आगळेवेगळे जंगल पिक

मी नेहमी असे मानतो की एखाद्या पत्रकाराने पूर्ण पान लेख लिहून जे सांगायचा प्रयत्न केलेला असतो ते एखादा छायाचित्रकार एका छायाचित्रातून आपल्याला जे हवे ते अधिक ठळकपणे सांगतो. एक फोटो कमाल करतो.

अनेकदा एखाद्या बातमीचे शीर्षक इतके चांगले असते की त्यामुळे बातमी चांगल्या पद्धतीने लक्षात येते. तसेच छायाचित्रकाराचे आहे. गेल्या काही वर्षांत मोबाईल क्रांतीमुळे जवळपास प्रत्येकजण छायाचित्रकार झाला / झाली, हे खरे असले तरी प्रत्येकाला उत्तम फोटो काढता येतेच असे नाही. त्यातही रोजच्या जीवनाशी निगडित फोटो काढणे, निसर्गात जाऊन सूर्योदय / सूर्यास्त किंवा उत्तम देखाव्याचे फोटो काढणे आणि जंगलात जाऊन वन्य प्राण्यांचे फोटो काढणे या प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या छायाचित्रणात कमालीचा फरक आहे. ते स्वाभाविकही आहे.

यात सर्वात कठीण काम आहे ते जंगलात जाऊन वन्य प्राण्यांचे फोटो काढणे. आपण प्राण्यांच्या अधिवासात जात आहोत त्यामुळे त्यांचे नियम पाळून फोटो काढायचे, हे लक्षात ठेवावे लागते. एखाद्या फोटोसाठी प्रसंगी अनेक तास वाट पाहावी लागते तर कधी थोड्या वेळात काही चांगले फोटो मिळू जातात. पण असे क्वचित होते. तरीही ‘नॉर्मल’ वाटणारे फोटो काढताना एखादा फोटो असा मिळून जातो की त्या दिवसांचीच नव्हे तर आपले करिअर सार्थकी लागले असे वाटून जाते. सामान्य माणूस म्हणून आपण हे फोटो जेव्हा बघतो तेव्हा छायाचित्रकारांच्या मेहनतीची कल्पना आपल्याला येत नाही. फोटोचे कौतुक करून आपण मोकळे होते. तो फोटो आपल्या लक्षात राहतो एवढे मात्र खरे.



असे लक्षात राहणारे अनेक फोटो काढण्याची संधी श्रीमती ऋता कळमणकर याना मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. वयाच्या चाळिशीनंतर कॅमेरा हाती घ्यायचा आणि छायाचित्रणासाठी जंगल आणि वन्य प्राण्यांची निवड करायची आणि एकापेक्षा एक सरस असे फोटो काढायचे हे काम सोपे नाही. त्यासाठी वन्य जीवनाविषयी मनापासून प्रेम असावे लागते. उत्तम फोटो मिळावा यासाठी कमालीचा संयम असावा लागतो. कधी, कसा आणि कोणत्या प्राण्याचा उत्तम फोटो मिळेल हे सांगता येत नाही. त्यासाठी सतत अलर्ट राहावे लागते. हे सारे काम सोपे नाही. ऋता कळमणकर यांनी नुकतेच ‘जंगल पिक’ नावाने एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. पुस्तकात हे ‘कॉफी टेबल बुक’ असल्याचा उल्लेख काही राजकीय नेत्यांनी केला आहे. पुस्तकाचा फॉरमॅट तसा असला तरी या पुस्तकाला ‘जंगलकोश’ किंवा विकिपीडियच्या धर्तीवर ‘जंगलपिडीया’ असे म्हणावे असे वाटते. बरीचशी ‘कॉफी टेबल बुक’ ही शोभेची असतात. तसे हे पुस्तक नाही. हे पुस्तक आपण वाचया / बघायला लागलो की याची जाणीव होते.

 

इथे मुद्दाम पुस्तकाची अनुक्रमणिका देत आहे. म्हणजे पुस्तकातील विषयांचे वैविध्य लक्षात येईल. ही सारी छायाचित्रे ही केवळ दहा बारा वर्षांची कमाई आहे, हे बघून आपण थक्क होतोच. पण एवढ्या कमी काळात इतके वैविध्य कसे अनुभवता आले याची कौतुक वाटते. मी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये असताना त्यांनी जवळपास अडीच वर्षे या विषयावर उत्कृष्ट लिखाण केले. वृत्तपत्रीय जागेच्या मर्यादेमुळे त्यांनी दिलेले फोटो कमी आकारात प्रसिद्ध होत होते, तरी या लिखाणाचे / फोटोंचे वाचकांनी मनापासून स्वागत / कौतुक केले होते.



ऋता कळमणकर याना छायाचित्रकार का व्हावेसे वाटले हे त्यांनीच पुस्तकाच्या प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे. त्या म्हणतात – ”हा छंद जिवाला लावी पिसे,’ या एका वाक्यात छंदाचं किती मार्मिक वर्णन केलंय. दैनंदिन आयुष्याच्या रहाटगाडग्यात आपण जोपासलेला एखादा छंद सुरेल संगीतासारखा आनंद देऊन जातो. फोटोग्राफीने मला माणूस म्हणून समृद्ध केलं प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन दिला. या अतिशय प्रभावी अशा माध्यमाने मला निसर्गातील चल-अचल गोष्टींचा आदर करायला शिकवलं. या निमित्ताने मला विविध देशातील वन्यजीवन पाहण्याची संधी मिळाली. अप्रतिम वनवैभव डोळ्यात साठवता आलं. मानवनिर्मित सीमारेषा न पाळणारे प्राणी, पक्षी, जलचर हे सर्व त्या सीमारेषांच्या संकुचितपणाची जाणीव देऊन गेले. व्हिक्टोरिया आणि इग्वासू फॉल्स पाहताना निसर्गाच्या या अतिप्रचंड, अतिसुंदर अस्तित्वासमोर माणूस किती छोटा आहे हे जाणवलं . चहुबाजूंनी उधळलेला निसर्ग न्याहाळताना शब्दावाचूनही बोलता येतं हे समजलं . अचूक आणि वेगवान निर्णय क्षमता, धाडसी वृत्ती या गुणांना प्रोत्साहन मिळालं. गजबजलेल्या शहरापासून दूर, कधी हिरव्यागार जंगलातून, लांबच लांब पसरलेल्या गवताळ कुरणात तर कधी घनदाट झाडीत, कधी बर्फाच्छादित प्रदेशात, निर्मनुष्य पोलार प्रदेशात, वाळवंटात, अप्रतिम सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची सधी मिळाली पोलार प्रदेशात तासन्तास जहाजाच्या डेकवर उभे राहून निःशब्दपणे सभोवतालचा परिसर पाहताना ईश्वराची किमया कळत गेली अनोळखी प्रदेश, अनोळखी लोक, त्यातच भेटणारा एखादा जिवलग, प्रसन्न सकाळ, निवांत दुपार, हुरहूर लावणारी संध्याकाळ प्रत्येक दिवशीचा वेगळा फोटोग्राफीचा अनुभव, वेगळी आव्हाने, प्रत्येक फोटोमागे वेगळी गोष्ट. उत्तम फोटो मिळावा म्हणून केलेली मेहनत, तो फोटो मिळवून देणारा क्षण… प्रत्येक फोटोमागील आठवणी हा खरंतर माझा आयुष्यभर पुरेल असा खजिना ! कधीही उघडावा आणि मनसोक्त पाहावा. जुने फोटो काढून नव्याने प्रोसेस करावेत हा नेहमीचा उद्योग! यातच एके दिवशी महाराष्ट्र टाइम्ससाठी ‘जंगल पिक’ हा कॉलम लिहायला सुरुवात केली. लिहिता-लिहिता मला नव्यानं सगळं उलगडत गेलं अडीच वर्ष सातत्याने कॉलम लिहिला त्यासाठी विद्यार्थीदशेत जाऊन अभ्यासही केला. म्हणूनच म्हणते, फोटोग्राफीने मला सर्वार्थानं समृद्ध केलं हा खजिना वाचकांसमोर उलगडताना एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. पुस्तक हे प्राणी आणि पक्ष्यांसारखंच सगळ्या सीमारेषा ओलांडून प्रवास करतं. डाव्या आणि उजव्या पानावर एकाचवेळी आपण वेगवेगळ्या देशांच्या प्राण्यांचे फोटो पाहू शकतो आणि त्यांच्यातल्या रंगांचा, प्रकशाच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटू शकतो हे फोटो पाहताना वाचकांचे काही क्षण जरी निसर्गाचं अद्भुत सौंदर्य अनुभवण्यात, आनंदात गेले तर आजवरची सर्व मेहनत फळाला आल्याचं समाधान लाभेल!”




अनुक्रमणिकेवर नजर टाकली तर किती पक्षी – प्राण्यांबाबत लिहिले आहे / फोटो आहेत हे लक्षात येतेच आणि प्रत्यक्ष मजकूर वाचताना या प्राण्यांचे भावविश्व अनेकविध पद्धतीने उलगडत जाते. मनुष्यप्राण्यापेक्षा वेगळे म्हणजे अत्यंत निस्वार्थी असे हे प्रेमळ भावविश्व आहे. (आता माणूस त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करू लागला असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत हा भाग वेगळा. आपण प्राण्यांच्या राहण्याच्या जागा नष्ट करायच्या आणि ते भूक भागविण्यासाठी मानवी वस्तीत घुसले की त्यांनाच दोष द्यायचा हे सध्या चालू आहे). या भावविश्वाशी दाखल सुंदर पद्धतीने ऋता कळमणकर यांनी घेतली आहे. त्या खेळावं फोटो काढून थांबल्या नाहीत तर त्या प्राण्याचा सखोल अभ्यासही केला. थोडक्या शब्दांत तो या पुस्तकात मांडला आहे. त्यांनी सर्व प्राणी , पक्षी यांचे फोटो काढले असले तरी वाघ, सिंह, बिबळ्या यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम आहे हे जाणवते. यापैकी बिबळ्याबाबत त्या काय म्हणतात?
”बिबळ्या ही प्राण्यांमधील चपळ,  निर्भय व सावध जात आहे. बिबळे आकाराने वाघ सिंहापेक्षा लहान असले तरी क्रूरपणे लढत देण्यात पटाईत असतात. खंडकाळ, डोंगराळ भागात राहण्याकडे त्यांचा कल असतो. अंगावर काळे ठिपके, सडपातळ सुंदर शरीर असणारे हे प्राणी दिवसभर गुहेत किंवा घनदाट झाडीत लपून बसतात, शिकारीसाठी शक्यतो रात्री एकट्याने बाहेर पडतात झाडाच्या फांदीवर किंवा पाणवठ्यावरच्या खडकात बेमालूमपणे लपून योग्य वेळेची वाट पाहतात. हरणे, माकडे, गुरे, ढोरे यांची मुख्यतः शिकार करतात. शिकार केल्यावर ती ओढत झाडावर नेतात. झाडावर झपाझप चढण्यात निपुण असतात. यामुळे आपल्या वजनाच्या दुप्पट वजन झाडाच्या वरच्या फांद्यांपर्यंत सहज ओढून नेऊ शकतात. पट्टीचे पोहणारे असल्यामुळे पाण्यातील मासे व खेकडेही पकडून खातात. बिबळ्याची मादी एका वेळेस साधारण एक ते तीन पिलांना जन्म देते. यांचे आयुष्यमान साधारण १५ ते १७ वर्षाच्या दरम्यान असते. बिबळ्या हाही वाघाप्रमाणे ठरावीक भूप्रदेशात एकटाच राहणारा प्राणी आहे. झाडावर नखाने ओरखडे काढणे व युरिन स्प्रे करणे इत्यादींच्या साहाय्याने स्वतःच्या क्षेत्राच्या सीमा इतरांसाठी प्रदर्शित करतात. मादीचे वजन ६०-१०० पौंड तर नराचे वजन ८०-१५० पौंड असते. तर सरासरी उंची २६-२८ इंच असते. आफ्रिकन आणि भारतीय बिबळ्या बऱ्याच प्रमाणात सारखा दिसतो. परंतु भारतातील बिबळ्याच्या अंगावरील ठिपके गडद काळे असतात. त्यामानाने आफ्रिकनचे ठिपके थोडे फिके असतात. आफ्रिकन बिबळ्या आकाराने भारतीय बिबळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. ब्लॅक लेपर्डच्या अंगावर ठिपके दिसत नाहीत. फर काळी असते. याला ब्लॅक पँथरही म्हणतात. अतिशय सुंदर मोठे मोठे डोळे, चपळ देखणे शरीर असलेला हा प्राणी खडकात, झाडावर बेमालूमपणे लपतो. अजिबात दिसत नाही. संध्याकाळ मात्र एखाद्या टेकाडावर बसून घालवायला याला आवडते. बिबळ्याचे नर व मादी एकेकटेच राहतात. फक्त प्रणयासाठी काही काळ एकत्र घालवतात. या सुंदर प्राण्याची त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कातडीसाठी तसेच त्याच्या अवयवांसाठी शिकार होते. भारतातील राजस्थान, मध्यप्रदेश, दक्षिण भारत, उत्तरप्रदेश येथील जंगलात बिबळ्या सर्रास दिसतो. अन्नाच्या स्पर्धेमुळे याचे वाघाशी वैर असते. श्रीलंकेचे ‘याला जंगल’ बिबळ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे केनियातील ‘सांबुरू’चे जंगलही बिबळ्याचे खास वसतिस्थान आहे. माणसाने जंगलावर केलेल्या अतिक्रमणामुळे हा प्राणी धोक्यात आहे. ठाणेवासीयांना हिरानंदानी इस्टेट व खोपट इथे मानवी वस्त्यांत शिरलेले बिबळे माहीतच आहेत. याचे कारण इथून जवळच असलेले येऊरचे जंगल. फोटोग्राफीसाठी अतिशय कठीण प्राणी असे बिबळ्याला म्हणता येईल. हा प्राणी एवढा चपळ आहे की कॅमेरा उचलेस्तोवर तो नाहीसाही होतो. सांबुरूच्या जंगलात खुरट्या झुडुपांमध्ये लपलेला बिबळ्या अजिबात दिसत नसे तेव्हा तिथल्या गाइडने सांगितले की चालताना त्याचे शेपूट वर असले तर ते हलताना दिसते व त्याचमुळे त्याचे अस्तित्व लक्षात येऊ शकते. मग आम्ही सतत लक्ष ठेऊन होतो. परंतु हा प्राणी फार सहजरित्या कॅमोफ्लॅज होतो.”


फोटोग्राफी करताना कसे अनुभव येतात? एक उदाहरण म्हणून सिंहिणी , तिची पिल्ले आणि बिबळ्या यांच्या संदर्भातील एक लेख वाचल्यासारखा आहे. त्या म्हणतात – ‘गोल्डन लाइट’मध्ये आम्ही समसाईमाराच्या जंगलात ‘मार्श प्राइड’ या सिंहाच्या समूहाचे छायाचित्रण करत होतो, एका समूहात सामान्यपणे एक ते दोन नर आणि तीन ते चार माद्या असतात. एक सिंहीण हजर नसेल तर दुसरी सिंहीण स्वतःच्या पिलांसोबत तिच्याही पिलांची काळजी घेते. एखाद्या संयुक्त कुटुंबाप्रमाणे ते सर्व राहतात. आमच्यासमोर कोवळ्या सूर्यप्रकाशात एक सिंह, दोन सिंहिणी व एक छावा बसले होते. बाकी समूह झाडाखाली विश्रांती घेत होता. अतिशय सुंदर असे ते दृश्य होते. सूर्यकिरणामुळे सिंहांची कातडी झळाळून उठली होती. एक छावा त्याच्या आईच्या अंगावरून इकडून तिकडे उड्या मारत मध्येच दूर उभ्या असलेल्या वाहनांकडे अतिशय चिकित्सक नजरेने पाहत होता.  इतक्यात आमच्या गाडीच्या पाठीमागे एकदम गडबड ऐकू आली. पाहतो, तर बिबळ्याची मादी एका रानटी डुकराचा पाठलाग करत होती. कॅमेरा सेट करेपर्यंत आमची खूपच धांदल उडाली. तरी फार चांगले फोटो मिळालेच नाहीत. त्याची हुरहूर खूप काळ वाटत राहिली. पुन्हा सिंहाच्या समूहाकडे वळलो, काही फोटो घेऊन परत जाण्यासाठी वळलो तर अगदी थोड्या अंतरावर एक स्थानिक माणूस आमच्या ड्रायव्हरला स्वाहिली भाषेत काहीतरी सांगत होता. बोलता बोलता ते दोघे जवळच्या झाडाकडे पाहू लागले. आम्हीही पाहिले तर दीड एक वर्षाचे बिबळ्याचे पिल्लू झाडावर बसले होते. त्याची आई आम्ही नुकतीच पाहिली होती. ती बहुधा शिकारीसाठी बाहेर पडली असावी. तिच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. आमचा ड्रायव्हर म्हणाला की ती तिच्या बछड्याला बोलावत आहे. परंतु खाली सिंहांचा समूह असल्यामुळे तो झाडाखाली उतरू शकत नव्हता. वरच अडकून पडला होता. त्याने दोनएक वेळा उतरण्याचा प्रयत्न केला, पण हिंमत न झाल्याने पुन्हा फांदीवरच बसून राहिला. काही वेळाने आणखी मोठ्या फांदीवर उभा राहून लांबवर दिसणाऱ्या त्याच्या आईकडे पाहत राहिला. त्या दरम्यान मला त्याचे सुरेख फोटो मिळाले. २००-४०० मिमी निकॉन लेन्स वापरून जास्तीत जास्त फोटो काढण्याचा प्रयत्न केला तोवर सिंहाचा समूह निवांत झोपला होता मग तिसऱ्या प्रयत्नात बिबळ्या झाडावर मागच्या बाजूने लपतछपत उतरला आणि झाडीत नाहीसा झाला. आम्हीही मग ब्रेकफास्टसाठी हॉटेलवर परतलो. माझ्या संग्रही माझा पहिला बिबळ्याचा फोटो आला होता. बोनस म्हणून सिंहिणीचे पिल्लू तिच्या पाठीवर प्रेमाने बसलेले असा एक मायलेकराचा फोटोही मिळाला. फोटोग्राफी म्हणजे प्रकाशाचा खेळ सकाळच्या कोवळ्या किरणांमुळे निसर्ग अधिकच रम्य व प्रफुल्लित भासतो. तिन्ही सांजेचा ड्रॅमॅटिक लाइट आणि समोर तुमचा आवडता प्राणी, पक्षी.. बास् एखाद्या छायाचित्रकारासाठी यापेक्षा अधिक सुख ते कोणते…”

दहा बारा वर्षांच्या अल्पावधीत केवळ भारतातच नव्हे तर परदेशातील प्राणिविश्व कॅमेऱ्यात बंदिस्त करायला मिळणे आणि त्या संधीचे सोने करणे ही साधी बाब नाही. पुस्तक वाचताना / बघताना हे सतत जाणवत राहाते. पुस्तकात अनेक ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी दिलेले QR कोड हे पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

प्रत्येक फोटोग्राफी-प्रेमींकडे आणि वन्य प्राण्यांवर प्रेम करणाऱ्याच्या संग्रही हा ‘जंगलकोश’ असायलाच हवा असे वाटते. ऋता कळमणकर यांची एक मुलाखत जरूर बघा. लिंक – https://youtu.be/O89LhApln_Q?si=zAjVqot9XMewwYW9

 

 
पुस्तकाची संकल्पना, छायाचित्रे, संपादन, लेखन – ऋता कळमणकर. मुद्रक, प्रकाशक – मीडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट (इं )प्रा. लि , मुंबई . पुस्तकासाठी संपर्क – ९८१९९०९२९२

टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण पुस्तक आहे, यासाठी घेतलेली
    चोहोबाजूची मेहनत झक्कास.
    आर्थिक बाजू चांगली असल्यामुळे पुस्तकाचा दर्जा उत्तम.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा