मनोरंजन नव्हे, प्रबोधन !


मुं
बईतील लोकल रेल्वे सेवा ही बहुसंख्य लोकांसाठी अत्यावश्यक सेवा आहे. मुंबईत राहणाऱ्या आणि पुढे अगदी कर्जत, कसारा, पश्चिम रेल्वेवर पालघरपर्यंत राहणारे लोक पोट भरण्यासाठी मुंबईत येताना प्रामुख्याने या लोकलचा वापर करतात. मेट्रोचे जाळे वाढत असले तरी ते अजून सर्वसमावेशक झालेले नाही. अन्य सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणाव्या अशा प्रभावी नाहीत. अशा वेळेस लोकलशिवाय पर्यायच नसतो. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, त्यांना अपुऱ्या पडणाऱ्या गाड्या, अतिताणामुळे यंत्रणेचे वारंवार कोलमडणे यासारख्या अडचणींवर मात करून सर्व प्रवासी प्रवास करत असतात. प्रवासाचा कालावधी कमी असेल तर भाग वेगळा, परंतु जास्त असेल तर अडचणीही जास्त. गाडीत शिरायला मिळाले तर भाग्य असे म्हणायची पाळी काही वेळेस येते. अशा गर्दीत डब्यात शिरून भजनांमध्ये दंग व्हायचे आणि नकळत इतरांनाही सहभागी करून घ्यायचे हे तसे दिव्य काम. बरे, सगळ्यांनाच ती भजने ‘आवडतील’ अशातला भाग नाही. अनेक जण घरगुती कारणांमुळे, कार्यालयीन कामाच्या तणावामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे त्रासलेले असतात. अशा वेळेस त्यांना डब्यातून प्रवास करताना शांतता हवी असते. त्यामुळे ती मंडळी या भजनांना कावतात हे खरे आहे. तरीही, त्यांना सांभाळून घेऊन, त्यांच्या भावना न दुखावता, त्यांना त्रास होऊ न देता असंख्य भजनी मंडळे रोज प्रवासात संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज वगैरे संतांची तसेच इतरांची भजने म्हणून प्रवास सुखकर करण्याचा प्रयास करत असतात. मात्र ही भजने हा केवळ ‘टाईम पास’साठी म्हटली जातात असा प्रकार नसतो. त्यासाठी वारकरी संप्रदायाची वृत्ती अंगात असावी लागते. मनापासून श्रद्धा असावी लागते.


लोकसत्ता दैनिकाच्या युट्युब चॅनेलवर एका मालिकेत सिद्धी शिंदे ही अत्यंत गुणी पत्रकार अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सशी गप्पा मारताना त्यांचे विश्व उलगडून दाखवत असते. या मालिकेच्या ताज्या भागात तिने अशा भजनी मंडळींपैकी काही जणांना एकत्र आणले आहे. सगळी मंडळी ठाणे, डोंबिवली, कल्याण या भागातील होती.. वेगवेगळ्या गाड्यांमध्ये चढणारे, वेगवेगळ्या स्थानकांमध्ये उतरणारे, वेगवेगळ्या वयोगटाचे, स्त्री -पुरुष .. सगळे यात आहेत. समान धागा एकच. धार्मिक वृत्ती, भजनांची आवड, लोकांपर्यंत काहीतरी सकारात्मक पोचवण्याची तळमळ ! काही भजनी मंडळे २५ वर्षे काम करत आहेत. काही कोविड काळानंतर जास्त कार्यरत झाली आहेत. संत सामाजिक रेल्वे प्रासादिक भजन मंडळ या नावाने एक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये (व्हीटी) कार्यरत असते. वारकरी संप्रदायातील नियमांचे उल्लंघन होऊ नये, भजने व्यवस्थित पद्धतीने व्हावीत म्हणून ही नोंदणी प्रक्रिया आवश्यक केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेतील भजनी मंडळांची नोंदणी केली जाते. आजमितीला पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ३५२ नोंदणीकृत भजनी मंडळे कार्यरत आहेत. कदाचित नोंदणी नसलेली आणखी काही मंडळेही असतील. अनेकजण एक किंवा अनेक भजनी मंडळांशी जोडले गेले आहेत. नेहमीची गाडी चुकली तर पुढची गाडी निवडताना त्यात एखाद्या भजनी मंडळांचा समावेश असला तरच चढायचे आणि मग त्या दिवसाचा प्रवास त्या भजनी मंडळाच्या साथीने करायचा, असा प्रघात असतो. वारकरी संप्रदाय हा सगळ्यांचा पाया असायला हवा हाच आग्रह असतो. हे सगळे ऐकल्यावर भजनी मंडळांचे विश्व काय आहे हे लक्षात येते.


सुहास बंडागळे, सुरेंद्र मंडलिक, अविनाश आंब्रे, सानिका कणसे , सौ. साधना पाटील, सदा लाडके, ऋतुराज दिवेकर, दशरथ कोंडावले यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. यांची भजने युट्युबवर उपलब्ध आहेत. त्यांची चॅनेल्स लाखो लोक फॉलो करतात. कदाचित त्यांना चांगले अर्थार्जनही होत असेल. प्रश्न तो नाही. त्या अर्थार्जनासाठी त्यांनी ही भजनी मंडळे अथवा युट्युब चॅनेल्स सुरु केलेली नाहीत. आज असंख्य इन्फ्लुएन्सर्स युट्युबचा वापर करून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत, काही चांगल्या कारणांसाठी तर काही चुकीच्या कारणांसाठी. अनेकजण लाखो रुपये कमवत आहेत. त्याबद्दल कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. पण एकंदरीत हा युट्युबचा मंचच असा आहे की त्यावर फार नियंत्रण ठेवता येत नाही आणि लोकांना काय आवडेल, काय नाही हेही निश्चित सांगता येत नाही. अशा परिस्थितीत युट्युबचा वापर कसा करायचा हे ज्यानेत्याने ठरवायचे आहे. अर्थात वर उल्लेखलेली भजनी मंडळे युट्युबवर फोकस करत नाहीत. त्यामुळे ते इन्फ्लुएन्सर्स नाहीत असे म्हणता येणार नाही.


सिध्दीने गोळा केलेली सगळी माणसे याच निःस्वार्थ भावनेने एकत्र आलेली होती. वेगवगेळ्या ठिकाणी राहणारी, आधी कोणताही संबंध नसलेली पण वारकरी संप्रदायाच्या प्रेमाखातर एकत्र आलेली मंडळी होती. हीच नव्हे तर इतर असंख्य मंडळी केवळ याच नात्याने एकत्र आलेली आहेत. त्यात अमराठी लोकही आनंदाने सहभागी झाली आहेत. त्यांच्या सहसा बातम्या होत नाहीत. भजनी मंडळांमुळे गाडीत त्रास होतो, आवाज सहन होत नाही, अशा तक्रारीच्या मात्र बातम्या होतात. अशा तक्रारींमध्ये अजिबात तथ्य नसते असे मी म्हणणार नाही. भजनी मंडळांनाही थोडे सामंजस्याने घ्यायला हवे. रेल्वेमधला प्रवास दिवसेंदिवस एवढा त्रासदायक होत चालला आहे की सांगणे कठीण आहे. एसी लोकलमुळे कदाचित काही थंडावा मिळत असेल, पण याहून तरी ती सगळ्यांच्या आवाक्यातील नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सामंजस्याने वागणे एवढेच आपल्या हाती आहे.

या साऱ्या मंडळींना एकत्र आणल्याबद्दल सिद्धीचे आभार. संपूर्ण व्हिडिओ पुढील लिंकवर पाहू शकाल.

https://youtu.be/wq9ykATeRvw?si=WxmC65w6X6UiXF_D


 

टिप्पण्या