पर्यटन महत्वाचे, पण …

 भारत हा निसर्गसौंदर्याने नटलेला देश आहे. परदेशातील रम्य ठिकाणे बघायच्या आधी संपूर्ण भारत बघितला तरी परदेशाचे आकर्षण कमी होईल अशी स्थिती आहे. ‘फोर्ब्स’ मासिकाने जगातील सर्वात सुंदर देशांची निवड जाहीर केली होती. त्यात पन्नास देशांमध्ये भारत सातव्या स्थानावर होता. The World Travel and Tourism Council या संस्थेने जाहीर केल्याप्रमाणे २०२१ मध्ये पर्यटन व्यवसायामुळे १३.२ लाख कोटी इतकी प्रचंड रक्कम उभी राहिली. ही रक्कम भारताच्या ठोकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५.८ टक्के आहे. या व्यवसायामुळे सव्वा तीन कोटी लोकांना रोजगार मिळाला. आता हे सारे आकडे आणखी वाढले असतील. साधारण तीन वर्षांपूर्वी सुमारे ६२ लाख परदेशी पर्यटकांनी भारताला पर्यटनासाठी पसंती दिली होती. . गेल्या तीन वर्षांत हाही आकडा वाढलेला असेल हे निश्चित. भारतात भारतीय लोकांकडून होणाऱ्या पर्यटनाचे आकडे मिळाले तर यावर अधिक प्रकाश पडेल. लहानमोठ्या ट्रॅव्हल कंपन्या पर्यटकांना विविध ठिकाणी नेट असतातच, परंतु त्यांचा आधार न घेता, त्यांच्या चौकटीत न अडकता स्वतःचे नियोजन स्वतःच करून फिरायला जाणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. थोडक्यात, पर्यटन हा विषय देशाच्या अर्थव्यवस्थेची तब्येत उत्तम ठेवण्यासाठी मदत करणारा आहे.

 

पर्यटन करताना ९९ टक्के पर्यटक योग्य पद्धतीने त्याचा आनंद घेत असले तरी काही वेळेस रंगाचा बेरंग होतो आणि अशा पर्यटनाला परवानगी द्यावी का असा प्रश्न निर्माण होतो. आपण जिथे जातो ती जागा स्वछ ठेवावी, तिचे पावित्र्य राखावे, ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपावा अशी अपेक्षा असते. तसे न झाल्यास पर्यटन स्थळांची अथवा तेथील अमूल्य ठेव्याची कायमची हानी होईल हे कोणी लक्षात घेत नाही. काही दिवसांपूर्वी ‘हिंदुस्थान टाइम्स’ दैनिकांमध्ये नीरज पंडित यांनी दिलेली बातमी वाचली. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये होणारा ‘काजवा महोत्सव’ पुढील वर्षांपासून बंद करावा अशी मागणी या महोत्सवाचे आयोजक अंबरीश मोरे यांनी सरकारकडे केली आहे. हा महोत्सव २०१२ पासून चालू आहे. भंडारदरा, अकोला, अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर येथे होतो. मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतात. या वर्षी २५ मे ते १५ जून या कालावधीत भंडारदरा येथे सुमारे ३५,००० पर्यटक आले होते. इतर ठिकाणी आलेले पर्यटक वेगळे. इतका प्रचंड आकडा असतानाही महोत्सव बंद करावा, असे का वाटले? मोरे यांच्या म्हणण्यानुसार, पर्यटकांमुले होणारा त्रास कमालीचा वाढला आहे. काजव्यांच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्जुन आणि बेहेडा झाडांचे अतोनात नुकसान होत आहे. शिवाय उडू न शकणाऱ्या आणि जमिनीवरच वाढणाऱ्या काजव्यांचाही नाश होत आहे. हे काजवे मारले जात असल्याने नवीन काजव्यांची उत्पत्ती खूप कमी होत आहे. पर्यटक महोत्सवाच्या जागी आल्यावर अगदी डीजे वापरून मोठ्याने संगीत लावतात, काजव्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या कारणांमुळे काजव्यांची संख्या कमी होत आहे. पर्यटकांनी हे लक्षात घ्यायला हवे.

अंबरीश मोरे यांनी या महोत्सवासाठी एमटीडीसीशी करार केला आहे. महोत्सवामुळे पर्यटकांकडून चांगले उत्पन्न मिळते आणि स्थानिकांना रोजगारही मिळतो, पण पर्यटक ज्या पद्धतीने वागतात ते पाहता हा महोत्सव बंद केलेला बरा असे त्यांना वाटते यात नवल नाही. एकवेळ अशी येईल की काजवेच उरणार नाहीत, मग कसा महोत्सव आणि कसले काय अशी परिस्थिती येईल. अन्य निसर्गप्रेमीही मोरे यांच्या मतांशी सहमत असतील. पुढच्या वर्षी कदाचित सरकार पर्यटकांची संख्या मर्यादित करण्याचा प्रयत्न करील, त्यांच्या बेबंद वागणुकीवर नजर ठेवील. परंतु त्याला मर्यादा आहेत. शेवटी पर्यटकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल.

पर्यटकांच्या वागणुकीचा फटका फक्त काजव्यांना बसतो आहे असे नाही. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात काही पर्यटक वाघांना कसे त्रास देतात याच्या बातम्या नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यावेळी तात्पुरती कारवाई होते. लोकसत्ता दैनिकात राखी चव्हाण या ताडोबा व्याघ्रप्रकल्प आणि एकूणच वन्यजीवांविषयी सतत लिहीत असतात. त्यांची २८ मे २०२४ रोजी यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला होता. त्या लिहितात, ‘ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटक वाहनांनी वाघाला घेरल्याची घटना ताजी, पण असे प्रकार आधीदेखील उघडकीस आले आहेत. वन्यजीव संरक्षण कायद्याची पायमल्ली याच नव्हे, अन्यही व्याघ्रप्रकल्पांत कशी काय होत राहाते? ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील प्रकरणात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाले, कारण वाघ हा या कायद्यामधील ‘अधिसूची एक’मध्ये येणारा वन्य प्राणी आहे. या कायद्यातील कलम २७ (४) अंतर्गत संरक्षित क्षेत्रात वन्यप्राण्यांना यातना पोहोचवणे हा गंभीर गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास अटक करून फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच पर्यटक वाहने जप्त करावी, असे नियम आहेत. शिक्षा म्हणून सुमारे ५० लाख रु.पर्यंतच्या दंडाची तरतूद यात आहे…… राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए-नॅशनल टायगर कन्झर्वेशन अॅथॉरिटी) भारतातील प्रत्येक व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यात पर्यटनासाठी मार्गदर्शक सूचना आखून दिल्या आहेत. त्यानुसार वन्यप्राण्यांपासून पर्यटक वाहन किमान २० फूट अंतर असणे आवश्यक आहे. तसेच वाहन एकाच ठिकाणी पाच मिनिटांपेक्षा अधिक उभे ठेवता येत नाही. वाघ पाणवठ्यावर पाणी पीत असेल, वाघांची झुंज होत असेल, त्यांच्या विणीची प्रक्रिया सुरू असेल तरीही पर्यटक वाहन पाच मिनिटांच्या आतच त्याठिकाणाहून समोर न्यावे लागते. पर्यटक वाहनाची गती २० किलोमीटर प्रतितासपेक्षा अधिक नको. प्रत्येक व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारातून जाणाऱ्या पर्यटक वाहनांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील गाभा क्षेत्रातील वाहनांची क्षमता १२५ आहे. मात्र, या मर्यादेचे देखील ताडोबात उल्लंघन झाले आहे.”. याच लेखात ताडोबातील प्रशासनावरही ताशेरे ओढले आहेत.

हा सारा प्रश्न केवळ काजवे अथवा वाघांचा नाही. फक्त वन्य प्राण्यांचाही नाही. आपण जिथे पर्यटनासाठी जातो तेथील नियम पाळून वागावे एवढे साधे समाजात नसेल तर मग कठीण आहे. ९५ टक्के पर्यटक हे नियम पाळतात, पण इतरांमुळे नुकसान होते ते होतेच. अभयारण्य असो, ऐतिहासिक वारसा असणारी स्थळे असोत, अथवा निसर्गसौंदर्य असो, ते जपण्याची आपलीही जबाबदारी आहे, हे कधी लक्षात येणार? अलीकडे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संदर्भातील अस्वस्थ करणाऱ्या बातम्याही वाचायला मिळतात. या गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व न लक्षात घेता तिथे फक्त मजा करायला जायचे, कचरा करायचा, प्लॅस्टिकच्या अथवा दारूच्या बाटल्या फेकायच्या असे प्रकार आढळायला लागले आहेत. हे प्रमाण किती कमी/जास्त आहे याची कल्पना नाही. परंतु मुळातच ते होणे चुकीचे आहे, हे सर्वांच्या लक्षात यायला हवे. परदेशात जाऊन असे बेबंद वागून दाखवा, म्हणजे काय होते ते लक्षात येईल.
भारतातील अनेक शहरांना ऐतिहासिक महत्व आहे, तेथे उत्तमोत्तम वास्तू आहेत, त्या जपण्याची जबाबदारी केवळ सरकारची आहे असे मानण्याचे कारण नाही. विविध कारणांमुळे होणारी निसर्गाची होणारी हानी हा तर अगदी वेगळा पण तितकाच गंभीर विषय आहे. हे सगळे आपणच जपले नाही, तर कोण जपणार? की पर्यटनातून मिळणारा महसूल महत्वाचा आहे, म्हणून सर्वानी दुर्लक्ष करायचे ?

टिप्पण्या