स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करणारा कलाकार !


षाढी एकादशी आली की ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वाचक त्या दिवशीच्या अंकाची वाट बघतात. बातम्यांसाठी नव्हे तर गेली काही वर्षे दोन पाने भरतील इतक्या आकाराचे (आमच्या भाषेत ‘पॅनो ‘) विठ्ठल राखुमाईचे अप्रतिम चित्र पाहायला. कोणतेही वर्तमानपत्र घरात आल्यावर अर्ध्या दिवसांत ‘शिळे’ होते हे खरे असले तरी विठ्ठल राखुमाईचे अप्रतिम चित्र जपून ठेवणारे असंख्य वाचक आहेत हे लक्षात घ्यायला हवे. हे चित्र काढणारा कलाकार आज अवघ्या महाराष्ट्रात / देशात प्रसिद्ध आहे. त्याचे नाव रोहन पोरे. विठ्ठल रखुमाईचे ‘पॅनोरमा’  चित्र अनेकजण घरी फ्रेम करून लावतात. काहीजण तर रेल्वे डब्यात हे चित्र लावून विठ्ठल रखुमाईची पूजा करतात.




अलीकडेच ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मायमराठी उत्सव मराठीचा’ या नावाने महोत्सव आयोजित केला होता. त्यात रोहनचा विशेष सहभाग होता. मटामध्ये प्रकाशित झालेल्या निवडक ४० व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन मुंबईत टाइम्स इमारतीत भारावले होते. त्यावेळी मान्यवरांकडून रोहनचे कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे वाचकांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. रोहनने काढलेले  २०२४चे चित्र मुद्दाम इथे देत आहे. रोजच्या अंकात, रविवार पुरवणीत आणि दिवाळी अंकात रोहनने काढलेली चित्रे पाहणे हा निखळ आनंद असतो. त्या चित्रातून त्या-त्या माणसाचे जे व्यक्तिमत्व प्रदर्शित होते ते विलक्षण असते.


रोहन स्वभावाने अत्यंत शांत आहे. पण चित्र काढताना त्याचा हात ज्या वेगाने चालतो ते प्रत्यक्ष पाहण्यासारखे आहे. आजच मटामध्ये काढलेले विठ्ठल रखुमाईचे चित्र सोबत दिले आहे.



रोहन वर्तमानपत्रात काम करतो. चित्र काढायला सांगितल्यावर , उद्या-परवा देतो ‘ असे म्हणता येत नाही. लगेच चित्र काढून द्यावे लागते. त्यामुळे कामात वेग आणि अचूकता दोन्ही असावी लागते. ते गुण त्याच्याकडे आहेत. सांगितलेली चित्रे काढणे हे काम तो करतोच, पण एखाद्या विषयावर (उदा. अर्थसंकल्प आणि तशासारखे विशेष दिवस) स्वतः विचार करून समर्पक चित्र तो काढतो.नमुन्यादाखल त्याची काही चित्रे इथे देत आहे. त्याने काढलेली गेल्या पाच वर्षांतील विठ्ठल रखुमाईची चित्रे देत आहे. आहेत विठ्ठल रखुमाईच, पण चित्रातले वैविध्य बघा.

 

मी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये असताना एक ज्येष्ठ व्यक्ती निवृत्त होणार होती. निवृत्तीच्या आसपास त्यांना त्यांचे एक पोर्ट्रेट काढून भेट द्यावे असे ठरले. पोर्ट्रेट कोण काढणार हे वेगळे ठरविण्याचे कारण नव्हते. तो माणूस ‘मटा’कडे आहेच. त्याने ते पोर्ट्रेट काढले. त्या ज्येष्ठ व्यक्तीला ते भेटही देण्यात आले. चित्र अप्रतिम असल्याने त्यांच्यासह सगळ्यांनाच ते आवडले. पोर्ट्रेट इतके हुबेहूब होते की फ्रेममध्ये फोटोच चिकटवला आहे असे वाटावे. काही दिवसांनी ती व्यक्ती मला टाइम्स इमारतीतच भेटली. ते म्हणाले, तो माझा फोटो आहे की पोर्ट्रेट ? फोटोच काढून पोर्ट्रेट म्हणून दिला आहे ना ? शेवटी त्यांना सांगितले, ”ते चित्र काढताना मटामधले अनेक सहकारी पाहात होते, ते पोर्ट्रेटच आहे, तुमचा फोटो चिकटवलेला नाही”. या उत्तरावर त्यांचा विश्वास बसला नाही हे माझ्या लक्षात आले. ‘तुम्ही मटा कार्यालयात या, तो तुमचे परत चित्र काढेल, मग तर विश्वास बसेल ना,” असे विचारल्यावर मात्र ते शांत झाले. त्या व्यक्तीच्या मनात शंका आली हे काही चूक नाही.  रोहन पोरे  ज्या वेगाने चित्र काढतो ते पाहून अचंबित व्हायला होते. एके दिवशी त्याने अवघ्या काही तासांत तिघांची चित्रे काढून हातात ठेवली होती. तेव्हा मलाही ते फोटो की पोर्ट्रेट, असा प्रश्न पडला होता.

 


रोहनसारखे कलाकार विरळाच. पोर्ट्रेट काढणे ही कला आहे, सगळ्यांना ती जमत नाही. त्याची व माझी पहिली भेट झाली तेव्हा त्याचे काम पहिले. मग मटासाठी निवड ही फक्त औपचारिकता उरली होती. ”मी याआधी कुठेही नोकरी केली नाही, त्यामुळे इथे कसा राहीन माहीत नाही,” असे मला म्हणणारा रोहन नुसताच राहिला नाही, तर स्थिरावला. स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून राहिला. रोहनला पुढील अनेक चित्रांसाठी शुभेच्छा. त्याची कला अशीच बहरत जावो या सदिच्छ !.

टिप्पण्या