त्या दोघांमधला 'दुवा'

 महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था विविध स्तरांवर काम करत आहेत. समाजाचे भले व्हावे यासाठी समविचारी लोकांच्या मदतीने चांगल्या कामाचे जाळे उभारत आहेत. पुण्यातील 'दुवा' ही अशीच एक संस्था. तिच्या कामाचा हा परिचय. अधिकाधिक लोक त्यात सहभागी होतील आणि हा 'दुवा' बळकट करतील अशी अपेक्षा आहे. 

      


 
जगात अनादि काळापासून ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असा भेद दिसून येतो. माणूस जसा सुसंस्कृत व्हायला लागला तसं त्याला ही दरी जाणवायला लागली आणि त्यातून या २ वर्गांना जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. पुण्यात काम करणारी ‘दुवा’ नावाची एक संस्थाही याच दृष्टीकोनातून निर्माण झाली.

        ‘आहे रे’ गटाकडे संसाधनांची विपुलता असते तर ‘नाही रे’ गट किमान गरजा पुरवण्यासाठी धडपडत असतो. त्यातून दुवा संस्थेच्या संचालिका अर्चना गोगटे यांना असं वाटून गेलं की जिथे आहे तिथून, जिथे नाही तिथे जाण्यासाठी एखादा ‘दुवा’ साधता येईल का? सधन घरातली वापरण्यायोग्य अशी भांडी, कपडे, खेळणी, पुस्तकं ज्यांना पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत पोचवता येतील का? आहे रे गटालाही अशा स्वरूपाचे समाजाचे देणे देण्याची इच्छा असते पण वैयक्तिक स्तरावर असा संपर्क साधण्यासाठी अडचणी असतात.

      


 
त्यातून मग अर्चनाताई आणि त्यांच्या ६ समविचारी मैत्रिणींनी २० ऑगस्ट २०२१ला ‘दुवा’ संकलन संवर्धन केंद्र या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. एका बाजूला घरातल्या वापरण्यायोग्य पण गरज नसलेल्या वस्तू गोळा करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला अशा वस्तूंची गरज असलेल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या संस्थांची माहिती गोळा करायला सुरुवात झाली. आणि या दुव्याची जोडणी होत गेली.

        या वस्तूंच्या संकलनात सर्वात जास्त गोळा होतात ते कपडे. त्यातही २ XL, ३ XL आकाराचे किंवा पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे संस्थाना पाठवता येत नाहीत. मग या कपड्यांचं करायचं काय? हा यक्ष प्रश्न उभा राहिला. त्यातून मग या कपड्यांच्या कापडाचा पुनर्वापर करायची कल्पना पुढे आली. सुरुवातीला या कपड्यांपासून भाजीच्या साध्या पिशव्या बनवायला सुरुवात झाली. आणि बघता बघता या छोटेखानी upcycling प्रकल्पाचे रोप चांगलंच फोफावलं. आता पायपुसण्यापासून ते shopping bags, mobile charger holder, sanitary pad holders, travel pillow, बटवे, तोरणं, table mats अशा सुमारे ५७ प्रकारच्या कलात्मक वस्तू तयार व्हायला लागल्या. अगदी वापरलेल्या फ्लेक्सपासून रोपं लावण्यासाठी grow bags ही बनवल्या जातात. या कलात्मक गृहोपयोगी वस्तूंची देशविदेशात विक्री होते आहे. भाजीच्या पिशव्या बनवणाऱ्या २ महिलांपासून सुरुवात झालेला हा उपक्रम आज १५ महिलांना रोजगार देतो आहे आणि त्याबरोबरच कपडे, फ्लेक्स यांच्या पुनर्वापरातून निसर्ग संवर्धनालाही हातभार लागतोय.

      


 
शिवणकामातली दुवाची गुणवत्ता पाहून पुणे महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहांनी नुकत्याच जन्मलेल्या बाळांसाठी झबली, टोपडी, लंगोट यांची ऑर्डर द्यायला सुरुवात केली आहे आणि हे काम मुळशी तालुक्यातील बचतगटातील महिला पूर्ण करत आहेत.

        अनेक सोसायट्यातून, सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी, भिशीच्या वेळी, दुवा संस्था आपला विक्रीचा स्टॉल लावते. त्यातून मोठ्या प्रमाणावर विक्री होते आणि संस्थेच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार तर लागतोच पण त्याशिवाय नवीन हितचिंतकही जोडले जातात.

        


हे काम करत असतानाच जिथे जिथे, ज्या ज्या प्रकारे दुवा सांधणं शक्य होतं, तिथे तिथे दुवाने पोचायला सुरूवात केली. काही हितचिंतकांनी दुवाचं हे काम पाहून आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त केली कारण ही मदत दुवा योग्य ठिकाणी पोचवेल अशी त्यांना खात्री होती.

त्यातून 'दुवा'नं आपलं स्वरूप विस्तारलं –

शिक्षण क्षेत्रात “ दुवा”

  • विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल बँक - अनेक घरातून चांगल्या सायकली पडून असतात. अशा सायकली गोळा करून आणि त्यात काही नवीन सायकलींची भर घालून दुवाने विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक योजना सुरु केली. सुरुवात पुण्यातील विजयमाला कदम कन्याशाळा इथल्या विद्यार्थिनींपासून झाली. आता यावर्षी ज्ञानदा प्रतिष्ठान प्रशालेतील १८ मुलामुलींना या उपक्रमात सहभागी करून घेतलं आहे. जून पासून एप्रिलपर्यंत मुल या सायकली वापरतात आणि वार्षिक परीक्षा झाल्यावर शाळेकडे यस सायकली परत करतात. पुढच्या वर्षी गरजेप्रमाणे पुन्हा त्याच किंवा नवीन विद्यार्थ्यांना सायकली दिल्या जातात.
  • गरजू विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची पडताळणी करून दुवा त्यांचं शैक्षणिक शुल्क भरते. केवळ परीस्थित नाही म्हणून कोणताही विद्यार्थी शिक्ष्स्नापासून वंचित राहू नये यासाठी ही धडपड.
  • पुण्यातील विद्यार्थ्यांच्या जुन्या वह्यातील कोरे कागद गोळा करून, त्यापासून नवीन वह्या बायडिंग करून मुळशी तालुक्यातील ६ पाड्यांवरच्या शाळांना ६०० वह्या दिल्या.
  • मुळशी तालुक्यातील नांदगाव या छोट्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना घसरगुंडी आणि जंगल जिम सारखी खेळणी दिली ज्यामुळे चक्क शाळेतली उपस्थिती वाढली.
  • वस्ती भागातल्या शाळातील मुलं शैक्षणिक वातावरणाच्या अभावी शिक्षणात हवी तेवढी प्रगती करू शकत नाहीत. खाजगी शिकवण्या लावण्याएवढी त्यांच्या कुटुंबाची क्षमताही नसते. पालकर शाळातील कच्च्या मुलांसाठी दुवाचे स्वयंसेवक अभ्यासाचे सराव वर्ग चालवतात. हे वर्ग शाळा भरायच्या आधी घेतले जातात. हा उपक्रम गेले ४ वर्षं चालू आहे आणि त्यातून काही चांगले परिणामही दिसले आहेत.

दिव्यांगांसाठी “दुवा “

  • येरवडा भागात रहाणाऱ्या एका अनाथ दिव्यांग मुलीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पिठाची गिरणी दिली. त्यामुळे ती घरबसल्या व्यवसाय करत स्वत:च्या पायावर उभी आहे.
  • दिव्यांग प्रतिष्ठान ही संस्था गेले ४ वर्षं आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील दिव्यांगांचे सामूहिक विवाह घडवून आणते. गेले २ वर्षं दुवा या नवविवाहित जोडप्यांना, दुवाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या गृहपयोगी वस्तू देते.

पर्यावरणाशी “दुवा”

  • कर्वेनगर इथल्या ग रा पालकर प्रशालेतील विद्यार्थ्यांना ओला कचरा जिरवून त्यापासून खत करण्याचे प्रशिक्षण दिले आणि एक पर्यावरण गट सुरू झाला. आता शाळेतला हा एक पडिक कोपरा हिरवागार झाला आहे. शाळेतली मुलं घरतला ओला कचरा शाळेतल्या या बागेत टाकण्यासाठी घेऊन येतात आणि निगुतिनी बागेची काळजी घेतात.
  • वर्षभर खाल्लेल्या फळांच्या बिया साठवून पावसाळ्याच्या तोंडावर त्याचे बिजागोले बनवण्याचा उपक्रम यावर्षी दुवाने हाती घेतला पावसाळ्याच्या सुरवातीला मुळशी तालुक्यात मुलांच्या हस्ते बीजगोळे डोंगर कपारीत वितरीत केले. पाऊस आल्यावर ती रुजून परिसर हिरवागार व्हावा ही कल्पना.


  • टेक्नो-भिडू प्रकल्पाद्वारे कॉलेज विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन मोबाईल वापरण्याचे धडे दिले. वस्तू online order करणे, त्यातून तरुणाईचं समाजभान आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळालेला तंत्रज्ञान वापरण्याचा आत्मविश्वास यांचा एक दुवा निर्माण झाला. यात सांगण्यासारखा एक अनुभव म्हणजे एका टेक्नो भिडूचा वाढदिवस असताना, तो ज्यांना शिकवत होता त्या आजीबाईंनी online केक आणून त्याचा वाढदिवस साजरा केला. दुसऱ्या एका आजीबाईंनी त्यांना शिकवणाऱ्या मुलीसाठी online taxi बुक करून दिली. दोघांसाठी हा क्षण खूपच भावपूर्ण होता.


लहानग्या हातानी जोडलेला दुवा

  • ‘घरच्या मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलातही देण्याची वृत्ती निर्माण व्हावी म्हणून दुवा संस्थेने पुण्यातील कै. मा. स. गोळवलकर गुरुजी शाळेतील मुलांना आपल्याला नको असलेले पण उपयोगी असे शालेय साहित्य देण्याचे आवाहन केले होते. त्यात मुलांनी आपल्या चित्रकलेच्या कोऱ्या वह्या, पेन्सिली, खोडरबरं, पेनं, रंगीत खडू, खेळणी अशा अनेक गोष्टी आणून दिल्या. त्या मुळशी तालुक्यातील पढारवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना वाटल्या. अशाच पद्धतीने ‘आजोळ या पाळणाघरातील मुलांनी आपले काही कपडे जमवले ते, सोलापूर येथील ‘प्रार्थना फौंडेशन या अनाथाश्रमातल्या मुलांना पाठवले. अशा रीतीने लहान बालगोपाळानाही या दानयज्ञात दुवामुळे सहभागी होता आले.

दुवाच्या या कामाला सहाय्य करणारे अनेक हात पुढे येत आहेत. अशाच २ हितचिंतकांनी दुवाच्या कामासाठी आपली जागा नि:शुल्क उपलब्ध करून दिली आहे. यातील एका जागी दुवा वस्तूंचे संकलन करते तर दुसऱ्या जागी दुवाचे विक्री केंद्र चालते. अशा कौतुकाच्या थापेमुळे दुवाला नवनवीन उपक्रम करण्यासाठी उर्जा मिळते.

दुवाचे हे उपक्रम दुवाचे स्वयंसेवकच चालवतात. त्यासाठी duwa support team नावाचा एक whatts’app गट बनवला आहे. जेंव्हा जेंव्हा दुवाच्या कार्यक्रमासाठी स्वयंसेवकांची आर्थिक, शारिरीक मदत लागते, तेंव्हा या गटावर आवाहन केल्यावर आवश्यक त्या साधनांची सहज जुळणी होते. प्रत्येक वेळी प्रत्येकालाच सहभागी होणे शक्य होत नाही, तेंव्हा नवनवीन माणसं पुढे येतात आणि काम पूर्ण होतं, असा अनुभव आहे.

दुवाची अधिक तपशीलवार माहिती, उपक्रम, भावी योजना यांची माहिती मिळवण्यासाठी दुवाच्या वेबसाईटला (www.duwa.org.in) आवर्जून भेट द्यावी आणि duwa support team मध्ये सहभागी व्हावे.

संपर्क –

मो ८७८८८ २०३३८

इ मेल – duwakendra@gmail.com

टिप्पण्या

  1. खूप छान उद्देश ठेवून दुवाचे कार्य सुरू आहे ..

    उत्तर द्याहटवा
  2. दुवा या संस्थेचे हे भरीव सामाजिक कार्य अगदी तळागाळापर्यंत पोचावा या करता चाललेली धडपड खरंच वंदनीय आहे,नियोजन फारच उत्तम आहे,प्रकल्प संकल्पना काळानुसार बदलून काम चालते हे विशेष आहे.अर्चना फडके ही माझी मामेबहीण मला याची माहिती कायम देते

    उत्तर द्याहटवा
  3. उत्तम संकल्पना आणी त्याचे यशस्वी संचलन!

    उत्तर द्याहटवा
  4. उत्तम संकल्पना व त्याचे संचलन

    उत्तर द्याहटवा
  5. *"जिथे कमी, तिथे आम्ही"* ह्या तत्वावर चाललेला उपक्रम फारच स्पृहणीय आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  6. अतिशय स्तुत्य उपक्रम

    उत्तर द्याहटवा
  7. अतिशय स्तुत्य उपक्रम

    उत्तर द्याहटवा
  8. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे

    उत्तर द्याहटवा
  9. अतिशय उस्फुर्त प्रकल्प आहे आपणांस सर्वांचे करावे तितके कौतुक कमीच आहे आम्ही जमेल तसे आमचे सहकार्य करु तुमचा पत्ता कृपया द.यावा ही विनंती आहे आभार धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा