... ...आणि अमेरिका जागी झाली !


अमेरिकेत सध्या काही भागात तापमान कमालीचे वाढत आहे. अनेक ठिकाणी वणवे पेटले आहेत. त्यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे कळत नाहीये. अनेकांची घरे त्यात उध्वस्त झाली, वनजमीन तर पार जाळून खाक झाली.  कॅलिफोर्निया पार्क भागात  सध्या साडेतीन लाख एकरमध्ये हा वणवा पसरलेला आहे. अतिउष्णतेमुळे अमेरिकेत असे वणवे पेटणे ही आता बातमी राहिलेली नाही. बदलत्या हवामानामुळे होणारे हे दुष्परिणाम याच नव्हे तर अन्य देशांनाही कुठे घेऊन जाणार आहेत हा अत्यंत काळजीचा विषय आहे. या वणव्यांबरोबरच अमेरिकेत सध्या चर्चा आहे ती या वणव्यासारख्या पसरलेल्या बातमीची. सध्याचे जग 'सतत ऑनलाईन' असण्याचे जग आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात जरा कुठे खुट्ट झाले की सगळ्यांना कळायला वेळ लागत नाही. आणि मी जी बातमी म्हणतो आहे ती तर जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची. अमेरिका शनिवार - रविवार काम करत नाही. सगळे सुटीच्या मूडमध्ये असतात. त्यातही रविवारी दुपारी बातम्या बघितल्या जातीलच असे नाही. बायडेन यांनी माघारीची घोषणा करण्यासाठी हीच वेळ निवडली आणि सगळे जण 'जागे' झाले. पुढच्या तीनपाच मिनिटात ही बातमी अमेरिकेतील दोनतृतीयांश जनतेला कळली. त्यांनी उर्वरित एक तृतीयांश जनतेला कळवली. विषय संपला !


हे सगळे झाले 'सतत ऑनलाईन' असणाऱ्या अमेरिकन लोकांच्या फोनवर आलेल्या News Alerts मुळे. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने या संदर्भात तपशील दिला आहे. बायडेन यांनी दुपारी १. ४६ वाजता एक्स (आधीचे ट्विटर) वर माघारीची घोषणा केली. अमेरिकेत १२४ मोठ्या News वेबसाइट्स आहेत. त्या क्षणाला त्यापैकी किमान एका वेबसाईटवर सुमारे २,१५,००० लोकांनी लॉगिन केले होते. त्यांना बायडेन यांची बातमी लगेच कळली. आणखी १५ मिनिटात या वेबसाइट्स वर ८,९३,००० लोकांनी लॉगिन केले. बायडेन यांनी घोषणा केल्यावर पुढच्या दहा मिनिटात सगळ्या वेबसाइट्स वरील लॉगिन केलेल्या लोकांची संख्या दुपटीतिपटीने वाढली. दुपारी दोन वाजता सुमारे २६ लाख लोक सीएनएन, फॉक्स न्यूज यासारखी टीव्ही चॅनेल्स बघत होते. काही वेळातच हा आकडा ६९ लाखांवर पोचला. आणि आणखी काही वेळाने ९२ लाखांवर गेला. आणि रविवारी दुपारी अमेरिका खडबडून जागी झाली ! अमेरिकेत मोठ्या संख्येने SMS पाठवले जातात. हे टेक्स्ट मेसेज एकमेकांना किती पाठवले गेले याची गणतीच नाही. दुपारी १. ४६ ते २. ०० वाजेपर्यंत अमेरिकेत जवळपास सगळ्यांना ही बातमी कळली !


बायडेन यांच्या घोषणेच्या वेळेस पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुस्तक लिहिणारे एक पत्रकार सपत्नीक सर्बियात होते. वेळेच्या फरकामुळे तेथे रात्र झाली होती, सकाळी उठल्यावर त्यांना माघारीची बातमी कळली. ते पत्नीला सांगायला गेले. तिचे उत्तर होते - मला रात्रीच कळले. एक्स वर नोटिफिकेशन आले होते ! पूर्वी अमेरिकेत शिकायला असलेला पण आता फिनलंड देशामध्ये राहणारा एक जण म्हणाला - ''मी रात्री दहानंतर पोहायला गेलो होतो. पोहत असतानाच सीएनएनचे नोटिफिकेशन आले आणि बायडेन यांनी माघार घेतल्याचे कळले.  अमेरिकेत शिकत असतानाच तेथील राजकारणात रस निर्माण झाला होता. त्यामुळे असे काही होऊ शकते याचा अंदाज होताच ''


न्यू हॅम्पशायर मध्ये राहणारी एक महिला म्हणते - ''आमच्या घरात इंटरनेट नीट चालत नाही. घरासमोरील हिरवळीवर एका विशिष्ट ठिकाणी गेले तरच रेंज येते. घरातील लहानमोठी मंडळी ठराविक वेळी तिथे जाऊन फोन चेक करतात. मी गेले असताना नेमकी त्याचवेळी बायडेन यांची बातमी कळली. ती वाचेपर्यंत तिच्या मित्रमंडळींकडून भराभर टेक्स्ट मेसेज यायला सुरुवात झालीच होती. 


या सगळ्यात आणखी एका प्रश्नांची चर्चाही होते आहे. बातम्या वेगाने पसरतात हे खरे, पण त्या विश्वासार्ह असतात का हा तो चर्चेचा विषय  आहे. बायडेन यांच्या माघारीच्या एक आठवडा आधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. ती बातमीही अर्थात अशीच वेगाने पसरली होती. पण अनेक पत्रकारांनी आणि लोकांनी शेअर करताना फार सावधगिरी बाळगली होती. ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न होता की आणखी काही हे जोपर्यंत स्पष्ट होत नव्हते तोपर्यंत खूप सावधगिरी बाळगली गेली. नंतर चित्र स्पष्ट झाले. आणि मग सगळ्यांनी तपशीलवार बातम्या दिल्या , विश्लेषण केले. 



साधारण दोन दशकांपूर्वी बायडेन अथवा ट्रम्प यांच्याबाबत जे झाले ते कन्फर्म करण्यासाठी बराच वेळ लागला असता. आता 'सतत ऑनलाईन' असणाऱ्या अमेरिकन (आणि जगभरातील) लोकांना या बातम्या पाच मिनिटात बातम्या कळल्या आणि बघायलाही मिळाल्या ! भारतातही विशेषतः निवडणुकीच्या काळात अशाच बातम्या आदळत असतात. त्यातला खरेपणा कसा तपासणार, आजकाल ज्याला 'नॅरेटिव्ह' म्हणतात त्यांचे काय करायचे हा प्रश्न जास्त भेडसावतो आहे. 


टिप्पण्या