कमला हॅरिस याना निधी मिळाला, मतांचे काय?

 


अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आणखी  चार महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन आता २४ तास उलटून गेले आहेत. माघार घेतानाच त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नवीन उमेदवार म्हणून सध्याच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. अर्थात म्हणून त्या आपोआप उमेदवार झाल्या नाहीत. ऑगस्ट महिन्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन आहे. त्यावेळी पक्षाच्या उमेदवाराची निवड अधिकृतपणे जाहीर होईल. परंतु, गेल्या २४ तासात कमला हॅरिस यांनी निधी संकलनाचा विक्रम नोंदवला आहे. २४ तासांत लहानमोठ्या देणगीदारांनी त्यांना आठ कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या दिल्या आहेत. यात आतापर्यंत या पक्षाला अजिबात देणगी न देणाऱ्यांचाही समावेश आहे हे लक्षात घ्यायला हवे. कमला हॅरिस याना आतापर्यंत ११०० डेमोक्रॅटिक प्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. म्हणजे अर्धी लढाई त्यांनी जिंकली आहे. पुढचा टप्पा उमेदवारी मिळविण्यापुरता तरी सोपा वाटतो आहे. 


हॅरिस यांनी २०२० मध्येच पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. ते अयशस्वी झाले. पण या निमित्ताने त्या देशभर फिरल्या. अमेरिकन लोकांना त्यांची ओळख झाली. त्यांची एकंदर राजकीय कारकीर्द मात्र छोटी आहे. जो बायडेन पायउतार झाल्यावर माजी अध्यक्ष बाराक ओबामा यांनी बायडेन यांच्या निर्णयाचे स्वागत केले परंतु, कमला हॅरिस याना पाठिंबा दिला नव्हता. योग्य उमेदवार निवडला जावा हे त्यांचे म्हणणे पटणारे असले तरी ओबामांसकट अन्य सर्व डेमोक्रॅटिक पक्ष प्रतिनिधींचा विश्वास संपादन करणे हे कमला हॅरिस यांच्यापुढचे प्राधान्याचे काम असेल.


जो बायडेन उमेदवारी मागे घेतील हा अंदाज सगळ्यांना होताच. 'कधी' हाच प्रश्न होता. त्यांचे वाढते वय, त्यामुळे मंदावलेल्या शारीरिक हालचाली, अनेकदा  बोलताना अडखळणे किंवा चुकीची नावे घेणे, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे बोलण्यात त्यांचा निभाव लागणे कठीण होते. तसे  तर बायडेन आणि ट्रम्प यांच्या वयात फार अंतर नाही. बायडेन ८१ आणि ट्रम्प ७८. (कमला हॅरिस ५९) ट्रम्प अजूनही आक्रमक आहेत. भाषण करताना बिनधास्त काही दावे करतात, पण ते चुकीने केलेले नसतात, जाणीवपूर्वक केलेले असतात. मतदाराची स्मरणशक्ती फार तीव्र नाही असे समजून केलेले असतात. अलीकडेच त्यांनी, ''मीच २०२० साली जिंकलो होतो, पण माझा विजय नाकारण्यात आला', असे पुन्हा एकदा सांगितले. त्यांच्या खऱ्या / खोट्या आक्रमकतेमुळे बायडेन दोघांमधील चर्चेत पार नामोहरम झाले. बायडेन यांची तब्येत बरी नव्हती, ते थकले होते, त्यांना सर्दी झाली होती, बरीच औषधे त्यांनी घेतली होती वगैरे कारणे सांगितली गेली. ती खरी असतीलही. परंतु इतक्या महत्वाच्या चर्चेच्या वेळेस ते तंदुरुस्त नव्हते. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षात जो काही गोंधळ झाला त्याची परिणती बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेण्यात झाली.

कमला हॅरिस यांची आई भारतीय आणि वडील जमैकाचे आहेत. म्हणजे त्या कृष्णवर्णीय आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक (उमेदवारी मिळविल्यास) लढणाऱ्या त्या हिलरी क्लिंटन यांच्यानंतरच्या दुसऱ्या महिला उमेदवार ठरतील.  ट्रम्प यांच्याशी सामना करणे सोपे नाही. राजकीय आघाडीवर काढतानाच त्यांना प्रसारमाध्यमांच्या आघाडीवरही लढावे लागणार आहे. बायडेन यांच्या माघारीत प्रसारमाध्यमांचाही हात आहे. ट्रम्प यांचे बोलणे खटकत नाही, पण बायडेन यांच्या चुका काढण्यात पुढे असा काही ठिकाणी प्रकार आहे. दोन्ही बाजूचे मतदार थ्रेडस, एक्स या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात. आणि मते बिनधास्तपणे व्यक्त करतात. अलीकडे ट्रम्प यांच्यावर जो हल्ला झाला त्याबद्दल शंका व्यक्त करणाऱ्या आणि त्यांचे निरसन करणाऱ्या अशा दोन्ही बाजूंच्या 'ठाम' पोस्ट वाचायला मिळतात. भारतात अशी उघड मते व्यक्त होत राहिली तर काय होईल ते वेगळे सांगायला नको !

ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदाचे  उमेदवार म्हणून ज्या व्हान्स याना निवडले आहे त्यांच्या पत्नी भारतीय वंशाच्या आहेत. याचा अर्थ ट्रम्प किंवा कमला हॅरिस यापैकी कोणीही निवडून आले तर भारताला जास्त आनंद होईल असे म्हणता येत नाही. अध्यक्ष झाल्यावर त्यांचे धोरण 'अमेरिका फर्स्ट' असेच असते. त्यात काही चूक नाही. बाहेरील देशांतून अमेरिकेत आलेल्या लोकांवर नियंत्रण ठेवण्याची, प्रसंगी त्यांना देशाबाहेर काढण्याची भाषा बोलली जाते. पण प्रत्यक्षात तसे करणे खूप कठीण आहे याची जाणीव दोन्ही पक्षांना आहे. ट्रम्प ठामपणे गर्भपाताच्या विरोधात आहेत तर कमला हॅरिस बाजूने. या एकाच नव्हे तर अनेक बाबींमध्ये कमला हॅरिस याना महिला मतदारांचा, म्हणजे ट्रम्प यांचे मतदार असणाऱ्या महिला मतदारांचाही विश्वास संपादन करावा लागेल. त्या उपाध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवार म्हणून निवडतात हेही बघावे लागेल. राजकीय आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी तो उमेदवार गौरवर्णीय असू शकतो. त्यातही दुसरी महिलाच निवडली तर वेगळा संदेश मतदारांना जाईल. पण ते कठीण दिसते.

या सगळ्यात अमेरिकन प्रसारमाध्यमे काय भूमिका बजावतात हे पाहणेही गरजेचे आहे. बायडेन यांच्या माघारीनंतर एका नेत्याची कॉमेंट होती की 'टिकटॉक च्या जमान्यातही टीव्ही माध्यम भारी ठरले. एकंदरीत कमला हॅरिस यांच्या एन्ट्रीमुळे अमेरिकन निवडणुकीला वेगळे वळण लागले हे निश्चित ! म्हणूनच कमला हॅरिस याना निधी किती मिळाला यापेक्षा मते किती मिळणार हा मुद्दा महत्वाचा ठरतो !

टिप्पण्या