एका लायब्ररीचा मृत्यू ...

 

तो साधारण १९८७-८८ चा काळ असावा. आमच्या सोसायटीत दर १५ दिवसांनी एक गृहस्थ ग्रंथपेटी घेऊन यायचे. पंधरा दिवसांपूर्वी दिलेले पुस्तक बदलून वाचकांनी नवीन पुस्तक घ्यावे, ते वाचावे यासाठी. त्यासाठी ते वाचकांकडून अल्प अशी मासिक फी घेत असत. त्यांचे नाव श्री मधू भट होते. ही ग्रंथपेटी केवळ 'व्यवसाय' म्हणून ते चालवत नव्हते. ते स्वतः उत्तम पुस्तके वाचत असत आणि ग्रंथपेटीत उत्तमोत्तम पुस्तकेच असावीत याकडे त्यांचा कटाक्ष असे. वाचकांनाही त्यांची आवडनिवड ओळखून विविध पुस्तके सुचवत असत. त्या सुमारास मी इंदिरा गांधी यांच्यावरील एक लेख अनुवादित केला होता. रविवार पुरवणीत पूर्ण आठ कॉलम म्हणजे पूर्ण पानभर (हो, त्या वेळेस मटामध्ये पूर्ण पानभर लेख प्रकाशित होत होते) आणि उरलेला पान  दोनवर असा तो प्रसिद्ध झाला होता. तीनच दिवसांनी श्री भट यांनी तो अनुवाद आवडल्याचे पत्र घरच्या पत्त्यावर पाठवले होते. मी ते अजून जपून ठेवले आहे. कालांतराने त्यांनी ही फिरती लायब्ररी बंद केली, पण त्यांचे साहित्यप्रेम काही कमी झाले नव्हते. लायब्ररी बंद झाल्याची चुटपुट मात्र अनेकांना लागली होती. 


आता साल आठवत नाही, पण नंतर काही वर्षांनी मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील दणाईत हॉस्पिटलचे (जीवनविकास) सर्वेसर्वा श्री सदानंद दणाईत हे घरी आले. आल्याआल्या त्यांनी त्यांची व्यथा सांगितली. हॉस्पिटल चालवत असले तरी त्यांनी तेथे एक लायब्ररी चालू केली होती. वाचकांकडून (मला वाटते १९७०च्या दशकात) त्यांनी एकरकमी तीन हजार रुपये आजीवन सदस्यत्व म्हणून घेतले होते. साधारण २५वर्षानंतर ते त्यांची व्यथा माझ्याकडे मांडत होते. लायब्ररीत त्यांनी वैद्यकीय विषयावरची महागडी पुस्तकेही वाचकांना उपलब्ध करून दिली होती. वर्गणीदारांकडून मिळणाऱ्या पैशांत नवीन पुस्तके खरेदी करणे कठीण जात होते. त्यांनी २०-२५ वर्षांपूर्वी आजीवन सदस्यत्व घेणाऱ्या वाचकांना पुन्हा काही पैसे भरण्याची विनंती केली. बऱ्याच वाचकांनी, आमचे नाव वगळलेत तरी चालेल, पण वाढीव वर्गणी देणार नाही,' असे त्यांना सांगितले. आता ही उत्तम लायब्ररी चालवायची कशी हा त्यांचा सवाल होता. आज ते हयात नाहीत, पण सुदैवाने लायब्ररी सुरु आहे, ही आनंदाची बाब आहे. (साहित्यप्रसारासाठी चालू असलेल्या 'ललित' मासिकाच्या वाचकांनाही अशीच सूचना गेल्या वर्षी करण्यात आली. नव्याने किती जणांनी पैसे भरले हे अशोक कोठावळेच सांगू शकतील. त्यांच्या संदर्भात ग्रंथालयाचा प्रश्न नव्हता, प्रकाशन व्यवसायाचा होता. दोन दशकांपूर्वी दिलेल्या दोन हजाराच्या (आसपास) रकमेत आजही 'ललित'सारखे मासिक हवे ही अपेक्षा चुकीचीच) . आजकाल अनेक यु ट्यूब चॅनेलचे लाखो फॉलोअर्स असतात, पण व्हिडिओ बघतात काही हजार ! तसेच काहीसे ग्रंथालयांच्या बाबतीत झाले आहे. आजीवन सदस्यत्व घेतलेले भरपूर, पण प्रत्यक्षात ग्रंथालयात येणारे कमी अशी परिस्थिती आहे. एखाद्या जुन्या वयोवृद्ध सभासदाचे निधन झाले तरी ग्रंथालयाला कळवले जात नाही, अशीही उदाहरणे ऐकायला मिळतात .  


नाशिकच्या विनायक रानडे यांनी सुरु केलेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी' योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. डोंबिवलीच्या पुंडलिक पै यांच्या 'पै फ्रेंड्स लायब्ररी'ने अनेक वाचकमित्र जोडले आहेत. आणि फक्त डोंबिवलीपुरते मर्यादित न राहता बाहेरही शाखा काढल्या आहेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रात अन्य ठिकाणीही काही उल्लेखनीय अपवाद आहेत. ही सगळी खासगी ग्रंथालये आहेत. आणि ती चालवणे वाटते तेवढे सोपे नसते. जिथे लायब्ररी संस्कृती फोफावली आहे तिथे ठीक आहे, तरी एकुणात विचार केला तर ग्रंथालयात जाऊन पुस्तक आणून ते वाचणे कमी झाले आहे हे मान्य करावे लागेल. 


अनेक ग्रंथालयांनी नवीन पुस्तक खरेदीवर मर्यादा आणल्या आहेत. त्यांचा व्यवसाय हा वाचकसंख्येवर अवलंबून असतो. तो वाचकच नसला तर काय उपयोग ? समाजमाध्यमांचा अतिरेक, किंडलसारखे नवे माध्यम, गेल्या जवळपास तीन दशकांत मराठी भाषिक घरातील मुले इंग्रजी भाषेच्या शाळेत गेल्याने आपोआप मराठी पुस्तकांचा भावी वाचक कमी होणे वगैरे अनेक कारणे यामागे आहेत. ज्या ग्रंथालयांना सरकारी अनुदान मिळते ते पुरेसे आहे का आणि तेही वेळेवर मिळते का हा संशोधनाचा विषय आहे. आणि काही वेळेस ग्रंथपाल व ग्रंथालयात काम करणारे त्याचे सहकारी साहित्यप्रेमी असले, वाचकांना सर्वतोपरी साह्य करणारे असले तरी व्यवस्थापनातील संबंधितांना रस नसला तर ग्रंथालयाची घसरण सुरु झालीच हे समजायला हरकत नाही. 


प्रसाद कुलकर्णी

सरकारी आशिर्वादावर चालणाऱ्या ग्रंथालयांचे सोडा, खासगी ग्रंथालयांचे प्रश्न आणखी गंभीर आहेत. आज नुकत्याच सुरु झालेल्या व सध्याच्या गदारोळात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या 'एनडीटीव्ही मराठी' या न्यूज चॅनेलवर 'एका लायब्ररीचा मृत्यू' ही बातमी पाहिली आणि या आठवणी जाग्या झाल्या. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील शंभरावी खासगी लायब्ररी बंद पडली, ही ती बातमी होती. प्रसाद कुलकर्णी यांनी केवळ पुस्तक व साहित्य प्रेमापोटी कोथरूड भागात ती सुरु केली होती. तिचे नाव 'बुकस्पेस '. दहा पंधरा वर्षांपूर्वी तीन साडेतीन हजार वाचक सभासद असणाऱ्या या लायब्ररीत आज अवघे ४० सभासद आहेत. त्यातीलही २०-२५ नियमित येणारे. बाकी अनियमित. 'वर्षाचा खर्च एक लाखाचा आणि उत्पन्न दोन हजाराचे', मग लायब्ररी कशी चालवणार? हा प्रसाद कुलकर्णी यांचा रास्त प्रश्न त्यांनी विचारला. गेल्या दहा वर्षांत आसपासच्या दहापंधरा लायब्रऱ्या बंद पडल्या त्या प्रसाद कुलकर्णी यांनी ती लायब्ररी चालवणाऱ्या माणसाने सांगितल्या त्या किमतीत विकत घेतल्या. आज कुलकर्णी यांच्याकडे सुमारे चार लाख पुस्तके आहेत. खरे म्हणजे 'होती' असे म्हणावे लागेल. कारण आता 'बुकस्पेस ' ३१ ऑगस्टला बंद करायचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यापूर्वी वाचकांना अत्यल्प दरात त्या पुस्तकांची विक्री करण्याचे त्यांनी ठरवले आहे. गेल्या काही दिवसांत एकदीड लाख पुस्तके वाचक घेऊन गेले असावेत असा त्यांचा अंदाज आहे. पुस्तक अल्पदरात खरेदी करणारे लोक सभासदच आहेत की अन्य कोणी हे कळले नाही. पण सभासद नसणाऱ्या आणि आता पुस्तक खरेदीसाठी धावणाऱ्या लोकांनी नीट सभासदत्व स्वीकारले असते तर ? ते जास्त फायदेशीर झाले असते. नाही का ? असो ! सर्व लायब्रऱ्यांना सरकार अनुदान देऊ शकत नाही. वाचकांनीच त्या तगवायला हव्यात हेच खरे !

ग्रंथालये बंद पडल्यामुळे केवळ ती चालवणाऱ्या लोकांना आणि वाचकांना फटका बसतो असे नाही, तर पुस्तक प्रकाशनांनाही फटका बसत असणार. कारण पुस्तकांची मागणी कमी होणार.  

प्रसाद कुलकर्णी यांचे एक वाक्य थेट प्रसिद्धीमाध्यमांसाठी होते आणि ते अधिक भेदक होते. 'मीडिया फक्त अंत्यसंस्काराला का जाते? संस्था चालू असताना का नाही? (तेव्हा आमचे काम प्रकाशात का आले असते तर जास्त फायदा झाला नसता का?) ... वेगळ्या संदर्भाने पण हाच मुद्दा रेटत ते म्हणतात - मी रोज ११ वर्तमानपत्रे घेत होतो. पण कोणतेही वर्तमानपत्र उघडा, फक्त नकारात्मक बातम्या वाचायला मिळतात. आता त्यातील आठ वर्तमानपत्रे बंद केली, फक्त तीन चालू ठेवली आहेत. वर्तमानपत्रे सकारात्मक कधी होणार? '' हा त्यांचा प्रश्न आहे. सर्वत्र जे घडते तेच आम्ही छापतो / दाखवतो, असे ही प्रसारमाध्यमे सांगत असतात, पण सकारात्मक गोष्टींची बातमी फार कमी वेळा होते हे मान्य का करत नाहीत, हा प्रश्नही आहेच की!. 

तुमच्या आठवणीतील खासगी लायब्रऱ्यांचे अनुभव काय आहेत ते जरूर कळवा. आणि सध्या तुम्ही जात असलेल्या ग्रंथालयातील चांगल्या आठवणीही कळवा !

(एनडीटीव्हीच्या राहुल कुलकर्णी यांनी ही बातमी केली आहे. बातमीची लिंक सोबत देत आहे - https://youtu.be/EruHR2b0I7U?si=oJ37YorbJiq2hION)




टिप्पण्या

  1. लेख माहितीपूर्ण आणि ग्रंथालयांच्या सद्यस्थितीची जाणीव करून देणारा.
    आपण लिहिल्याप्रमाणे विनायक रानडे, नाशिक हे चालवत असलेल्या 'ग्रंथपेटी'च्या उपक्रमास चांगला प्रतिसाद बृहन्महाराष्ट्रात आणि विदेशातही मिळतो आहे, हे लक्षात येतं. माझ्या सर्व पुस्तकांच्या काही प्रती मी त्यांना त्यांच्या ह्या तसंच इतरही उपक्रमांसाठी दिल्या आहेत. कदाचित त्यांच्यासारख्यांचा अनुभव आणि विचार इतर अल्प प्रतिसाद असलेल्या ग्रंथालयांसाठी ग्रंथप्रसारात नाविन्य आणण्यासाठी उपयोगी ठरू शकेल.
    प्रसाद कुलकर्णी यांचं, 'मीडिया फक्त अंत्यसंस्काराला का जाते? संस्था चालू असताना का नाही? (तेव्हा आमचे काम प्रकाशात का आले असते तर जास्त फायदा झाला नसता का?)'; हे म्हणणं अगदी खरं आहे आणि बऱ्याचदा माझ्याही मनात येतं. पूल, इमारत पडल्यावर बातमी दिली जाते पण त्यांची योग्य निगराणी होत नसताना त्याकडे दुर्लक्ष होतं.
    कमी किमतीत खरेदी केलेली पुस्तकं वाचली जाणार की बरी दिसतात म्हणून दिवाणखान्यात 'स्टेटस सिम्बॉल' म्हणून जागा व्यापणार, हा देखील प्रश्नच आहे.
    'बुकस्पेस' संदर्भातील बातमी आम्ही देखील ऐकली होती पण ऐकली आणि सोडून दिली, असं झालं. तुम्ही त्याला लेखाच्या माध्यमातून 'वाचा' फोडली आहे.
    डॉ. मिलिंद न. जोशी

    उत्तर द्याहटवा
  2. सर्वप्रथम ....लेख अतिशय उत्तम आणि एका वेगळ्या पण वाचक मनाशी खूप जवळ असणाऱ्या विषयाला हात घालणारा. आजच्या काळात खरोखरच ग्रंथालयाकडे वळणारी पावले मंदावली आहेत. निवृत्त जीवन जगणारे संसारिक जबाबदाऱ्या कमी झाल्याने हाताशी भरपूर वेळ असणारे साठी पार वाचक सध्या ग्रंथालयातून पुस्तक आणून वाचत असतील असं मला वाटतं पण एक काळ होता जेव्हा ग्रंथालय आणि तरुण वाचकांचे तितकंच घट्ट नातं होतं . माझ्याही ग्रंथालयाच्या खूप रम्य आठवणी आहेत. वडील पट्टीचे वाचक असल्यामुळे घरात पुस्तकांचा सतत राबता असायचा. ग्रंथालयात जाऊन आपल्याला हवं असलेलं पुस्तक धुंडाळून ते मिळाल्यानंतरचा आनंद आणि ते घरी आणून कधी एकदा वाचून होतंय आणि पुन्हा नवं पुस्तक कधी एकदा आणतो ही उत्सुकता कमालीची आनंददायी होती .पण आता हे सगळं खूपच कमी झाले आहे याची खंत मनात आहे आणि त्यातही वाचकांची ही भूक भागवणाऱ्या खाजगी असो किंवा अनुदानित असो पण त्या ग्रंथालयांना आपलं कार्य थांबवावं असं वाटणं हे तर त्याहून शोकांतिक आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. खेदानं सगळीकडे अशीच अवस्था आहे, आणि वाचनच बंद झालंय साधं व्होत्सापवरचं मोठं लिखाणही पूर्ण वाचत नाहीत. नुसता 👍🏻/👌🏻 अश्या प्रकारे लेखकाचं कोरडं समाधान होतंय. 😢
    वास्तव लेख. 🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  4. अगदी खर आहे.आजची अवस्था बिकट आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा