अमेरिकेत बोलबाला Influencers चा !

 

अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीची धामधूम सुरू आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून आपण परत एकदा निवडणूक लढवावी अशी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांची कितीही इच्छा असली तरी ते शक्य झाले नाही. त्याची कारणे सर्वश्रुत आहेत. त्यांच्या जागेवर उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची निवड उमेदवार म्हणून झाली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प  यांनी या निवडणुकीत आधी आघाडी घेतली होती, पण आता सध्या तरी अल्पमताने का असेना कमला हॅरिस आघाडीवर आहेत. अजूनही नोव्हेंबरमध्ये नक्की कोण निवडून येतील हे सांगणे कठीण आहे. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर शिकागो येथे गेले चार दिवस सुरू असलेल्या अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले. हॅरिस यांच्या समर्थनार्थ स्वतः जो बायडेन, बराक व मिशेल ओबामा, हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक दिग्गज नेते या अधिवेशनात येऊन गेले. अमेरिकेत राहणारे पण मतदानाचा अधिकार नसलेले लोकही ही भाषणे ऐकत आहेत. कारण ही निवडणूक कदाचित त्यांचेही भविष्य ठरवणार आहे. 

 

हॅरिस आणि त्यांची टीम डेमोक्रॅटिक पक्षाचे जुने मतदार, तरुण मतदार आणि कुंपणावर असलेले उमेदवार यांच्यापर्यंत पोचण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीने हे अधिवेशन एका बाबतीत खूप वेगळे ठरले आहे. कमला हॅरिस यांनी या अधिवेशनात डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेते / कार्यकर्त्यांसोबतच सध्याचे चलनी नाणे असलेल्या "content creators"  ना म्हणजेच Influencers ना मानाचे स्थान दिले आहे. काहीना तर पहिल्या रांगेत स्थान मिळाले आहे. मागच्या म्हणजे २०२० च्या निवडणुकीत त्यांना एवढे प्राधान्य मिळाले नव्हते. या लोकाना आता बोलावण्याचे कारण म्हणजे बरेचसे (दोन्ही पक्षांचे) तरुण मतदार वृत्तपत्र अथवा टीव्ही बातम्या वाचत / बघत नाहीत. ते मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमे वापरतात. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी Influencers ची गरज सर्व राजकीय पक्षांना वाटते. ही पिढी यू ट्यूब , टिक टॉक आणि Instagram हीच माध्यमे प्रामुख्याने बघतात / वापरतात. आणि इथे चलती असते ती Influencers चीच !

ही आकडेवारी बघितली तर लक्षात येईल. २०२३  मध्ये अमेरिकेत ८३  टक्के लोक यू ट्यूब, ६८ टक्के लोक फेसबूक, ४७  टक्के Instagram आणि ३३  टक्के टिकटॉक वापरत होते. Pew Research Center ने ही पाहणी केली होती. अमेरिकेतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त जनता या समाजमाध्यमांवर बातम्या बघत असते. म्हणजेच जगभर काय चालले आहे हे बघण्याचा त्यांचा 'सोर्स' वृत्तपत्र अथवा टीव्ही नसून ही समाजमाध्यमे आहेत. अमेरिकेत जुलै २०२४ मध्ये किमान दहा कोटी लोक Whatsapp वापरतात असे नुकतेच जाहीर झाले आहे. बातम्या शेयर करण्याचा हाही मार्ग आहे. आता निवडणुकीच्या धामधुमीत हे आकडे आणखी वाढले असतील हे नक्की. म्हणूनच वृत्तपत्र / न्यूज वेबसाइट / टीव्ही आणि रेडियो यांच्यासाठी काम करणाऱ्या पत्रकारांपेक्षा Influencers सरस ठरले आहेत. नेहमीच्या पत्रकारांना यंदा कमी संख्येने प्रवेश दिला गेल्याचे सांगण्यात येते. हे एका अर्थाने अपरिहार्य होते, कारण आता जनता (मतदार !) वेगळ्या ठिकाणाहून बातम्या मिळवते.  / बघते. त्यामुळे आता Influencers ना जास्त प्राधान्य देण्यावाचून पर्याय नाही, असे सांगण्यात आले. या Influencers ना डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना सहजपणे भेटता येत होते. त्यांच्या मुलाखती घेता येत होत्या,  त्यांच्याबरोबरचे फोटो शेयर करता येत होते. वृत्तपत्र अथवा टीव्ही / रेडिओच्या पत्रकारांना तुलनेने मागचे स्थान होते व त्यांना सर्वांना सहजपणे भेटता येत नव्हते असे Reuters या वृत्तसंस्थेने एक बातमीत म्हटले आहे.


 Influencers ना फॉलो करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर एक पोस्ट टाकली की लगेच लाखों लोकांपर्यंत जाते. तरीही पत्रकारांपेक्षा Influencers ना जास्त महत्व द्यावे का यावर दोन्ही बाजूनी चर्चा चालू आहे.  ‘आम्ही निष्पक्षपणे कंटेंट टाकतो’ असे बऱ्याच  Influencers चे म्हणणे असते. प्रत्यक्षात तशी परिस्थिती  असते का हे अमेरिकेतील लोकच सांगू शकतील. साधारणपणे जो पक्ष बोलवेल त्याच्या बाजूनेच Influencers बोलतील असे म्हणता येईल किंवा आपल्या विचारसरणीच्या जवळ असणाऱ्याना Influencers नाच बोलावले जात असेल का ? काहीही असले तरी तरुण लोकांपर्यंत राजकारण पोचविण्यासाठी ही Influencers मंडळी प्रभावी ठरत आहेत ही नक्की ! एका Influencer ने स्पष्ट सांगितले – ‘वृत्तपत्र वा टीव्ही चॅनेलचा पत्रकार जिथे नोकरी करतो त्या संस्थेचे राजकारण वा राजकीय बातम्या देण्यासंदर्भात काही धोरण ठरलेले असते. Influencers चे तसे काही नसते, त्यांच्यावर कोणतीही बंधने नसतात, ते स्वतःच एक ब्रँड असतात’. 

हे खरेच आहे !

अर्थात या धोरणामुळे वृत्तपत्र वा टीव्ही चॅनेल चालविणाऱ्या संस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तर नवल नाही. ही अस्वस्थता त्यांच्या बातम्यांमध्ये उतरते का हे बघावे लागेल. Influencers ना फक्त डेमोक्रॅटिक पक्ष महत्व देते असे नाही. रिपब्लिकन पक्षालाही Influencers कडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. स्वतः ट्रम्प याना समाजमाध्यमांचे महत्व चांगलेच माहीत आहे. त्यामुळे त्यांचा पक्षही Influencersकडे दुर्लक्ष करत नाही. हे वास्तव वृत्तपत्र व टीव्ही माध्यमांनी लवकर लक्षात घेतलेले बरे !

भारतातही अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत Influencers चा वापर झाला हेही खरे असले तरी अमेरिकेइतका झाला नाही. याचा अर्थ भारतीय मतदार समाजमाध्यमे वापरत नाही, असे अजिबात नाही. आपल्याकडे वृत्तपत्रे व टीव्ही माध्यम (आधी इतके नसले तरी ) अजून प्रभावी आहे. आणि Influencers अजून तेवढे राजकीयदृष्ट्या प्रभावी नाहीत. प्रत्येक पक्षाने आपापला सोशल मीडिया सेल उभारलेला आहे आणि त्यांच्या करामती चालू असतात, हे खरे. काही विश्लेषकांनी यू ट्यूबचा आधार घेऊन पक्षीय भूमिका मांडणे सुरू ठेवले आहे. त्या अर्थी तेही Influencers आहेत. परंतु अमेरिकेत जसे पत्रकार विरुद्ध Influencers असे अघोषित संघर्ष आता बघायला मिळत आहेत तसे अजून तरी भारतात झालेले नाही. पण ती वेळ फार दूर नाही, असे मला वाटते. अनेकांना आठवत असेल, की पत्रकार परिषद घेणारे लोक पूर्वी महत्वाच्या वर्तमानपत्रांचे पत्रकार आले नसले तर त्यांच्यासाठी थांबत असत. जेव्हा बातम्यांची टीव्ही चॅनेल सुरू झाली तेव्हा वर्तमानपत्रांपेक्षा त्यांना प्राधान्य मिळू लागले. आता मोबाईल पत्रकारिता आली. Influencers पत्रकारिता यायला फार वेळ लागणार नाही. ती काही प्रमाणात सुरू झालीच आहे या वास्तवाचे भान सर्वांनी ठेवायला हवे !

 

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा