एका सच्च्या कार्यकर्त्याची शंभरी !

बाबन व रतन डिसोजा मधू व प्रमिला दंडवते यांच्यासह

बबन डिसोजा, रतन डिसोजा, मधू दंडवते, प्रमिला दंडवते

 

वयाच्या १८व्या वर्षी 'भारत छोडो' आंदोलनात सक्रिय सहभाग, राष्ट्र सेवा दलात भरीव काम, मिल मजदूर सभेच्या स्थापनेपासून नंतर अनेक वर्षे सक्रिय सहभाग, प्रजा समाजवादी पक्षाचे पूर्ण वेळ चिटणीस, गोवा विमोचन समितीचे व संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मुंबई शाखेचे कार्यालयीन सचिव, बॅ. नाथ पै,  मधू दंडवते यांच्या निवडणुकांमध्ये मोठे काम, साने गुरुजींच्या  नेतृत्वाखाली  काम , १९७५मध्ये आणीबाणीच्या विरोधात काम, नंतर मुंबई जनता दलात अनेक वर्षे काम, १९८० साली मालवणमध्ये बॅ. नाथ पै सेवांगणाच्या उभारणीत सिंहाचा वाटा, आणि हे सारे काम करताना अत्यंत निर्मल आणि नि:स्वार्थी स्वभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी ... हे सारे करणाऱ्या श्री. बबन डिसोजा यांचा आज शंभरावा वाढदिवस आहे. माझे वडील, राजकीय कार्यकर्ते, कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध भूमिकांमध्ये त्यांना मी पाहात आलेले आहे. आणि या सगळ्याबद्दल मला विलक्षण अभिमान आहे.

बबन डिसोजा आणि राणी पाटील

 

बबन डिसोजा यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२४ रोजी गणेश चतुर्थीला, मालवण तालुक्यातील कट्टा या गावी झाला. लहानपणीच आई वारल्यामुळे वे बहिण व वडीलांसोबत ते काकांच्या घरी राहू लागले. चुलत भावंडांसोबत बालपण व प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी  मालवणच्या टोपीवाला  हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. वयाच्या १८ व्या वर्षी १९४२ च्या स्वातंत्र्य लढयात त्यांनी भाग घेतला. मालवण शहरात शाळा बंद पाडून, मिरवणुका - मोर्चे- निदर्शने यांचा अवलंब केला. प्रसंगी पोलिसांचा लाठीमार झेलावा लागला. ते  अशा पद्धतीने ४२ च्या भारत छोड़ो आंदोलनात सक्रीय झाले. मालवण परिसरातील राजकोट येथे वायरलेस स्टेशन जाळण्याच्या संदर्भात त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

बबन डिसोजा आणि लीलाधर हेगडे

 

त्यांनी स्वातंत्र्यलढ्याबरोबरच गावोगावी राष्ट्र सेवा दलाच्या शाखा सुरु करणे व प्रमुख ठिकाणी शिबीरे भरविणे यावर भर दिला. त्यांनी मालवणमध्ये राष्ट्र सेवा दलाच्या दोन शाखा सुरू केल्या. मुलींच्या शाखेत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मालवणमध्ये मारुतिराव शिर्सेकर यांच्या नेतृत्वाखाली  त्यांनी भूमिगत कार्य सुरू केले. तुरुंगात न जाता बाहेर राहून काम करायचे ठरविले. राजापूरचे शिबीर संपल्यानंतर भाऊ तेंडुलकर यांच्या बरोबर रत्नागिरी जिल्हयाच्या दक्षिण भागात भूमिगत कार्यात ते सामील झाले. तेथील त्या वेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत भूमिगत कार्य करणे सुलभ व्हावे म्हणून भाऊ तेंडुलकरांनी त्यांचे नाव बदलून बबन कुळकर्णी असे ठेवले, ४२ च्या लढ्यानंतर ते पुन्हा बबन डिसोजा या नावाने ओळखले गेले.  १९४४ साली ते मुंबईला आले.

 

रतन डिसोजा, राणी पाटील, चंद्रशेखर, बबन डिसोजा

 

भूमिगत कार्य चालू असले तरी उपजिवीकेसाठी नोकरी करणे गरजेचे होते. त्यांनी प्रिंटींग प्रेस व मुंबई महापालीकेत नोकरी केली. नंतर 'टाइम्स ऑफ इंडिया'त मुद्रित तपासनीसाचे काम केले. पण त्यांचे मन नोकरीत रमेना. भाऊ तेंडुलकरांनी ही गोष्ट ओळखली व त्यांना काँग्रेस सोशलिस्ट पक्षाचा सदस्य बनविले. साने गुरुजीच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम सुरू केले. यावेळी राष्ट्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे  साथी बगाराम तुळपुळे, किसन तुळपुळे, राजाभाऊ कुळकर्णी इत्यादी काही समाजवादी कार्यकर्ते बाहेर पडले व  साने गुरुजी आणि अशोक मेहता यांच्या नेतुलाखाली १९४७ साली मिल मजदूर सभेची स्थापना केली. मिल मजदूर सभेत बबन डिसोजा यांनी  पूर्ण वेळ कार्य करणे सुरु केले. १९५० च्या गिरणी कामगारांच्या बोनसच्या प्रश्नावर ६२ दिवसांच्या ऐतिहासिक संपात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पुढे ते मिल मजदूर सभेतून मुंबई शहर प्रजा समाजवादी पक्षाचे पूर्ण वेळ चिटणीस झाले. परिणामी १९५४ ते १९७१ या काळात शहर कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली.


 बबन डिसोजा व ज्ञानेश देऊळकर

 

दि. ५ मार्च १९५४ रोजी रतन पै यांच्याशी बबन डिसोजा यांचा  विवाह साने गुरुजी यांच्या मेधा भुवन, दादर या निवासस्थानी झाला. विवाहानंतर महिन्याच्या आतच दोघांनाही साथी अशोक मेहता यांच्या निवडणूकीच्या कामासाठी गोंदियाला जावे लागले. तिथे. केवलचंद जैन यांच्या घरी राहून महिनाभर निवडणुकीचे  काम केले. नंतर १९७० साली वसंत बापट, सदानंद वर्दे व लिलाधर हेगडे यांनी आईला (रतन डिसोजा) साने गुरुजी विद्यामंदीर, सांताक्रूज येथे मुख्याध्यापिका म्हणून नेमले. तिथे निवृत्त होइपर्यंत तिने माध्यमिक विभागाची मुख्याध्यापिका म्हणून काम केले.


बबन डिसोजा १९५५ साली स्थापन झालेल्या गोवा विमोचन समितीचे व संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मुंबई शाखेचे कार्यालयीन सचिव होते. नंतर ते प्रजा समाजवादी पक्षाचे कार्यालयीन काम पाहू लागळे, तिथे त्यांची मधू दंडवते, जी. जी. परीख व सदानंद वर्दे यांच्याशी मैत्री झाली. १९५६ साली आईला माहेरचे कुणी नसल्यामुळे प्रिय मैत्रिण प्रमिला दंडवते यांनी स्वतःच्या घरी शारदाश्रम, दादर येथे आईला आणले व तिचे बाळंतपण केले. माझ्या जन्मापासून पहिले ३-४ महिने आम्ही मधू दंडवतेंच्या घरी रहात होतो. तेव्हा पासून दोन्ही कुटुंबातील मैत्री अधिक दृढ झाली. काही वर्षांनी वडिलांनी समाजवादी मित्रांच्या सहकार्याने विलेपार्ल्यात  मधू पानवलकर,  वसंत गुप्ते व इतर अनेक समविचारी लोकांसोबत प्लॉट पाहून तिथे १९५९ साली नवसमाज सोसायटी स्थापन केली. डिसेंबर १९६० मध्ये सोसायटीच्या उदघाटनाला तेव्हाचे अर्थमंत्री वैकुंठभाई मेहता उपस्थित होते हे विशेष !. नवसमाज सोसायटी विमानतळाजवळ असल्याने आणि पूर्वीचे उत्तम संबंध असल्याने समाजवादी नेतेमंडळी आमच्या घरी येवून राहू लागली. एच. व्ही. कामत, प्रेम भसीन, बॅ. नाथ पै, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधू दंडवते, चंद्रशेखर जी चर्चेसाठी घरी येऊ  लागले.

बबन डिसोजा हे  नाथ पैंच्या तिन्ही निवडणुकींमध्ये राजापूर मतदार संघात व कोकणात त्यांच्यासोबत असायचे.  बॅ. नाथ पै यांच्या निधनानंतर पक्षाने मधू दंडवते यांना राजापूर मतदारसंघात उभे केले. ते सहा वेळा तिथून निवडून आले. त्यांच्याही सर्व निवडणूकींचे व दौऱ्यांचे  नियोजन बबन डिसोजा यांनीच  केले. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात आणीबाणीविरोधी साहित्य वाटण्याचे काम त्यांनी केले. त्यावेळी आमच्या घराचीही सी. आय.डी ने झडती घेतली होती. . १९७७ च्या जे. पी. मूव्हमेंट मध्ये जनता पक्ष स्थापन झाल्यावर त्यांनी  मुंबई जनता पक्षाचे कार्य केले.



बबन डिसोजा मुंबईत असले तरी त्यांच्या जन्मभूमीला विसरले नाहीत. १९८० साली मालवणमध्ये बॅ. नाथ पै सेवांगणाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. गेली ४४ वर्षे ही संस्था अविरत कार्य करीत आहे. या व्यतिरिक्त वडिलांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनात अनेक पदे सांभाळली. त्या पैकी मुख्य म्हणजे मिल  मजदूर सभेचे अध्यक्षपद व मालवण मधील बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्षपद होय. नाथ पै सेवांगणात त्यांनी श्री. ज्ञानेश देऊळकर व इतर सभासदांच्या साहाय्याने शैक्षणिक, शेतीविषयक व सामाजिक विकासासाठी अनेक उपक्रम राबविले. या व्यतिरिक्त खेडोपाडी स्वातंत्र्यसैनिकांना सरकारी पेन्शन मिळावे यासाठी वडिलांनी मित्र जगदीश तिरोडकर यांच्यासोबत अनेक स्वातंत्र्यसैनिकांना भेटून पेन्शनसाठी नोंदणीचे आवाहन केले, सरकारी पेन्शनमुळे अनेक स्वातंत्र्यसैनिकांना दिलासा मिळाला.


दि. 20 जुलै २००५ रोजी आईचा मृत्यू झाला. वडिलांच्या  व्यक्तिगत जीवनात हा सर्वाधिक मोठा धक्का होता. तरी खचून न जाता त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवून ठेवले. त्यांनी  वयाच्या ९३ व्या वर्षापर्यंत नितांत सेवाभावनेने अनेक पदे सांभाळली. निवृत्त झाल्यानंतर गेली ७ वर्षे मला  व माझ्या कुटुंबियांना त्यांची सेवा करायची संधी मिळाली. आज ३ सप्टेंबर २०२४ ला त्यांना शंभर वर्षे पूर्ण होत आहेत याचा आम्हाला आनंद आहे.


- राणी सतीश पाटील

(लेखिका बाबन डिसोजा यांच्या कन्या आहेत. त्यांनी लिहिलेला लेख दि. तीन सप्टेंबर रोजी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यात थोडी भर घालून हा लेख तयार केला आहे) 

 

टिप्पण्या