बातमी, विश्लेषण आणि अर्थ सांगणारे पुस्तक


विख्यात पत्रकार राजीव  साबडे  यांनी लिहिलेले आणि ‘रोहन प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेले  ‘वार्तांच्या झाल्या कथा’ हे पुस्तक पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या आणि काही वर्षे पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येकाने  वाचण्यासारखे आहे. ‘एका ज्येष्ठ पत्रकाराने अनुभवलेल्या विविध घटनांचे गोष्टीरूप चित्रण’ असे पुस्तकाच्या सुरुवातीला म्हटले असले तरीही वेगवेगळ्या घटनांचे रिपोर्ताज स्वरूपातले  लेखन आणि ती घटना आज अनेक वर्षे होऊन गेली तरी डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करण्याचे कसब हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.  हे संपूर्ण लेखन कधीही कोणताही सवंगपणा आणि भडकपणा येऊ न देता केले असल्यामुळे ते अधिक विश्वासार्ह वाटते.  श्री साबडे यांची संपूर्ण कारकीर्द पुण्याच्या 'सकाळ' या वृत्तपत्रात गेली.  तब्बल ३४  वर्षे विविध संपादकीय पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना देश-विदेशात वार्तांकन करण्याची संधी मिळाली आणि त्यातल्या काही घटनांवर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.  पुस्तकांमध्ये तेरा प्रकरणे आहेत आणि प्रत्येक प्रकरणातला तपशील हा स्वतंत्रपणे पुस्तक होऊ शकतो इतका भरगच्च आहे.  या तेराही विषयांवर यापूर्वी कोणी लेखन केले नाही असे नाही, परंतु सर्व दृष्टिकोन एकाच ठिकाणी वाचायला मिळाल्याने ते विषय नवीन पत्रकाराला अथवा पत्रकारितेत वार्तांकन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शक ठरेल या शंका नाही.  लेखक पुणेकर असल्यामुळे पुण्याच्या काही विषयांवर त्यांनी लिहिले हे स्वाभाविक म्हणायला पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीने ते लिहिले आहे आणि ज्या सखोलपणे तो विषय उलगडून दाखवला आहे ते वाचले  की मग पुस्तक एकदा वाचायला घेतले की खाली ठेवावेसे वाटत नाही.

 पुणे आणि रजनीश हा विषय पुणेकरांना नवीन नाही.  आज रजनीश जाऊन इतकी वर्ष होऊन गेली तरीही या माणसाबद्दल अनेकांना कुतूहल आहे. हे रजनीश पुण्यात कसे आले, त्यांनी आपले बस्तान कसे बसवले इथपासून ते रजनीश यांच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास थक्क करून टाकणारा आहे. रजनीश यांच्या आश्रमात प्रवेश मिळवणे आणि थेट रजनीश यांच्यापर्यंत पोहोचणे ही सहजसोपी गोष्ट नव्हती.  तरीही साबडे यांनी तेथे प्रवेश मिळवला आणि नुसता प्रवेश मिळवला असे नाही तर रजनीश यांच्या संदर्भातील सर्व बातम्या मोठ्या खुबीने बाहेर काढल्या.  रजनीश यांच्या विश्वासातले काही खास लोक होते आणि त्यांच्या मार्फतच आश्रमाचा व्यवहार चालत असे, परंतु नंतरच्या काळात हे विश्वासातले लोक त्यांच्यापासून दूर झाले. रजनीश यांच्या मृत्यूनंतर त्या आश्रमाचे स्वरूपात पूर्णपणे बदलले इथपर्यंतचा इतिहास श्री साबडे यांनी अत्यंत मनोरंजक पद्धतीने पण अतिरंजित न करता दिला आहे


 'एका सेनानीचा अंत आणि जिंदा - सुखाशी गाठ' हा जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यावरील लेख अतिशय हृद्य झाला आहे.  जनरल वैद्य यांच्या सुरक्षेबाबत जी खबरदारी घ्यायला हवी होती ती घेतली असती तर आज ते हयात असते आणि त्यांच्या गुणवत्तेचा वापर भारताला करून घेता आला असता.  परंतु तसे झाले नाही आणि एक उत्तम सेनानी भारताने गमावला.  भारतीय तोफखानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त एक  कार्यक्रम आयोजित केला होता आणि तिथे जनरल वैद्य यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी मला मिळाली होती अतिशय अल्प अशा भेटीनंतर जनरल वैद्य यांच्या बद्दल कमालीचा आदर निर्माण झाला होता.  त्यामुळे साबडे यांनी लिहिलेले हे प्रकरण वाचताना वेगळ्याच प्रकारचा थरार जाणवत होता.


तिसरे प्रकरण पुण्यात गाजलेल्या जोशी -अभ्यंकर हत्याकांड या विषयावरचे आहे. मी त्या काळात पुण्यात गरवारे शाळेत (अकरावी)आणि नंतर गरवारे महाविद्यालयात (बारावी) होतो.  त्याच काळात हे हत्याकांड घडले होते त्यामुळे हे प्रकरण वाचताना तो काळ मी पुन्हा जगत असल्यासारखे वाटले. मी तेव्हा प्रभात रोडवरील एका बंगल्यात राहत होतो.  जोशी अभ्यंकर हत्याकांड झाले त्याच्या अगदी जवळ.  गुन्हेगार कशा पद्धतीने गुन्हा करू शकतात आणि त्यांना पकडणे हे काही वेळेला किती कठीण होते पण एखादी लहान चूक केल्यानंतर ते गुन्हेगार पकडले जातात,  पकडले गेल्यानंतरही त्याबद्दल त्यांना पश्चात्ताप होत नाही  ही मानसिकता विलक्षण भयकारक वाटते. हे प्रकरण वाचताना अनेकदा अंगावर शहरे आल्यावाचून राहणार नाहीत. 


पुस्तकातली आणखीन काही प्रकरणे हिंसाचार आणि त्याचे परिणाम या दृष्टिकोनातून लिहिलेली आहेत. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर शीख समुदायाला लक्ष्य करून झालेल्या दंगली, त्याचे राजकीय परिणाम, सुवर्ण मंदिर कारवाई  करताना झालेल्या चुका आणि त्याचे नंतर भोगावे लागलेले परिणाम या विषयावरील 'स्मरण एका हत्येचं आणि हत्याकांडाचं' हे प्रकरण  अनेक  पैलूंवर प्रकाश टाकते.  इंदिरा गांधींची हत्या, शीख  हत्याकांडातील काही काँग्रेस नेत्यांचा संबंध, डोळ्यासमोर हत्याकांड होत असतानाही पोलिसांनी केलेले दुर्लक्ष याचा तपशील सांगत असतानाच माणुसकीच्या भावनेने काही शीख कुटुंबांना कसे वाचवण्यात आले हेही श्री साबडे सांगतात.  ते वाचताना या केवळ वार्ता नसून 'वार्तामागची वार्ता' आहे हे जाणवते. 

 भारताने आणखी एक पंतप्रधान हिंसाचारात गमावला आणि ते म्हणजे राजीव गांधी.  इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर रातोरात पंतप्रधान झालेले राजीव गांधी यांची सुरुवात फार आश्वासक होती आणि आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत खूप चांगली प्रगती करेल अशी चिन्हे दिसू लागली होती.  परंतु नंतर राजीव गांधी यांची धोरणे कशी बदलत गेली, ते कसे अनेक चुका करत गेले आणि त्याची परिणीती त्यांची सत्ता जाण्यात कशी झाली याचे वर्णन पुस्तकात अतिशय वस्तुनिष्ठपणे आले आहे. याच राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतिसेना पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तो कसा फसला हे सविस्तर प्रकरणे सांगणारे वेगळे प्रकरण या पुस्तकात आहे.  या प्रत्येक प्रकरणातील तपशील इतका लक्षवेधी आहे की त्या त्यावेळी दर्शवलेल्या चुका संबंधितांच्या लक्षात कशा आल्या नाहीत आणि आल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण त्यांनी का अवलंबले असे प्रश्न पडतात.  परंतु राजकारणापुढे असे सगळे प्रश्न व्यर्थ ठरतात, त्याची जबर किंमत भारताला मोजावी लागली आहे. 


सध्या इस्राईल आणि लेबेनॉन यांच्यात युद्ध चालू आहे, त्यात इराणही ओढला गेला आहे.  गाझा  पट्टीत तर युद्ध आधीपासून चालू आहे.  या सगळ्याची पार्श्वभूमी  'धर्मभूमी ते युद्धभूमी ' या प्रकरणात वाचायला मिळते. २००६ साली श्री साबडे यांना इस्राईलमध्ये जाण्याची संधी मिळाली.  याबद्दल ते लिहितात -- युद्ध किंवा युद्धसदृश्य स्थितीचं वार्तांकन करण्याची ती माझी पहिली वेळ नव्हती.  कारगिल युद्ध ओसरतानाचं वातावरण मी तिथे जाऊन अनुभवलं होतं.  त्याहीपेक्षा वेगळे म्हणजे प्रत्यक्ष युद्धापेक्षा भयंकर अशा अतिरेक्यांनी सुरू केलेल्या काश्मीर खोऱ्यातील आणि पंजाबमधील दहशतवादी युद्धाचे भयानक आणि थरारक असे अनुभव मी घेतले होते.  ऐंशीच्या दशकात संपूर्ण पंजाब आणि ९० च्या दशकात संपूर्ण काश्मीर खोरे अघोषित युद्धाची भूमी बनलं होतं.  त्याचं वार्तांकन करून परतताना प्रत्येक वेळी आपण जिवंत आणि धडधाकट परतत आहोत हा चमत्कार वाटत होता.  वाईट म्हणजे ते युद्धाचे प्रसंग दहशतवादी विरुद्ध सुरक्षा दल म्हणजे आपले लोक विरुद्ध आपले सैनिक असे होतं.  इस्राईलमध्ये नेमकी उलटी परिस्थिती होती.  लढणारे दोन्ही गट तिसरेच म्हणजे आपल्याशी अर्थार्थी काही संबंध नसलेले होते.  हे म्हणजे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट कसोटी सामन्याचे वार्तांकन करण्यासारखं होतं.  फरक एवढाच की इथे त्रयस्थपणे बघतानाही आपला जीव धोक्यात टाकणं क्रमप्राप्त होतं.  पण पत्रकारितेत असली अवघड कामगिरीच आव्हानात्मक असते आणि ती पार पाडताना चे अनुभव जीवनभराची शिदोरी बनत असतात.  शिवाय इस्राईलबद्दल मनात एक विलक्षण कुतूहल आणि आकर्षण निर्माण झालेलं होतं.  त्यापूर्वी दोन वेळा पोलंडला दिलेल्या भेटींमध्ये नाझींनी ५० ते ५५ लाख ज्यूंच्या  केलेल्या कत्तलीच्या खुणा मी जवळून पाहिल्या होत्या मानवी इतिहासातील तो सर्वात काळा अध्याय होता.  त्या भीषण प्रसंगांचे आणि छळ छावण्यांचे अवशेष पाहताना मी अंतर्बाह्य हादरून गेलो होतो त्यावेळच्या महाशक्तिशाली सेनेने यांचा वंश संहार हे अंतिम ध्येय ठेवलं होतं.  त्यातून वाचलेल्या ज्यूंनी  इस्राईल राष्ट्र उभं केलं होतं.  हे वाळवंटातील नंदनवन ठरलं होतं आणि प्रबळ लष्करी सत्ता केंद्र बनलं होतं.  हे परिवर्तन जवळून पाहण्याची सुप्त इच्छा पूर्ण होण्याची ती संधी होती.'' त्यांची ही साहसी पत्रकारिता इस्राईलप्रमाणेच इतर प्रकरणांमध्येही वाचायला मिळते.


 हिंसाचाराशी  निगडित नसलेली परंतु तरीही अत्यंत वाचनीय असलेली काही प्रकरणे या पुस्तकात आहेत 'अविस्मरणीय अटलजी' हे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरचे प्रकरण अतिशय मार्मिक झाले आहे.  त्यांच्या मनातली अस्वस्थता साबडे यांनी अचूक टिपली आहे.  पुण्यातलं 'महानगर व्यापणारं  टेल्को कुटुंब' आणि  मार्केट यार्ड स्थलांतर - नको नको ते हवे हवे (अर्थात त्यामागचे राजकारण ), आणि पुणेरी बावाजी हे  पुण्यातील पारसी कुटुंबांवरील प्रकरण  या तीनही विषयांवर चांगला प्रकाशझोत टाकतात .


पुस्तकातील लेखनाबद्दल लेखक लिहितात की या ग्रंथातील प्रत्येक प्रकरण म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातील आठवणींवर आधारित लेखन आहे.  काही व्यक्ती,  स्थळ आणि प्रसंगांचं  वार्तांकन करताना त्यांच्याशी नकळत जवळीक निर्माण झाली त्यांचे संदर्भ घडामोडी यांचा मागोवा घेणे आणि त्यांचा अभ्यास करणे याचा छंद जडला.  तो या लेखनात उतरवण्याचा प्रयत्न मी केला आहे.  मी ज्या तीन विषयांवरील वार्तांकनात अत्यंत रोमांचक संस्मरणीय आणि काही वेळा भीतीदायक अनुभव घेतले ते विषय मात्र या पुस्तकात घेतलेले नाहीत.  पाकिस्तानचे तीन दौरे आणि काश्मीर व अयोध्येच्या अनेक भेटी या प्रत्येक विषयाचे अनुभव एक एक स्वतंत्र पुस्तक बनेल एवढे विस्तृत आहेत म्हणून ते मागे ठेवले आहेत.'' 


वर्तमानपत्राच्या विश्वामध्ये कोणत्याही एका वार्ताहराला शहर - राज्य - देश आणि परदेश इतक्या सगळ्या ठिकाणी जाऊन वार्तांकन करण्याची संधी फारच कमी वेळा मिळते.  सकाळच्या श्री ग. मुणगेकर  आणि नंतरच्या संपादकांनी श्री साबडे यांना ही संधी दिली आणि त्या संधीचे चीज त्यांनी करून दाखवले हे पुस्तक वाचताना वारंवार लक्षात येते.  साधारणपणे पत्रकाराचे पुस्तक वैयक्तिक टीका टिप्पणी अथवा एकतर्फी पक्षीय लेखन अशा प्रकारचे होण्याची शक्यता असते.  आजच्या काळात तर ती शक्यता वाढते. श्री साबडे यांनी तसे होऊ दिलेले नाही.  जिथे एखाद्याच्या चुका दाखवायच्या तिथे त्या चुका दाखवल्या आहेत आणि  त्याच नेत्याने काही चांगले केले असेल तर त्याचे कौतुकही केले आहे.  श्री साबडे हे २००९  मध्ये सकाळमधून निवृत्त झाले.  नंतर ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असले तरी या पुस्तकातील त्यांचे सगळे अनुभव हे २००९ च्या आधीचे आहेत.  त्यावेळची पत्रकारिता आणि आजच्या पत्रकारितेत किती फरक आहे हे पुस्तक वाचता वाचता लक्षात येते.  बातमी मिळवण्यासाठी वार्ताहराचा एक 'सोर्स' असावा लागतो किंबहुना अनेक 'सोर्स' असावे लागतात.  ते श्री साबडे यांनी कसे मिळवले आणि त्या आधारे कशा बातम्या दिल्या हे आज नवीन  वार्ताहरांनी अभ्यास करण्यासारखे आहे. या दृष्टीने 'नाती अल्पकाळाची चिरंतन आठवणींची' हे प्रकरण वाचायलाच हवे. रूढार्थाने 'सोर्स' नसलेले पण काहीही संबंध नसताना वार्तांकनात सर्वतोपरी मदत करणारे हात कसे पुढे येतात आणि त्यांची चिरंतन आठवण कशी राहते हे वाचणे हे वाचकाला आणि पत्रकार होऊ पाहणाऱ्यालाही बरेच काही शिकवून जाते. 



निवृत्तीनंतर सुमारे १५ वर्षांनी हे पुस्तक लिहिणे हे काम सोपे निश्चित नव्हते. श्री. साबडे यांनीच म्हटल्याप्रमाणे - पत्रकारितेतून बाहेर पडल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात अध्यापनासाठी मला अधिक वेळ देता आला. तिथे शिकवताना 'थिअरी' समजावताना माझे पत्रकारितेतील अनुभव अपरिहार्यपणे येत असत. ते ऐकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी 'सर, तुम्ही हे अनुभव लिहून काढा' असा प्रेमळ आग्रह धरत. लष्करी सेवेत स्टडी लिव्ह घेऊन अभ्यासक्रम करणाऱ्या एका कर्नलने तर 'तुम्ही एक एक अनुभव बोलत राहा, मी लिहून काढतो.' इथपर्यंत गळ घातली. त्या वेळी मला जाणवलं, की आपल्या नकळत इतरांना सांगावं असं मोठं संचित जमा झालं आहे.दर वर्षी 'पुण्यभूषण' हा दर्जेदार दिवाळी अंक काढणारे माझे मित्र डॉ. सतीश देसाई आणि अंकाच्या सहसंपादक गौरी कानेटकर यांच्या आग्रहामुळे मी पूर्वी वार्तांकन केलेल्या पुणे शहरातील काही घटना, संस्था, समाज यांच्याबद्दल लेखन सुरू केलं होतं. ते पुन्हा वाचताना मला वाटलं की, त्यातील आणखी काही तपशील लिहिताना सुटून गेले आहेत. त्यांची जोड दिली तर तेच लेख अधिक विस्तृत आणि रंजक ठरू शकतील. त्यातूनच मग या ग्रंथलेखनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कोरोना कालखंडात लॉकडाऊनने इतर सगळी व्यवधानं बंद पाडल्यावर मी वार्तांकन केलेल्या देश-विदेशातील एकेका विषयाच्या जुन्या नोट्स शोधणं, त्या वेळच्या अंकांची कात्रणं मिळवणं आणि संबंधितांशी बोलून त्याचे आणखी तपशील मिळवणं याला मी सुरुवात केली. प्रारंभी वाटलं त्यापेक्षा हे काम खूप अवघड आणि त्रासाचं होतं. पण हळूहळू पाहिजे ती सर्व माहिती मिळत गेली. त्याचबरोबर विस्मृतीत गेलेले अनेक संदर्भ लिहायला बसल्यावर आपोआप आठवत गेले. त्यामधूनच वार्ताच्या झालेल्या कथांचं एकेक प्रकरण आकार घेत गेलं.''


'रोहन प्रकाशन'ने हे पुस्तक काढल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.   राहिलेल्या तीन विषयांवरचे पुस्तक किंवा पुस्तके लवकरच प्रकाशित  व्हावीत यासाठी श्री साबडे  यांना शुभेच्छा ! 


(वार्तांच्या झाल्या कथा - मुद्रक व प्रकाशक - प्रदीप चंपानेरकर, प्रकल्प समन्वयक - रोहन चंपानेरकर, संपादन - अनुजा जगताप, मुखपृष्ठ - राजू देशपांडे. पाने - ३२२. किंमत - ४९५ रुपये)

टिप्पण्या