वास्तव
' रिस्पॉन्सिबल नेटिझम' ही संस्था गेली आठ वर्ष शालेय / महाविद्यालयीन मुले, सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षक आणि इतर अनेक लोकांबरोबर काम करत आहे. सायबर सिक्युरिटीचे धडे या सर्वांना देत आहे अथवा त्यांची मदत घेऊन या क्षेत्रात भरीव काम करत आहे. गेल्या आठ वर्षात या संस्थेने किमान दहा लाख मुलांना सायबर सिक्युरिटी विषयी जागृत केले आहे आणि हे काम अव्याहतपणे अजून चालू आहे आपण, मुले इंटरनेट खूप वापरतात असे म्हणत असतो आणि सध्याच्या lockdown काळामध्ये तर मुलांना वेळ घालवायला इंटरनेटशिवाय दुसरे काहीच साधन नाही, असेही आपण म्हणतो. काही शाळांनी ऑनलाईन धडे सुरुवात केली आहे त्या धड्यांचा या मुलांना फायदा होतो आहे आणि या ऑनलाईन राहण्यामुळे मुले अधिक स्क्रीनजवळ जात असली तरी तो इंटरनेटचा सकारात्मक वापर आहे असे म्हणायला हवे. तरीही एकंदरीत ही मुले इंटरनेटवर नेहमी काय करतात, त्याचा कसा वापर करतात याचा एक तपशीलवार आढावा रिस्पॉन्सिबल नेटिझमने नुकताच घेतला.
सायबर पीस फाउंडेशन या संस्थेची मदत त्यांना मिळाली. त्याचबरोबर एम एस सी ई आर टी आणि इतर संस्थांनी त्यांना मदत केली. त्यात एन एम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि एस एन डी टी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजी यांची मोलाची मदत झाली. त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागामधला मुलांची एक पाहणी केली तिचे निष्कर्ष धक्कादायक वाटत असले तरी याहीपेक्षा अधिक प्रमाणावर मुले इंटरनेट वापरत असावीत हे उघडच आहे.
या पाहणीसाठी त्यांनी मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, नंदुरबार या जिल्ह्यांमधील १८ शाळांमधील ११५२ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यापैकी चार मुले वगळता ११४८ मुलांनी या पाहणीमध्ये प्रत्यक्षात भाग घेतला. महाराष्ट्राचे सगळे जिल्हे यात समाविष्ट होऊ शकले नाहीत तरीही या पाहणीचा अहवाल एक निश्चित चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करतो. या ११४८ पैकी ५६५ मुलगे होते आणि ५८३ या मुली होत्या. इयत्ता सहावी ते नववी अशा इयत्तांमध्ये शिकणारी ही मुले होती आणि त्यांचा वयोगट १० ते १७ वर्षे असा होता. या पाहणीत काय आढळून आले? केवळ एक टक्का मुली आणि दोन टक्के मुलगी यांनी असे सांगितले की ते कोणताही फोन अथवा कोणतेही डिवाइस वापरत नाहीत.
रोज तीस मिनिटांपेक्षा कमी वेळ इंटरनेट वापरणाऱ्या मुली या ३०% होत्या तर मुलगे २६ टक्के होते. एक ते दोन तास इतका वेळ इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये १६ टक्के मुली आणि १७ टक्के मुलगी असे प्रमाण होते . तीन ते चार तास इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये एक टक्का मुली आणि दोन टक्के मुली असे प्रमाण होते. त्यांच्या वापरातून आपल्याला काय दिसले ? ११ ते १५ अशा वयोगटाचा विचार केला तर अकरा वर्षाची केवळ चार मुले कोणत्याही प्रकारचा सोशल मीडिया वापरत नव्हते, बारा वयोगटात ११ मुले वापरत नव्हती, तेरा वयोगटात २६ मुले वापरात नव्हती, १४ आणि १५ वयोगटात मात्र अनुक्रमे नऊ आणि आठ टक्के मुलं कोणताही सोशल मीडिया वापरात नव्हती. याचाच अर्थ असा की सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही मुले मोबाईलवर गेम्स खेळतात हे तर सर्वांना माहीत आहे. सर्वात जास्त गेम ते कुठला खेळत असतील? अर्थात पब्जी. जवळपास २७ टक्के विद्यार्थी हा गेम खेळतात.
ज्या ११४८ मुलांचा सर्वे केला त्यापैकी ३५९ मुली आणि १५२ मुले कोणताही गेम खेळत नाहीत. याचाच अर्थ असा की २२४ मुली आणि ४१३ मुलगे गेम्स खेळत असतात. विशेष म्हणजे या मुलांपैकी २४% मुलांनी मान्य केले की मी माझ्या फोनवर पूर्णतः अवलंबून आहे. ४६% मुलांनी असे म्हणून मान्य केले , की फोन सतत वापरल्याने माझ्या अभ्यासावर परिणाम होतो आहे हे माहीत असूनही मी फोनचा वापर थांबू शकत नाही. साडेनऊ टक्क्यांनी असे मान्य केले की मला फोनवर खेळू दिले नाही म्हणून मित्र अथवा आई वडील यांच्याशी मी भांडण केले आहे. २७ % मुलांनी असे सांगितले की मला माझ्या मोबाईल वापराबद्दल वॉर्निंग देण्यात आली, तरीही मी मोबाईलपासून दूर जाऊ शकत नाही. तर ३६ टक्के लोकांनी मुलांनी सांगितले की मला काही लोकांनी फोनच्या अतिवापरातून बाहेर येण्यासाठी मदत देऊ केली, पण ती मी स्पष्टपणे नाकारली .
अशाच प्रकारची पाहणी वेगवेगळ्या प्रकारात करण्यात आली.
या मुलांना इंटरनेट सिक्युरिटीबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांना अनेक सायबर क्राइमना सामोरे जावे लागते. यापैकी १८% मुलांनी त्यांचे अकाउंट हॅक झाल्याची तक्रार केली, १४ टक्के लोकांनी नको त्या ग्रुपमध्ये आपण मेंबर आहोत असे सांगितले तर सायबर रॅगिंग किंवा सायबर बुलिंग सात ते दहा टक्के मुलांचे झाले होते. आठ टक्के मुलांना अनोळखी लोकांकडूनही त्रास देण्यात येत होता. सोशल मीडिया आणि इतर कारणांसाठी मोबाईलचा वापर ही मुले करत असतात. खरे म्हणजे १३ वर्षे वय होईपर्यंत कोणतेही मूल समाजमाध्यमांचा वापर करू शकत नाही परंतु आजकाल अगदी लहान मुले गेम्स अथवा वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन नको ते बघत असतात, नको ते खेळत असतात. सरसकट सगळीच मुले वाईट असतात असे मला सुचवायचे सुद्धा नाही, परंतु सायबर क्राईम हा या मुलांना इतका सोसावा लागतो की काळजी वाटते. पाहणीत अकरा वयोगटातील २३ मुलांना सायबर क्राईमचा फटका बसला असे लक्षात आले. हे प्रमाण १४ व्या वर्षापर्यंत १३४ मुलांना फटका बसणे इतके झाले. पंधराव्या वर्षी मात्र ही संख्या ७० वर खाली आली. पण सायबर बुलिंग किंवा सायबर रॅगिंग यातून ही मुले अजूनही पूर्णपणे बाहेर आली आहेत असे म्हणता येणार नाही.
हा अहवाल मुळातूनच वाचायला हवा. ज्या मुलांची माहिती गोळा करण्यात आली, त्यापैकी ३७ टक्के मुलांना सायबर क्राईमचा फटका बसलेला होता. केवळ ११४८ मुलांमध्ये ही परिस्थिती आहे तर भारतातल्या सर्व शाळांमधील मुलांची परिस्थिती काय असेल हे लक्षात येते . आपण असे जर म्हणत असाल की विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आई-वडील आणि मूल एवढे जण जर राहत असतील तर मूल अधिकाधिक इंटरनेटच्या आहारी जाईल आणि एकत्र कुटुंब पद्धती असेल तरी हे मूल इंटरनेटच्या आहारी जाणार नाही, तर तो समज खोटा आहे हे हा पाहणी अहवाल म्हणतो. दोन्ही प्रकारच्या घरांमध्ये मुलांचे इंटरनेटवेड हे सारखेच आहे. हे रोखण्यासाठी अर्थात पालकांनी अत्यंत सजग असले पाहिजे.
लहानपणापासूनच मुलांच्या हाती मोबाईल सोपवून ते मोठी चूक करतात आणि नंतर मग आमचे मूल मोबाईलच्या आहारी गेले आहे असे म्हणतात. योग्य वयात पालकांनी मुलाला इंटरनेटचा वापर करणे शिकवले पाहिजे, त्याचे धोके आणि फायदे दोन्ही समजून सांगितले तर मुले याचा अतिरेकी वापर करतील असे वाटत नाही. भारतात इंटरनेट वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि त्यातही मुले खूप मोठ्या प्रमाणावर इंटरनेट वापरत आहेत.
आजचा ऍडिक्ट झालेल्या मुलांसाठी खास उपचार केंद्र सुरू करावी लागणे हे मोठे दुर्दैव आहे. परंतु वास्तवाला सामोरे जाण्यातच शहाणपण आहे. स्वतः रिस्पॉन्सिबल नेटिझम अशा मुलांचे कौन्सिलिंग करते आणि त्यांना योग्य त्या संस्थेकडे किंवा पोलिसांकडे नेऊन त्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच वेळेला आपल्या मुलाचा फोनचा अतिरेकी वापर पालकांच्या लक्षात आल्यानंतर उशीर झालेला असतो आणि अशावेळी त्या मुलाच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे केवळ पोलीस नव्हे तर मानसोपचार तज्ञ आणि इंटरनेट संदर्भातली मार्गदर्शन करणारी रिस्पॉन्सिबल नेटिझम व इतर संस्था हे खूप मार्गदर्शक ठरतात.
साधारणपणे पालक आपली बदनामी नको म्हणून पोलिसांकडे जाणे टाळतात आणि घरातल्या घरात मुलावर ओरडून, मारहाण करून तो मुलगा सुधारतो आहे का हे बघण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे केल्यामुळे तोटे जास्त होतात आणि ते मूल अधिकाधिक इंटरनेटच्या आहारी जाण्याची शक्यता असते. अशी मुले या इंटरनेटचा अतिवापर करण्यापासून बाहेर पडू शकतात, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य त्या टप्प्यावर मिळायला हवे आणि पालकांनी, शिक्षकांनी, मित्रमंडळींनी पुरेसा समंजसपणा दाखवला तरी यातून मार्ग निघण्यात काहीच अडचण नाही. अतिशय परिश्रम घेऊन ही पाहणी केल्याबद्दल आणि हे भीषण वास्तव लोकांसमोर आणल्याबद्दल रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या सोनाली पाटणकर आणि उमेश जोशी व त्यांची संपूर्ण टीम यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या अहवालाने धोक्याचा इशारा दिला आहे, पुढचे काम अधिक कठीण आहे, याची जाणीव आपण ठेवायला हवी.
(रिस्पॉन्सिबल नेटिझम हेल्पलाईन +९१-८४३३७०१०७७ )
Comments
Post a Comment