शिक्षण क्षेत्रातले प्रयत्न अपुरेच?
काही दिवसापूर्वी केंद्रीय शिक्षण खात्याने घेतलेल्या एका निर्णयाबद्दल बरीच चर्चा झाली होती. इयत्ता पाचवी आणि आठवी या इयत्तेत जर विद्यार्थी नापास झाले तर त्यांना पुढच्या इयत्तेत न ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची ही बातमी होती. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण नको आणि आठवीपर्यंत त्यांना विनाताण शिकता यावे यासाठी आठवीपर्यंत परीक्षेत उत्तीर्ण करण्याचा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. तो बदलल्यानंतर त्यावर टीका झाली आणि परत विद्यार्थ्यांवरचा मानसिक बोजा वाढेल, तणाव वाढेल असे म्हटले गेले होते. पण यातही नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत जाऊन सुद्धा नीट लिहिता वाचता येत नाही अथवा जे अभ्यासात काहीच प्रगती करू शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांचे नववीत गेल्यानंतर काय हाल होतील याचाही विचार केला गेला पाहिजे. यात संदर्भात आज दिनांक २३ जानेवारीला 'द इकॉनॉमिक टाइम्स' या वृत्तपत्रात आलेल्या बातमीकडे पाहिले पाहिजे असे मला वाटते . जानेवारी महिना संपत आला की विद्यार्थी आणि पालकांनाही वेध लागतात ते दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे. यातली दहावीची ...