नाशिकमध्ये वेगळा प्रयोग
कोरोनामुळे वर्तमानपत्रांच्या जगामध्ये बरीच उलथापालथ झाली. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रांचे वितरण बंद असणे, नंतर टप्प्याटप्प्याने ते सुरु होणे, वाचकांना ती ऑनलाईन वाचण्याची सवय लागणे, परिणामी आज कोरोना काढता पाय घेत असल्याचे संकेत मिळत असतानाही वृत्तपत्रांचे वितरण कोरोनापूर्व काळाइतके १०० टक्के न होणे अशा अनेक समस्या आजही भेडसावत आहेत. मधल्या काळात अनेक पत्रकारांनी वैयक्तिक पातळीवर ऑनलाईन चा आधार घेण्याचा प्रयत्न केला. ९० टक्के लोक त्यांच्या website चे रूपांतर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करण्यात अयशस्वी ठरले. जे यशस्वी ठरले ते तगले. त्यातील एक महत्वाची website म्हणजे https://indiadarpanlive.com. नाशिक जिल्हा आणि आसपासच्या बातम्यांना प्राधान्य द्यायचा प्राथमिक हेतू असला तरी आधी महाराष्ट्र, नंतर हळूहळू देशाच्या पातळीवरच्या बातम्या दिसायला लागल्या. हजारो वाचक Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेले. टेलिग्राम, फेसबुक आणि You Tube च्या माध्यमातून जोडले गेले. आतापर्यंत जवळपास सव्वातीन कोटी लोकांनी या website चा लाभ घेतला हे फक्त सव्वा वर्षाच्या काळात झाले. 'आमचे प्रिंट माध्यमच खरे, ऑनलाईन म्हणजे timepass ' असे कुत्सितपणे बोलणाऱ्यांना ही सणसणीत चपराक होती / आहे. प्रिंट माध्यम ताकदवान आहेच, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ऑनलाईनला बदलत्या काळातही कमी लेखण्याचा विचार कसा केला जातो ते कळत नाही. असो.
जळगावहून निघणारे 'जनशक्ती' हे दैनिक आणि गौतम संचेती, भावेश ब्राह्मणकर, देविदास चौधरी यांनी अत्यंत श्रमाने घडवलेले Indiadarpanlive.com हे मिळून आज संयुक्तपणे 'जनशक्ती'ची नाशिक आवृत्ती सुरु करत आहेत. प्रत्येक वर्तमानपत्राची website असतेच, परंतु दोन स्वतंत्र कंपन्यांची माध्यमे, तीही प्रिंट व website, एकत्र येऊन प्रिंट आवृत्ती सुरु करतात हे महत्वाचे आहे. हा कार्यक्रम आज नाशिकला मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या नवीन प्रयोगाला मन:पूर्वक शुभेच्छा !
(संदर्भासाठी मी एप्रिलमध्ये लिहिलेलय त्यांच्यावरच्या लेखाची लिंक देत आहे - https://ashokpanvalkar.com/darpan-ind/ )
27/02/2022
हेतू स्तुत्य, पण मार्ग?
मुलांचे इंटरनेट addiction हा सर्वच पालकांसाठी चिंतेचा विषय राहिला आहे. अनेक मुलांनी त्यापायी आपल्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पालकांनी फोन विकत घेऊन दिला नाही किंवा असलेला फोन काढून घेतला म्हणून मुलांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. मानसोपचार तज्ञांकडेही अशा प्रकारच्या अनेक केसेस येत आहेत. इंटरनेटवरचे विशिष्ट गेम्स विशिष्ट वयोगटासाठी असतात हे मुले तर विसरतातच, पालकही स्वतःच्या व्यापात दुर्लक्ष करतात. जेव्हा त्यांच्या लक्षात येते तेव्हा उशीर होतो. या संदर्भात अमेरिकेतल्या एका बातमीने लक्ष वेधून घेतले. कुटुंबातल्या मोठ्या मुलीला मोबाईलचे व्यसन लागले. पालकांनी तिच्याकडून मोबाईल काढून घेतला. तिने अर्थातच थयथयाट केला असणार, पण मोबाईलविना तीन आठवडे गेल्यावर तिने पालकांचे आभार मानले. ही गोष्ट २०१६ची. तेव्हा तिचा धाकटा भाऊ बारा वर्षांचा होता. त्याला मोबाईलचे व्यसन लागू नये म्हणून पालकांनी त्याच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. 'तू १८ वर्षांचा होईपर्यंत मोबाईलवर कोणत्याही समाजमाध्यमांवर (स्नॅपचॅट, ट्विटर, फेसबुक वगैरे) अकाउंट उघडायचे नाही. याचे बक्षीस म्हणून तुला १८ व्या वाढदिवशी आम्ही १८०० डॉलरचे बक्षीस देऊ'', असा तो प्रस्ताव होता. या मुलाने तो स्वीकारला आणि सहा वर्षे मोबाईलकडे ढुंकूनही पाहिले नाही. या आठवड्यात त्याला १८ वर्षे पूर्ण झाली. त्याच दिवशी त्याला पालकांकडून नवीन स्मार्टफोन मिळाला आणि शिवाय १८०० डॉलरही ( साधारण १ लाख ३५ हजार रुपये). आता तो समाजमाध्यमे वापरू शकतो. तो हे काम अतिशय समंजसपणे करेल, त्याच्या आहारी जाणार नाही, असा पालकांना विश्वास आहे. मुलांना इंटरनेट व्यसनापासून दूर ठेवण्याचा हा मार्ग (पैशांचे आमिष दाखवून) अनेकांना पटणार नाही. इंटरनेट वापरावर निर्बंध का हवेत, त्याचे फायदे तोटे काय हे मुलांना योग्य वयात नीट समजावून सांगितले तर ते अधिक पटते. मुलेही ऐकतात. प्रत्येक पालकांचा मार्ग वेगवेगळा असतो, हेतू मात्र एकच असतो. तरीही, वर उदाहरण दिलेल्या मुलाने दाखवलेला 'समंजसपणा' वेगळाच आहे, हे मान्य केले तरी उद्या प्रत्येक गोष्टीसाठी मुले पालकांकडून पैसे मागू लागली तर काय होईल याचा विचार केलेला बरा !
२५/०२/२०२२
मनाला उभारी आली, पण ...
सध्या महाराष्ट्रात उडत असलेल्या राजकीय चिखलामुळे सुजाण नागरिकांचे मन उद्विग्न होत असतानाच एका बातमीमुळे मनाला उभारी आली. 'कोंड नेस्ट ट्रॅव्हलर' या मासिकाने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय नऊ पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे. हीच ती आनंददायी बातमी. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये निसर्गवैभव अजिबात कमी नाही. अर्थात आपण त्याचा लाभ खऱ्या अर्थाने किती घेतला हा प्रश्नच आहे. इतक्या निसर्गसौंदर्याच्या ठिकाणी पर्यटकांसाठी पुरेशा सोयी, स्थानिक रोजगाराची निर्मिती, या ठिकाणांचे चांगल्या अर्थाने 'मार्केटिंग' हे आपण किती केले या प्रश्नांचे उत्तर फारसे सकारात्मक नाही. आता एका मासिकाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश केल्याने तरी आपण जागे होऊ अशी आशा करू या. आपल्याकडे उत्तमोत्तम समुद्रकिनारे आहेत, उत्तम पर्यटनस्थळे आहेत. देशविदेशातील पर्यटकांना तिथे जाण्यासाठी तितक्याच उत्तम सोयी करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी त्या आहेतही. तरीही आपल्याला बरेच काही करणे गरजेचे आहे याची जाण ठेवलेली बरी. कोकणचा कॅलिफोर्निया वगैरे नंतर बघू, कोकणचे 'सुंदर, सक्षम कोकण' झाले तरी आताच्या घडीला पुरे झाले. परंतु राजकारण्यांकडून कोकण नेहमीच उपेक्षित राहिले आहे. निसर्गाने आपल्याला भरपूर दिले आहे. त्याचा उपयोग करून महाराष्ट्रातील आणखी काही जिल्हे / पर्यटनस्थळे जगातील पर्यटकांना भुरळ घालतील असे आपण केले पाहिजे. महाराष्ट्रात पर्यटनातूनही चांगला महसूल मिळू शकतो हे आतापर्यंत कोणत्याच सरकारला लक्षात आलेले नाही. किंबहुना हा विषय त्यांच्या दृष्टीने गेल्या २५-३० वर्षांत प्राधान्याचा नाही. तो व्हावा एवढीच इच्छा आहे !
२४/०२/२०२२
... आणि महिला जिंकल्या !
अमेरिकेत २०१९मध्ये देशाचा महिला फुटबॉल संघ आपल्याच संघटनेच्या विरोधात न्यायालयात गेला. मुद्दा होता असमान वेतनाचा. अमेरिकेचा पुरुष संघ २०१४ मध्ये अंतिम १६ मध्ये आला (स्पर्धा जिंकणे दूरच) तेव्हा त्यांना ५३ लाख डॉलर्स मिळाले. महिलांनी २०१५ची स्पर्धा जिंकली तेव्हा त्यांना जवळपास १८ लाख डॉलर मिळाले. हा दुजाभाव का असा या महिलांचा थेट आणि रास्त प्रश्न होता. 'यूएस सॉकर' या संघटनेने असा दावा केला की हे पैसे 'फिफा' ठरवते, आम्ही नाही. उदा. फ्रान्सने २०१८मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली तेव्हा त्यांना जवळपास चार कोटी डॉलर्स देण्यात आले, उलट अमेरिकन महिलांनी २०१९ची स्पर्धा जिंकल्यावर त्यांना केवळ ४० लाख डॉलर देण्यात आले. हा दावा महिलांना मान्य नव्हता. त्या गेली चार वर्षे या अन्यायाविरुद्ध लढा देत होत्या, मंगळवारी त्या लढ्याला यश आले. त्यांना आता जवळपास अडीच कोटी डॉलर मिळतील. शिवाय २० लाख डॉलरचा निधी वेगळा राखून ठेवण्यात येईल. त्यातून खेळाडू निवृत्त झाल्यावर त्यांना मदत करण्यात येईल. यापुढे प्रत्येक सामन्यासाठी पुरुष आणि महिला याना समान पैसे देण्यात येतील असे 'यूएस सॉकर'ने जाहीर केले आहे. पूर्वी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांमध्येही पुरुष आणि महिला खेळाडूंना वेगवेगळे मानधन दिले जात होते. तेव्हाही महिलांना संघर्ष करावा लागला होता. अमेरिकन महिला फुटबॉल खेळाडूंचा आदर्श घेऊन इतर देशातल्या महिला खेळाडू समान मानधनासाठी लढा देतात का ते बघायचे !
23/02/2022
नवीन पिढीचे स्वागत
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने 'एअरथिंग्स मास्टर्स' या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले. प्रज्ञानंदने सोमवारी सकाळी कार्लसनचा ३९ चालींमध्ये पराभव केला. ...ही बातमी वाचून साहजिकच आनंद झाला. कार्लसनची कामगिरी गेले काही दिवस चांगली होत नाही हे खरे असले तरी त्यामुळे प्रज्ञानंदची कामगिरी कमी ठरत नाही. गेले काही दिवस भारतात 'इंडियन प्रीमिअर लीग' म्हणजेच आयपीएलमधील लिलावाच्या आणि त्यांना मिळणाऱ्या पैशांच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. तो पैसा बुद्धिबळात नसला तरी भारतीय क्रीडा क्षेत्रात एक समान सूत्र मात्र आहे. ते म्हणजे या दोन्ही खेळांत नवीन पिढी जोमाने पुढे येत आहे. बुद्धिबळात प्रज्ञानंदबरोबरच अभिमन्यू मिश्रा, संकल्प गुप्ता, विदित गुजराथी, वांतिका अगरवाल, दिव्या देशमुख, मृदुल देहनकर आदी नवीन पिढीचे शिलेदार पुढे येत आहेत ही चांगली बाब आहे. क्रिकेटमध्ये यश धूल, ऋतुराज गायकवाड, सर्फराझ खान, ईशान किशन, सूर्यकुमार, सकीबुल गनी हे खेळाडू मैदान गाजवताहेत. आयपीएलमध्ये सर्वात जास्त पैसे उगवत्या खेळाडूंनाच मिळाले. त्यामुळे आपली कामगिरी कशीही झाली तरी संघात आपली जागा कोणी घेऊ शकत नाही, असे समजण्याचे कारण नाही, हे 'ज्येष्ठ' खेळाडूंना कळून चुकले आहे. या नवीन पिढीचे स्वागत !
२२ /०२/२०२२
भाषेबाबत समतोल हवा !
आज जागतिक मातृभाषा दिन. मूल आईच्या पोटात असताना आई त्याच्याशी ज्या भाषेत 'बोलते' किंवा जन्माला आल्यावर आई ज्या भाषेत त्याच्याशी बोलते ती त्याची / तिची मातृभाषा असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. मूल जसजसे मोठे होते तसतसे भाषेच्या दृष्टीने समृद्ध होत जाते. शालेय शिक्षण मातृभाषेपेक्षा वेगळ्या भाषेत सुरु झाले की सुरुवातीला गोंधळ होतो. भाषेचे, विषयाचे आकलन नीट होत नाही. आपल्याकडे अस्सल मराठमोळ्या घरात मूल एकदम इंग्रजी माध्यमात शिकायला लागले की सुरुवातीला अशीच गडबड होते. आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजीवर प्रभुत्व हवे अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच चूक नाही. चूक होते ती मराठीकडे दुर्लक्ष करण्याची. नुकत्याच झालेल्या एका टीव्ही कार्यक्रमात मुलांना मराठी आकडे इंग्रजीत सांगता येईनात, तेव्हा मराठीप्रेमींमध्ये संतापाची भावना होती. मी त्या मुलांना दोष देणार नाही. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्यावरही त्याला / तिला मातृभाषा नीट यावी यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु, मुलाची इंग्रजी भाषा नीट व्हावी म्हणून घरातही इंग्रजीत संभाषण करण्याचे आग्रह काही पालक धरतात, तेव्हाच मुलांची मातृभाषेशी असलेली नाळ तुटते. पण सूर लागतो तो 'काय आजकालची मुले' असा ! मुलांना इंग्रजी माध्यमातच शिकवायचे असा अट्टाहास असेल तर निदान घरी तरी मातृभाषेतूनच संवाद व्हावा असा आग्रह का धरला जात नाही? हा समतोल साधला जाईल तेव्हाच या पिढीची भाषा अधिक समृद्ध होईल !
२१ /०२/२०२२
मधू लिमये मराठीत !
वेगळ्या प्रकारची नोकरी करूनही स्वतःचे 'लेखक'पण ज्यांनी टिकवून ठेवले आहे त्यात सुमेधा रायकर म्हात्रे यांचे नाव मी जरूर घेईन. मराठी भाषिक पत्रकार इंग्रजीतून नियमित लिखाण करतो हे पहिल्यांदा अजिबात घडत नाही. गोविंदराव तळवलकर, दिलीप पाडगावकर, कुमार केतकर, अरुण टिकेकर ही नावे आत्ता पटकन आठवतात. आजच्या काळात मात्र असे मोजकेच पत्रकार दिसतात. रविवारच्या मिडडेमध्ये सुमेधा रायकर म्हात्रे यांचे पाक्षिक सादर असते. ते आवर्जून वाचायला हवे असे आहे. वेगळे विषय घेऊन त्यावर सखोल (पण वर्तमानपत्राच्या शब्दांच्या मर्यादेत राहून) लिखाण करणे यात त्यांचा हातखंडा आहे. आजच्या लेखात त्यांनी मधू लिमये यांच्या पुस्तकांच्या मराठीतील भाषांतराच्या प्रकल्पांबद्दल लिहिले आहे. कनिका जैन गुप्ता यांची वानरसेनेवरील चित्रे, विदर्भातील ग्रामीण भाग जोडणारी पण आता बंद झालेली नॅरोगेज रेल्वे सुरु करण्यासाठी आंदोलन, नर्मदा परिक्रमेमुळे होणारे प्रदूषण, गोव्याच्या 'अजबगजब' राजकारणावर संदेश प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या नव्या पुस्तकनिमित्त गोव्याच्या राजकारणाचा आढावा ... हे गेल्या काही महिन्यांमधले लेखांचे विषय मला वेगळे वाटले. गेल्या वर्षी त्यांनी नाथ पै यांच्यावरही लिहिले होते. मधू लिमये, नाथ पै, मधू दंडवते ही माणसे वेगळीच होती. त्यांनी दिल्ली आणि देश गाजवला तो चांगल्या अर्थाने. आज महाराष्ट्रात आणि देशात जे राजकारण चालले आहे ते पाहून या तिघांचे मोठेपण अधिकच जाणवते. यातील प्रत्येक राजकारणी माणसाचे विचार सगळ्यांना पटायलाच हवेत असे नाही, परंतु ते आजच्या राजकारण्यांसारखे कधी खालच्या पातळीवर आले नाहीत हे तरी सर्वाना मान्य करावे लागेल. मधू लिमये यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांची निवडक इंग्रजी पुस्तके मराठीत भाषांतरित होऊन प्रसिद्ध होत आहेत. (या संबंधीच्या आजच्या लेखाची लिंक देत आहे - https://www.mid-day.com/news/opinion/article/bringing-madhu-limaye-home-23215094) .नाथ पै यांच्यावरील पुस्तक त्यांच्या पत्रकार नातीने (आदिती पै) गेल्या वर्षीच प्रसिद्ध केले आहे. हे सर्व लिखाण जास्त लोकांपर्यंत जाऊन त्याची सर्व बाजूनी चर्चा होणे गरजेचे आहे.
२० /०२/२०२२
पिता झालात? सुटी घ्या .....
ट्विटरचे सीईओ पराग अगरवाल काही आठवडे रजेवर जात आहेत...आता यात 'बातमी' काय असे कोणीही विचारेल. रजेचे कारण म्हणजे पराग अलीकडेच दुसऱ्यांदा पिता बनले. त्यावरून चर्चा सुरु आहे. आणि ही चर्चा टीकात्मक नव्हे तर स्वागताची आहे ही सकारात्मक बातमी आहे. मूल झाल्यास ट्विटरमध्ये २० आठवडे रजा मिळते. पराग अगरवाल कमी रजा घेत आहेत असा सूर काहीजणांनी लावला. त्यांनी पूर्ण रजा घेतली तर इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल असेही काहीजणांचे म्हणणे आहे. एका बातमीनुसार अमेरिकेत पगारी Parental Leave फक्त २३ टक्के लोकांना मिळते. त्यामुळे असेल, पण तिथे पुरुष फार कमी Parental Leave घेतात. त्यांनी पत्नी आणि मुलांच्या मदतीसाठी रजा घ्यावी असेच सर्वांचे म्हणणे आहे. 'मेटा'चे सीईओ मार्क झुकरबर्ग याना २०१५ व २०१७ मध्ये मुली झाल्या तेव्हा दोन महिन्यांच्या रजेवर गेले होते. तिथे चार महिन्यांची रजा मिळते, ती झुकरबर्ग यांनी घेतली नाही. तेव्हाही चर्चा झाली होती. आता पराग अगरवाल यांनी जास्त रजा घ्यावी अशी विनवणी होत आहे. भारतातही 'वडिलांनी ' रजा घेण्याची प्रथा अजून रुळलेली नाही. प्रसूतीनंतर पत्नी माहेरी असते हे कारण त्यासाठी देऊन चालणार नाही. अगरवाल यांच्या रजेवरून भारतातही सकारात्मक चर्चा सुरु झाली तर हवीच आहे. महिलांचे नोकरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक जणींनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत. त्यांना प्रसूतीनंतर सगळे सांभाळणे कठीण जाते. पतीने रजा घेतल्यास मदत होते. हा सकारात्मक बदल झाला तर तो हवाच आहे.
(१९/०२/२०२२ )
Comments
Post a Comment