एखादी व्यक्ती का लिहिती होते? लिखाण करायला आवडते म्हणून? स्वतःचे मत व्यक्त करावेसे वाटून ते प्रत्यक्षात आणायचे म्हणून? आपल्या नावावर पुस्तक असावे म्हणून? लोकांना उपदेश करायचा म्हणून? काहीतरी नवीन सांगावे म्हणून? वेळ जात नाही म्हणून? ... की आपण आपले लिहीत जावे, कोणाला आवडो अथवा न आवडो, कोणी कौतुक करो वा न करो, स्वान्तसुखाय लिहीत जावे, स्वतःचे विचार मोकळेपणी मांडत जावे...या भावना ठेवून? आपण लिहावे, घरच्यांनी वाचावे, मित्रमंडळींनी वाचावे, वाटलेच तर त्यांच्या मित्रपरिवाराने वाचावे आणि आपला विचार त्या लोकांपर्यंत पोचावा. त्यांना आनंद झाला तर ठीक, न झाला तरी ठीक, पण आपण प्रांजळपणे लिहीत जायचे , हलक्याफुलक्या शब्दांत, कधी प्रेमळपणे, कधी कठोर शब्दांत ..... यासाठी? हा शेवटचा विचार फार कमी लोक मनात आणतात. या थोड्या लोकांमध्ये सौ. मुग्धा मंदार फडके यांचे नाव येते. (विख्यात लेखक अंबरीश मिश्र यांच्या भाषेत मुग्धाबाई !)
त्यांना भरपूर वेळ होता, म्हणून भरपूर लेखन करता आले, असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल. कारण निवेदिका, सूत्रसंचालिका (मराठी, हिंदी वाद्यवृंद, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, सामाजिक संस्थांचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यांची ), 'नादब्रह्म' नावाच्या एका संस्थेसाठी सुगम संगीताचे कार्यक्रम, व्याख्याने, मुलाखती, नाटके, एकांकिका, नृत्याविष्कार अशा प्रकारांची आखणी करणे, प्रत्यक्ष सादरीकरण करणे, हिस्टरी टीव्ही १८ वाहिनीसाठी काही कार्यक्रमांच्या संवादाचे मराठी बोलीभाषेत भाषांतर करणे , किशोरी आमोणकर, मंगेश पाडगावकर, अरुण दाते, विक्रम गोखले आदींसारख्या दिग्गजांच्या मुलाखती घेणे , आपल्या 'मुग्धा क्रिएशन्सतर्फे उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती करणे, प्राचीन भारतीय ज्ञानाची माहिती सांगणाऱ्या 'अनाहत' हा सर्वांगसुंदर कार्यक्रमाची निर्मिती करणे (प्राचीन भारतीय ज्ञान आजही तितेकच उपयुक्त आहे... ते कसे ? हे दाखवण्यासाठी सृष्टीच्या उत्पत्तिपासून आतापर्यंतचा मानवाचा प्रवास आणि या काळात विकसीत होत गेलेल्या अनेक कला शास्त्र इतिहास, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांना स्पर्श करत जाणारं निवेदन आणि आवश्यक तिथे गाण्यांची झलक असं या कार्यक्रमाचं स्वरुप आहे.)....आणि यातून वेळ काढून वैयक्तिक, कौटुंबिक नाती सांभाळता सांभाळता अनेक लोकांचे मैत्र जपणे ....हे ऐकूनच आपल्याला दमायला होते. एवढे असूनही वेळ काढून त्यांनी लेखन सुरु केले. तसे पाहिले तर प्रत्येक माणसाकडे लेखनकला असते, संवादकला असते, प्रश्न असतो तो ते नेमकेपणे मांडण्याचा. काही उपदेश आपण करतोय याचा आव न आणण्याचा आणि लोकांच्या बऱ्यावाईट प्रतिक्रियांमधून स्वतः शिकण्याचा !
मुग्धाबाईनी लिहायला सुरुवात केली ती अशाच भावनेने असे मी समजतो. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, ''म्हणजे कसं असतं ना...की कोणालाही जेंव्हा व्यक्त व्हायचं असतं, स्वतःशीच संवाद न साधता, दुसऱ्यांनाही काही सांगायचं असतं, आपल्या विचारांत इतरांनाही सहभागी करून घ्यायचं असतं, तेव्हा माणूस किंवा कोणताही सजीव प्राणी काहीतरी असा मार्ग निवडतो, ज्यातून तो त्याचे विचार, भावना व्यवस्थित मांडू शकेल... समोरच्यापर्यंत नीटपणे पोचवू शकेल...मग हा मार्ग कधी बोलण्याचा असेल, तर कधी चित्रं, कधी शिल्पं, कधी नृत्य, कधी गाणं... तसं मला लिहावंसं वाटतं...इतर मार्गांपेक्षा लिखाणाचा मार्ग मला सोपा वाटतो म्हणून....'' . एकदा ही भूमिका समजून घेतली तर त्यांच्या लेखनाचे मर्म समजायला मदत होते, आणि 'गुंफियेला शेला' (प्रकाशक - मनोरमा प्रकाशन, दादर, मुंबई) या त्यांच्या पुस्तकाच्या रंगांच्या छटाही स्पष्ट दिसायला लागतात. आधी स्वतःच्या कुटुंबापुरते लेखन, नंतर समामाध्यमाचा उपयोग करून इतर लोकांपर्यंत जाणारे लेखन, नंतर त्याला रीतसर ब्लॉगचे रूप देऊन अजून विस्तारलेले लेखन आणि त्याची परिणती म्हणून पुस्तक, असा हा प्रवास आहे. यातले पहिले तीन टप्पे बऱ्याच लोकांच्या आयुष्यात येतात. विशेषतः Whatsapp व तत्सम समाजमाध्यमांचा राक्षसी प्रसारामुळे हे सहजशक्य होते. पण प्रत्येक लेखनाची परिणती पुस्तकात होते असे नाही.
'गुंफियेला शेला'मध्ये मुग्धा यांनी त्यांच्या ब्लॉगवरील निवडक ५० लेख घेतले आहेत. त्यात बऱ्यापैकी वैविध्य असले तरी प्राचीन संस्कृतीबद्दल कमालीचा आदर, आध्यात्मिक विचार, समाजात काही चुकीचे चालले असले तर त्यावर ठेवलेले बोट, कधी मुक्त चिंतन, कधी चिमटे, कधी कौतुक, कधी गद्य, कधी पद्य... पण विचार मांडून मोकळे व्हायचे हेच मुगधाबाईनी पुस्तकात केले आहे. कारण, ''शान महाराष्ट्राची, अधिष्ठान, ब्रह्मर्षि डॉ. प. वि. वर्तक स्मरणिका या अंकासाठी, तसेच नवाकाळ वृत्तपत्रासाठी लेखन केले आहे. राजमुग्धा या नावाने raajmugdha.blogspot.com वर त्या नियमितपणे ब्लॉग लिहितात. तसंच प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, आणि संगीतशास्त्र यांची सांगड घालणारा 'अनाहत' नावाचा एक कार्यक्रमही त्यांनी लिहिलेला आहे, '' ही झाली अधिकृत ओळख. पण रोजच्या जगण्याच्या रगाड्यात आपण जगतो ते माणूस म्हणूनच. कधी आनंद, कधी क्वचित दु:ख, कधी हसणे, कधी रुसणे, कधी फुलणे, कधी अंतर्मुख होणे ... या सगळ्या क्रिया-प्रतिक्रियांचे प्रतिबिब 'गुंफियेला शेला'मध्ये सापडते. नमुन्यादाखल काही लेख इथे देत आहे. त्यावरून एकंदर लिखाणाची लय लक्षात येईल, त्यांचे लेखनाद्वारे 'मोकळे होणे' किती गरजेचे आहे ते लक्षात येईल. पुढच्या लिखाणाची उत्सुकता वाढेल. आपणही असे मोकळे होण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला ते जमतेच असे नाही. मन धुमसत ठेवण्यापेक्षा मोकळे करावे हे लक्षात येईपर्यंत आयुष्य संपते... परत मुग्धाबाईंच्याच भाषेत सांगायचे म्हणजे,
''साधी सरळ माणसं असली तर डोक्यात विचार येत नाहीत असं नसतं ना??? रोजच्या साध्या साध्या... छोट्या छोट्या गोष्टी मनात थैमान घालत असतात... रोजचं रूटीन सुद्धा ज्यांच्यासाठी कष्टदायक आहे, अशा कित्येकांची मनं अशा गोंगाटानी सारखी भरून जातात.... त्यांनी काय करायचं???.... सारखं सारखं ध्यान लावून शांत होणं शक्य नसतं खूपदा... आणि त्याचाही राग येतो कधी कधी... मग?? करायचं काय आणि कसं???. अशा वेळी एक गोष्ट करायची... जे काही डोक्यात/मनात येतंय, ते कागदावर लिहून काढायचं... सगळं... एकदा... दोनदा... तीनदा... आणि फाडून फेकून द्यायचं... एवढाही वेळ नसेल तर मनातल्या मनात त्या विचारांचा एक मोठ्ठा चेंडू करायचा आणि द्यायचा लाथेने उडवून... (मनातच हं...) तेही शक्य नसेल... तर एखादी उशी घ्यायची... उचलायची. तिच्यात ते सगळे विचार कोंबायचे... (म्हणजे तशी कल्पना करायची....) आणि ती उशी, कुठेतरी लपवून ठेवायची... तिच्याशी बोलायचं का... म्हणावं... "बाई ग... मी आता कामात आहे... तर तुझ्याकडे चायला... तुझं म्हणणं ऐकायला मला वेळ नाहीये... तर मला वेळ ळेल तेव्हा बोलू हं आपण..." विश्वास बसणार नाही... पण खरंच बरं वाटतं.... हलकं वाटतं... तो विचारांचा गोंगाट... आतला शोर... कल्लोळ... थांबवता येतो काही वेळापुरता तरी... आणि हे जर सहज जमायला लागलं तर मग काय... झक्कास.... कसला शोर नी कसलं काय...काहीच ताण नाही... काय मग?? करून बघणार ना??...आणि सांगा बरं का...''(लेख - अंदरके शोर का क्या करोगे?...)
दुसऱ्या एका लेखात त्या म्हणतात, ''
''मनात विचार, भावना यांचा जो काही गुंता झालाय नं... तो सोडवण्यापेक्षा त्याचंच डिझाईन तयार करा... आणि हे डिझाईन एकमेकात गुंफून त्याचा शेला बनवा... आणि हा शेला... विचारांचा... विकारांचा... वासनांचा... वैषम्याचा... पांडुरंग चरणी अर्पण करा... तिथे अर्पण केलेली वस्तू प्रसाद म्हणून परत मिळते नं आपल्याला, तसंच तिथे वाहिलेले विचार... विकार... वासना... वैषम्य... सगळ्यांचा गुंता... सुरळीत होऊन... शेल्यासारखा मऊसूत होऊन.... विचारांची सुस्पष्टता घेऊन प्रसाद म्हणून परत मिळेल असा विश्वास बाळगा. माणूस अंतर्बाह्य बदलून जातो हो... ''
असो ! सोबत काही लेख देत आहे. तुम्हीच वाचून व्यक्त व्हाल हे नक्की !
१ ) उत्पत्ती.. स्थिती.. लय..
खरं तर ब्लॉगमध्ये अनाहत कार्यक्रमाचा विषय आणायचा नाही असं ठरवलं होतं. पण आज पहाटेचा सूर्योदय पाहताना काहीतरी क्लिक झालं..लक्षात आलं…उत्पत्ती...स्थिती..लय...ही त्रिसूत्री अवघ्या सृष्टीला बांधून ठेवतेय. आपण जरी अजून lockdown मध्ये असलो तरी..
निसर्गचक्र कुठे थांबलं?
वाटलं...इतकी शांतता..स्तब्धता सभोवार असताना सृष्टीचा नित्यनेम मात्र सुरूच आहे..
तोच तो हळूवार झुळझुळणारा वारा…
लालसर शेंदरी होत जाणारं क्षितिज…
आभाळाच्या निळाई वर झिरझिरतं वस्त्र घालावं तशी हळूच चमकणारी सोनेरी किरणं…
आणि मग…
" तो रविकर का गोजिरवाणा..
आवडला आमुच्या राणीला??"
आलाच तो दिनकर.. दिनमणी..तेजोनिधी..भास्कर..
सगळं कसं उजळून गेलं..
लख्ख प्रकाश पडला..
चैतन्य ओसंडून व्ह्यायला लागलं..
अवघी धरा जागी झाली..
पाखरांचा चिवचिवाट सुरू झाला..
इकडून तिकडे जायची लगबग सुरू झाली..जणू लगीनघाई सुरु होती…
समोरच्या कंपाऊंडमध्ये कुत्र्या मांजरांच्या पाठशिवणीचा खेळ सुरू झाला..
उत्तरेकडच्या राम मंदिरात गायी गोठ्यामध्ये हंबरू लागल्या…
त्यांच्या नादात टाळ, चिपळ्या, मृदंग देखील सामील झाले…
हातांनी ताल धरला...पायांनी फेर…
सोनचाफा, मदनबाण, मोगरा यांच्यासोबत धुपाने ही सुगंध उधळला..त्यात सुंठवड्याचा ठसका मिसळला..
अवघा आसमंत दुमदुमून गेला…
राम जन्मला गं सखे...राम जन्मला…
हाच तो " BREAK" असेल का??
उत्पत्ती..स्थिती..लय ….ह्याचं एक आवर्तन पूर्ण झाल्यावर पुन्हा उत्पत्तीसाठी तयार होत आहोत का आपण??
२१दिवसांचा लॉक डाऊन…
सगळी जणं आपापल्या घरट्यात…
आपापल्या माणसांसोबत…
वेळ घालवतायत…
कामांना हातभार लावत आहेत…
एकमेकांना समजून घेतायत…
कामाची काळजी आहे..पण ताण जाणवत नाही…
घरी बसून राहावं लागतंय पण फ्रस्ट्रेशन नाही..
उलटपक्षी मनात एक आस आहे..विश्वास आहे..
हा वेळ संपला की नव्याने जगायची..कामाला भिडायची तयारी आहे…
माणसं स्वतःला फिट ठेवतायत...ब्रेक मधून बाहेर पडल्यावर नव्या जोमाने ..नव्या उत्साहाने बाहेर पडायचं आहे...आणखी काम करायचं आहे…
काळजी वाटते की कसं होईल..जमेल नं आपल्याला..दडपण वाटतं की इतके दिवस जग थांबलं होतं...त्याचे परिणाम सोसतील नं...आपण सगळं निभावून नेऊ शकू नं???
पण मनात आत्मविश्वास आहे..
होय...नक्की जमेल…
ह्या २१ दिवसात खूप काही शिकलो आहोत..
समजून घेतलं आहे..
संयम कळला आहे..
आता कसली भीती?? …
आणि उत्पत्तीच्या आवर्तनाची सुरुवात झाली की…
राम जन्मला ग सखे राम जन्मला...
२) सह अनुभूती...
म्हणजे च्या बरोबर अनुभवणे...जे असेल ते…
अगदीच पुस्तकी आहे हे..पण हेच खरं आहे…
"तू मला मी तुला गुणगुणू लागलो ".....
दो जिस्म एक जान…
एकाला ठेच लागली तर दुसऱ्याच्या डोळ्यांत पाणी येतं...एकाला दुःख झालं तर दुसरा कळवळतो…
मुलांवर संकट आलं तर आई बाप कळवळतात….
हे काय आहे??
सह अनुभूती…
फक्त ती खरी की खोटी हे ओळखता यायला हवं…
" मला तुझ्याबददल सहानुभूती वाटते " हे तद्दन खोटं आणि नाटकी वाक्य आहे…सह अनुभूती ही जाणवते...दोन्ही बाजूच्या व्यक्तींना...ती अशी शब्दांत सांगावी लागत नाही….
ये हृदयीं चे ते हृदयीं...हे आपोआप जमून येतं…
केंव्हाही...कुठेही...कुणासोबत ही…
त्याला काहीच धरबंध नाही...मापदंड नाही…
Calculation तर अजिबातच उपयोगी नाही….
पण मग जेंव्हा ती जाणीव होते नं...ती खूप खरी असते...निःसंदिग्ध असते..कोणत्याही शंकेला वाव रहात नाही…
जसं जिझस ख्राईस्ट ला क्रूसावर पाहून कळवळला नाही असा माणूस मी तरी पाहिलेला नाही…
काय त्याचं आयुष्य तरी…
जन्मापासून फक्त नी फक्त प्रतिकूल परिस्थिती आणि हाल हाल ….
तरीही ह्या माणसाने केवळ दुसऱ्यांची दुःख दूर करण्यासाठी आयुष्य वेचलं…
नुसतं स्वतःचं आयुष्य नव्हे तर आपल्या शिष्यांना, अनुयायांना देखील हीच शिकवण दिली…
आणि अखेर राज्यकर्त्यांच्या हट्टापुढे नतमस्तक होऊन स्वतःचं आयुष्य ...स्वतःचं जगणं ..समर्पित केलं….
कठीण आहे नं….
आपल्याला जमेल??
असं आयुष्य दुसऱ्यांसाठी उधळून देणं??
दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतः हसत हसत मरण पत्करणं ???...
स्वातंत्र्यासाठी जे जे लढले, ते हेच करत होते नं?
आपल्याला जमेल??
असं मृत्यू हातावर घेऊन फिरणं??
देशासाठी घरादाराची होळी करणं??
घर नाही.. दार नाही...आपली माणसं नाहीत…
दुखलं खुपलं तर काळजी करणारं कुणी नाही….
उपाशी पोटी... उन्हातान्हात फिरणं... रानावनातून.. काट्याकुट्यातून भिरीभिरी हिंडत राहणं…
आपल्याला जमेल??
पण आपले आदिवासी बांधव असेच जगताहेत ….अजूनही…
आपल्याला सहानुभूती वाटते असं आपण म्हणतो..
फक्त म्हणतो….
करत काहीच नाही….
म्हणूनच म्हटलं सह अनुभूती ही जाणवावी लागते...सांगावी लागत नाही…
ती जाणवली की डोळे पाणावतात…
त्याच्याशी संवाद सुरू होतो...शब्दांविना संवाद…
मग येशू दिसतो...
कर्ण अंतर्मुख करतो…
अश्वत्थामा काळीज चिरत जातो…
मीरा चा विषाचा प्याला आपल्याच कंठात जळजळतो…
पद्मिनी चा जोहार अंगाचा थरकाप उडवतो…
समर्थ रामदासांची गर्जना ऐकू येते….
शिवाजी महाराजांचे नुसते दर्शन प्रेरणा देऊन जाते…
सुभाषबाबू, सावरकर यांसारख्या जाज्वल्य
देशभक्तांना साष्टांग दंडवत घालावासा वाटतो…
मग पुन्हा डोळे पाणावतात…
पण आता मनात एक ज्योत जागी झालेली असते…
राष्ट्र प्रेमाची ...अभिमानाची….
मग मात्र आपण ठरवतो...पोकळ सहानुभूती काही कामाची नाही….जी असेल ती सह अनुभूती…
आणि त्यातून निर्माण होतील ते खरे ऋणानुबंध…
ते मात्र जपायलाच हवेत...हो नं??
" एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ…."
३ ) ऊर्जा
ऊर्जा म्हणजे शक्ती... बल..ताकद….
ही आपल्याकडे असतेच...पण बहुतेक वेळा आपल्याला ती कशी वापरायची तेच कळत नाही…
शारीरिक ताकद आपण वापरतो..तीही मोजूनमापून...आणि बहुतेक वेळा नाईलाजाने कराव्या लागणाऱ्या कामांसाठी….
म्हणजे...समजा नोकरीनिमित्त प्रवास करावा लागतो..
...त्यासाठी ७:३४ ची ट्रेन पकडा..
त्यासाठी भरभर जिने चढा.. उतरा…
अक्षरशः मुसंडी मारून चालत्या ट्रेन मध्ये शिरा…
मग धक्काबुक्की करून डब्यात जितकं आत जाता येईल तितकं आत..safe zone मध्ये जा…
मग बसायला जागा मिळण्यासाठी सगळ्या बसलेल्या लोकांकडे चौकशी करा...claim लावा…
मग हातातलं सामान शेल्फवर टाका किंवा कोणाला तरी सांगा….
मग पर्समधून मोबाईल, हेड फोन्स काढून सगळे मेसेज/ व्हिडिओ/ कथा/ कविता/ व्हॉटसअप/ फेसबुक/ इंस्टा….सुरू…
एका तास दीड तासाच्या प्रवासात केवढे उद्योग करतो आपण...तेही दोनदा...नाही?
किती ऊर्जा वापरली जाते माहितेय???
भ…..र…. पू….र….
पण आपण मोजत नाही.. ह्या प्रवास प्रकरणातून सुटून आपण पुढची ऊर्जा खर्च करायच्या वाटेला लागलेले असतो… एकतर सकाळी ऑफिसला पोचतो, तिथे ८ तास काम...किंवा संध्याकाळी घरी येतो तिथे थोडं कमी काम…
कुणाला येताना बाजारहाट...देऊळ..मित्र/ मैत्रीण वगैरे…
बायकांना तर निघताना आणि आल्यावर ..दोन्ही वेळा स्वयंपाक...भाज्या निवडणे..मुलांचे अभ्यास…
सासू सासऱ्यांची सोय...बघावंच लागतं…
ऊर्जा टिकवून ठेवावीच लागते….पर्याय नाही…
पण जर ती कशी वापरायची हेच ठाऊक नसेल तर टिकवणार तरी कशी?? नाही का??
ऊर्जा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवर काम करत असते….
शारीरिक ऊर्जा वापरताना जर मनात नाराजीची / नाईलाजाची भावना असेल तर ही ऊर्जा पटकन संपते मग आपली चिडचिड सुरू होते….
अशा वेळी...कितीही नावडतं काम असलं तरी ते आवडून घेणं must आहे…कारण ते कर्तव्य आहे..महत्त्वाचं आहे…
आता हे जबरदस्तीनी आवडून कसं घ्यायचं तर..त्यासाठी..आधी positive विचार करायचा...म्हणजे "हे मला करावं लागतंय" असं न म्हणता.."मी हे माझं कर्तव्य बजावतो आहे आणि त्यामुळे माझी मान ताठ राहणार आहे" अशी वाक्यं मनातल्या मनात म्हणायला शिकायचं...त्याचीच सवय करायची…
पुढचा प्रश्न वाढत्या थकव्याचा...त्यासाठी दर दोन तासांनी काहीतरी छोटंसं खायचं किंवा प्यायचं…
एखादं फळ/ dry fruits/ सरबत…
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण छान दिसायचं..नेहेमीच..( हीसुद्धा सवय करायला लागते बरं) सुटसुटीत कपडे..सुंदर रंगसंगती...योग्य चपला/ शूज/ sandles..
हलकासा परफ्यूम/ अत्तर वापरायची सवय करायची…
आणि आरशाला विचारायचं…
"सांग दर्पणा..okk ना??" असे जरा स्वतःचे लाड करून मगच बाहेर पडायचं…
आणि हो हलकीफुलकी गाणी मनात सुरू ठेवायची बरं का...
मग पुढचे सगळे प्रवास..ऑफिस.. कामं..गॉसिप...भाज्या..स्वयंपाक.. सगळं कसं मस्तपैकी लय पकडतं...एक गती येते...एक मस्त feeling येतं.....ही गती फक्त गाण्याची नसते..तर आपण मस्त आहोत ह्या विचाराची असते…
करून बघा..ऊर्जा वापरली..आपण थकलो असं जाणवणार सुद्धा नाही…
कारण आता आपण स्वतःवर प्रेम करतोय....दुसऱ्यांसाठी नाईलाज म्हणून कर्तव्य करत नाहीये..ते कर्तव्य पार पाडणे ही आता आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे…
मग उर्जेचं स्वरूप सुद्धा बदलतं…. छान दिसताना, परफ्यूम लावताना, गाणी ऐकताना...ऊर्जा आधी आपल्या मनात..मग शरीरात प्रवेश करते..आणि तिथेच थांबते…
करून बघणार ना?? Let me know..
४) माया...buffer???
खूप वर्षांपूर्वी एका पेपरमध्ये एक लेख वाचला होता…
माया….म्हणजे ममता, प्रेम, वात्सल्य हा अर्थ आहेच...पण त्या लेखात संदर्भ होता शिलाई संबंधी…
कपडे शिवताना आतल्या बाजूने शिवण संपली तरी आणखी जागा असते….म्हणजे जर कपडा घट्ट होत असेल तर त्या जास्तीच्या कापडावर अगदी टोकाशी शिवण घालून, मूळ शिवण उडवून कपडा वापरता येतो...ह्या जास्तीच्या कापडावर जी जागा शिल्लक ठेवली जाते, तिला माया म्हणतात…
ही माया सुद्धा ममतेचंच रूप आहे असं वाटतं मला... कारण तो कपडा जर घट्ट होत असेल तर त्याला सैलावता यावं म्हणून प्रेमाने थोडी जागा देणं ही ममताच आहे..वात्सल्य आहे…
अशीच माया आईची असते...आक्रसत आलेल्या नात्यांना आपल्या मायेने म्हणजे सहनशील वागण्याने मोकळं करते….किंबहुना ती सहन करते म्हणूनच मायेने वागू शकते…मुलांच्या ….rather कोणाच्याही चुका मान्य करून "it's okk" असं म्हणायची आंतरिक शक्ती फक्त आई मध्येच असते…
मी तर म्हणेन, ज्या ज्या व्यक्तींना समोरच्या माणसाला समजून घेता येतं, त्याच्या मनातली घालमेल कळते, त्या सगळ्या व्यक्ती "मायाळू" असतात...पण दुर्दैवाने अशा मायाळू व्यक्तींना नेहेमीच buffer म्हणून वागावं लागतं...किंवा वागवलं जातं...गृहीत धरलं जातं…
गृहिणी ह्या जमातीचा नंबर ह्यात फारच वरचा आहे ह्यात शंका नाही…
घरी असणारं buffer….सतत काम करणारं...अचानक येणारी emergency handle करू शकणारं…
घराचं रोजचं रूटीन...नवऱ्याच्या, मुलांच्या वेळा, सासू सासर्यां च पथ्य पाणी…. त्यांच्या वेळा...घरी सांगून येणारे पाहुणे, न सांगता येणारे पाहुणे...मुलांचे मित्र मैत्रिणी, नवऱ्याच्या पार्ट्या,..कामवाल्या बायकांच्या दांड्या...अचानक उद्भवणारी आजारपणं….हे सगळं चक्रव्यूह भेदून त्यातूनही स्वतःच्या आवडीनिवडी जपणं, सगळ्या नातेवाईकांशी, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी संबंध जपणं, स्वतःला maintained ठेवणं...ह्यात गृहिणीची प्रचंड दमछाक होत असते….
पण ह्याची जाणीव मात्र कुणालाच नसते…
ती गृहिणी आहे, म्हणजे तिने घरातलं सगळं बघितलच पाहिजे... अप टू डेट राहिलंच पाहिजे…
घरातली सगळी टापटीप, स्वच्छता, चादरी, उशांचे अभ्रे, पडदे, सोफा कव्हर, गालिचे, खिडक्या, काचा...असंख्य गोष्टी maintained ठेवणं हे फक्त तिचं एकतीचंच काम आहे असा तिचा समज करून दिलेला असतो .. लहानपणा पासूनच...त्यातून ती बाहेर येऊ शकत नाही...कितीही कर्तृत्ववान असली तरी घरचं झाल्याशिवाय बाहेरचं काहीही करायचं नाही..त्याला महत्व नाही, हे तिच्या मनात इतकं पक्कं बसवलेलं असतं, की केवळ घरी बघायला मदतनीस नाही किंवा दुसरं बाई माणूस नाही म्हणून कितीतरी जणी स्वतःचं कर्तृत्व गाजवण्याची संधी सोडून देतात...rather सोडावी लागते…
कारण ही संधी साधायचा प्रयत्न केला आणि घराकडे दुर्लक्ष झालं तर आपण गृहिणी म्हणून अपयशी ठरू ह्याची त्यांना जास्त भीती वाटते…
आणि दुर्दैवाने समाज, घरचे म्हणवणारे so called पुरोगामी नातेवाईक, हे सगळे तिच्या घरातल्या स्वच्छतेपासून, तिच्या मुलांना असणाऱ्या चुकीच्या सवयी , नवर्याच बेपर्वा वागणं….ह्या सगळ्याचं खापर तिच्या कर्तृत्व गाजवण्याच्या संधी वर फोडतात…." ह्यापेक्षा घराकडे लक्ष दे म्हणावं..". ."किती धूळ साठलीय...आम्हांला बाईच्या हातचं चालत नाही….मुलांना शुभं करोति म्हणायची आवड नाही...मुलं शाळेत पहिली येत नाहीत…" अशी शेरेबाजी तिला नेहेमीच सहन करावी लागते...त्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व नाही सिद्ध केलं तरी चालेल असाच निर्णय बहुतेक वेळा घेतला जातो…
आणि मग ती buffer म्हणूनच आयुष्य जगते आणि मरते सुद्धा….मग मात्र, म्हणजे मेल्यावर मात्र ती अचानक सगळ्यांची लाडकी होते...आदर्श होते...तिने कसं स्वतःचं आयुष्य घरासाठी वेचलं, ह्याचे गोडवे गायले जातात….ती कशी कर्तृत्व वान होऊ शकली असती हे सांगितलं जातं….पण आपण तिला जिवंतपणी संस्कारांच्या साखळीने घरालाच जखडून ठेवलं होतं हे मात्र सोयिस्करपणे विसरलं जातं…
काय उपयोग अशा दुटप्पी वागण्याचा?? आणि काय उपयोग असे BUFFER होऊन आयुष्य जगण्याचा?? जेंव्हा समाज उघड्या डोळ्यांनी हा विपर्यास स्वीकारणं बंद करेल, तेंव्हा घराघरातल्या buffer ना खऱ्या अर्थाने मुक्ती मिळेल.
५) न जाने क्यूँ...
छोटी सी बात... मधलं हे गाणं...नेहेमीच अंतर्मुख करतं मला…
" न जानें क्यूँ...होता हैं युं जिंदगी के साथ…
अचानक ये मन..किसी के जानें के बाद... करें फिर उसकी याद.. छोटी छोटी सी बात…"
उत्तर नाहीये नं???
माणूस असेतोवर आपण फार गृहीत धरतो
त्याला / तिला...आणि गेल्यावर मात्र ….
इन जनरल...मनुष्य हा प्राणी दांभिकच….
माणूस जिवंत असेतोवर त्याचे विचार..त्याचे आचार..त्याची तत्त्व...त्याचे संस्कार..त्याचा काटेकोर पणा...या सगळ्याला वेगवेगळा प्रतिसाद देतो आपण…
कधी मान्य करतो..कधी अमान्य…
कधी सहकार्य करतो..कधी विरोध…
कधी वाद घालतो...कधी री ओढतो…
कधी टिंगल करतो...कधी आरती ओवाळतो…
का असं वागतो आपण??
सांगू??...
आपली सोय म्हणून….खरंच..आपली सोय म्हणूनच..
जेंव्हा आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटतं आणि ते आपल्या सोयीचं असतं, तेंव्हाच ते अमलात आणतो आपण…
( म्हणजे लादलं गेलं नाही तरच...अमलात
आणावं लागलं तर ...दुर्दैव..)
नाही पटलं तर सरळ दुर्लक्ष...तेवढी हिम्मत नसेल तर गोड बोलून टाळाटाळ….मग मागाहून बोलणं वगैरे वगैरे…
पण तो वारल्यानंतर मात्र …..
त्याचे सगळे गुण आठवायला लागतात…
त्याचे कष्ट...मेहनत...त्याच्या आवडी निवडी…
त्याच्या सवयी... त्याचं आग्रही असणं.. त्याचं रोजचं जगणं…
सगळं सगळं आठवत राहतं…
फ्लॅश बॅक सारखं….
आणि मग सोयीप्रमाणे आपण त्या आठवण्याच देखील भांडवल करतो…कधी कधी तर चक्क प्रदर्शन….
मग कुणाला दुःखाचे कढ येतात...कुणाला ते स्वप्नात दिसतात…कुणाला काही संकेत मिळतात..तर कुणी खंतावून बसतात…
पण फार कमी लोक किंवा नातलग किंवा शिष्य असे असतात जे देवाघरी गेलेल्या स्वजनांचे खऱ्या अर्थाने स्मरण ठेवतात...त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालतच आयुष्य काढतात...त्यांचा जहाल प्रामाणिक पणा स्वतःमध्ये जोपासतात...
त्यांच्या तत्वांना आपल्या आयुष्यात पाळून पुढच्या पिढ्यांमध्ये ती तत्वे रुजवतात…
हे करत असताना अंधानुकरण नक्कीच टाळतात...आणि स्वतःबरोबर समाजालाही उत्तम दिशा दाखवतात….एक एक घराणे जर असे उजळत गेले तर अवघा समाज तेजस्वी होत जातो…
आपल्याकडे असंख्य अशी उदाहरणं आहेत..ज्यांच्या विचारांच्या अनुकरणाने समाजजीवन सुसह्य झाले...आपले सगळेच संत ज्ञानेश्वर..तुकोबा..एकनाथ..नामदेव..समर्थ रामदास. तसंच...शिवाजी महाराज...नेताजी सुभाषचंद्र...सावरकर...यांच्या विचारांचे अनुकरण केल्यामुळे समाज किती बदलला...खंबीर झाला….
पण त्याचबरोबर त्यांची जाज्वल्य तत्व आचरणात असणं अवघड वाटायला लागलंय का?
हो..बहुतेक….
कारण आज आपण ह्या सगळ्यांच्या आणि ह्यांसारख्या अनेकांच्या नावाचा उदो उदो होताना बघतो..पण जी तत्व ह्यांनी पाळली आयुष्यभर..त्यातलं आपण काहीच पाळत नाही…
म्हणजे आपण शिवाजी महाराजांचे नाव घेतो पण त्यांनी दुर्ग जितक्या काटेकोरपणे जपले... राज्याच्या विकासासाठी, सुव्यवस्थेसाठी जितक्या योजना राबवल्या, उत्तम प्रशासन..प्रामाणिकपणा..कठोर न्यायनिवाडा..
आता.. त्यांचा मागमूस देखील दिसत नाही..
सावरकरांचे नाव घेतो पण त्यांचं यौगिक सामर्थ्य आपल्या अंगी बाणवून घ्यायचा प्रयत्न तरी करतो का?
संतांची मांदियाळी महाराष्ट्रात उदंड ….सगळ्यांची शिकवण एकच…
माणुसकी...स्वतः जगा..दुसऱ्याला जगू द्या…
पंढरीच्या वारीत सगळे वारकरी समान…
लहान असो वा थोर….
वारकरी समोर आला की माऊली म्हणून साद घालावी आणि उराउरी भेट घेण्यापूर्वी पाय धरावे…किती उत्कट विनय...समर्पण…
दुसऱ्याच्या आनंदासाठी आपलं सर्वस्व सहज उधळून टाकायचं... ही वृत्ती... अंगाअंगात मुरलेली….
आज त्याच संतांच्या भूमीत नवश्रीमंत स्वघोषित संतांची भर कशी पडते??लाखो लोकांच्या समुदायाला शिकवण देण्यासाठी हे संत हजारोंची तिकिटे लावतात?? आयुर्वेदाला वेठीस धरून वस्तू विकतात? पुन्हा आमच्याच गोष्टी pure म्हणून हवाले देतात?? बरं ह्यांच्या प्रवासाची बोली लागते बरं...कुणी भक्त होंडा आणतो..कुणी मर्सिडीज...मग कुठे बाबाजी जागचे हलतात…
ह्या सगळ्या विरोधाभासी गोष्टीत आपण सत्यापासून किती दूर चाललोय ह्याचा विचारच करत नाही आपण….
आणि मग स्वर्गवासी झालेल्यांच्या आठवणीने नुसतेच व्यथित होतो... कारण त्यांचं यथायोग्य स्मरण ..अनुकरण..आपण करत नाही...फक्त आपली सोय बघतो आणि असे न निस्तरता येणारे घोळ वाढवून ठेवतो…
जोवर आपण स्वतःला विवेकाच्या काट्यावर तोलत नाही, तशी सवय करत नाही..तोवर ह्या दुष्ट चक्रातून सुटका
नाही...ना आपली...ना समाजाची…
६) मैत्र…
जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा….
आणि मैत्री मध्ये मैत्र जपणाऱ्या समस्तांचे अभिनंदन!!
बुचकळ्यात पडलात??
मैत्र..मैत्री...काय शब्दांचे खेळ करतेय ही .. असं वाटलं का??
एक तर इतके दिवसांनी ब्लॉग..आणि त्यात ही कसरत…
असो….
सध्याच्या ग्लोबल प्रथेनुसार आज मैत्री दिन…
म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी समस्त दोस्त..सखे..सोबती वगैरे मंडळींना त्यांनी आपल्याला दिलेल्या सोबतीबद्दल शुभेच्छा द्यायच्या…..
मस्त कल्पना आहे नं…
Elegant..classy…. आणि मोजून मापून प्रेम दाखवायचं..तेही आपल्याच मित्राला / मैत्रिणीला…
कृत्रिम नाही का वाटत हे??
मला व्यक्तिशः खूप ऑकवर्ड वाटतं…
समोरच्या माणसाला दणकून चार धपाटे घालावेत...सख्यांच्या गळ्यात पडावं...आपल्या घासायला अर्धा घास काढून भरवावा...आणि असं वागताना आजूबाजूला कुणीही असलं तरी वावगं वाटू नये...ही मैत्री खरी...अस्सल…
कोणतेही मुखवटे न बाळगणारी…
कुणाचीही भीडभाड न ठेवणारी…
निर्मळ मन…
नो दिखाऊ पणा…
अत्यंत मोकळं व्यक्त होणं…
न सांगताच मनातलं कळणं …
न मागताच सोबत करावीशी वाटणं…
श्वासाच्या लयीवरून मुड आहे की नाही हे समजणं…
दाटून आलेला आवंढा फोनवर सुद्धा लक्षात येणं…
आणि मुख्य म्हणजे " मैं हुं ना" हे सांगायची गरज न पडणं…
म्हणजे मैत्र…
निरपेक्ष….सख्य…
जे बोलून दाखवायची गरज नसते….
सतत बोलायची .. संपर्कात राहायची गरज नसते…
एकमेकांच काय चाललंय हे सारखं update करायची गरज नसते….
नेहेमी होणाऱ्या भेटीगाठी इतकंच मोकळेपण अनेक वर्षांनी झालेल्या भेटीत दिसतं..तेंव्हा..मैत्रीपेक्षा मैत्र मजबूत असतं…
तेंव्हा माझ्या समस्त मैत्र जपणाऱ्या सख्या, सोबत्यांनो…
जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…
आणि आजचं गाणं…
तुम इतना जो.. मुस्कुरा रहे हो…
https://youtu.be/C8eAKT-zQXk
मैत्र... म्हणजे सख्य....
न बोलता सह अनुभूतीची जाणीव देणारं...
न सांगता सांभाळून घ्यावं वाटणारं...
न विचारता बिनधास्त व्यक्त होऊ शकणारं...
न मागता सोबतीचा हात पुढे करणारं...
आदरास पात्र असं हे मैत्र...
आपल्यातील मैत्र जपल्याबद्दल खूप आनंद व्यक्त करतेय…
७) भोचकपणा...
जरा असंस्कृत वाटतं नं ..ऐकायला..बोलायला..वाचायला….
पण याच हेडिंग ने सुरू झालेली पोस्ट वाचली आणि अचानक या शब्दाचं महत्त्व कळलं….
याला पर्यायी शब्द नाहीच…
जे म्हणायचं आहे तेच…..थेट.. direct...
.ढवळाढवळ म्हणजे interference... हा जरा जवळ जाणारा शब्द पण तरी सौम्य...त्यात मूळ शब्दाचा विखार/ वैताग नाही...
तसा पोस्टचा विषय नेहमीचाच….
सासर vs माहेर…
मग.. संस्कार...सवयी.. शिस्त...वगैरे…
मग प्रत्येक सासूला आपली मुलगीच कशी योग्य वाटते...आणि सून चुकीची वगैरे….
मग मुलं..नातवंड...
त्यांचं सामाजिक ...आर्थिक...शैक्षणिक यश..अपयश वगैरे…
त्यांच्या यशस्वी किंवा अपयशी असण्यावरून पुन्हा सुनेला judge करणं…
त्यातून ती सुशिक्षित असूनही पूर्ण वेळ गृहिणी असेल तर बघायलाच नको….अर्थात हा तिचा choice असतो की नसतो हा भाग आणखी वेगळाच….
पण कसंही करून एकदा तिच्यावर नापसंतीचा शिक्का मारायचाच असतो ...बहुतेक ठिकाणी….असं मॅटर…..
But it triggered me to have a loud thinking... म्हणजे विचारमंथन….करायला भाग पडलं...
खरं तर.. आम्ही किती छान..आम्हीच किती महान….
हा फंडा तर प्रत्येकाच्याच मनात असतो आणि आयुष्यातही…..
पण आपल्यात देखील दोष असू शकतात आणि आपणही चुकू शकतो हे कुणी लक्षातच घेत नाही.. मग त्यावर विचार करून अंमल करणं तर दूरच राहिलं..(.अर्थात याला अपवाद असणारे देखील समाजात असतात बरं…)
प्रत्येकाला दुसऱ्यांनीच सुधारावं असं वाटतं आणि त्यांना सुधारण्याची जबाबदारी आपलीच आहे असं वाटतं…( पालक आणि मुलं हा मुद्दा बाजूला ठेवा….ते कर्तव्य आहे..)
कितीही कळकळ वाटली तरी मागितल्याशिवाय सल्ले देऊ नयेत...आणि दिले तरी त्याचा समोरच्याला वैताग येईपर्यंत पाठपुरावा करू नये असं मला वाटतं…. कारण फार पाठपुरावा झाला तर मग ती कळकळ राहत नाही. ... तो भोचकपणा ठरतो...आपण almost समोरच्याच्या आयुष्याचा ताबा घेतोय असं त्याला ( समोरच्याला) वाटू लागतं...आणि तो माणूस दुखावला जातो…
काही जणांना सतत शेजारी जाऊन बसण्याची सवय असते...ही प्रोसेस two way असेल तर ठीक...उत्तमच...पण सगळ्यांनाच आपली स्पेस डिस्टर्ब झालेली आवडेलच असं नाही... बरं सौम्यपणे सांगूनही समोरच्याला कळत नसेल तर मात्र काहीतरी वाद होण्याची शक्यता जास्त…
काही जणांना येता जाता लोकांनी काय आणलय.. हातात पिशव्या आहेत का?? ते किती वेळा सोसायटी मधून बाहेर पडतात? लोकांच्या घरी किती वेळा पाहुणे येतात??.. जेवायच्या सवयी काय आहेत??... हॉटेलात किती वेळा जातात??...किती महागड्या गाड्या घेतात??...एक ना दोन… असे सारखे survey करायची सवय असते...आणि त्या survey वरून ते सगळ्यांना judge करत असतात...वर मीच कसा आधी अंदाज केला होता..मीच कसं आधी त्यांचे problems ओळखले होते वगैरे शेखी मिरवतात…मुद्दा मीच कसा अलर्ट/ महान वगैरे दाखवण्याचा असतो..बाकी काही नाही...
फार वाईट वाटतं...जेंव्हा एखाद्या मृत्यूची बातमी कुणाला कळवली जाते...आणि ज्यांना कळवावे, ते त्याच क्षणापासून "आता त्या गेलेल्या व्यक्तीची मुलं एकमेकांसोबत राहतील की वेगळी होतील..मृत व्यक्तीच्या इस्टेटीची वाटणी कशी होईल" याबद्दल चर्चा करतात...त्याबद्दल थेट भाष्य करतात….
खंत वाटते अशा वेळी….
आजारी माणसाला भेटायला गेलं तरी.. पेशंटचे मनोधैर्य वाढवण्याच्या आधी...
"कोण कसं गेलं"…
"हॉस्पिटल च बिल कसं डॉक्टर लोक वाढवतात"…
"यापेक्षा अमक्या अमक्या डॉक्टरांकडे का नाही गेलात??"...
"आम्ही बाबा फक्त हिंदुजा/ नानावटी/ अंबानी अशाच ठिकाणी जातो...इतर ठिकाणी नाही"..
अशा चर्चेच्या फैरी झडतात…
ही पेशंटला बघायला गेल्यावर त्याच्याचसमोर बोलायची गोष्ट आहे???...
आयुष्यात दुर्दैवी घडामोडी अनपेक्षितपणे होत असतात…
परीक्षेत अपयश...प्रेमभंग..
फसवणूक..विवाहबाह्य संबंध....घटस्फोट..
मुलं न होणं/ उशिरा होणं…दिव्यांग मुलं जन्माला येणं...गतिमंद असणं..
आर्थिक अडचणी…
आजारपण.....अपघात….
असंख्य अशा घटना आहेत, ज्याचे परिणाम त्या त्या कुटुंबावर खूप खोल आघात करतात…
त्यातून त्यांना सावरण्यासाठी मदत करण्याच्या निमित्ताने अनेकजण सोबत येतात..साथ देतात...त्यात खरी कळकळ किती आणि दुसऱ्याच्या दुःखाचा आपल्यासाठी उपयोग करणारे किती हा संशोधनाचा विषय ठरावा….
या दुःखाच्या काळात मानसिक पडझड झालेली असते….पुन्हा उभारी घ्यायला हवी हे कळतं पण वळत नाही... मन जखमी असतं...त्यावर जरा खपली धरली की कुणाच्या तरी भोचकपणामुळे ती उचकटली जाते….मनाची जखम पुन्हा वाहू लागते...त्यात ही भोचक स्पेशल मंडळी असंख्य उपदेश करत असतात..सल्ले देत असतात..एखादा सल्ला ऐकला नाही की लगेच नाराज होतात.. नावं ठेवतात...अशा वेळी हळवी...कमकुवत मनाची माणसं गांगरून जातात...भावनेच्या आहारी जाऊन भलतंच पाऊल उचलण्याची शक्यता जास्त…
हे सगळं कळतं..पण वळत नाही…
आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात interfere करतो ...तो आपला हक्कच आहे असं वागणं सुरू राहतं...आणि गोष्टी विकोपाला जातात…Then
It becomes very difficult to bridge these relations….
सण, समारंभ, पार्ट्या अशा ठिकाणी सुद्धा गॉसिप व्यतिरिक्त वेगळं संभाषण क्वचित ऐकू येतं…
या सगळ्याचं निरीक्षण केलं तर एकच गोष्ट लक्षात येते की सध्याच्या समाजात जो
भोचकपणा करत नाही तो मूर्ख, बावळट किंवा शिष्ट ठरतो..
ज्याला स्वतःची स्पेस हवी असते, ती मिळवण्यासाठी तो जर स्वतःभोवती कोष विणून घेत असेल तर तो समाजाच्या दृष्टीने useless असतो….
असा कोषात राहणारा माणूस इतरांच्या भोचकपणाचा बळी झालेला असू शकतो..हे पटकन समजत नाही….
मुळात माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे..पण तरीही जर कुणी सतत अलिप्त राहत असेल तर त्याला नक्कीच त्याची स्पेस द्यायला हवी हे बहुतेक वेळा लक्षात येत नाही….अनेक वेळा आजूबाजूची माणसं स्वतःला, स्वतःच्या मतांना, सतत समोरच्यावर लादत राहतात...आणि मग समोरचा आणखीनच अलिप्त होत जातो..कुणाशी शेअरिंग करावं ही इच्छाच नाहीशी होते...मग तो दुःखी जीव माणूसघाणा होतो...कडवट होतो...आणि मग एकाकी…
भोचकपणा can lead to horrible level of serious consequences to one's life….
तेंव्हा...प्रेम, काळजी,कळकळ,आणि भोचकपणा...आणि ढवळाढवळ....यात सीमारेषा असलीच पाहिजे..ती पाळायला शिकूया….
८ ) पैल...
पैलतीर…
पैल तो गे काऊ कोकताहे..
पैल पार …
ऐलमा पैलमा गणेश देवा..
क्या हैं ये "पैल"???
तर.."पैल" म्हणजे पलीकडचं…
बहुतेक वेळी हा शब्द नदीकाठच्या संदर्भात वापरतात…
आपण जिथे असतो तो ऐल काठ..तर दुसरा..विरुद्ध बाजूचा.. पैल…
Grass is always greener at the other side of the fence…. अशी एक म्हण आहे…
म्हणजे कुंपणाच्या पलीकडचं गवत जास्त हिरवेगार आहे..( किंवा वाटतंय)...
हे पैल प्रकरण तसंच …..
माणसाला विशेषतः तत्वचिंतक वगैरे लोकांना हा पैलतीर सारखा खुणावत असतो…
इथल्या जगात वावरणं त्यांना फारसं रुचत नाही..
पचत नाही..झेपत नाही..थोडक्यात भागो ssss..
त्यापेक्षा पैलतीर बरा असं काहीसं मनात खदखदत असतं…तेच..((grass is greener at the other side of the fence...अर्थात त्याचा actually काहीच उपयोग नसतो म्हणा….) पण "पैल" चं आकर्षण तीव्र असतं हे मात्र खरं…
हा पैल बघितलाय का कुणी?? I doubt…
हे क्षितिज रेषेसारखं असणार...जितकं त्याच्याजवळ आलो..पोचलो असं वाटतं...तितकंच ते दूर दूर जाताना दिसतं…
आता ???
Wait….
Physically कुठे जाणं अशक्यच आहे..म्हणजे नदी असली तरच पैलतीर…
पण आपल्याकडे मन नावाचं एक सुपरफास्ट vehicle आहे..virtual आहे बरं का...त्यामुळे no cost in terms of money…
मग हा प्रवास costless आहे का??
तर..बिलकुल नाही….
It demands cost in terms of behaviour…. thought process...and stability of mind which contributes to well being of the society….
जड झालं ना???….
हा पैलतीर निःसंग माणसाच्या नशिबी असतो खरं तर...ह्या मायेच्या पसाऱ्यात राहूनही इथल्या जंजाळात न अडकता जो केवळ त्या पैलतीरी मन गुंतवून ठेवतो, त्याला इथे कोण थांबवणार???
नुसतं मन गुंतवून भागत नाही...तर वागणं सुद्धा काटेकोर असावं लागतं..ठेवावं लागतं…
आवडत्या गोष्टींचा त्याग…
नावडत्या कामांचा भडिमार….
तरीही कर्तव्यात कसूर होऊ द्यायची नाही…
मनातले सल मनातच ठेवून आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांप्रती कर्तव्यं पूर्ण करायची असतात….. तीही बिनचूकपणे…
त्याच वेळी आपली कर्तव्यं..(वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक)..सगळीच पार पाडत रहायचं.....त्यात यशस्वी व्हायचं... समाजातलं स्थान टिकवून ठेवायचं...तरीही कर्म..प्रारब्ध..संचित... क्रियमाण या सगळ्यांचं व्यवधान राखायचंच….आणि ऐल तीरी रमायचं... पैलतीरावर लक्ष ठेवून …
डोंबाऱ्याचा खेळ बघितलाय???
तो डोंबारी कसा आगीतून उड्या मारत असतो...
हातात काठी घेऊन उंचावरच्या त्या दोरीवरून चालत असतो..
ढोलकीच्या तालावर पाऊलें टाकत असतो…
पण पडत नाही...
चुकत नाही…
तरीही पैलतीरी पोहोचतो…कारण नजर तिथे असते..त्या तिथे..पलीकडे...
तसंच या जगात जगणं आहे…
तो खेळवत असतो...परिस्थिती ढोल वाजवत असते.. जबाबदार्यांची काठी हातात घेऊन चालताना पायांखाली मात्र
दोरीऐवजी तलवार असते…
तीही दुधारी...
जssss रा चूक झाली,
की जखम नाहीतर कपाळमोक्ष ठरलेला…
तरीही इथल्या जीवाने मात्र …. त्या ssssss किनाऱ्याकडे ..त्या दुसऱ्या टोकाकडे नजर ठेवून चालत राहायचं..
अगदी .." लागले नेत्र रे पैलतीरी"...अशी अवस्था झाली तरी..तिथल्या काऊला थांबवायचं...कितीही शकुन दाखवले तरी ते आपल्याजवळ ठेवायचे….
लक्ष चालण्याकडे च ठेवायचं..
Grass is greener on the other side of the fence असं कितीही वाटलं तरी ते तसं नसतं हे लक्षात घ्यायचं..
का माहितीय???
कारण
ऐलतीरावर आपण जी काही मशागत करत असतो ना,...
आपल्या मनाची...संस्कारांची…
आपल्या नात्यांची..माणसांची…
आपल्या भावनांची… जाणिवांची…
आपल्या कर्तव्याची... अलिप्त राहण्याची…
त्यातून निर्माण होणारं जे काही पीक असतं ना, त्याच्या इतकं खरं..अस्सल असं दुसरं काहीच नसतं…
म्हणूनच grass is always green where we are existing हेच खरं....
स्वतःवर विश्वास ठेवायचा..बाळगायचा..
मग दुसऱ्यांनाही आपल्यावर विश्वास ठेवावा लागतो…
here grass becomes greener...and greener..and greener…
Makes sense??
Please let me know if you agree..
९) मनाचिये गुंती
मनाचिये गुंती... गुंफियेला शेला....
मन वढाय वढाय... उब्या पिकातलं ढोर... मन मनास उमगत नाही... आधार कसा शोधावा.... मन उधाण वाऱ्याचे... गुज पावसाचे... मन रे... तू काहे न धीर धरे...
मना सज्जना... भक्ती पंथेची जावे...
मन चिंती ते वैरी न चिंती...
मन... काय ताकद आहे ह्या दोन अक्षरात.... सगळं लॉजिक... शहाणपणा... हुशारी... एका क्षणात खल्लास करून
टाकतं ते मन....
कुणाचंही असू दे...
त्यापुढे भले भले नांगी टाकतात.... तिथे आपला काय पाड??? प्रत्येकला ते वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं बरं का...
कुणाच्या नवथर तारुण्याला पावसात उधाण आल्यासारखं वाटतं...
तर कुणाला ते अगदी उतावीळ... एखाद्या मातेच्या जीवाला घोर लावतं... तर कुणाला उभ्या पिकात घुसलेल्या ढोरासारखं वाटतं... कितीही दूर सारा... पुन्हा पिकावरच येणार...
कुणाला एकदम 'ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नही' असा
साक्षात्कार होतो... तर कुणी भक्तीपंथाला लागतो... पण मला आवडतो तो ज्ञानोबा माऊलींचा ATTITUDE...
मनाचिये गुंती... गुंफियेला शेला... बाप रखुमा देवी वरु... . विठ्ठले अर्पिला...
मनात विचार, भावना यांचा जो काही गुंता झालाय नं... तो सोडवण्यापेक्षा त्याचंच डिझाईन तयार करा... आणि हे डिझाईन एकमेकात गुंफून त्याचा शेला बनवा... आणि हा शेला... विचारांचा... विकारांचा... वासनांचा... वैषम्याचा... पांडुरंग चरणी अर्पण करा...
तिथे अर्पण केलेली वस्तू प्रसाद म्हणून परत मिळते नं आपल्याला, तसंच तिथे वाहिलेले विचार... विकार... वासना... वैषम्य... सगळ्यांचा गुंता... सुरळीत होऊन... शेल्यासारखा मऊसूत होऊन.... विचारांची सुस्पष्टता घेऊन प्रसाद म्हणून परत मिळेल असा विश्वास बाळगा.
माणूस अंतर्बाह्य बदलून जातो हो... उगीच नाही तो विठूराया सगळ्यांच्या
मनात बसलाय...
एक जागा ठेवलीय नतमस्तक व्हायला... आळंदीला... संजीवन समाधी...
तिथे जाऊन स्वत:ला वाहून या...
मग ????
मोगरा फुलला... मोगरा फुलला...
(27/12/2021)
Comments
Post a Comment