(मूल दत्तक घेण्याचे प्रमाण भारतात आता वाढले असले तरीही कायदेशीर अडचणी, दत्तक मूल स्वीकारण्याबाबतचे मानसिक तिढे, अशा मुलांना समाज स्वीकारेल का ही मनात असलेली भीती, मुलाचे पालक कोण असतील, त्यांची पार्श्वभूमी कशी असेल, मुलात काही मानसिक वा इतर दोष असतील का या आणि इतर अनेक प्रश्नांमुळे मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सहजसुलभ नसते. मात्र, योग्य मार्दर्शन मिळाल्यास हा अनुभव खूप आनंददायी होऊ शकतो. आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईक अथवा अन्य कुटुंबात मूल दत्तक घेतले गेले असेल तर त्याबद्दल कुतूहल असते, पण जेव्हा स्वतःच्या कुटुंबात मूल असे दत्तक आणायचे असते तेव्हा मात्र मन पटकन निर्णय घेण्यास तयार होत नाही. काही दिवस, महिने जावे लागतात. लोकांच्या मनातील याच शंका दूर करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा पवार -तावडे यांनी दत्तक मुलांच्या व पालकांच्या भावना त्यांच्याच शब्दात मांडून पुस्तकरूपाने आपल्यासमोर आणल्या आहेत. पुस्तकाची संकल्पना, संकलन आणि संपादन त्यांनीच केले आहे. डॉ. मनोज भाटवडेकर यांची समर्पक प्रस्तावना पुस्तकात आहे. मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीच नव्हे तर इतर प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे. मुंबईच्या ''वात्सल्य ट्रस्ट'' या संस्थेने हे पुस्तक (किंमत १२५ रुपये) प्रकाशित केले आहे. ही प्रस्तावना येथे देत आहे)

या पुस्तकाच्या निर्मात्या वर्षा पवार-तावडे यांनी मला पुस्तकाच्या निमित्तानं प्रस्तावनेचे चार शब्द लिहायला सांगितले; त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो. वर्षा पवार-तावडे यांना मी गेली अनेक वर्षं एक सहृदय, संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या आणि पालक म्हणून ओळखतो. दत्तक पालकत्व हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या क्षेत्रात त्यांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांत मनोविकार तज्ज्ञ म्हणून सहभागी होण्याची संधी मला लाभली आहे. दत्तक पालकत्वातून उद्भवणाऱ्या पालक आणि मुलांच्या अनेक समस्या मी व्यावसायिक म्हणून हाताळल्या आहेत. दत्तक प्रक्रियेच्या स्वीकृतीचा अभाव या समस्यांच्या मुळाशी असतो ही त्यातली दुर्दैवी गोष्ट. या संदर्भात ही प्रस्तावना लिहिताना मला अतिशय आनंद होत आहे.
खरं म्हणजे या पुस्तकाचं शीर्षक हीच त्याची प्रस्तावना आहे. ‘ॲडॉप्शन: एक गुड न्यूज!’ नावातच दत्तक पालकत्वाच्या प्रक्रियेतील सकारात्मकता संपूर्णतया सामावली आहे. कुठल्याही दाम्पत्याला नैसर्गिकरीत्या मूल होऊ घातल्याच्या बातमीला ‘गुड न्यूज’ म्हणण्याची प्रथा सर्वश्रुत आहे. तोच दर्जा दत्तक मूल घरात येण्याच्या बातमीला दिला जातोच, असं नाही. अमक्या अमक्यांनी मूल ‘घेतलं’ किंवा ‘आणलं’ एवढ्यावरच हा उल्लेख थांबतो. दत्तक प्रक्रियेला ही सापत्न वागणूक कशामुळे मिळत असावी, याची कारणं आपल्या तथाकथित समाजमनाच्या गुंतागुंतीत आहेत.
मुळात आपल्या समाजानं (म्हणजे नेकमं कुणी ते मला एकदा शहाण्या माणसानं नीट समजावून सांगावं. मी ऐकायला तयार आहे.) काही गोष्टी गृहीत धरल्यासारख्या आहेत. एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्नएका विशिष्ट वयात झालंच पाहिजे, लग्नानंतर अमुक अमुक काळात मूल झालंच पाहिजे, एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर जास्त चांगलं वगैरे वगैरे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या आग्रहांचा इतका प्रचंड प्रभाव नवविवाहित दाम्पत्यांवर असतो की या सामाजिक दबावाला बळी न पडता आपल्याला आयुष्यात हवे ते निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, हेही विसरलं जातं. एखाद्या जोडप्याला काही कारणानं मूल होत नसेल, तर त्यासाठी वैद्यकीय उपचार केले जातात. त्यांनाही यश न मिळाल्यास मूल दत्तक घेणं हा पर्याय उपलब्ध असतो. या पर्यायाकडे मुळात कसं बघितलं जातं यावर पुढच्या प्रक्रियेचं यश अवलंबून आहे, असं मला वाटतं. अशा जोडप्यांना मनात अनेकदा न्यूनगंड असतो. किंबहुना नैराश्यही. वंध्यत्वाच्या शिक्क्यातून बाहेर पडून नैराश्याचं व्यवस्थापन करुन पुढे जाण्याची गरज असते.
जेव्हा मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा त्यावर उलटसुलट चर्चा होते. मुलाचा जन्म कुठल्या पार्श्वभूमीवर झाला असेल – त्याचे जन्मदाते पालक कसे असतील – आनुवंशिक घटकांचा मुलांवर कितपत परिणाम होईल – मूल कसं निघेल – ते मूल दिसायला कसं असेल – ते अभ्यासात चांगलं असेल का – नातेवाईक, कुटुंबीय त्याला स्वीकारतील का – त्या मुलाला पुढे कुटुंबाबद्दल प्रेम वाटेल का – समजा, त्याला आपल्या जन्मदात्या आईकडे परत जावंसं वाटलं तर काय होईल – एकंदरीत हे मूल शेवटी आपल्याला ‘यश’ देईल का – या फंदात पडावं की नाही – एक ना दोन – नाना शंका भेडसावत असतात. त्यात नकारात्मक उदाहरणांची भर घालून नको ते सल्ले देणारे अनेक ‘हितचिंतक’ असतात. अनेकदा असं दिसतं की, मूळ नैराश्यग्रस्त मन:स्थितीचं योग्य व्यवस्थापन केल्याशिवायच मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला जातो. हे टाळण्यासाठी समुपदेशनाचा फायदा होऊ शकतो. हा निर्णय नेहमीच सकारात्मक भूमिकेतून आणि एक ‘निवड’ म्हणून घेतला जावा. या निर्णयाशी निगडित जर आनंदी मन:स्थिती असेल तर ती मन:स्थिती संपूर्ण दत्तक प्रक्रियेचा पाया म्हणून कायम उपलब्ध राहते.
याच आनंदी मन:स्थितीचा पाया हा या पुस्तकाचा स्थायीभाव आहे. अनेक मुलं या निमित्तानं बोलती झालेली आहेत. आपल्या पालकांविषयीचा अभिमान आणि त्यांच्याविषयीची अपार कृतज्ञता या मुलांच्या लिखाणातून जाणवते. आपण दत्तक मूल आहोत या घटनेकडे ही मुलं एक नॉर्मल वस्तुस्थिती म्हणून बघताना दिसतात. त्या घटनेचा उदो उदोही करत नाहीत की ती लपवतही नाहीत. त्यांच्या या प्रगल्भ दृष्टिकोनाबद्दल त्यांचं आणि त्यांच्या पालकांचंही अभिनंदनच करायला हवं. दत्तक प्रक्रिया स्वीकारताना पालकांना अग्निदिव्यातून जावं लागतं. त्याचाही उल्लेख काही मुलांच्या कथनातून आलाय. आपल्यासाठी हेही पालकांनी सोसलं ही जाणीव त्यांना आहे ही केवढी मोठी गोष्ट आहे. पालकांकडून मिळालेलं प्रेम हा त्यांच्यासाठी मोठा ठेवा आहे. त्यांना त्यांची मिळालेली ‘आयडेंटिटी’ हे त्यांच्यासाठी असलेलं महत्त्वाचं उद्दिष्ट साध्य झालं, याचा आणि या प्रवासात पालकांचा हातभार फार मोठा आहे, हा आनंद त्यांच्यसाठी अवर्णनीय आहे. दत्तक पालकांनी स्वत:ची दत्तक प्रक्रिया किती खुलेपणानं स्वीकारली आहे, यावर मुलांचा या प्रक्रियेकडे बघण्याचा दृष्टिकोन अवलंबून असतो. स्वीकृती हा मामला अंत:करणाचा आहे; बुद्धीचा नाही. बुद्धी विचारांच्या माध्यमातून काम करते; अंत:करण अनुभवाशी घट्ट जोडलेलं अतसं. आपले अनुभवही मुलांनी या पुस्तकाव्दारे अत्यंत आत्मविश्वासाने मांडले हे या पुस्तकाचं मोठं बलस्थान आहे.
मुलांबरोबर काही पालकांनीही आपलं मनोगत इथे व्यक्त केलंय. मुळात दत्तक पालकत्वाचा प्रवास हा ‘हे मूल दुसऱ्या कुणीतरी जन्माला घातलंय; पण ते माझांच आहे’ या ठाम भूमिकेतून सुरु होतो. ‘त्या मुलात जे चांगलं आहे ते आमच्यामुळे आणि जे नकारात्मक आहे ते मात्र त्याच्या आनुवंशिकतेमुळे’, असा युक्तिवाद या पालकांना करणं सहज शक्य असतं आणि तशी उदाहरणं आमच्या व्यवसायात बघायला मिळतातही. या पुस्तकात मात्र पालकांनी पालकत्वाची भूमिका बजावताना कशा कशाला तोंड द्यावं लागतं आणि त्यातून कसा मार्ग काढता येतो या एक वस्तुपाठच दिलाय. हेही पुन्हा अनुभवाचे बोल आहेत. यात कुठेही उपदेशबाजी नाही. मुलांबद्दलची संपूर्ण स्वीकृती आणि त्यांच्याबद्दलचं बिनशर्त प्रेम हे दोन घटक पालकांच्या कथनातून ठायी ठायी जाणवतात.
वर्षा पवार-तावडे यांनी लिहिलेली काही प्रकरणंही दत्तक पालकत्वाच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकून जातात. दत्तक पालक आणि मुलं यांच्या मानसिकतेचं पुरेपूर भान त्यांना आहे. या मुलांना आपल्या जन्मदात्या पालकांबद्दल कुतूहल वाटणं स्वाभाविक असतं. याबद्दल त्यांना आस्था असते. अशीच आस्था दत्तक पालकांना असावी, असं प्रतिपादन ती मुलं करतात. प्रसारमाध्यमांना त्यांनी सरळ सरळ आवाहन केलंय – ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावावर ‘दत्तक’ सारख्या विषयांवर खेळ करणं त्यांनी बंद करावं. एकूणच, गैरसमज, पूर्वग्रह अशा नकारात्मक दृष्टीकोनांच्या विळख्यातून दत्तक पालकत्वाची प्रक्रिया सुटावी, ही तळमळ त्यांच्या लिखाणातून पदोपदी जाणवते.
बालक-पालक नात्यामध्ये आणि एकूणच मुलांच्या विकासामध्ये प्रेम हा एकमेव मूलभूत पाया असतो, हे पुन्हा एकदा या पुस्तकाच्या माध्यमातून अधोरेखित झालं. ते प्रेम जन्मदात्या पालकांकडून मिळतं की दत्तक पालकांकडून मिळतं हा मुद्दाच उपस्थित होऊ शकत नाही. (असे प्रश्न फक्त कोरड्या बुद्धीलाच पडू शकतात; अंत:करणाला नाही.) हे पुस्तक पालक आणि मुलांसाठी तर आहेच; पण कुठल्याही संवेदनशील अंत:करणाच्या वाचकांसाठीही आहे. या पुस्तकातून जाणवणारा प्रेमाचा ओलावा वाचकांच्या अंत:करणाला नक्की स्पर्श करेल, असा विश्वास मला वाटतो. दत्तक प्रक्रियेकडे तिरकस आणि अजाण नजरेनं बघणाऱ्या मंडळींचे डोळे उघडण्याचं ‘सामाजिक’ कार्य आणि या प्रक्रियेशी झागडणाऱ्या दत्तक पालक व मुलांना या पुस्तकामार्फत मार्गदर्शन व्हावं, अशी सदिच्छा मी इथे व्यक्त करतो.
पुन्हा एकदा वर्षा पवार-तावडे आणि सर्व लेखक मुलं व पालक यांचं मन:पूर्वक अभिनंदन!
- डॉ. मनोज भाटवडेकर
जेष्ठ मनोविकार तज्ज्ञ
(24/11/2021)
Comments
Post a Comment