मूल दत्तक घेताना ..

 (मूल दत्तक घेण्याचे प्रमाण भारतात आता वाढले असले तरीही कायदेशीर अडचणी, दत्तक मूल  स्वीकारण्याबाबतचे मानसिक तिढे, अशा मुलांना समाज स्वीकारेल का ही मनात असलेली भीती, मुलाचे पालक कोण असतील, त्यांची पार्श्वभूमी कशी असेल, मुलात काही मानसिक वा इतर दोष असतील का या आणि इतर अनेक प्रश्नांमुळे मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सहजसुलभ नसते. मात्र, योग्य मार्दर्शन मिळाल्यास हा अनुभव खूप आनंददायी होऊ शकतो. आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईक अथवा अन्य कुटुंबात मूल दत्तक घेतले गेले असेल तर त्याबद्दल कुतूहल असते, पण जेव्हा स्वतःच्या कुटुंबात मूल असे दत्तक आणायचे असते तेव्हा मात्र मन पटकन निर्णय घेण्यास तयार होत नाही. काही दिवस, महिने जावे लागतात. लोकांच्या मनातील याच शंका दूर करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा  पवार -तावडे यांनी दत्तक मुलांच्या व पालकांच्या भावना त्यांच्याच शब्दात मांडून पुस्तकरूपाने आपल्यासमोर आणल्या आहेत. पुस्तकाची संकल्पना, संकलन आणि संपादन त्यांनीच केले आहे. डॉ. मनोज भाटवडेकर यांची समर्पक प्रस्तावना पुस्तकात आहे. मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीच नव्हे तर इतर प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे. मुंबईच्या ''वात्सल्य ट्रस्ट'' या संस्थेने हे पुस्तक (किंमत १२५ रुपये) प्रकाशित केले आहे. इथे वर्षाताईंचे मनोगत देत आहे. त्यावरून हा प्रश्न, पुस्तकामागची भूमिका स्पष्ट होईल. सोबत वर्षाताईंची एक कविताही देत आहे.  )

 

‘ॲडॉप्शन : एक गुड न्यूज!’

दत्तक मूल घरात येण्याने ‘घराला घरपण येतं’, असा सगळ्याच पालकांचा अनुभव असतो. एकदा का मूल घरात आलं की, त्याचा/तिचा इतका लळा लागतो की, हे मूल आपलं ‘दत्तक मूल’ आहे हेच विसरायला होतं आणि काळाच्या ओघात काही पालकांकडून आपल्या मुलांना ती दत्तक आहेत हे सांगणं राहूनच जातं. परंतु, मोठेपणी हे सत्य आपल्या मुलांना चुकून बाहेरच्या व्यक्तींकडून कळू नये, ही काळजीही त्यांना वाटत असते. नव्यानं दत्तक पालक बनणाऱ्या अनेक पालकांमध्ये दत्तकपणाबद्दल आपल्या मुलांना कसं सांगावं, कधी सांगावं, का सांगावं, याबद्दल ‍व्दिधा मन:स्थिती असते. अशा सर्व पालकांना ॲडॉप्शन: एक गुड न्यूज या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. या पुस्तकात दत्तक मुल आणि पालक यांनी त्यांचे अनुभव लिहिले आहेत.

मुलांनी जे अनुभव लिहून दिले ते खरंच खूप प्रामाणिक आणि ‘सच्चे’ आहेत. ॲडॉप्शनबद्दल लहान वयात कळलं तेव्हा फार काही वेगळं वाटलं नाही; पण जसजसा मोठ्या वयात त्याचा ‘खरा अर्थ’ लागला, समाजात असलेली त्याबद्दलची मतमतांतरं समजत गेली. तसतसा या वस्तुस्थितीशी जुळवून घ्यायला कसा वेळ लागला, पालकांबरोबर सतत याबद्दल मोकळेपणाने बोलता आल्याने विचारांमध्ये कसा सकारात्मक बदल होत गेला याबद्दल मुलांनी खुलेपणाने लिहिलं आहे. काही जणांनी याबद्दल लिहिताना म्हटलं आहे की, ‘ॲडॉप्शन हा माझा भूतकाळ आहे आणि तो कुरवाळत राहण्यापेक्षा माझ्या कर्तृत्वाने मी माझा भविष्यकाळ घडवेन’, तर काहिंनी, दत्तक विषयाबद्दल शाळेत चिडवाचिडवी होऊ नये म्हणून त्या वयात शाळेतच दत्तकपणाबद्दल अधिक सकारात्मक विचार मांडणं गरजेचं आहे असं आवर्जुन म्हटलं आहे. कुणी असंही म्हटलं आहे की, ‘मी ॲडॉप्टेड आहे हे मी सगळ्या जगाला सांगत बसत नाही (जगाला माहिती असण्याची गरजही नाही) आणि माझ्या आयुष्यात जी महत्त्वाची माणसं आहेत, त्या सगळ्यांनाच हे सत्य माहिती आहे.’ लग्नाच्या वयाच्या मुलामुलींनी आवर्जून म्हटलं आहे की, भावी जोडीदारापासून ॲडॉप्शनचं सत्य कधीच लपवायचं नाही. प्रसारमाध्यमांमध्ये असंवेदनशीलपणे दाखवल्या जाणाऱ्या दत्तक विषयाच्या चित्रणाबद्दलही काही मुलांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या मुलांच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक होणं शक्यच नव्हतं.

पुस्तकाच्या निमित्तानं अनेक मुलांच्या पाकांशीही बोलणं झालं. पालकांनी आपल्या मुलांना दत्तक असल्याचं केव्हा सांगितलं? त्यापूर्वी त्यांच्या मनात काही चलबिचल होती का? मुलांच्या वयाच्या विविध टप्प्यांमध्ये पालकांनी मुलांचे प्रश्न कसे हाताळले? कसा संवाद साधला? अशा मुद्दयांवर पालकानी लिहिलं आहे.

दत्तक विषयात काम करणाऱ्या संस्थांमधील समुपदेशक, संचालक यांनी मुलांच्या मोठ्या वयात दत्तक असल्याबद्दल मुलांना सांगण्याची वेळ पालकांवर आल्यास तो प्रसंग कसा हाताळावा? काय काळजी घ्यावी? याबद्दलही काही माहिती लिहिली आहे.

लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच नवीन जोडप्याला नातेवाईक विचारायला लागतात, ‘काय मग? गुड न्यूज कधी देताय? बायलॉजिकल मूल होणं ही जशी गोड बातमी (गुड न्यूज) आहे, तशीच ॲडॉप्शनही गुड न्यूज आहे. असा विचार आपल्या समाजात वाढावा हा या पुस्तकाचा उद्देश आहे. ‘ॲडॉप्शन: एक गुड न्यूज’ या पुस्तकात दत्तक मुला-मुलींच्या भावना त्यांच्याच शब्दांत वाचायला मिळतात ही ह्या पुस्तकाची विशेष उल्लेखनीय बाब आहे.

मूल दत्तक घेण्याविषयी दत्तक पालक किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. मूल कोणाचं असेल? ते आमच्या घरात रुळेल ना? ते कसं वाढेल? त्याची आय.क्यू.टेस्ट करुन मिळेल का? असे प्रश्न विचारणाऱ्या या सर्वच पालकांना नेहमीच सांगावंसं वाटतं- ते बाळ विचारतं का हो, ‘याच कुटुंबात मला का पाठवताय? हे पालक माझा नीट सांभाळ करतील ना? त्यांची ई.क्यू. (इमोशनल कोशंट) टेस्ट करुन पाहिली का? माझ्या वाढत्या वयात मला पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची ते योग्य उत्तरं देऊ शकतील का?...’

पालकांनी खरंच इतकी पुढची तयारी केलेली असते का? खरं म्हणजे नसते. त्यासाठीच दत्तक संस्थांमध्ये त्यांचं काऊन्सिलिंग करुन अशा विविध मुद्दयांची त्यांना तोंडओळख करुन दिली जाते. मुलाच्या वतीनं त्याचे पालक निवडण्याची जबाबदारी शासन/सस्थांची असते. त्यासाठीच पालकांकडून विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. या सगळ्या प्रक्रियेत हल्ली एक ते दोन वर्षांचा काळ लागतो.

पालकांच्या मनात एक अनामिक भीती घर करुन बसलेली असते आणि ती म्हणजे दत्तक मुलाला त्याच्या दत्तकपणाबद्दल माहिती होण्याची. अनेकांना ते गुपित ठेवणंच जास्त हिताचं आहे, असं वाटत असतं. परंतु, मानसशास्त्रज्ञांच्या मते, हे सत्य इतर कोणाकडून कळण्यापेक्षा आपल्या आई-वडिलांकडून कळलं, तर मुलांना कमी मानसिक धक्का बसतो आणि सत्य पचवणं तुलनेने कमी त्रासाचं होतं. आई-वडील आणि मुलाच्या नात्यातला विश्वास टिकून राहायला मदत होते.

हे सर्व पटत असूनसुध्दा प्रत्यक्ष मुलांना ते सांगणं ही पालकांसाठी कसोटीची वेळ असते. केव्हा सांगायचं? कसं सांगायचं? त्याला/तिला काय वाटेल? धक्का बसेल का? तो/ती परिस्थिती मान्य करील का? आपल्याकडे पाहण्याचा त्याचा/तिचा दृष्टिकोन बदलेल का? त्याच्या/तिच्या व्यक्तिमत्त्व, स्वभावावर तर याचा परिणाम होणार नाही ना? एक ना दोन हजार प्रश्न मनातील भीती वाढवत असतात.

दत्तकविषयक काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात की, सुरुवातीपासूनच दत्तक हा शब्द सकारात्मक भावनेतूनच बोलण्यात ठेवावा. ‘दत्तक’ जाणं/घेणं ही एक चांगली गोष्ट आहे, हे सतत वेगवेगळ्या संदर्भात बोलत राहावं. गोष्टी, गाण्यांमधून त्यांचा उल्लेख करत राहावा. दत्तक आई-वडिलांना आणि दत्तक मुला/मुलींना एकमेकांची गरज होती हे ठसवत राहावं.

दत्तक मुलाचं वय, मनोविकास, संवेदनक्षमतेनुसार त्या-त्या टप्प्यांवर कोणत्या प्रश्नांना ते मूल सामोरं जाईल, त्यानुसार माहिती पुरवत जावी. तरीही दत्तक मुलं प्रत्येक वेळी त्यांना काय वाटतं ते बोलून दाखवतीलच, असं नाही. दत्तकत्वाबद्दल माहिती झाल्यावर सुरुवातीला काही काळ त्यांना त्यांचा त्रास होईल. माझ्याच बाबतीत असं का घडलं, असे निराशावादी प्रश्न पडतील. जन्मदात्या आई-वडिलांबद्दलची उत्सुकता वाढेल. दत्तक आई-वडिलांबद्दल पूर्वीइतका हक्क दाखवण्यात कदाचित काही काळ संकोच होऊ शकेल. काही वेळा दत्तक आई-वडिलांचं ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ करणंही सुरु होईल. पण दत्तक आई-वडील जर खंबीर मनाचे असतील तर याही परिस्थितीला ते सकारात्मकतेने तोंड देऊ शकतील.

परस्पर विश्वास, आपुलकी, निरपेक्ष प्रेम व मोकळा संवाद यांचा सततचा अनुभवच हे नातं आनंदी करायला मदत करु शकेल. काही संस्थांतर्फे दत्तक मुलांसाठी विशेष एकत्रीकरण, चर्चात्मक कार्यक्रम आणि ‘काऊन्सिलिंग सेंटर्स’ चालवली जातात. काही ठिकाणी दत्तक पालकांचेही गट एकमेकांच्या अनुभवांतून शिकण्याचा प्रयत्न करत असतात.

काही पालक मनाने ठाम नसतात, ते अनेकदा खूप गोंधळलेले दिसतात. दत्तक मूल आपल्या कुटुंबात रुळेल ना, हा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. अशा साऱ्यांनाच एक प्रश्न विचारावासा वाटतो. दुसऱ्या कुटुंबातल्या संस्कारांत २०-२५ वर्षं वाढलेली मुलगी लग्न करुन आपण आपल्या घरात आणतो, तेव्हा आपण तिला आपल्या घरात जितकं प्रेम सहवास, विश्वास व आपलेपणा देऊ तितकी ती लवकर रुळते. हे जर आपल्याला पटत असेल तर त्या छोट्या बाळाला दत्तक घेताना, आपल्या कुटुंबात आणताना इतकी साशंकता का बरं मनात ठेवावी?

७-८ वर्षांची समीरा जेव्हा आईला म्हणते, ‘आई, मी तुझ्यासारखीपण दिसत नाही आणि बाबांसारखीही दिसत नाही. मग मी कुणासारखी दिसतेय?’... बेसावध क्षणी समीराच्या आलेल्या या प्रश्नाने आई क्षणभर गोंधळते आणि मग म्हणते, ‘कोण म्हणतं असं?’ उलट मला तर किती जण म्हणतात, ‘समीरा किती तुझ्यासारखं वागते. तिची बोलण्याची, हसण्याची स्टाईल किती तुझ्यासारखी आहे,’ समीराला हे ऐकून गंमत वाटते. ती म्हणते, ‘खरंच असं म्हणतात? खरंच मी तुझ्यासारखी बोलते?’ आई म्हणते, ‘अंग खरंच! मलासुध्दा आधी जाणवलं नव्हतं; पण कोणीतरी म्हटल्यावर ते पटलं’ हे ऐकून समीराची कळी एकदम खुलते आणि मग आई-बाबांच्या वागण्या-बोलण्याच्या लकबींशी स्वत:शी तुलना करण्यात तिला गंमत वाटायला लागते.

वर उल्लेखलेला प्रसंग काल्पनिक नसून दत्तक पालकांना येणारा हा खरा अनुभव आहे. हे आणि असे विविध प्रश्न दत्तक मुलं सतत पालकांना विचारत असतात. ‘आई, मी तुझ्या पोटातून का नाही आले?’ किंवा ‘मी तुमच्या कुटुंबातली नाही ना?’ हेही पालकांच्या जिवाची घालमेल करणारे प्रश्न. अशा वेळी पालकांना प्रसंगावधान राखून या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. ‘बाळा, तू माझ्या पोटातून नाही; पण माझ्या हृदयातून जन्माला आला आहेस. देवबाप्पाने स्पेशली आपल्याला एकमेकांसाठी बनवून पाठवलं आहे.’ हे मनापासून दिलेलं उत्तर मुलांनाही भावतं. कुटुंबाबद्दल बोलताना एका आईनं आपल्या मुलीला दिलेलं उत्तर खूपच समर्पक आहे. ती म्हणाली, ‘अगं, तुझे बाबा वेगळ्या कुटुंबात जन्मले, मी एका दुसऱ्या कुटुंबात आणि तू आणखी एका कुटुंबात. पण, आता आपण तिघं एकत्र येऊन आपलं एक वेगळं खास कुटुंब बनवलं आहे.’ खरंच किती समर्पक उत्तर आहे हे.

मुलांचं दत्तक असणं मुलांना बाहेरुन कळलं तर ते कोणत्या स्वरुपात कळेल, यावर आपला ताबा नसतो. त्यामुळे मुलांना धक्का बसू शकतो. त्यात आपल्याकडचे सिनेमे आणि सीरियल्स यातून दत्तकत्वासंबंधी चुकीची माहिती दाखवली जाते. याचाही मुलांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. म्हणून पालकांनीच स्वत:मुलांना दत्तकपणाबद्दल माहिती द्यावी. त्यातून आई-वडील आणि मुलांच्या नात्यातला विश्वास टिकून राहतो. कोणत्या वयात मुलांना सांगाव, याचं ठोस उत्तर नसलं तरीही कृत्रिमपणे गंभीर चेहरा करुन, खूप मोठं रहस्य सांगितल्याचा अभास निर्माण करून अजिबात सांगू नये. गोष्ट सांगता सांगता, गप्पा मारता मारता लहान वयात याचा उल्लेख करावा. मुलांना चिऊ-काऊ, परीराणी यांच्या गोष्टी सांगता सांगताच कृष्ण बाळ, झाशीची राणी अशांच्या गोष्टींतून दत्तक बाळाची गोष्ट सांगावी. मुलांकडून दत्तकपणाबद्दल येणाऱ्या प्रश्नांना टाळू नये. मोकळेपणाने गप्पा मारत त्यांची उत्तरं द्यावी. दत्तक बाळ घरी आणल्याच्या दिवसांच्या फोटोंचा अल्बम, व्हिडीओ, सी.डी. जरूर बनवावी; ज्यामुळे बाळाचं कुटुंबात येणं हा सर्वांसाठीच किती आनंदाचा दिवस होता, हे मुलांच्या मनावर ठसत रहातं.

हे खरं आहे की, पालकांनी मुलांच्या बाबतीत काही स्वप्नं पाहिलेली असतात. पालकांच्या अपेक्षांच्या चौकटीनुसार मूल वागत नसेल, तर काही वेळा पालकांना मनातून त्याचं  ‘दत्तक’ असणं आठवायला लागतं.’ पण आपण समाजात पाहतो, सख्ख्या भावंडांत, अगदी जुळ्या भावंडांमध्येही स्वभाव, आचार-विचार यात कितीतरी तफावत आढळते. मुलांवर पालकांच्या अपेक्षेप्रमाणेच वागण्याची सक्ती करणं हे मुलांवर एक प्रकारे अन्याय केल्यासारखंच होऊ शकतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘ॲडॉप्शन: एक गुड न्यूज’ हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

या पुस्तकाचे प्रकाशक वात्सल्य ट्रस्ट ही संस्था आहे. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या पुस्तकासाठी ‘ब्लर्ब’ च्या माध्यमातून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी संक्षिप्त परिचय करुन देताना असे म्हटले आहे कि मराठी ग्रंथ संसारामध्ये हे पुस्तक अनेक अर्थानी महत्वाचं ठरणार आहे. हे पुस्तक वाचताना पदोपदी शब्दोशब्दी जाणवेल की ॲडॉप्शन ही माणूसकीसाठीची ‘गुड न्यूज’ आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या माध्यमातून डॉ. मनोज भाटवडेकर यांनी पुस्तकांचे सार समर्पकरित्या वाचकांसमोर मांडताना म्हटलं आहे की हे पुस्तक पालक व मुलांसाठी तर आहेच; पण कुठल्याही संवेदनशील अंत:करणाच्या वाचकांसाठीही आहे.

या पुस्तकामध्ये एकच मूल दत्तक असलेले, एक मूल बायलॉजिकल आणि एक मूल दत्तक, एकल पालकत्व असलेल्या पालकांचं दत्तक मूल, लहान वयात दत्तक गेलेले, मोठ्या कळत्या वयात दत्तक गेलेले, आता शिक्षण सुरू आहे अशी दत्तक मुलं आणि लग्न झालेले – त्यांनाही मुलं झाली आहेत अशा दत्तक व्यक्ती इतक्या विविध प्रकारच्या दत्तकत्वाच्या अनुभवांचं संकलन केलं आहे.

दत्तक मुलांनी लिहिलेल्या अनुभवात त्यांना त्यांच्या पालक, नातेवाईक, मित्र-परिवारांकडून मिळालेल्या प्रेमाचा आवर्जून उल्लेख आहे. त्याच वेळी समाजाकडून कळत-नकळत येणारे वेगळे अनुभव, बदलेल्या नजरा यांचा कधी कधी त्रास होतो, असंही ही मुलं मोकळेपणानं मांडत आहेत. ‘दत्तक’ नात्यात ‘उपरेपणाचा’ भाव तर अजिबातच नाही; तसाच ‘उपकाराचा’ भावही नसतो. ‘दत्तक’ हे नातं निखळ, निर्मळ प्रेम व वात्सल्यावर उभं राहिलेलं असतं. हे नातं जसं घराला ‘घरपण’ देतं. तसंच ते समाजालाही अधिक सुदृढ आणि परिपक्व बनवत असतं.

भावी काळातील दत्तक पालक, मुलं, त्यांचे नातेवाईक, मित्रापरिवाराला, तसेच दत्तक विषयावर अभ्यास करणाऱ्या आणि याविषयीची उत्सुकता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या पुस्तकातून काहीतरी नवीन माहिती नक्कीच मिळेल. पुढील काळात कोणत्याही वेळी पालकांच्या मनात काही प्रश्न/विचार आले, तर या पुस्तकातलं कोणतंही पान उघडून वाचलं तरी त्यातून नवीन विचार/नवीन दृष्टिकोन मिळून आत्मविश्वास वाढण्यास नक्कीच मदत होईल, अशी खात्री आहे.

'जन्म नाही दिला तिला
 
जन्म नाही दिला तिला
हे कोण कुजबुजले तिथे ?
आईपणाची हीच एक
असते का ओळख इथे ?
 
नाही उदरी पोसले
नऊ महिने मी तिला
बाळंतपणाच्या यातना
हृदयातून मी सोसल्या
तिचे पाहिले पाऊल
मधाळ चिमणे बोल
शाळेतला पहिला दिवस
केवढे त्याचे मोल !
 
एकच स्वप्न पाहिले
यशस्वी तिला बघायचे
तिच्या सुखाच्या आड
कोणा न येऊ द्यायचे
आईपणाची याशिवाय
वेगळी ओळख कोणती
तिच्या विश्वात गवसली
मला सगळी नाती !

(24/11/2021)
 

Comments