वर्तमानपत्रांमधले बजेट

 अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाल्यावर दुसऱ्या दिवशीचे वर्तमानपत्र कसे निघते हा माझा नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. म्हणून मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर आजच्या वर्तमानपत्रांनी  पहिल्या पानावर त्याचे कसे वर्णन केले आहे ते मला आवश्यक वाटले.

'महाराष्ट्र टाइम्स'ने 'आभासातुनी 'अर्थ' मिळावा' असे शीर्षक दिले आहे आणि ही बातमी देताना असे म्हटले आहे की, ''दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे ओढवलेल्या आर्थिक अरिष्टाशी झुंजणाऱ्या सर्वसामान्यांना फारसा दिलासा न देता २५  वर्षानंतरच्या 'अमृत' काळाकडे डोळे लावत आभासातून अर्थ मिळवणारा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडला.''  'महाराष्ट्र टाइम्स'ने आतील पानांमध्ये विषयानुरूप विविध तज्ञांचे लेख आहेत. त्यांनी मात्र शिक्षण वगळता बाकी सर्व क्षेत्रांना किमान साडेतीन ते जास्तीत जास्त नऊ असे गुण दिले आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी शरद जावडेकर यांनी दहापैकी केवळ दोन गुण दिले आहेत. तसेच महिला आणि बालकल्याण या क्षेत्रासाठी किरण मोघे यांनीही दहापैकी दोनच गुण दिले आहेत. संपादकीय पानावर डॉक्टर अभिजित फडणीस यांचा लेख आहे आणि त्यांनी दहापैकी नऊ गुण देताना असे म्हटले आहे आहे की, ''विकासाच्या आणि नव्या वाटा चोखाळणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्र्यांनी बहुतेक क्षेत्रांना स्पर्श केला असून त्यासाठी भरीव तरतूदही केली आहे. दूरगामी विचार करता अनेक नव्या आयामांना गवसणी घालणारा हा 'अमृत' अर्थसंकल्प आहे.''. महाराष्ट्र टाइम्स ने पहिले पान संपूर्ण अर्थसंकल्पाला दिलेले नाही. अन्य विषयांच्या बातम्याही घेतल्या आहेत.
 
'सकाळ' दैनिकाने 'डिजिटलचा अमृतकुंभ' असे शीर्षक दिले आहे आणि असे म्हटले आहे की, ''डिजिटल इंडियाचा अमृतकलश आणणारा, स्टार्टअप इकोसिस्टीमला ड्रोन शक्तीचे बूस्टर देणारा पण करदात्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. शेतकरी, नोकरदार आणि उद्योजक यांना भरीव असे काही मिळाले नाही.''  सकाळने  पहिल्या पानावर महाराष्ट्राला मिळणार ५२  हजार कोटी अशी महाराष्ट्राची विशेष बातमी दिली आहे.
 
लोकसत्तेने 'अर्थ' विलगीकरणात असे शीर्षक दिले असून मुख्य बातमीच्या इंट्रो मध्ये अर्थसंकल्पावर थेट टीका केली आहे. ते म्हणतात, ''कोरोनालाटांवर हेलकावे खात असलेले अर्थकारण, महागाईचा वाढता बोजा, असंघटित क्षेत्रातील बेरोजगारी, वाढती वित्तीय तूट अशी लक्षणे दाखवत असलेल्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य ठरवणारा अर्थसंकल्प मंगळवारी सादर झाला. अर्थव्यवस्थेला वर्धक मात्रा देऊन तिची प्रतिकारशक्ती वाढवण्याऐवजी यापैकी अनेक मुद्द्यांना बगल देत अर्थमंत्र्यांनी संकल्पातून 'अर्था'चे विलगीकरण केल्याचे दिसून आले. ''
 
'लोकमत'ने निर्मला सीतारामन यांना 'स्वप्नांची जादूगार' असे म्हटले आहे. प्रमुख बातमी देताना असे म्हटले आहे की, ''ज्याप्रमाणे सूर्याचा रथ सात अश्व ओढतात तसा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ते शताब्दी यापुढच्या २५  वर्षांमधील भारताचा विकासरथ रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, प्रवासी वाहतूक,  जलमार्ग, आणि मालवाहतूक हे सात अश्व ओढून देशाला स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनतील असे सांगत अमृत महोत्सवी वर्षातील २०२२-२३ च्या अर्थसंकल्पाच्या रुपाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी विकासाची दिशा देशासमोर मांडली, अशा शब्दात अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. 'हॅलो मुंबई' पुरवणीत विविध तज्ज्ञांची मते मांडली आहेत. त्यांचे शीर्षक  मात्र 'बजेटने केली निराशा' असे आहे.
 
सोबत इंग्रजी वर्तमनपत्रांची पहिली पानेही देत आहे. त्यावरून त्यांनी पहिल्या पानांवर बजेट कसे मांडले हेही लक्षात येईल.

Comments