चिऊताईसाठी मुंबईत घर

 मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरांमध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, तसेच मोबाइल टॉवरचे जाळे वाढतेय, ग्रीन झोन नष्ट होत आहेत. मोठमोठ्या टॉवरच्या काचेच्या भिंतींमुळे चिमण्यांना तसेच इतर छोटया पक्ष्यांना घर करण्यासाठी जागाच उरली नाही. त्यामुळे चिमण्या व इतर छोटे पक्षी स्थलांतरित होत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने हे घातक आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी 'स्पॅरोज शेल्टर' ही संस्था काम करत असून, संस्थेने आतापर्यंत ठिकठिकाणी कृत्रिम घरटी बसवत चिमणी संवर्धनाला हातभार लावला आहे. महाविद्यालयीन मित्रांनी पर्यावरण रक्षणासाठी स्पॅरोज शेल्टर या संस्थेची स्थापना केली. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांच्या नेतृत्वाखाली काम सुरु आहे. बिघडत चाललेले निसर्गचक्र पूर्ववत करण्यासाठी निसर्गसंवर्धन आणि संरक्षण हे स्पॅरोज शेल्टरचे ध्येय आहे. गेल्या १३ वर्षापासून चिमण्यांसह इतर छोट्या पक्ष्यांची कृत्रिम घरटी शास्त्रीय पद्धतीने तयार केली जात आहेत. राणीची बाग. कलिना संकुल, शिवाजी पार्क, फाइव्ह गार्डन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, महापालिकेची उद्याने, महाराष्ट्र राजभवन, हरयाणा राजभवन येथे ही कृत्रिम घरटी लावण्यात आली आहेत. आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त कृत्रिम घरटी विविध भागात लावण्यात आली आहेत.

(बातमी - लोकमत)

.... ... ... ... ... .

महाराष्ट्र 'एनसीसी' देशात सर्वोत्तम

प्रजासत्ताक दिनासाठी दिल्ली पाठविण्यात आलेले महाराष्ट्रातील एनसीसीचे (राष्ट्रीय छात्रसेना) पथक देशात सर्वोत्तम ठरले. महाराष्ट्र एनसीसीला हा मान अठराव्यांदा मिळाला आहे. प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरात महाराष्ट्राच्या पथकाने प्रतिष्ठेचा पंतप्रधान ध्वज पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सर्वोत्तम सैनिक तसेच छात्रसैनिकांची निवड होते. राष्ट्रीय छात्रसेनेंतर्गत (एनसीसी) या निवडीसाठी स्वतंत्र शिबिर घेतले जाते. हे शिबिर तीन आठवड्यांपासून राजधानी नवी दिल्लीत सुरू होते. पंतप्रधान ध्वज प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने या शिबिराची सांगता होते. वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संचालनालयाला (राज्याला) हा ध्वज प्रदान केला जातो. त्यानुसार हा प्रतिष्ठेचा ध्वज महाराष्ट्र संचालनालयाला शुक्रवारी प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र संचालनालयाचे प्रमुख असलेले एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी हा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वीकारला. सीनियर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव हा छात्रसैनिक ध्वजवाहक होता. यानिमित्ताने सर्वोत्तम संचालनालयाला चषकदेखील प्रदान केला जातो. हा चषक नौदल कॅडेट कॅप्टन निकिता खोत हिने स्वीकारला. सन २००२ ते २०१३ दरम्यान सलग १२ वेळा महाराष्ट्र संचालनालय विजेते होते. २०२०, २०२१ मध्ये ते उपविजते ठरले होते. प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराचे समन्वयन यंदा पुणे येथील एनसीसीचे गट प्रमुख ब्रिगेडियर आर. के. गायकवाड यांच्याकडे होते. 'हे यश खऱ्या अर्थाने पथकाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध सिन्हा यांच्यासह मेजर आरुषा शेटे व मनोज फिरंगे यांच्या नेतृत्वातील छात्रसैनिकांच्या मेहनतीचे आहे,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या शिबिरात देशभरातील २१५५ छात्रसैनिक सहभागी झाले होते. त्यातून मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयाची कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील ही सर्वोत्तम ठरली. कॅडेट सीनिअर अंडर ऑफिसर शंतनू मिसाळ याने चौथा क्रमांक पटकावला. राज्यातील ५७ छात्रसैनिकांचा यात समावेश होता. त्यामध्ये ३५ मुले व २३ मुली होत्या. सर्वाधिक ४० छात्रसैनिक हे लष्कर शाखेतील होते.

(बातमी - महाराष्ट्र टाइम्स)

.. .. .. .. .. .. .

सात महिने शिक्षणकार्य अव्याहत

करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील शाळा पुन्हा सुरू होण्यात अनेक अडचणी येत असताना साताऱ्यातील विजयनगरच्या जिल्हा परिषद शाळेत गेल्या सात महिन्यांपासून शिक्षणकार्य अव्याहतपणे सुरू आहे. या एकशिक्षकी शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांनी झाडाखाली, व्हरांड्यात, शाळेच्या आवारात असे शक्य त्या सर्व ठिकाणी ३८ विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले असून, क्रमिक शिक्षणाला कौशल्य विकासाचीही जोड दिली आहे.  विजयनगरच्या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. शाळेतील विद्यार्थी प्रामुख्याने गरीब कुटुंबातील असल्याने ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाऊ शकतात याचा विचार करून शिक्षक बालाजी जाधव यांनी प्रत्यक्ष शिकवण्याला प्राधान्य दिले. राज्यातील शाळा अधिकृतरीत्या १ डिसेंबरला सुरू झालेल्या असल्या तरी जाधव यांनी त्याआधीच वर्ग सुरू केले. बालाजी जाधव हे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त आहेत. त्यांनी प्रशासनाच्या आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे, विजयनगरची शाळा सुरू झाल्याचे कळल्यानंतर जवळपासच्या गावातील काही विद्यार्थ्यांनीही या शाळेत प्रवेश घेतला. त्यातील अकरा विद्यार्थी खासगी शाळांतून या शाळेत आले आहेत. जाधव यांची २०१७ मध्ये शाळेत नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी देणग्यांच्या माध्यमातून एलसीडी प्रोजेक्टरसारखी इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध केली. निधीअभावी वीजदेयक भरण्यात अडचणी असल्याने त्यांनी शेजाऱ्यांना विनंती करून स्वत:च्या खिशातून पैसे देऊन वीज जोडणी घेतली आहे. शाळा सुरू करण्याबाब जाधव म्हणाले, की मार्च २०२०मध्ये शाळा बंद झाल्यावर पहिल्या टाळेबंदीच्या काळात करोना विषाणूबाबत  काहीच माहीत नव्हते. एक करोनाबाधित आढळल्यानंतर लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कॉन्फरन्स कॉलसारख्या माध्यमांचा वापर केला. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थी एकाग्रतेने शिकत नसल्याचे पालकांचे म्हणणे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यास, एक-दोन विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना शिकवणे सुरू केले. त्यासाठी प्रशासनाकडून तोंडी आदेश आणि पालकांची लेखी परवानगी घेतली, असे जाधव यांनी सांगितले. नियमित वर्गांसह विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी जाधव यांनी बहुकौशल्य विकसन कार्यक्रम सुरू केला आहे. केवळ दोन खोल्यांच्या शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी कल्पक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात विद्यार्थ्यांना टॅब्लेटवर पियानोवादन, साबण तयार करणे, तिरंदाजी, वारली चित्रकला, घड्याळ निर्मिती असे उपक्रम केले जातात. त्यामुळे सात-आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती होण्यास मदत झाली आहे, असे जाधव यांनी सांगितले. अधिकृतरीत्या शाळा सुरू करता येत नसतानाच्या काळात करोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या किंवा रुग्ण नसलेल्या भागात प्रशासनाने अनौपचारिकरीत्या वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे मैदानात, झाडाखाली विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहिले, असे विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त यांनी सांगितले.

(बातमी - लोकसत्ता)

... ... ... ... ... ... .

कोल्‍हापूर : पाण्यासाठीची

पायपीट थांबली

विजेची अडचण, दळणवळणाचा अभाव असलेल्या जिल्‍ह्यातील १२३ वाड्या वस्‍त्यांना सोलरवरील पाणी योजनांनी तारले आहे. १० वर्षांत यांत्रिकी विभागाने दुर्गम डोंगर, वाड्या, वस्‍त्यावरील शेकडो कुटुंबांना या पाणी योजनांच्या  माध्यमातून जगण्याचा मोठा आधार देण्याचे काम केले आहे. सोलर योजनांमुळे डोंगरातील माता भगिनीची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे. सर्वात महत्त्‍वाचे म्‍हणजे सोलर पाणी योजना असल्याने ग्रामस्‍थांना पाण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही. दहा वर्षांपूर्वी तयार केलेल्या योजना आजही गावासाठी तारणहार म्‍हणून काम करत आहेत. १० वर्षांपूर्वी शासनाने सौर पंपावर आधारित दुहेरी लघु नळ पाणीपुरवठा योजना घेण्याच्या सूचना दिल्या. या योजनेत अशा वाड्या, वस्‍त्यांची निवड केली, ज्या ठिकाणी विजेची व्यवस्‍था नाही, वीज असली तर सातत्याने वीज खंडित असते, पाणी योजना राबवण्यास तांत्रिक कारणास्‍तव विजेचा उपयोग करणे शक्य नाही, अशा वाड्या, वस्‍त्यांचा सर्व्हे केला. या सर्व्हेच्या आधारे दरवर्षी आठ ते दहा वाड्यांना सोलरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या गावांत हातपंपालाच सोलर पंपाची जोड दिली. हे पाणी उपसून ५ हजार लिटर क्षमतेच्या टाकीत टाकण्यात येते. दिवसातून किमान दोन वेळा ही टाकी भरण्याची व्यवस्‍था केली आहे. गावातील सार्वजनिक नळ बंद करून थेट घरोघरी नळ दिले आहेत. या पाणी योजनांसाठी किमान खर्च ७ लाख रुपये करण्यात येतो. सकाळी उन्‍हात आपोआप सोलरचे पंप सुरू होतात. पाण्याची टाकी भरली की हे पंप आपोआप बंद होतात. शासकीय बोअरवेल २०० फुटांपर्यंत खोल करण्यात येते. मात्र त्यातील पंप हा १२० फुटांपर्यंतच सोडण्यात येतो. उन्‍हाळ्यात १२० फुटांपेक्षा पाणी खोल गेले तर पंप काम करत नाही. लोकांना डोक्यावरून इतर स्‍त्रोतामधून पाणी आणावे लागते. मात्र सोलर योजनेतील पंप हा बोअरवेलमध्ये १९० फुटांपर्यंत खोल जातो. त्यामुळे उन्‍हाळ्यात पाणी जरी १२० फुटापेक्षा खाली गेले तरी या सोलर पंपाने खोल पाण्याचाही उपसा करता येतो. ज्या ठिकाणी हे सोलार पंप बसवले आहेत. तेथील टंचाई व पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे.

दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍‍न सोडवणे हे जिल्‍हा प्रशासन व पाणीपुरवठा विभागासमोर मोठे आव्‍हान होते. विविध पर्याय करूनही टंचाई दूर होत नव्‍हती. मात्र मागील दहा वर्षांत सोलार पाणी योजनांमुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. अत्यंत कमी खर्चात योजनेची उभारणी व देखभाल दुरुस्‍तीचा शून्य रुपये खर्च, यामुळेच ही योजना खूप उपयुक्‍त ठरत आहे., असे - अमित ओतारी, उपअभियंता यांत्रिकी विभाग यांनी सांगितले.

(बातमी - सकाळ)

.. .. .. ..

औरंगाबादमधील उद्योगाला

दुबईचा पुरस्कार

ग्रामीण भागातील ८०० महिला आणि सुमारे १२ हजार शेतकऱ्यांच्या आयुष्यात सौर वाळवण यंत्राच्या साहाय्याने मोठे आर्थिक बदल घडवून आणणाऱ्या ‘एस फॉर एस’ म्हणजे सायन्स फॉर सोल्युशन या लघुउद्योग कंपनीला संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मोहम्मद बीन राशिद यांच्या वतीने दिला जाणारा ‘झायेद सस्टेनॅब्लिटी’ हा पुरस्कार मिळाला आहे. जगभरातील ८६ संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यात औरंगाबाद येथे अन्न प्रक्रिया उद्योगात प्रामुख्याने काम करणाऱ्या लघु उद्योग कंपनीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सहा लाख अमेरिकी डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सौर ऊर्जेवर वाळवण यंत्र तयार करणाऱ्या युवकांनी या क्षेत्रात केलेल्या कामाची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘लोकसत्ता’मध्ये ‘बंदा रुपया’ या सदरात या कंपनीच्या कार्यशैलीचा आढावा मांडण्यात आला होता. आरोग्याच्या क्षेत्रातील पारितोषिक अर्जेंटिना, ऊर्जा क्षेत्रातील पुरस्कार बांगलादेश तर अन्न प्रक्रिया क्षेत्रातील पुरस्कारासाठी एस फॉर एस या लघुउद्योग कंपनीची निवड करण्यात आली. भारतात विविध ठिकाणी काम करणाऱ्या एस फॉर एस या लघु उद्योग कंपनीकडून औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यात अन्न प्रक्रिया क्षेत्रातील काम उभे करण्यात आले आहे. सौर वाळवण यंत्र ( सोलार ड्रायर यंत्र) विकसित करून त्याचे प्रयोग ग्रामीण भागात करण्यात आले. या कंपनीचे अश्विन पावडे म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांमध्ये पोषणमूल्य वाढविण्याचे काम करतानाच त्यांना उद्योजक बनविण्याचे काम समोर आहे. हा पुरस्कार मिळविताना केलेल्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली, त्याचा आनंद आहे. या कंपनीमुळे ग्रामीण भागात रोजगारही वाढला असून विशेषत: महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. या कंपनीच्या उत्पादनामुळे २२ हजार टन कृषी उत्पादने वाया जाण्यापासून वाचतात, असा दावा कंपनीकडून केला जात आहे. गाजर, भेंडी, कांदा, लसूण तसेच अन्य कृषी उत्पादनांचे छोटे काप करून या यंत्राव्दारे वाळविले जातात. या यंत्रामुळे अन्नातील पोषक द्रव्ये जशास तशी राहतात. त्यामुळे वाळवलेले पदार्थ तयार करणे, त्याचे श्रेणीनिहाय वर्गीकरण करणे आदी कामे औरंगाबादसह राज्यात तसेच अन्यत्रही अनेक ठिकाणी केले जातात.

(बातमी - लोकसत्ता)

.. .................

मराठी उद्योजकांनी साकारले

'विक्रांत'चे अंतरंग

मुंबई : पहिल्या भारतीय बनावटीच्या व आता सागरी चाचणी सुरू असलेल्या आगामी 'विक्रांत' या विमानवाहू युद्धनौकेवर अद्ययावत स्वयंपाकघर व लाँन्ड्री संकुलाबरोबरच तब्बल ४२ कक्षांचे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे परिपूर्ण रुग्णालय उभे करण्याची कामगिरी महाराष्ट्रातील मराठी उद्योजक पितापुत्रांनी केली आहे. भारतात बांधण्यात आलेल्या या ४० हजार टनांच्या आजवरच्या सर्वात मोठ्या युद्धनौकेवर १६०० नौसैनिकांची निवासव्यवस्था असून त्यातील अंतर्गत रचनांची सुमारे ८० ते ९० कोटी रुपयांची विविध कामे आदित्य, अमेय व प्रकाश बेहेरे यांच्या 'सुषमा मरीन' या कंपनीने केली आहेत व त्याद्वारे परकीय चलनही वाचवले आहे. आदित्य, अमेय व त्यांचे वडील प्रकाश बेहेरे यांच्या 'सुषमा इलेक्ट्रिकल्स समूहा'ने सन २००६ पासून भारतीय नौदल व भारतीय तटरक्षक दलाच्या युद्धनौका, गस्तीनौकांसाठी अंतर्गत रचना व सुविधा उभारणीची कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण केली आहेत. त्यापैकी आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवरील प्रकल्प मानाचा तुरा ठरला आहेत. व्हीजेटीआयमधून मेकॅनिकल इंजिनीअर झालेले प्रकाश बेहेरे यांनी १९७७मध्ये घाटकोपरच्या एका गाळ्यात हिटर उत्पादनांची निर्मिती सुरू केली. नौदलाच्या युद्धनौकांमधील स्वयंपाकखान्यात ज्वलनशील प्रक्रिया चालत नसल्याने गॅसऐवजी हिटर उत्पादनांची गरज भासते. त्यामुळे ही कामे बेहेरे यांच्या सुषमा कंपनीकडे आली. त्याचा पुढे विस्तार होत गेला व टेक्सासमध्ये इंजिनिअरिंगमधील उच्च शिक्षण घेऊन भारतात परतलेला त्यांचा पुत्र आदित्य हाही २००८ पासून पूर्णपणे या उद्योगाशी जोडला गेला. तर जर्मनीतून एमबीए व युरोपियन तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन परतलेला अमेयही उद्योगात सहभागी झाला. २००५ पासून त्यांच्या कंपनीने भारतीय नौदलाच्या युद्धनौकांमधील अंतर्गत कक्षांची रचना व त्यातील सुविधांची निर्मिती करण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. आयएनएस शिवालिकच्या निर्मितीपासून नौदलाने अंतर्गत कक्षांच्या निर्मितीचे काम बाहेरून करून घेणे सुरू केले. 'आयएनएस विक्रान्त या विमानवाहू युद्धनौकेत ४२ कक्षांचे परिपूर्ण रुग्णालय तयार करण्याचे आव्हानात्मक काम सुषमा मरीनला मिळाले. त्यातील सिटी स्कॅनची सुविधा तयार करणे हे सर्वात जिकिरीचे होते. कारण त्यातून उत्सर्जित होणारे किरणोत्सारी पदार्थ अन्य कुठेही जाता कामा नयेत. बाहेरच्या जगात त्यासाठी विटांची भिंत असते. येथे ते शक्य नव्हते. तेव्हा शिशाचे दोन मिमीचे प्रतिरोधक आवरण भिंतींवर घालण्याची क्लृप्ती वापरण्यात आली. या वैद्यकीय संकुलात पूर्णस्वरूपी शल्यक्रिया कक्ष आणि दंतउपचार केंद्रही तयार करण्यात आले आहे', असे आदित्य यांनी सांगितले. विमानवाहू युद्धनौकेवरील स्वयंपाकखान्यात झटपट पदार्थ तयार करण्यासाठी अनेक यंत्रांचा वापर करण्यात आला आहे. त्यात पोळ्या करण्याच्या तसेच इडली व डोसा तयार करण्याच्या यंत्रांचाही समावेश आहे. बेहेरे यांच्या कंपनीचे मुख्यालय माहीमला असून खोपोली येथे कारखाना आहे तसेच इतर अनेक युद्धनौकांवरही त्यांचे कामगार कार्यरत असतात. सध्या सुमारे ४०० जण त्यांच्याकडे काम करतात. अमेरिकेत असताना आदित्यला मज्जारज्जूच्या आजाराने ग्रासले. परंतु या कुटुंबाने घेतला वसा सोडला नाही. चाकांच्या खुर्चीवरून आदित्यही पुन्हा उद्योगात रुजू झाला. आपल्या नौसैनिकांना घरापासून दूर गेल्यावरही अगदी घरच्यासारखेच वाटावे, ही संकल्पना प्रत्येक कक्षनिर्मितीत केंद्रस्थानी असते, असे बेहेरे कुटुंबीयांनी सांगितले.

(बातमी - समीर कर्वे, महाराष्ट्र टाइम्स)

 

...............................................

नाडी परीक्षण उपकरणाला ‘स्टार्टअप अ‍ॅवॉर्ड’;

डॉ. अनिरुद्ध जोशींचा गौरव

पुणे : भारतीय औद्योगिक विश्वात नाविन्यपूर्ण संशोधन करणार्‍या तरुण संशोधकांसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेलं ‘स्टार्ट-अप इंडिया अवॉर्ड’  पुण्यातील नाडी तरंगिणीचे निर्माते डॉ. अनिरुद्ध जोशी ) यांना जाहीर झाला आहे. त्यासाठी भारतातून 2,177 अर्ज आले होते. त्यातील 46 जणांना हा सन्मान जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2016 मध्ये ही योजना सुरू केली. त्यामध्ये कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात-निर्यात अशा एकूण आठ क्षेत्रांचा समावेश आहे. एकविसाव्या शतकात देशाचे सामर्थ्य वाढविणार्‍या आणि जगभर उपयोगी पडू शकणार्‍या तरुणांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. त्यात प्रामुख्यांने तरुणांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला जातो. सन 2020 पासून आघाडीच्या संशोधकांना व उद्योजकांना वार्षिक हा अॅवॉर्ड सुरू करण्यात आला, याचं हे दुसरं वर्ष आहे. केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्रालयाकडून हा अॅवॉर्ड जाहीर केला जातो. कोरोना महामारीमुळं सर्व अॅवॉर्डप्राप्त संशोधकांना दिल्लीत न बोलावता शनिवारी दिल्लीत हे प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आले. डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या नाडी तरंगिणीचे वैशिष्ट्य असे की, भारतातील प्राचीन आयुर्वेदातील मनगटावरील नाडी तपासून शरिरातील रोगाचे निदान करणे व उपाय सुचवणे हे काम त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने संगणकावर तसेच मोबाईलवरही बसवले. त्यांचे ‘स्टार्टअप इंडिया’ सन्मान मिळालेले ‘तुरीय’ नावाच्या उपकरणाद्वारे स्वत:च्या प्रकृतीबाबत रोजच्या रोज चना मिळतात. डॉ. जोशींनी तयार केलेली ही उपकरणं सध्या बारा देशात वापरली जात आहेत. तसेच याच्या आधारे एक लाख लोकांची शरीर व आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांच्याकडे संकलित स्वरुपात उपलब्ध आहे.

(बातमी - सकाळ)

...........................................

शेतकऱ्यांनी वाचविले सोयाबीन

बियाण्यांचे 900 कोटी!

नाशिक : खरीप हंगाम सुरू झाला, की सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीच्या तक्रारींचा पाऊस पडायचा. त्यावर उपाय म्हणून कृषी विभागाने बीजोत्पादनाचा कार्यक्रम राज्यातील शेतकऱ्यांकडून राबवून घेतला. त्याचा परिणाम असा झाला, की गेल्या वर्षीच्या खरिपामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः बियाण्याचे उत्पादन केल्याने त्यांचे ९०० कोटी वाचले आहेत. एवढेच नव्हे, तर बियाण्याच्या उगवणीची एकही तक्रार कृषी विभागापर्यंत पोचली नाही. राज्यात २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र ४६ लाख १७ हजार हेक्टरपर्यंत पोचले. एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र ३१.६ टक्के राहिले. २०२० च्या खरिपात सोयाबीनचे पुरेसे बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध नव्हते. परिणामी, बाजारातून बियाणे विकत घ्यावे लागले. मात्र, बाजारातून विकत घेतलेल्या बियाण्याची उगवण क्षमता नसल्याच्या एक लाख २० हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागापर्यंत पोचल्या होत्या. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसह बियाण्यापोटी कृषी विभागाला १५ ते १८ कोटी रुपये द्यावे लागले होते. ही समस्या दूर करण्यासाठी कृषी आयुक्तालयातर्फे शेतकऱ्यांकडून बीजोत्पादन करून घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला सोमवार आणि गुरुवार हा दिवस संवाद, मार्गदर्शनासाठी निश्‍चित केला होता. परिणामी, ३४ लाखांपैकी २४ लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी उत्पादित केले. बियाण्याच्या उत्पादनाच्या जोडीला लागवडीत अंतर किती ठेवायचे, खत कसे द्यायचे, काढणी, साठवणुकीपासून उगवण क्षमता तपासणीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात आली. या सगळ्या प्रयत्नांमुळे हेक्टरी ८ ते १० क्विंटलवरून सरासरी उत्पादन १२ ते १४ क्विंटलपर्यंत पोचल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. एवढेच नव्हे, तर सोयाबीनला मिळणाऱ्या भावामुळे पुढील खरीप हंगामात राज्यातील सोयाबीनखालील क्षेत्र ५० लाख हेक्टरपर्यंत पोचण्याची शक्यता कृषी विभागाला वाटत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात हेक्टरी सोयाबीनचे उत्पादन २५ क्विंटलपर्यंत घेतले जाते. मात्र, नांदेडच्या कृषी सहाय्यकाच्या प्रयत्नातून हेक्टरी ५० क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले गेले. त्यासाठी सरी-वरंब्याचा वापर करण्यात आला. उत्पादनवाढीचे हे तंत्र आता राज्यातील सर्वदूर शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागातर्फे पोचविण्यात येणार आहे. तिफण, ट्रॅक्टर, यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन बियाण्याची पेरणी करण्याऐवजी सरी-वरंबा पद्धतीत बियाणे टोचून सरींमध्ये पाणी सोडण्याचे तंत्र शेतकऱ्यांना सांगितले जाणार असल्याची माहिती दक्षता विभागाचे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्यावर स्वतः उपाय शोधला असला, तरीही शेजारच्या मध्य प्रदेशात बियाण्यांच्या उपलब्धतेअभावी सोयाबीनऐवजी इतर पिकांकडे शेतकऱ्यांनी जावे, असे सांगितले गेले होते.

(बातमी - सकाळ)

............................................................

आर्ट रिस्टोरेशन व कंझरर्वेशन प्रयोगशाळा

नागपूर :  थोर कलावंतांनी रेखाटलेल्या दोन हजार चित्रांचा संग्रह करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत  मिलिंद लिंबेकर हे चित्रकार जुन्या पिढीतील नाट्य कलावंत, संगीतकार वसंतराव लिंबेकर आणि गायिका, अभिनेत्री वनिता लिंबेकर या कलावंत दांपत्याच्या पोटी जन्माला आलेले मिलिंद यांची नाळ कलेशी जोडली नसती गेल्यास नवलच. मिलिंद यांना लहानपणा पासूनच हुबेहुब पानांवर उतरणाऱ्या चित्रकारांच्या चित्रांविषयी कुतूहल होते. याच आकर्षणापोटी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व १९९४ साली या विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, मास्टर ऑफ फाइन आर्ट (नागपूर) आणि १९९७ साली बडोद्याहून आर्ट क्रिटीसिजन या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या आईने कर्ज काढून त्यांना शिकविले. बडोद्यामध्ये चित्रकार अन् कलेचा मोठा सहवास लाभल्याने त्यांचे मन नागपूरमध्ये रमत नव्हते. त्यामुळे, त्यांच वर्षी त्यांनी मद्रास येथील ‘चोलामंडल आर्टिस्ट व्हिलेज’ गाठायचे ठरविले आणि तोच त्यांचा टर्निंग पॉइंट ठरला. या ठिकाणी वास्तव्यास असताना त्यांनी अनेक चित्रे काढली , ती उत्तम किमतीत विकली गेली. याच ठिकाणी त्यांना हॉलिवूडच्या चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. काही चित्रपटांसाठी काम केल्यानंतर आपली मुळ, चित्रकले विषयी दुर्लक्ष झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी चित्रकलेवरच पूर्णवेळ लक्ष ठेवायचे असा निर्णय घेतला. काही काळ मुंबईत असताना त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सदानंद बाकरे यांचा सहवास लाभला. २००५ साली त्यांनी मुंबई सोडली आणि नागपूरला स्थलांतर केले. कला संग्रह वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी नामवंत चित्रकार हुसेन, सुझा, रझा, जेमिनी, रॉय, सोमनाथ होर अशा दिग्गज पाचशे चित्रकारांची चित्रे त्यांनी संग्रहित केली. याचे जतन व्हावे या उद्देशाने प्रतापनगर मधल्या टेलिकॉम कॉलनी येथील पारस पॅराडाईज इमारतीमध्ये आर्ट रिस्टोरेशन व कंझरर्वेशन प्रयोगशाळा सुरु केली. शिवाय, ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्यासह सर्जना निर्माण या उपक्रमातून जगविख्यात चित्रकारांसह त्यांच्या चित्रकारांना उलगडत आहेत. यामुळे, चित्रकलेचे जतन होत असून नव्या चित्रकारांना रोजगार देखील उपलब्ध होतो आहे. यामध्ये, चित्रकला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी दीपाली यांची त्यांना मोलाची साथ मिळाली आहे. कला विषयात शिक्षण घेणारे अनेक कलावंत जिल्ह्याच्या ग्रामीण  भागातून येतात. कला साहित्य भेट देत त्यांना अनेक जण मदत करतात. मात्र, वैद्यकीय मदतीची गरज पडल्यास त्यांना आर्थिक फटका बसतो. अशा कलावंतांना ‘कलाश्रय’ उपक्रमाच्या माध्यमातून ते वैद्यकीय मदत पुरवीत आहेत .

(बातमी - सकाळ)

...............................................

समुद्राची भरती, ओहोटी

आपल्याला देणार वीज

समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीचा अभ्यास करून १६ वर्षीय हर्ष कुंजन चौधरी या मुलाने वीजनिर्मितीचे यंत्र बनविले आहे. या यंत्राची चाचणी त्याने बोर्डी येथील समुद्रात केली आहे. या यंत्राचा आधार घेऊन समुद्रात मोठा वीज प्रकल्प उभारणे शक्य असल्याचा दावाही त्याने केला आहे. विरार पश्चिमेकडील हर्ष याने वीजनिर्मिती प्रकल्प साकारला आहे. सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंत महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्राला येणाऱ्या भरती व ओहोटीच्या पाण्याचा उपयोग करून वीजनिर्मिती यंत्र चालवण्याचा हर्ष याचा मानस आहे. वीज निर्मितीचे लहान यंत्र तयार करून, त्याने अलीकडेच त्याची चाचणी बोडर्डी येथील समुद्रात घेतली. ही चाचणी यशस्वी झाली असून यातून वीजनिर्मिती झाल्याचा दावा हर्षने केला आहे. या यंत्राचा आधार घेऊन सरकारच्या माध्यमातून समुद्रामध्ये मोठा प्रकल्प उभा करता येऊ शकतो. या प्रकल्पामुळे मच्छिमारीवर परिणाम होणार नसल्याचा दावा हर्ष याने केला आहे. विरारच्या नॅशनल हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या हर्षला लहानपणापासूनच काहीतरी आपण वेगळे करावे असे वाटत होते. आई-वडिलाची साथ मात्र आर्थिक पाठबळ फारसे नसल्यामुळे अगदी भंगारातील वस्तूंचा वापर करून त्याने नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला. त्याची दखल 'नासा'नेही घेतली होती. अंडरवॉटर रोबोटिक स्पर्धेसाठी हर्षची नासाकडून निवड करण्यात आली होती. मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे झालेल्या राष्ट्रीय नवप्रवर्तन उत्सव आणि मेगा प्रदर्शन २०२० मध्ये भारतातून निवडलेल्या आणि निवडक ९५० प्रकल्पापैकी २७ प्रकल्पाच्या यादीमध्ये हर्षच्या प्रकल्पाची निवड झाली होती. कोरोनाच्या काळात सामाजिक दुरीकरण यत्राची निर्मितीही त्याने केली होती. घडयाळाच्या आकाराचे हे यंत्र आपण हस्तादोलन करताना आणि चेहयाला स्पर्श करताना आपल्याला व्हायब्रेशन करून इशारा देते. अशा नवनवीन प्रयोगासह त्याने आता समुद्राच्या पाण्यापासून वीजनिर्मितीचे यंत्र तयार केले आहे. विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्याच्यापासून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने महापौर किशोरी पेडणेकर यानी हर्षचा भेटवस्तू देऊन महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात मंगळवारी सहकुटुब सत्कार केला.

(बातमी - लोकमत)

...........................................................

बिगारी कामगार

ते जरबेरा फुलांचा व्यापारी

पायात चप्पल नाही, अंगावर फाटलेले कपडे, घरात एक वेळच्या जेवणाची भ्रांत, घरची परिस्थिती बेताची, सुटीच्या दिवशी बिगारी काम करून घराला आर्थिक आधार देण्याचा सुरू असलेला छोटासा प्रयत्न; तर दुसरीकडे शाळेचा अभ्यास, असं सुरू असताना एक दिवस अचानक वडिलांचा अपघात होतो. अनेक प्रयत्न करूनही वडिलांचे प्राण वाचवता न आल्याची खल मनावर परिणाम करू गेली. कधी तरी चांगले दिवस येतील, ही आशा सत्यात उतरवण्यासाठी त्याच्या वडिलांच्या जळत्या चितेच्या आगीने त्याला स्वस्थ बसू दिले नाही. त्यामुळेच तो बिगारी ते एक यशस्वी फुलांचा व्यापारी होऊ शकला. ही कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी असली, तरी ती सत्य असून, एका दिवसात उभी राहिलेली नसून त्याला अथक परिश्रमांची जोड असल्याने वकील होण्याचे स्वप्न असूनही परिस्थितीने व्यापारी बनवले, असे पुण्यातील तरुण सुनील गोयकर सांगतो. वडील हमाली काम करीत होते, त्यांचा अपघाती मृत्यू झाला. एकच आधार होता, तोही काळाने हिरावून नेला. आईने घरची जबाबदारी सांभाळली, असे सुनील सांगतो.

वडिलांच्या उपचारासाठी पैसे उसनवारीने घेतले होते. ते फेडण्यासाठी काम करणे हाच उपाय होता. एका कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करू लागलो. त्यात खर्च भागविणे कठीण होऊ लागल्याने एका मित्राच्या सल्ल्याने रस्त्यावर थांबून फुले विकू लागलो. प्रामाणिकपणे काम करणे आणि आयुष्यात कधीच व्यसन न करणे या वडिलांच्या सूत्रानुसार काम करत आहे. त्यामुळे अनेक अडथळे येऊनही पुढे जाता येणे शक्य होते. एक दिवस मार्केट यार्डमध्ये फुले विकत घेताना मार्केटमध्येही फुले विकण्यासाठी जागा मिळू शकते, याची माहिती मिळाली, त्यानुसार मार्केटमध्ये फुले विकू लागलो. मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांचे विक्रेते आणि व्यापारी मोठ्या संख्येने आहेत, अशी माहिती अभ्यास केल्यामुळे मिळाली. जर या व्यवसायात टिकायचे असेल, तर ज्याला मागणी अधिक आहे आणि विक्रेते कमी आहेत, अशा फुलांचा व्यवसाय करावा असा विचार केला. तेव्हापासून ज्या फुलाचे नाव माहिती नव्हते. त्या जरबेरा फुलांची विक्री सुरू केली. शेतकऱ्यांशी असलेले चांगले संबंध आणि त्‍यांनी ठेवलेला विश्‍वासामुळे देशभरात फुलांचा व्यापार करता येत आहे, असे सुनील सांगतो. ‘‘रिकामा हंडा राहण्यापेक्षा भरलेला हंडा बना, असे शिक्षक सांगत असत. त्यावाटेवर जीवनाचा प्रवास सुरू आहे. विठ्ठल चंद्रभान गोयकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करत आहे. वडिलांचे शरीर सोडून गेले आहे, मात्र त्यांचे संस्कार जिवंत आहेत. कितीही दुःख, गरीबी असली आणि त्यात अपयश आले, तरी इच्छा शक्तीमुळे यशस्वी होता येते.’’ असे सुनील सांगतो.

(बातमी - सकाळ)

.............................................................
मध्य रेल्वेच्या रूळांशेजारी
खुलणार फुलांची बाग
 
मध्य रेल्वेच्या रुळांशेजारी नेहमी कचऱ्याचा ढीग, घाण, सांडपाणी दिसून येते. त्यामुळे रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना या दुर्गंधीला सामोरे जावे लागते; परंतु मध्य रेल्वेने रुळाशेजारी रिकाम्या जागेत फुलांची शेती करून बागा फुलविण्याची योजना आखली आहे. त्यामुळे रेल्वे परिसर स्वच्छ, निटनेटका आणि सुगंधित करण्याचे नियोजन आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या एकूण ११३ ठिकाणी सुमारे १५० एकर जमिनीवर फुलझाडे लावण्याची निविदा काढली आहे. या निविदामध्ये १४ कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. मध्य रेल्वेच्या अनेक जागा ओसाड पडून आहेत. त्यावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाचे वारंवार वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात. पूर्वी रेल्वे रुळांशेजारी रेल्वे कर्मचाऱ्यांद्वारे भाजीपाला पिकविला जात होता. त्यामुळे रेल्वेच्या जागेचे संरक्षण होत असे. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा रेल्वे रुळांशेजारील जागेत करता आला नाही. त्यामुळे त्यांनी सांडपाण्याचा वापर करून भाजीपाला पिकविला. परिणामी, मानवी आरोग्यास हानीकारक असलेला भाजीपाला पिकविला जात असल्याने रेल्वेने ही योजना बंद केली. आता भाजीपाल्याऐवजी फुलझाडे लावण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे. मध्य रेल्वेने फुलशेती करण्यासाठी निविदा काढली. यात १४ फुलशेती करणाऱ्या खासगी कंपन्यांनी रुची दाखविली आहे. फुलशेतीमध्ये गुलाब, झेंडू यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, या कंपन्यांना फुलशेतीसह औषधी वनस्पतींच्या लागवडीबाबत परवानगी हवी आहे. कोरफडीपासून अनेक उत्पादने होत असल्याने कोरफडीसारख्या औषधी वनस्पतीला बाजारात खूप मागणी आहे. मुंब्रा ते कळवा दरम्यानच्या १२ एकर परिसरात फुलशेती केली जाणार आहे. यासह कल्याण ते ठाकुर्ली आणि कल्याण यार्ड ते ठाकुर्ली पॉवर हाऊसमध्ये १० एकरात, ठाणे ते मुलुंड दोन एकरात, मुलुंड ते नाहूर दीड एकर, विक्रोळी ते घाटकोपर दोन एकर, दादर ते परळ दीड एकरात फुलशेती केली जाणार आहे. यासह ऐरोली- घणसोली, मानखुर्द-वाशी, ठाणे-तुर्भे, जीटीबी नगर, टिळकनगर, कुर्ला कारशेड, शीव-कुर्ला, कुर्ला-घाटकोपर, शहाड-कल्याण, बदलापूर-अंबरनाथ, वडाळा, एलटीटी, दिवा-डोंबिवली, नेरूळ-सीवूड्स या भागात फुलशेती केल्याने प्लॅस्टिक कचरा, घाण, दुर्गंधी दूर होणार आहे.
 
(बातमी - सकाळ)
...................................................................................
 
विद्यार्थ्यांनी गिरवले शेतीचे धडे
अन् फुलवली भाज्यांची बाग
 
विक्रमगड : मुलांना सेंद्रिय शेतीतून (Organic farming) फळभाज्या व पालेभाज्या यांचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने व शिक्षकांच्यामार्गदर्शनातून जि. प. शाळा गुरवपाडा  (सवादे) येथे गेल्या तीन वर्षांपासून किचन गार्डन शेती  केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून शाळेत सुहृद् फाउंडेशन ही समाजसेवी संस्था मुलांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करतात. तपासणी केल्यानंतर मुलांमध्ये प्रोटीन व अनेक जीवनसत्वाचा कमतरता जाणवली त्यामुळे शाळेत किचन गार्डन तयार केले. या किचन गार्डन मध्ये खोदकाम, वापे करणे, भाज्यांची लागवड करणे, भाज्यांना पाणी देणे, सेंद्रिय खते देणे, तण काढणे व भाज्यांना काठीचा आधार देणे यासारखी कामे मुले स्वतः शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान घेत भाज्या पिकवतात.शाळेतील किचन गार्डन मध्ये मेथी, पालक, आंबाडी, कोथिंबीर व मुळा या सारख्या पालेभाज्या आणि टोमॅटो, वांगी, मिरची व कांदा यासारख्या फळभाज्या लागवड केले आहे. याचा वापर शालेय पोषण आहारात केला जातो. सध्या कोरोना विषाणूमुळे पोषण आहार शाळेत शिजवला जात नाही त्यामुळे आम्ही मुलांना भाज्या कच्च्या खाण्यास देत आहोत. सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवल्याने त्या भाज्या चविष्ट असतात व त्यातून आरोग्याची हानी पण होत नाही. त्यामुळे मुलांचे आरोग्य निरोगी राहते, मुले आवडीने आहार खातात. मुलांना सेंद्रिय शेती कशी करायची याचे ज्ञान होते, भाज्यांची लागवड कधी व कशी करायचे याचे पण ज्ञान लहान वयातच होत आहे. पालकांकडे मुबलक शेती व पाणी असून पण भाज्या लागवडीचे ज्ञान नसल्याने स्वतःच्या शेतात न करता बोटीत, वित्तभट्टीवर, रोजाने जायचे त्यामुळे अनेक कुटुंबाचे स्थलांतर व्हायचे. कुटुंबाचे स्थलांतर झाले का शाळेतील मुलांचे पण स्थलांतर होत होते. शाळेतील पालक मिटींगला सतत किचन गार्डन शेतीची माहिती दिल्याने व सतत शेतीत कोणत्या भाज्या लावल्या पाहिजे व कोणते सेंद्रिय खते वापरले पाहिजे याची माहिती सांगितल्याने आज याचाच फायदा असा झाला की पालकांनी मुलांच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनांनी आज 14 पालकांनी स्वतःच्या शेतात भाज्या लावल्या आहेत. त्याचा वापर घरी खाण्यासाठी व मार्केट मध्ये विकण्यासाठी केला जातो. त्यांना त्यातून पैसे मिळाल्याने पालकांचे स्थलांतर थांबले त्यामुळे मुलांचे पण स्थलांतर थांबले आहे. शाळेत वेगवेगळे उपक्रम राबिवले जात असल्याने विद्यार्थी 100% उपस्थित राहतात. किचन गार्डन शेती करताना सुह्रद फाउंडेशन, केंद्रप्रमुख शंकर हडबाळ, शाळेचे मुख्याध्यापक केशव भोये,शिक्षक सुरेश भांड व दशरथ धुमाळ यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले.
 
(बातमी - सकाळ)
...................................................
 
लोकसाहित्याचा समृद्ध वारसा
लोकसाहित्याचा व मौखिक परंपरेचा सशक्त वारसा जतन करणाऱ्या मंकाबाई यशवंत मुंडे यांनी निरक्षर असूनही केवळ छंदाच्या जोरावर हजारो ओव्या, गवळणी रचल्या आहेत. त्यांच्या ओव्या ऐकल्यावर मंकाबाई एकही वर्ग शाळा शिकल्या नाहीत किंवा मंकाबाई अशिक्षित आहेत, असे म्हणताना कुणाची जीभ धजावणार नाही. अगदी सोप्या, ओघवत्या भाषेत कुणावरही तत्काळ ओव्या गाणाऱ्या मंकाबाईंची प्रतिभा पाहून एखाद्या साहित्यिकालाही प्रश्न पडेल. अनेक मार्मिक उदाहरणांतून त्या अगदी सहजपणे उपदेश देतात. बालपणापासून कृषी संस्कृतीत, आध्यात्मिक वातावरणात वाढलेल्या मंकाबाईचा जन्म बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जोला गावी वडील भानुदास व आई काळूबाईच्या पोटी झाला. वडील विठ्ठलभक्त असल्याने बालपणीच मंकाबाईंना अभंग, ओव्यांचा छंद जडला. मंकाबाईंचा बालविवाह बीडमधील बालाघाट डोंगररांगेतील चिखलबीड गावच्या यशवंत मुंडेंशी १९५० च्या दशकात झाला. माहेरप्रमाणेच सासरची कुटुंबवत्सलता व धार्मिक वातावरणामुळे मंकाबाईंच्या ओव्या पुढे बहरत गेल्या. लग्नानंतर सासूसोबत पहाटे जात्यावर दळण दळताना त्या ओव्या गायच्या. यातूनच पुढे त्यांना विविध विषयांवर ग्रामीण भाषेत काव्य, ओव्या गायची सवय लागली.
 
"शीतल सावलीला पाखरं ग झाली गोळा,
देसाई, माझा बाबा, विसाव्याचा पानमळा..!
शीतल, गं, सावलीला पाखरं घेती झोप,
माय माझी गवळण, विसाव्याची नांदरुक"
 
अशा विविध प्रकारच्या ओव्या अगदी सहजपणे त्यांना सुचतात. त्यानंतर मुले मोठी होत गेली आणि मुलगा बाळासाहेब मुंडे यांची भंडारा जिल्ह्यात शिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्या मुलासोबत भंडारा येथे सहा  वर्षांपासून राहत आहेत. मात्र, गावाकडच्या आठवणी त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. त्यामुळे त्या गाव गोष्टी, सगेसोयरे यांचे प्रसंग ओव्यांतूनच सांगतात. परिसरातील नागरिक ओव्या ऐकून आश्चर्य व्यक्त करतात.  मंकाबाईंचे सहा मुलांचे कुटुंब आजही एकत्रच आहे. त्यांना सहा मुले, सुना, १९ नातवंडे असून आजह एकत्रच राहतात. एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्शच त्यांनी समाजासमोर मांडला आहे. थोरला मुलगा जालिंदरसह लक्ष्मण, सहदेव हे तिघे शेती करतात. वसंत हा साखर कारखान्यात पर्यवेक्षकपदी कार्यरत तर आदिनाथ बीड येथे प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. लहान मुलगा बाळासाहेब मुंडे हे भंडारा जिल्ह्या जिल्हा परिषद हायस्कूल वरठी येथे सहायक शिक्षकपदी कार्यरत आहेत.
(बातमी - लोकमत)
........................................................
 
बिर्याणी खाताय? ..
मग डब्बाही खा !
 
कोरोनाकाळात स्वीगी, झोमॅटोसारख्या अॅपचा वापर वाढला. पण, त्यातून पॅकेजिंग आणि त्यातून निर्माण होणारा घनकचरा ही समस्या वाढली. हे पाहून एकवीरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पार्सलसाठी खाण्यायोग्य डब्यांचा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या स्पर्धेत राज्य पातळीवर मुंबईतील १३ प्रकल्पांची निवड राज्य फेरीसाठी झाली आहे. त्यातीलच एक प्रकल्प आहे कांदिवली येथील चारकोपच्या एकवीरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा. 'खाण्यायोग्य पार्सल डब्बा' ही संकल्पना आर्यन सावंत आणि उत्कर्ष  गावंड या विद्यार्थ्यांना सुचली. पार्सलमुळे वाढणारा घनकचरा कमी करण्यासाठी त्याला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक उपाय सुचविणे या संकल्पनेवर विद्याथ्र्यांनी सर्वेक्षण करून पर्याय उपलब्ध केला. त्यानुसार ज्या डब्यात बिर्याणी वा इतर खाद्यपदार्थ भरल्यानंतर तो डवा तुटणार नाही, नरम होणार नाही व त्यातील तेल गळणार नाही यासाठी आम्ही शाळेतील शिक्षकांशी व काही गृहिणींशी चर्चा केली. इंटरनेटवरून काही माहिती मिळवली. त्यानंतर पालकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या धान्यांचे पीठ वापरून स्वतः प्रयोग केले आणि डब्बा बनविल्याची माहिती आर्यन सावंतने दिली. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, साबुदाणा आणि इतर अनेक प्रकारच्या पिठांच्या वापरापासून डब्या बनविता येणे शक्य होणार असून, यातून शून्य कचरा निर्माण होणार असल्याचे प्रकल्पातून निष्पन्न झाले आहे. बाजारातील अनेक स्वाद्यविक्रेत्यांना ही संकल्पना आवडली असून, अशा प्रकारच्या वस्तू बाजारात आल्यास ते त्यालाच पसंती देतील, असे मतही त्यांनी आवर्जून मांडले आहे. बिर्याणीसारखा पदार्थ यात पार्सल केल्यानंतर हा डबा  १ ते २ तास टिकणार असून, त्यापूर्वी तो ० ते १२ दिवस सुस्थितीत, त्याच चवीचा राहू शकणार असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक शिक्षिका विभा संख्ये यांनी दिली. सध्यस्थितीत केवळ सुक्या भाज्या किंवा  भातासारखे पदार्थ यातून पार्सल करता येणार असले तरी भविष्यात इतर पदार्थासाठीही त्याचा वापर होईल का यावर त्यांच्या  मुंबई प्रयोगशाळेत चाचण्या सुरू असल्याची माहितीही दिली.
(बातमी - लोकमत)

...............................................

`रंग कौशल्य कट्ट्या`वर

वाचनाचा गोडवा ...

सर्वांसाठी २४ तास खुले, कोणतीही सुरक्षा नाही आणि विशेष म्हणजे चोरीही होत नाही, इथे केवळ आणि केवळ वाचनाची भूक भागवली जाते. ठिकाण आहे मुलुंड पूर्व, खंडोबा मंदिर परिसरातील पदपथ. धावपळीच्या जीवनात व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राममध्ये सर्वसामान्य इतके व्यस्त झाले आहेत की त्यांनी वाचनाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी वाचनालये ओस पडली; परंतु वाचन संस्कृती जपून राहावी याकरिता मुलुंडमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या `रंग कौशल्य कट्टा`तर्फे अनोखे असे खुले ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. दिवस-रात्र सुरू असणाऱ्या वाचनालयाला वाचक वर्गाचा भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. मोबाईल नसल्याने प्रत्येकाला काहीतरी हरवल्यासारखे वाटते. पुस्तकांपेक्षा त्यांना मोबाईल महत्त्वाचा वाटतो; परंतु यामुळे लोप पावत चाललेली वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी कौशल्य कट्टाने पदपथावर खुले ग्रंथालय सुरू करण्यास पुढाकार घेतला. ग्रंथ, कादंबरी, शालेय पुस्तके, स्पर्धा परीक्षा पुस्तके, लहान मुलांसाठीची पुस्तके अशी सर्व प्रकारची शेकडो पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व पुस्तके संपूर्ण मुंबईतून दान स्वरूपात गोळा करण्यात आली आहेत. या खुल्या ग्रंथालयात कोणीही बसून किंवा पुस्तके घरी नेऊन ती वाचू शकणार आहे. गेल्या आठवड्यात या ग्रंथालयाचे उद्‌घाटन प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक अशोक यादव यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालयात एकूण १००० पेक्षा अधिक विज्ञान, आत्मचरित्र, लहान मुलांकरिता गोष्टीची पुस्तके आहेत. ही पुस्तके ज्येष्ठ नागरिक अभियंते सदानंद देसाई, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त जयवंत हारगुडे, पत्रकार दीपक खेडकर, उद्योजिका जयश्री भिसे व अन्य पुस्तकप्रेमींनी दान दिली आहेत. ग्रंथालय दिवस-रात्र खुले असते. सुरक्षा नसली तरी या वाचनालयातून एकही पुस्तक चोरीला जात नाही. पुस्तकप्रेमी येऊन हव्या त्या पुस्तकांचे वाचन करतो. तसेच काहीजण पुस्तकांची वहीत नोंद करून घरी वाचण्याकरिता घेऊन जातात. आम्ही ही संकल्पना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी मुंबईकरांना पुस्तके देण्याचे आवाहन केले आहे. अभियंते सदानंद देसाई व त्यांच्या पत्नीला वाचनाची आवड होती. त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ एकूण २०० पुस्तके वाचनालयाला देणगी दिली आहेत, असे रंग कौशल्य कट्ट्याचे संस्थापक रमेश मेश्राम यांनी सांगितले.

(बातमी - सकाळ)

.................................................

चालकाचा मुलगा बनला आयपीएस

जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असल्यास यशापासून कोणीही रोखू शकत नाही, हे मोळे (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील जगदीश श्रीकांत अडहळ्ळी (Jagdish Shrikant Adhalli) यांनी दाखवून दिले आहे. चालक (Driver) म्हणून काम करणारे वडील श्रीकांत यांनी प्रोत्साहन दिल्याने जगदीश हे आंध्रप्रदेशमध्ये (Andhra pradesh) आयपीएस अधिकारी (IPS) बनले आहेत. त्यांच्या या यशोगाथेमुळे मोळे गावचा लौकिक वाढला आहे. जगदीश अडहळ्ळी हे युपीएससी परीक्षा 440 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यांची आंध्रप्रदेश केडरमधून आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीमध्ये 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जगदीश यांची आता कृष्णा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस (एएसपी) म्हणून नियुक्ती झाली आहे. जगदीश यांनी प्राथमिक शिक्षण कवलगूड, माध्यमिक शिक्षण मोळे हायस्कूल, पदवीपूर्व शिक्षण अथणी तर पदवीपर्यंतचे शिक्षण बेळगाव येथील गोगटे कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा दिली‌‌. त्यासाठी दिल्ली येथे कोचिंग क्लास लावला. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) 2019 च्या बॅचच्या केएएस परीक्षेत 23 वा क्रमांक मिळविलेल्या जगदीश अडहळ्ळी यांनी यापूर्वी कलबुर्गी येथे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हजारो तरुणांसाठी जगदीश एक आदर्श ठरले आहेत. कठोर परिश्रम करून परीक्षा देत त्यांनी आपले पालक आणि गावचा नावलौकिक वाढविला आहे. ग्रामीण भागातून येणारी मुले स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. याचे एक उत्तम उदाहरण जगदीश यांनी घालून दिले आहे. त्यामुळे त्यांचे कौतूक होत आहे.

(बातमी - सकाळ)

 
.................................................
पाच हजार 'बेस्ट' कर्मचारी
तंबाखूच्या विळक्यातून मुक्त 
 
तंबाखूचे सेवन जीवघेणे ठरू शकते, याची जाणीव असली तरी त्याचे व्यसन मात्र पिच्छा सोडत नाही. मग दररोजच्या जीवनातला ताणतणाव दूर करण्यासाठी अनेकांना त्या एका कीकची गरज वाटते. वाहतूक कोंडीतून मार्ग काढत तासनतास बस चालवावी लागत असल्याने चालकांमध्ये तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण अधिक असते. मात्र बेस्ट उपक्रमाच्या मॅजिक मिक्समुळे आतापर्यंत पाच हजार बेस्ट कर्मचारी तंबाखूमुक्त झाले आहेत. बेस्ट चालक, वाहक, नवघाणी कामगार तर काहीवेळा अधिकाऱ्यांनाही तंबाखूचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे. बाखूचे सेवन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण ठरते. त्यामुळे २०१४ पासून बेस्ट उपक्रमामध्ये तंबाखूमुक्त मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत बेस्टच्या दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४५० कर्मचाऱ्यांच्या तोंडात डाग (मुख कर्करोगाची पूर्वलक्षणे) दिसला. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचार देऊन तंबाखूमुक्त करता आले. तंबाखूचे व्यसन सुटण्यासाठी बेस्ट उपक्रमाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कुमार सिंघल यांनी तंबाखूसारखाच मात्र घरगुती व आरोग्यदायी पदार्थ तयार केला आहे. जिरे, ओवा, दालचिनी, बडीशेप, लवंग बारीक करून तांदळाच्या मॅजिक मिश्रणाचा वापर करत अनेक कर्मचाऱ्यांनी तंबाखू सोडल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले. तंबाखूमुक्त होण्यासाठी प्रोत्साहन तंबाखूमुक्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये बेस्ट उपक्रमामार्फत जनजागृती केली जात आहे. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनाही मार्गदर्शन केले जात आहे. तसेच तंबाखू सोडलेल्या कर्मचाऱ्यांचा अनुभव इतर कर्मचाऱ्यांना सांगितला जातो. त्याचबरोबर पुन्हा तंबाखूचे व्यसन जडू नये यासाठी सतत या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची विचारपूस केली जाते. याकरता बेस्ट उपक्रमाने विशेष समूह तयार केला आहे.
 
(बातमी - लोकमत )
.................................................
 
कामाठीपुऱ्यात महिला, मुलींना
'पोस्ट ऑफिस’चे आर्थिक बळ
 
भारतीय टपाल खात्याने नववर्षानिमित्त कामाठीपुऱ्यातील महिलांना विशेष भेट दिली आहे. या भागात एका अशा टपाल कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे, जे खास महिलांना सेवा देईल. मुंबई पोस्ट सर्कलच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या पोस्ट ऑफिसचे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त महिलांना सेवा देईल आणि त्यातील कर्मचारीही महिलाच असतील. कामाठीपुऱ्यातील महिलांचे, विशेषतः मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बचत बँक, आवर्ती ठेव, टाईम डिपॉझिट  सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, मासिक उत्पन्न योजनेसह पोस्टाच्या अन्य सेवांचा लाभ या टपाल कार्यालयात घेता येईल. शिवाय सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाती उघडण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
याबाबत पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे म्हणाल्या, कामाठीपुरा येथील रहिवाशांना त्यांच्या आर्थिक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी २४ तास सेवा देण्याचा प्रयत्न आहे. उपरोक्त सेवांशिवाय आधारकार्ड नोंदणी आणि अद्ययावतीकरणाची सुविधाही या कार्यालयात असेल.
 
(बातमी - लोकमत)
.................................................
 
 (21/01/2022)

Comments