प्रसारमाध्यमामधला मेलोड्रामा
(Adoption एक गुड न्यूज या पुस्तकातील वर्षा पवार-तावडे यांचा हा लेख. सोबत त्यांची कन्या अन्वी हिचा प्रांजल लेख. या पुस्तकातले दोन लेख आधीच दिले आहेत. त्यावरून या साऱ्या प्रकरणाची माहिती वाचकांना होईल असे वाटते)
मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालकांसोबत समाजाचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो. प्रसारमाध्यमांकडून प्रगल्भ भूमिकेची अपेक्षा असते.
प्रसारमाध्यमांकडून अनेक वेळा अॅडॉप्शन हा विषय चवीनं हाताळला जातो. कथा-कादंबऱ्या, टीव्ही सीरियल्स व सिनेमांमधून 'मेलोड्रामॅटिक' इफेक्ट आणण्यासाठी कुठल्या तरी एका कुटुंबातल एक मूल 'ॲडॉप्टेड' दाखवलं जातं. त्या विषयाचा गांभीर्यानं सखोल अभ्यास न करता अतिशय असंवेदनशील आणि नाट्यमय पद्धतीनं प्रसंग रंगवले जातात.
सिनेमा वा सीरियल्समध्ये कुटुंबातलच मूल त्याच कुटुंबातल्या कोणीतरी दत्तक घेण्याचा प्रसंग किंवा मोठं सामाजिक कार्य करण्याचा आव आणत संस्थेतून मूल दत्तक घेताना सर्रास दाखवलं जातं. 'दत्तक' संबंधीची शास्त्रशुद्ध व कायदेशीर माहिती करून न घेताच चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात. उदा. एका वेळी अनेक बाळांमधून पालकांना निवड करायला सांगणं, मुलांच्या जन्मदात्यांचा उल्लेख करणं, पालकांची मानसिक तयारी नसताना संस्थेनं मूल त्या कुटुंबात देण्याचा आग्रह धरणं, असे अतार्किक प्रकार सिनेमा व सीरियल्समध्येच दिसतात.
या सर्वांत भयानक प्रकार दाखवला जातो, तो म्हणजे दत्तक मुलाच्या जन्मदात्यांनी त्याचा शोध घेत त्या कुटुंबात येण्याचा आणि त्यातून उठणाऱ्या वादळाचा! भारतीय कायद्यानुसार जन्मदात्यांना आणि दत्तक पालकांना एकमेकांची कोणतीही माहिती कधीच दिली जात नाही. ती २०० टक्के गोपनीयच राहते. त्यांना एकमेकांना 'भेटवण्याची' ही 'फिल्मी’ स्टाईल फारच उथळपणे दाखवली जाते. दत्तक मुलांच्या जन्मासंबंधीचे उल्लेख कोणाच्या तरी तोंडी इतक्या 'असंवेदनशील' पद्धतीनं दाखवले जातात, की आपण हतबल होऊन पाहतच राहतो.
मध्यंतरी कोणत्या तरी ऑनलाईन सोशल प्लॅटफॉर्मवरील मार्केटिंग साईटवर रक्षाबंधनानिमित्त केलेल्या सिरॅमिक मग्जच्या जाहिरातीत 'द रिअल वन', अॅडॉप्टेड वन' असे मजकूर एकेका कॉफी मगवर छापले होते. ‘द अॅडॉप्टेड वन' मजकूर असलेल्या मग्ज् वरची रेखाचित्रं ही भावंडांमधल्या कुचेष्टेच्या वळणाची होती. सर्वसामान्यांनी या जाहिरातीकडे खोडकर जाहिरात म्हणून गमतीनं पाहिलं; परंतु काही दत्तक पालकांनी वेळीच जागरूक राहून; त्याविरोधात तक्रारी करून, त्या सोशल साईटवरून असे प्रॉडक्ट विकण्याला बंदी घालण्यात यश मिळवलं.
असे साहित्य वाचून / पाहून किंवा असे चित्रीकरण पाहून दत्तक मुलांच्या मनात भावनिक गोंधळ उडू शकतो. आपल्या कलाकृतीतील कोणताही शब्द, वाक्यं किंवा प्रसंगातून दत्तक मुलांच्या मानसिकतेचं खच्चीकरण तर होत नाही ना, याचं भान लेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार या सर्वांनीच ठेवायला हवं. सिनेमा/ सीरियल्समध्ये दाखवलेल्या त्या एका शब्द/वाक्य किंवा प्रसंगामुळे एखाद्या कुटुंबातलं दत्तक मूल दुखावलं जाऊ शकतं. त्याच्यात 'नकारात्मक' भावना आणि न्यूनगंड वाढत गेला, तर त्यातून बाहेर पडणं आणि समाजाला खुल्या मनानं स्वीकारणं त्या मुलासाठी कष्टदायक होऊ शकतं. अख्खं कुटुंब त्यामुळे विस्कटून जातं. त्यातही पुन्हा त्या कुटुंबात पालक आणि मुलांत मोकळा संवाद नसेल, तर सर्वच नाती गुंतागुंतीची बनतात. एक चांगलं फुलत असलेलं नातं आणि कुटुंब आपल्या एखाद्या असंवेदनशील प्रकटीकरणामुळे कोमेजणार तर नाही ना, याचं भान समाजानं आणि प्रामुख्याने प्रसारमाध्यमांनी ठेवायलाच हवं. जगात इतर नातेसंबंध आणि असंख्य असे विषय आहेत की, ज्यावर नाटक, सिनेमा, सीरियल्स बनू शकतात. 'दत्तक' सारख्या संवेदनशील विषयाचा केवळ 'सिनेमॅटिक लिबर्टी' च्या नावावर खेळ करणं आता तरी कृपया थांबवावं !
हे सर्व थांबवणं दत्तक पालक म्हणून जरी आपल्या हातात नसलं, तरीही आपल्या मुलांना अशा सर्व अनुभवांवर आपल्याशी मोकळेपणानं बोलतं ठेवणं, ते प्रेम, तो विश्वास देत राहणं, हे सर्वस्वी पालकांच्याच हातात असतं.
अन्वीज् मॉम डॉट कॉम
अन्वी वर्षा विनोद तावडे
विद्यार्थिनी-बॅचलर इन लिबरल आर्टस् (एस.एस.एल.ए.)
'माझ्या दत्तक असण्याची गोष्ट' मला इथे सांगायला मिळतेय, याचा मला आनंद होतोय. सुरुवातीलाच सांगायचं तर, मी अगदी लहान असल्यापासून दत्तक म्हणजे काय याची ओळख मला करून देण्यात आली होती. माझी आई नेहमी म्हणायची, 'तू माझ्या पोटातून आली नसलीस ना,
योगायोग म्हणजे, माझ्या | जन्माच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या हृदयात तुझा जन्म झालेला होता!' |आई-बाबांनी वात्सल्य संस्थेत अॅडॉप्शनसाठी | (माझ्याचसाठी) अर्ज केला होता!
तरीही तुला बघण्याआधीच माझ्या मनात, माझ्या दत्तक असण्याबद्दल माझे आई-बाबा माझ्याशी कायमच स्पष्ट आणि पारदर्शी असल्यामुळे, ते ऐकून मला धक्का बसलाय | वगैरे असं काही झालं नाही. माझ्या आई बाबांनी माझ्या कळत्या वयात पुन्हा एकदा जेव्हा अॅडॉप्शनबद्दल सांगितलं, तेव्हाही ते संभाषण माझ्या बाबतीत खूप सहजपणे घडून आलं. खूप सुरुवातीपासून 'मी अॅडॉप्टेड आहे' या एकूणच कन्सेप्टबाबत मी 'कम्फर्टेबल' असल्याने त्यात काहीतरी खूप विचित्र, जगावेगळं आहे, असं मला कधीही वाटलं नाही; पण माझ्यापुरतं म्हणायचं तर मला 'माझ्यात काहीतरी विशेष आहे', असं मात्र वाटलं होतं!
दत्तक घेणं म्हणजे एक जण किंवा दोघांनी मिळून कायदेशीररीत्या अॅडॉप्शन एजन्सीमधून मूल आपलंसं करून त्याला वाढवण्याची संपूर्ण जबाबदारी घेणं. आता हे सगळं ऐकायला जरा फॉर्मल वाटलं तरी विश्वास ठेवा, द प्रोसेस इज वर्थ इट! जेव्हा आई-बाबांनी स्वतः स्थिरस्थावर झाल्यावर कुटुंब वाढवायचं, असं ठरवलं, तेव्हा त्यांचं आधीपासूनच हे • नक्की होतं की आपण मूल दत्तक घ्यायचं. आता त्या वेळी ते दोघेही आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात व्यग्र असतानाही, अनेक मुलांना कुटुंबाची गरज आहे याचीही जाणीव त्यांना होती त्यामुळे त्यांच्या या समजूतदारपणे घेतलेल्या निर्णयाचा मी मनापासून आदर करते. आता एकदा आपण मुलगी दत्तक घ्यायची आहे, हे ठरल्यानंतर घरात त्यासाठीच्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची लगबग सुरू झाली आणि शेवटी २३ फेब्रुवारी २००० या दिवशी त्यांनी अॅडॉप्शनसाठी अर्ज भरला. त्यांच्या भावी बाळाला बघण्यासाठी नि त्यासाठीची परवानगी मिळायला त्यांना जवळपास साडेपाच महिने थांबावं लागलं. ते बाळ म्हणजे मी. गंमत म्हणजे त्यांनी हे पहिलं वहिलं आणि एकच बाळ पाहिलं बरं का !
योगायोग असा, की माझा जन्म २२ फेब्रुवारी २००० या दिवशी झाला होता आणि आई-बाबांनी २३ फेब्रुवारी २००० ला 'वात्सल्य' या संस्थेमध्ये अॅडॉप्शनसाठी अर्ज केला होता. आता विचार केला तर मला असं ठामपणे वाटतं की - माझे नि माझ्या आई-बाबांचे ग्रह नक्कीच वरच कुठेतरी जुळून आले होते; वुई वेअर मेन्ट टू बी टुगेदर! मग २२ ऑगस्ट २००० या दिवशी माझं माझ्या कुटुंबाकडून खूप आनंदानं व प्रेमानं स्वागत झालं आणि आई-बाबांनी प्रेमाने मला अन्वी हे नाव दिलं. तेव्हापासून कायद्याने आणि अर्थातच व्यक्तिगत पातळीवर आम्हा तिघांचं एक कुटुंब तयार झालं.
आई-बाबा कायमच या गोष्टीबाबत स्पष्ट होते की, 'रक्ताच्या नात्याचं महत्त्व' वगैरे असं काहीही नसतं आणि मी स्वतःसुद्धा याच मताची आहे. एक कुटुंब म्हणून आमच्या घरी दत्तक असणं म्हणजे काहीतरी फार वेगळं, लोकांना न सांगण्यासारखं, इतका संकुचित विचार कधीच नव्हता; उलट या गोष्टीचा स्वीकार इतका सहज होता की, ज्या क्षणी मला स्वतःला अॅडॉप्ट केलंय म्हणजे काय हे जरा नीट लक्षात आलं त्या क्षणी मी शाळेतल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना मला अॅडॉप्ट केलंय हे सांगूनही टाकलं; तेही इयत्ता दुसरीत असतानाच. त्यावर त्या सगळ्यांच्या मिक्स्ड रिअॅक्शन्स होत्या बऱ्याच जणांसाठी हे जरा धक्कादायक होतं; कारण - त्यांना नेहमीच मी 'बायॉलॉजिकल चाईल्ड' आहे, असं वाटत आलं होतं. म्हणजे मी माझ्या आई-बाबांसारखी दिसते आणि दोघांच्या व्यक्तिमत्त्वातल्या काही गोष्टी माझ्यात जाणवतात म्हणून त्यांचा हा समज झालेला होता (माझी जडणघडण तशी असल्यामुळे आणि लहानपणापासूनच्या सोशलायझिंगमुळे असा समज झाला असावा).
शिवाय मला नेहमीच हे ऐकायला मिळतं की, माझी चेहरेपट्टी आईसारखी आहे आणि बाबांमधले गुण माझ्यात दिसतात; आणि खरं तर मला हे ऐकून मस्त वाटतं. आपल्या आई-बाबांपैकी कुणासारखं तरी असणं ही कल्पनाच मला 'होलसम' वाटते.
आता अॅडॉप्शनमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला असावा का, याबाबत सांगायचं झालं तर नाही! त्यामुळे माझी स्वतःबद्दलची आणि एकूणच जगाबद्दलची जाणीव समृद्ध होण्यास मदत झाली का? तर हो नक्कीच! माझ्याकरता तर दत्तक घेतलं जाणं म्हणजे नवीन बाळाचा जन्म होण्यासारखंच आहे. त्याचं हसणं, खिदळणं, रडणं, उत्साह हे काही इतर बाळांपेक्षा वेगळं तर नाही ना? त्यामुळे माझी आयडेंटिटी तयार होण्यात अॅडॉप्शनचा काही भाग आहे, असं मला वाटत नाही. आता स्वभाव हा जन्मतः असतो की तो संस्कार, संगोपनातून घडतो, या वादाबाबत सांगायचं तर, मला वाटतं माझी आयडेंटिटी आकाराला येण्यात माझ्या आई-बाबांचा जास्त वाटा आहे. आजूबाजूचा परिसर आणि आपण ज्या वातावरणात वाढतो त्याचाही प्रभाव आपल्या आयडेंटिटीवर पडत असतो. आताची 'मी' जी आहे, ती माझे आई-बाबा, कुटुंब, मित्र-मैत्रिणी या सगळ्यांमुळे आहे. कारण मी ज्या वातावरणात वाढले, तिथे दत्तक असणं म्हणजे लज्जास्पद वगैरे असले काही समज कधीही नव्हते. माझ्या जवळच्या बहुतेक मित्र-मैत्रिणींना या बाबीचा तर कसलाही फरक पडत नाहीच आणि अजूनपर्यंत अॅडॉप्टेड असल्यानं आमच्यात दुरावा आलाय वगैरे हेही कधी झालेलं नाही; याउलट मी तर म्हणेन की, आम्ही एकमेकांच्या आणखी जवळ आलो आहोत. त्यांच्या अॅडॉप्शनबद्दलच्या प्रश्नांना मी एखादी टीचर मुलांच्या शंका दूर करते ना, तशी उत्तरं दिली आहेत. सुरुवातीला किंवा लहानपणी त्यांच्या त्या अतिउत्सुक प्रश्नांनी खरं तर मी जरा अस्वस्थ झाले होते; कारण माझ्या दत्तक असण्यामुळे आमच्यातले संबंध बदलतात की काय, अशी थोडीशी भीती माझ्या मनात होती. नशिबानं तसं काही न घडता, त्यांनी मला हेही विचारलं की, मला ज्यांनी जन्म दिला, त्या आई-बाबांना भेटायला मला आवडेल का ? काही काळ या प्रश्नाने मला त्रास झाला खरा - खरंच मला त्यांना भेटावंसं वाटत होतं का? आधी मी त्यावर विचार केला हे खरंच. मी लहान असताना जेव्हा माझ्या मनात माझ्या जन्मदात्या आईला शोधण्याचे विचार येत होते; तेव्हा मी माझ्या आईला तसं सांगितलं. त्या वेळी माझ्या आईनं मला समजून घेत, जवळ घेत म्हटलं, 'हो, तुझी इच्छा असेल तर आपण नक्की प्रयत्न करूया. कसं शोधू शकतो आपण? तुला काय वाटतं?' आईचं हे उत्तर ऐकून मला खूप बरं वाटलं होतं. मी तिला म्हटलं, ‘आपण असं करूया का? आपण इंटरनेटवरून ‘अन्वीज् मॉम डॉट कॉम' असं सर्च केलं तर आपल्याला सापडू शकेल.’ माझ्या आईनेही मला तेव्हा दुजोरा दिला होता. माझ्या आईनं मला त्यावेळी दिलेल्या त्या साथीमुळे मी निश्चिंत झाले. आई-बाबा आपल्याबरोबर कायम आहेत, हा विश्वास बळावला. हळूहळू माझी जन्मदात्री आई शोधण्याचा विचार मनातून पुसट होत गेला.
सगळ्या शोधकार्याचा शेवट जर निराश करणारा असणार असेल, तर मग मला त्या बाबतीत खरोखर आणखी त्रास, मनस्ताप नको होता. त्यामुळे मग मी हा विचार करण्याचा पर्याय निवडला की, मला ज्यांनी जन्म दिला, त्या आई-वडिलांनी मला आणखी चांगलं आयुष्य जगता यावं, माझं भविष्य उत्तम घडावं याच आशेनं मला अॅडॉप्शन एजन्सीकडे सुपूर्द केलं होतं, म्हणून मला हे आई बाबा मिळाले.
प्रामाणिकपणे सांगायचं तर या संपूर्ण अॅडॉप्शन प्रोसेसबाबत माझं काहीच म्हणणं नाही आणि एकंदरीत त्याबद्दल लहानपणापासून स्पष्टता असल्यानं, मी मोठी होत असताना या गोष्टीबाबत जास्त मॅच्युअर्ड होऊन • विचार करतेय वगैरे असंही काही नाही. पण, मी लहान असताना ही • संकल्पना एकूण समाजात फार सहज पचनी पडत होती, असंही नाही. म्हणजे फार जाणवण्याइतपत कधी काही दर्शवलं गेलं नाही; पण एकूणच वातावरणातला तो सूक्ष्म म्हणता येईल असा तणाव माझं मन टिपून घेऊ शकत होतं. म्हणजे रक्ताच्या नात्याची परंपरा राखली जावी वगैरे अशा कल्पना होत्या. (मी लहान असतानाच्या काळात मला हे जाणवत होतं) पण जसजशी मी मोठी होत गेले, तसतसं माझ्या आजूबाजूला, शाळेत, कुटुंबात, आमच्या ओळखीतल्या मित्रपरिवारामध्ये बरीच मुलं दत्तक घेतलेली दिसत होती. मुलांचे आई-बाबाही या विषयाबाबत जास्त मोकळेपणे व स्पष्ट बोलायला लागलेले होते आणि मुलंही स्वतःहून खुलेपणानं त्यांच्या दत्तक असण्याबद्दलच्या गोष्टी सांगत होती. ज्यांनी मूल दत्तक घेतलं आहे ते आई-बाबा व त्यांची मुलं, हेही इतर आई-बाबांप्रमाणेच आपापसांत तक्रारी करतात, भांडतात नि वाद घालतात हे सगळं बघताना खूप ‘परिपूर्ण’ असल्यासारखं वाटतं आणि दत्तक घेतलं जाणं हे अतिशय 'नॉर्मल' आहे, हे परत एकदा मनात ठसतं.
(28/11/2021)
Comments
Post a Comment