उत्तम माणसाचा सन्मान !

 This is the story of of a tribal village Dahe which is 100 km from Mumbai. The village never  people used to defecate in open. NGO Keshvshrushti helping them to live life with dignity. I approached the Dawoodi Bohra community to build toilets for the village. Accepting my request, they built 11 toilets to make the village open defecation free. Happy that the present and future generations in Dahe village will hopefully live a healthy and happy life.

ज्येष्ठ पोलिस अधिकारी एसीपी अविनाश धर्माधिकारी यांची ही ताजी ट्विटर पोस्ट. हे काम करणे कोणा पोलिस अधिकाऱ्याचे काम आहे का असा प्रश्न सकृतदर्शनी पडू शकेल. परंतु रोजच्या धकाधकीच्या कामाबरोबरच अशी समाजोपयोगी कामे करणे हा अविनाश यांचा स्वभावधर्म आहे हे त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे. त्यांची ओळख झाली ती पु. ल. देशपांडे यांचे पुतणे जयंत देशपांडे यांच्यामुळे. मुंबईत कालिना विभागाचे एसीपी असताना अविनाश धर्माधिकारी याना २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त विलेपार्ले उपनगरात एक कार्यक्रम करायचा होता. त्या निमित्ताने निमंत्रण देण्यासाठी ते घरी आले, तेव्हाच हा माणूस वेगळा असल्याचे लक्षात आले. पुढे ही ओळख अधिक वृद्धिंगत होत गेली. त्यांचा मित्र परिवार किती मोठा आहे आणि तो किती विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये आहे हेही लक्षात येत गेले. असा मित्र परिवार जेव्हा वाढतो तेव्हा ते पोलिस अधिकारी कसे आहेत यापेक्षा माणूस म्हणून कसे आहेत याकडे जास्त पाहिले जाते.पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीवर एकही डाग पडू दिला नाही, ही प्रचंड मोठी जमेची बाजू आहेच. उत्तम माणूस असल्याशिवाय हे शक्य नसते!
एखाद्या गावामध्ये कोणी व्यक्ती समाजोपयोगी काम करतो आहे, त्याला निधीची आवश्यकता आहे, हे कळल्यावर त्या व्यक्तीला मदत करायची, कधी स्वतः तर कधी विविध व्यक्तींशी, संस्थांशी संपर्क साधून मदत मिळवून द्यायची, हे काम तर नियमित चालूच असते. मित्रपरिवारालाही त्या गावातल्या माणसाचा तपशील देऊन, चांगले काम आहे, लक्ष ठेवा, मदत करा हेही सांगितले जाते. कोणाला रक्त हवे आहे, कोणाला शिक्षणासाठी मदत हवी आहे, कोणाचे अन्य काम आहे, अविनाशजी ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात, हे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. उत्तम पोलिस सेवेसाठी खात्याकडून अनेकदा शाबासकीची थाप मिळाली, हे खरे असले तरी त्यांना मुंबईतून हलवून नाशिकला बदलीवर पाठवणे (आणि तेही निवृत्तीला काही महिने उरलेले असताना) सामान्य नागरिकाला रुचले नाही. नाशिककरांचा निश्चित फायदा झाला, पण मुंबईचे नुकसान झाले. त्यांनी अतिशय संवेदनशील असलेल्या डोंगरी भागात कठीण काळात केलेले काम तेथील लोक विसरलेले नाहीत. पोलिस खात्यात बदल्या नवीन नाहीत. या खात्यात बदल्यांसाठी कायकाय केले जाते हे मी सांगायला नको. अशा वेळी अविनाशजींसारख्या सरळ माणसाचे नुकसान होते, अशी भावना अनेकांमध्ये होती आणि आहे. ही बदली होऊ नये, म्हणून काहीजणांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली, त्यांना बदली थांबविण्याची विनंती केली. त्यांनीही लक्ष घालण्याचे आश्वासन दिले, पण पुढे काही झाले नाही. अविनाशजी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच्या सुरक्षा व्यवस्थेतही  काही काळ काम केले होते. पण ठाकरे सरकारच्या काळातच त्यांची अन्याय्य बदली झाली असे लोकांना वाटते. बदलीचे नेमके कारण पोलिस खातेच सांगू शकेल.

अविनाशजींचे वाचन अफाट आहे. पुष्पगुच्छऐवजी दोन पुस्तके दिली की त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. मिळालेले पुस्तक वाचून त्यांचा अभिप्रायही संबंधित माणसापर्यंत पोचतो हे विशेष. समाजात कोणत्याही क्षेत्रात काही सकारात्मक घडले, मराठी माणसाचे पाऊल पुढे पडले की त्यांचे कौतुकाचे चार शब्द कानी पडतातच. केवळ स्वतः नाही, तर इतरांनीही समाजमाध्यमांचा उपयोग सकारात्मक कामांसाठी करावा असा त्यांचा आग्रह असतो. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांची त्यांना उत्तम जाण आहे. यातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींना दाद द्यावी असे त्यांचे म्हणणे असते. एखादा गाण्याचा कार्यक्रम असला, उत्तम नाटक असले की अविनाशजी शक्यतो टाळत नाहीत. कामामुळे जमले नाही तरच अनुपस्थिती होते.  या क्षेत्रांची आवड असणारे अन्य कोणी पोलिस अधिकारी  नाहीत असा माझा अजिबात दावा नाही, अनेक जण आहेत. अशा चांगल्या माणसांमुळेच पोलिस खाते अजून तगून आहे, असे मला वाटते. अर्थात अशा एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यावर हेच खाते वेगळा रंग दाखवते हा भाग वेगळा.

अशा अविनाशजींना दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती पदक राज्यपालांच्या हस्ते देण्यात आले. ते जाहीर झाले होते तीन वर्षांपूर्वी. कोणाही अधिकाऱ्याला आपल्या सेवाकाळातच पदक  प्रदान व्हावे असे वाटत असते. ते स्वाभाविकही आहे. त्यामुळे निवृत्तीच्या काही काळ आधी का असेना, हे पदक मिळाले याचा आनंद अविनाश धर्माधिकारी यांच्याबरोबरच त्यांचे कुटुंबीय, त्यांचा मोठा मित्रपरिवार यांनाही झाला. त्यांना व इतर पोलिस अधिकाऱ्यांना हे पदक देण्यात इतका उशीर का व्हावा हा वेगळ्या बातमीचा विषय होऊ शकतो. असो !
आपण कोणत्याही नोकरीत, व्यवसायात असलो तरी त्यात यश मिळविण्यासाठी आधी उत्तम माणूस असावे लागते. अविनाश धर्माधिकारी यांचे यश हेच अधोरेखित करते. यापासून धडा घ्यायचा की नाही, हे इतरांनी ठरवावे एवढेच आपण म्हणू शकतो. गेल्या काही महिन्यांत मुंबईतील पोलिस खात्याबद्दल बरेच काही प्रसिद्ध होत आहे. त्यातील बरेचसे खात्याला अभिमान वाटेल असे नाही. या पार्श्वभूमीवर अविनाश धर्माधिकारी यांच्याबद्दल आवर्जून लिहावेसे वाटले, एवढेच !

Comments