राजकारण महत्वाचे की लोकांचे प्रश्न ?
स माजमाध्यमांचा अतिरेक व्हायला लागल्यापासून बातम्यांचे / पत्रकारितेचे जग पार घुसळून निघाले आहे. कोणती बातमी खरी, कोणती खोटी हे कळायला मार्गच उरत नाही. टीव्ही वृत्तवाहिन्या अगदी दोनचार वर्षांपूर्वीपर्यंत ज्या संयत पद्धतीने काम करत होत्या त्याही आता भरकटत चालल्या आहेत असे वाटत आहे . नुकताच हर्षदा स्वकुळ यांच्या एका व्हिडिओमध्ये ‘कोणास काय म्हणाले जर्नालिझम’ असा शब्दप्रयोग ऐकला आणि तंतोतंत पटला. आधी इंग्रजी व हिंदी वृत्तवाहिन्या या राजकारण आणि राजकारण्यांच्या आहारी गेल्या होत्या , आता मराठी वृत्तवाहिन्याही त्याच मार्गाने चालल्या आहेत. महाराष्ट्रातले राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर गेले आहे की काल एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी जी प्रतिक्रिया दिली होती, ती सामान्य माणसाची प्रतिक्रिया असू शकते. ते म्हणाले होते, ”आताचे महाराष्ट्राचे राजकारण बघता, त्यात मी मिसफिट आहे, असे वाटते. आजच्यासारखी महाराष्ट्राची परिस्थिती मी कधीच पाहिली नाही. त्यामुळे या सगळ्याचा वीट आला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्यावर ही वेळ आली आहे. राज्यात २० वर्षांपूर्वी निकोप राजकारण होते. आता ज...