कातळशिल्प हा प्रकार बघायला जेवढा ‘सोपा’ वाटतो, तेव्हढाच तो शोधायला आणि त्याचे जतन करायला कठीण आहे. हा विषय फक्त पुरातत्वशास्त्राशी संबंधित आहे, आपला काही संबंध नाही, अशी सामान्य माणसाची समजूत. आपण इतिहासाकडे बघतो ते फक्त त्यातले राजकारण, वेगवेगळे राजे-राण्या आणि त्यांची कारकीर्द एवढ्यापुरते. शालेय अभ्यासात आपल्याभोवती तीच चौकट घालून दिलेली असते. सनावळी लक्षात ठेवल्या की झाले काम, असाही हा ‘अभ्यास’ असतो. परंतु या इतिहासाच्या पोटात फक्त एवढेच दडलेले नाही. पृथ्वी कधी निर्माण झाली इथपासून ते आजच्या बदललेल्या जगापर्यंत येताना बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. त्यातल्या फार थोड्या आपल्याला कळल्या, अभ्यासता आल्या, ते ज्ञान वाटता आले, अधिक लोकांना त्याची जाणीव झाली आणि पर्यायाने जागृती झाली. अलीकडे कोकणातल्या बारसू प्रकल्पाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील कातळशिल्पांचा विषय जाहीर सभेतून मांडला आणि सामान्य लोकांच्या काहीशा विस्मरणात गेलेल्या विषयाला पुन्हा वाचा फुटली. ही कातळशिल्पे म्हणजे नेमकी काय, कुठे आणि कशा अवस्थेत आहेत हे जाणून घ्यावेसे वाटले. यासाठी ज्येष्ठ पत्रकार सतीश लळीत यांचे ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.
सतीश रामचंद्र लळीत, निवृत्त उपसंचालक (माहिती व जनसंपर्क)महाराष्ट्र शासन, मा. मुख्यमंत्री यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी, माजी संपादक, लोकराज्य, माध्यमकर्मी, पत्रकार, लेखक, ट्रेकर ही झाली लेखकाची ‘बायोडाटा’मधील ओळख. किंवा, ”निवृत्तीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’ या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेची स्थापना. पर्यावरण, पाणी, आरोग्य, ग्रामविकास इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या या संस्थेचे संस्थापक मुख्य विश्वस्त व अध्यक्ष. ‘मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग’ या संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यवाह. आतापर्यंत सहा मालवणी बोली साहित्य संमेलनांचे आयोजन,” ही झाली सामाजिक कार्याची ओळख. पण त्यांनी २००१च्या मे महिन्यात मालवण तालुक्यातील हिवाळे येथील कातळशिल्पांचा शोध लावला आणि कातळशिल्पांच्या अभ्यासाचा समांतर प्रवास सुरु झाला. त्याची परिणती म्हणजे २०२१ मध्ये आलेले हे पुस्तक. मूळ पुस्तक फक्त ११७ पानांचे आणि अत्यंत महत्वाची अशी परिशिष्टे धरली तर १५६ पानांचे. म्हणजे म्हटले तर एकदोन दिवसांत सहज वाचून होणारे, पण या विषयाची व्याप्ती सहज सोप्या पद्धतीने मांडली असल्याने आपल्या मनात कायमची रुजते.
या समांतर प्रवासाबाबत लेखकाच्याच भाषेत सांगायचे तर – मुळात मी एक ट्रेकर आहे. डोळे आणि कान उघडे ठेवून भटकंती करणे हा माझा अतिशय आवडता छंद आहे. यातून काही ट्रेक झाले. महाराष्ट्रात साडेतीनशेहून अधिक किल्ल्यांपैकी जेमतेम ९० किल्ल्यांना आतापर्यंत पाय लावणे शक्य झाले. अर्थात ही भटकंती करताना प्राचीन, ऐतिहासिक अवशेष पाहताना त्यांच्याशी एक प्रकारची आत्मीयता जडली, नाते निर्माण झाले. आपण याचाच एक भाग आहोत, आपल्यापैकीच कोणीतरी, केव्हातरी हे घडवले आहे ही भावना वाढीला लागली. यातून मग असे काहीतरी शोधण्याची आवड नकळत निर्माण झाली. भटकंतीला गेल्यावर गावकऱ्यांशी गप्पा मारणे, त्यांच्याकडे आसपासच्या भागात गुहा, लेणी किंवा अगदी गावकऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर ‘पांडवांची चित्रे’ आहेत का, याची विचारणा करण्याचा आणि तसे काही आहे असे कळल्यास वाट वाकडी करण्याचा नाद लागला. अशीच भटकंती करीत असताना पुरातन वास्तू, समाध्या, थडगी, वीरगळ, सतीगळ, मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र, पुरातत्व याची माहिती मिळत गेली. कालांतराने इतिहासाचा ओढा पुरातत्व विषयाकडे वळला. मिळेल त्या साधनांनी अभ्यास करीत गेलो आणि विषयाची व्याप्ती कळत गेली. तसेच हा विषय सर्वसामान्य माणसांशीही कसा निगडीत आहे, हे स्पष्ट होत गेले. ‘डिस्कव्हरी’सारख्या वाहिन्यांनी तर घरबसल्या दूरदूरच्या ठिकाणांच्या सहली घडवल्या. दूरसंचार क्रांती, इंटरनेट, स्मार्टफोन यामुळे जग आणखी जवळ आले. यातूनच इंटरनेटद्वारे मुक्त दूरशिक्षणाची एक अलिबाबाची गुहाच उघडली. त्यातून मग “Ancient Egypt” (The University of Manchester), Recovering The Humankind’s past and saving the Universal Heritage (Sapienza Universita Di Roma), Becoming Human : Anthropology (Macquarie University, Australia) असे ऑनलाईन अभ्यासक्रम पुरे केलेमहाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागाचा मोडी लिपी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला.”
या पुस्तकात लळीत यांनी केवळ स्वतःच्या कातळशिल्प शोधाची कथा मांडली नाही. इतर अनेक लोक या कामी वेगवेगळे संशोधन करीत आहेत, त्यांच्या नावासह त्यांचे या क्षेत्रातले काम इथे वाचायला मिळते. मुळात पुरातत्त्वशास्त्र म्हणजे काय, पाषाणकला म्हणजे काय, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळशिल्पे कुठेकुठे सापडली आहेत, त्यांची सध्याची अवस्था काय या साऱ्यांचा आढावा इथे वाचायला मिळतो. ते वाचण्यासाठी आपण पुरातत्वशास्त्राचा विद्यार्थी असलो पाहिजे असे बंधन अजिबात नाही. त्यामुळे पुस्तक माहितीपर असले तरी कंटाळवाणे होत नाही.
कातळशिल्पे का तयार झाली असावीत याचे विवेचन करताना लेखक म्हणतात -लाखो वर्षांपासून पृथ्वीतलावर असणाऱ्या आणि अत्यंत प्रतिकूल स्थितीतही सतत प्रगती करणाऱ्या मानवाला स्थैर्य लाभले ते जेमतेम दहाबारा हजार वर्षांपूर्वी. तोपर्यंत त्याला अन्न, निवारा आणि संरक्षण यासाठी प्रचंड परिश्रम करावे लागले. जगाच्या अनेक भागात आजही रानटी, आदिम जमाती वास्तव्य करुन आहेत. यावरुन मानवाच्या या कष्टमय प्रगतीची कल्पना यावी. मानव नवाश्मयुगाच्या सुमारास एका ठिकाणी वस्ती करुन राहू लागण्याच्या पुर्वीच्या काळातील पुरावे फारसे मिळत नाहीत, याचे कारण तो नैसर्गिक गुहांमध्ये (Rock Shelter) किंवा उघड्यावरच रहात असे. हे पुरावे म्हणजे मुख्यत: त्याने दगडापासून तयार केलेली वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे होत. शिकार हेच उपजिविकेचे साधन असल्याने ही हत्यारे त्याच्या दृष्टीने जीवनाचा आधारच होता. शिकारीच्या शोधात त्याला दिवसभर भटकावे लागत असे. पण केवळ भटकून किंवा ताकदीच्या जोरावर शिकार मिळणे कठीण होते. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर दगडी हत्यारे तयार केली. दगडाच्या चिपा काढून ही हत्यारे बनवली जात. नंतरच्या काळात तर हाडे, शिंगे यांच्यापासून ही हत्यारे तयार करण्याचे कसब त्याने आत्मसात केले. आजही अनेक ठिकाणी उत्खननामध्ये अशा प्रकारची हत्यारे सापडतात. त्यावरुन कोणत्या काळात तिथे मानवी वस्ती किंवा वावर होता, याचा. साधारणपणे अंदाजही बांधता येतो. आदिमानव जेव्हा एका ठिकाणी स्थायिक होऊ लागला, तेव्हा टोळ्यांचे रुपांतर हळुहळु अगदी प्राथमिक अवस्थेमधल्या का होईना, पण समाजामध्ये होऊ लागले. भाषा अस्तित्वात होती का, याचा पुरावा सापडलेला नाही. पण तो कोणत्यातरी प्रकारे संवाद साधत असणार.
……एकत्रित समाजामुळे हळुहळु काही नियम तयार झाले असावेत. धर्म किंवा देव ही संकल्पना फारच अलिकडवी आहे. तथापि, पूर्णपणे निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या आणि निसर्गावरच आपले अस्तित्व अवलंबून असणाऱ्या मानवाला निसर्गाच्या अफाट ताकदीचा प्रत्यय सारखा येत असणार. पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण करणाऱ्या, जीवन असह्य करणाऱ्या कडक उन्हाळ्यानंतर बरसणारा पाऊस त्याला सुखावून जात असणार. पण त्याच काळात आकाशातून पडणारी आणि जाळून टाकणारी वीज पाहून त्याला भीतीही वाटली असणार. वाघासारखे हिंस्त्र किंवा सापासारखे जीव घेणारे प्राणी त्याला भीतीदायक वाटले असणार. जसजसा मानव उत्क्रांत होत गेला, तसतसा त्याच्या बुद्धीचाही विकास होत गेला. त्याच्या ठिकाणी ‘आहार, निद्रा, भय, मैथुन’ या सजीव प्राण्याच्या मूलभूत भावनांपेक्षा अन्य भावनांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. कारण माणूस आता ‘विचार करायला शिकला होता’. यातूनच तो प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव त्याच्या परीने शोधू लागला. हळुहळु जशी समाजनिर्मिती होऊ लागली, तसतशी मानवाच्या ठिकाणी ‘कुला’ची कल्पना निर्माण झाली असावी. हे एक प्रकारे ‘टोळी’चे उन्नयन होते. याचदरम्यान मानवाच्या ठिकाणी कलावृत्ती निर्माण होण्यास सुरुवात झाली. तसेच, भटक्या जीवनाला थोडेफार स्थैर्य आल्याने त्याला कदाचित विरंगुळ्यासाठी काही काळ मिळू लागला असण्याची शक्यता आहे. हाच काळ त्याने कलासाधनेसाठी घालवला असण्याची शक्यता आहे. उत्खननात सापडणारी मृद्पात्रे किंवा मातीची भांडी (पॉटरी) ही तो काळ समजून घेण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतात. मातीची भांडी बनविण्याची कला याच काळात मानवाने साध्य केली. त्याने टोकदार दगडाचाच वापर केला असावा. यामध्ये मुख्यत्वे शिकारीचे प्रसंग, त्याला दिसलेले प्राणी वगैरेंचा समावेश होता. तत्कालिन समजुतींनुसार मेलेल्या व्यक्तींच्या स्मृती म्हणून काही ठिकाणी मानवाकृतीही चितारल्या किंवा कोरल्या गेल्याया. सर्व कलेमध्ये दगड हा प्रमुख घटक असल्याने व या सर्व कलाकृती अश्मयुगातील असल्यामुळे याला पाषाणकला किंवा Rock Art म्हटले गेले.कुडोपीच्या पठारावरील कातळशिल्पे पाहण्यापूर्वी मी आणि मा प्रा.डॉ. बाळकृष्ण अशा दोघांनी हिवाळे पठारावरील अशाच कातळशिल्पांचा शोध मे २००१ मध्ये लावला होता. गुहाचित्रे, कातळशिल्पे, शिलालेख, प्राचीन शिल्पे आदींचा शोध घेणे, त्यांचा अर्थ लावण्याचा किंवा समजून घे प्रयत्न करणे, हा असाच आपली मूळे शोधण्याचा एक जाणीवपूर्वक के प्रयत्न आहे.”
दुसऱ्या एका संदर्भात लेखक म्हणतात – अनेकदा नुसतीच पायपीट झाली, फारसे काही हाती लागले नाही. काही ठिकाणी मात्र चीज झाले. विर्डी, पेंडुर, हिवाळे आणि कुडोपी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणे यापैकीच आहेत. हिवाळे कातळशिल्पांचा शोध असाच अपघाताने लागला. माझ्या एका मित्राशी या विषयावर गप्पा मारताना तो ‘आमच्या हिवाळे गावात सड्यावर पांडवांची चित्रे’ आहेत’ असे म्हणाला होता. अर्थात ती त्यांनी पाहिली नव्हतीच. ‘ती आहेत असा गावातले जाणते म्हणतत. कोन गेलोहा मराक तकडे’, एवढीच जुजबी माहिती त्यांच्याकडे होती. (बहुतेकांकडे एवढीच माहिती असते. पण हा संदर्भ खूप महत्वाचा असतो. जिज्ञासूनी लक्षात ठेवावे.). बरीच वर्षे झाली तरी हिवाळे गावी जाणे जमले नव्हते. मात्र किडा डोक्यात पक्का होताच. २००१च्या मे महिन्यात आमच्या आडाळी (दोडामार्ग) या मृ गावी सगळे जमलो असताना हिवाळे विषयाचा छडा लावण्याचे ठरवले. सॅकमध्येपाण्याची बाटली, भूकलाडू, कॅमेरा घेऊन मी, माझे बंधू अजित, बाळकृष्ण, पुतण्या शैलेंद्र आणि तेव्हा आठ वर्षांचा असलेला माझा मुलगा शुभेन्दू असे सगळे हिवाळ्याला निघालो. तो दिवस होता ७ मे २००१. हिवाळे हे गाव कसा मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे १० किलोमीटरवर कसाल (विरणमार्गे) मालवण रस्त्यावर आहे. तीन गाड्या बदलून हिवाळ्याच्या नऊआंबुली बसथांब्यावर उतरायला दुपार झाली. गावात चौकशी केल्यावर कोणाला काही सांगता येईना. एका हॉटेलात बसलेल्या आजोबांनी गावामागच्या डोंगरा धनगरवाड्याजवळ सड्यावर ‘पांडवांची चित्रे’ आहेत आणि लहानपणी मी एक तिकडे गेलो होतो, अशी महत्वपूर्ण माहिती दिली. या सुतावरुन आम्ही सडारुपी स्वर्ग गाठला. अर्थात त्यासाठी डोंगरातील दगडाधोंड्यांची दो किलोमीटरची पायवाट तुडवावी लागली. विस्तीर्ण सड्यावर या चित्रांचा शोध लावायला बराच वेळ लागला. मात्र बघायला मिळाले, त्यामुळे श्रमांचे चीज झाले. याठिकाणी काही मानवाकृत पक्षी, मासे, वर्तुळे, चौकटीत कोरलेल्या काही अमूर्त रचना (शिल्पपट्ट) अ विविध आकृती आहेत.”
महाराष्ट्र आणि गोव्याच्या पश्चिम किनारपट्टीवर सापडलेल्या कातळशिल्पांप्रमाणेच कुपगळ (बळ्ळारी) कर्नाटक, इडक्कल (वायनाड) केरळ, पेरुमुक्कल (दिंडीवनम) तामिळनाडु, कोल्लुर (विल्लुपुरम) तामिळनाडु येथे पाषाणशिल्पे आढळली आहेत. गोव्यातील पोनसाईमळ-उसगाळीमळ, मौशी, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळे, कुडोपी, राजापूर, लांजा, निवळी, नागिरी अशा अनेक ठिकाणी पश्चिम किनारपट्टीवर ही कातळशिल्पे आढळली असून त्यामध्ये काही परस्परसंबंध, साखळी (लिनिएज) असण्याची शक्यता निश्चितच आहे. पक्षी, प्राणी, मासे, अमूर्त रेषा व चित्रांचे शिल्पपट्ट रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यात आढळले आहेत. या सर्वांमध्ये काही प्रकारचे साधर्म्य (पॅटर्न) दिसुन येतो. कदाचित त्या काळात तत्कालिन मानवी समुहांचे स्थलांतर या रिसरात होत असावे, असा निष्कर्षही यावरुन काढता येतो, असे लेखकाचे म्हणणे आहे.
या सर्व ठिकाणांचा सविस्तर अभ्यास झाल्यास या भागातील आदिम नवी समुह व त्यांची वसतीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकतील, शी अनेक ठिकाणे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात अज्ञात आहेत. मात्र, त्यांचे तज्ज्ञांकडून वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यास कोकण प्रदेशाच्या प्रागितिहासावर अधिक प्रकाश पडण्याची क्यता आहे. तसे पाहिले तर कातळशिल्पांचा अर्थ लावणे, अतिशय जटिल आहे. ही कातळशिल्पे खोदण्याचा अश्मयुगीन मानवाचा नेमका कोणता उद्देश होता, त्या चित्रांचा अर्थ काय, हे प्रश्न आजही बऱ्याचअंशी अनुत्तरित आहेत. गुहाचित्रांमधील प्राणी व त्यांच्या शिकारीच्या प्रसंगांची चित्रे किंवा कातळशिल्पांमधील प्राणी यांचा अर्थ काही प्रमाणात लागू शकतो. मेमरी ड्रॉईंग या चित्रकला पद्धतीनुसार त्याने हे पूर्वी पाहिलेले, अनुभवलेले चितारले किंवा खोदले. आपल्या पुढील पिढीला याची माहिती मिळावी, असाही त्याचा उद्देश असावा. मेंदुचा सतत होत असलेला विकास, सुचणाऱ्या संकल्पना, फावल्या वेळाचा सदुपयोग हे उद्देशही त्यामागे असण्याची शक्यता आहे. … दुसरी एक शक्यता अशी वाटते, की या काळात ज्या भटक्या टोळ्या होत्या, त्या वेगवेगळ्या प्रदेशात शिकारीनिमित्त फिरत असत. अशा अनेक टोळ्या असल्याने शिकारीवरुन त्यांचा संघर्षही होत असणार. याकरिता विशिष्ट भुप्रदेशावरची आपली मालकी किंवा सत्ता सिद्ध करण्याचाही प्रयत्न त्याने केले असावेत. वन्य प्राणीही अशा प्रकारे आपल्या क्षेत्राच्या सीमा निश्चित करुन घेतात. या सीमांच्या हद्दीत ते दुसऱ्या प्राण्याला येऊ देत नाहीत. एकाच ठिकाणी अशा प्रकारे सहज लक्ष वेधून घेतील, अशी चित्रे कोरुन त्या टोळ्यांनी आपल्या सीमारेषा किंवा हद्द आखुन घेतल्या असाव्यात, अशीही शक्यता आहे, असे लेखक म्हणतात ते पटण्यासारखे आहे.
….. हा सगळा इतिहास मानवाभोवती केंद्रीत असणे स्वाभाविक आहे. या पृथ्वीतलावर माणूस कधी अवतरला, तो कसा उत्क्रांत होत गेला, याचाही अभ्यास पुरातत्वशास्त्र करते. माणसाच्या प्रवासाचा धावता आढावा याठिकाणी घेतला तर विषय समजणे सोपे जाईल, असे लेखकांना वाटते. विज्ञानाचे म्हणणे आहे की, आपली सूर्यमाला ज्या विश्वात आहे, त्या विश्वाचे वय सुमारे तेराशे कोटी वर्षे आहे आणि आपल्या सूर्याचे वय फक्त पाचशे कोटी वर्षे आहे. सूर्याच्या उत्पत्तीनंतर चाळीस कोटी वर्षांनी म्हणजे आतापासून ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. अर्थातच तेव्हा तो तप्त वायूचा गोळा होता. वेगवेगळ्या वायूंचे विघटन, संयोग अशा नानाविध रासायनिक प्रक्रिया घडून हा गोळा थंड होऊन पाण्याची निर्मिती व्हायला शंभर सव्वाशे कोटी वर्षे लागली. याच सुमाराला केव्हातरी नैसर्गिक जैव-रासायनिक क्रिया घडून अल्गी, शेवाळ, अमिबा, बॅक्टेरियासारखे जिवाणू निर्माण झाले. सुमारे दोनशे कोटी वर्षे पृथ्वीवर अशा प्रकारच्या प्राथमिक रुपातील सजीवांचेच राज्य होते. आजपासून सुमारे साठ कोटी ते वीस कोटी वर्षांपर्यंत पृथ्वीवर बहुपेशीय आणि कमी गुंतागंतीची शरीरे असलेल्या सजीवांची निर्मिती झाली. हा काळ प्राचीन जीवयुगाचा होता. नंतर वीस कोटी ते पाच कोटी वर्षांपर्यंत सरपटणारे प्राणी, उडू शकणारे पक्षी, वनस्पती, इथपासून ते डायनॉसॉरसारख्या महाकाय प्राण्यांचे अस्तित्व असलेले मध्यजीवयुग येऊन गेले. आताचे सस्तन प्राण्यांचे जे नवजीवयुग आहे, ते गेल्या फक्त पाच कोटी वर्षांचे आहे. याच नवजीवयुगात सुमारे सव्वाकोटी वर्षांपूर्वी माणसाचा पूर्वज असलेला शेपटी नसलेला, चार पायांचा, पण दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करणारा मानवसदृश मर्कट (नरवानर) (Primate) पृथ्वीवर अवतरला. हाच नरवानर पुढे उत्क्रांत होत गेला. तो पुढे वाकून चालू लागला, पुढच्या पायांचा वापर त्याने वस्तू हाताळण्यासाठी केला. या घडामोडीत त्याच्या हाताच्या एका बोटाचे रुपांतर अंगठ्यात झाले आणि या आंगठ्याने मोठी कमालच केली. त्याचे पुढचे पाय आता हात बनले. त्याचा कंठ उत्क्रांत झाला, तो इतर प्राण्यांपेक्षा वेगवेगळे आवाज काढू लागला. यातूनच शब्द, भाषा आणि मग लिपीचा जन्म झाला. (अर्थात हा फार पुढचा टप्पा.) माणसाला हात मिळाल्यावर आणखी एक मोठी गोष्ट घडली. त्याच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आणि त्याचा जबडा लहान होत गेला, डोक्यात मेंदूची वाढ व्हायला जागा निर्माण झाली आणि त्याचा मेंदू वेगाने उत्क्रांत होऊ लागला. पुढे क्रमाने सुमारे दहा ते पंधरा लाख वर्षांपूर्वी पूर्णपणे दोन पायांवर उभा राहणारा आणि पाठीच्या कण्यावर शरीराचा तोल सांभाळणारा ‘होमो इरेक्टस’ विकसित झाला. आज जे आपण आहोत, त्या आपल्या सगळ्यांचा पूर्वज मानला गेलेला निएंडरथल तर अगदी अलिकडे म्हणजे साधारण दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण झाला. (याबद्दलही अनेक मतमतांतरे आहेत.) तेव्हा या विश्वाच्या पसाऱ्यात आपला वावर जेमतेम दीड लाख वर्षांचा आहे आणि हाच पुरातत्वशास्त्राचा प्रांत आहे. एकोणिसाव्या शतकात पुरातत्त्वीय संशोधनाला मोठी चालना मिळाली.
….. डॅनिश पुरातत्त्वज्ञ आणि युरोपियन प्रागितिहासाचे जनक सी. जे. थॉमसन (२९ डिसेंबर १७८८-२१ मे १८६५) (ख्रिश्चन युर्गेनसन थॉमसन) यांनी अश्मयुग, कांस्ययुग आणि लोहयुग अशा तीन अवस्थांमध्ये मांडणी सूचित करणारा त्रियुग सिद्धांत प्रतिपादन करून मानवी संस्कृतीच्या प्रगतीतील तीन संभाव्य अवस्थांचा क्रम निश्चित केला. या पृथ्वीतलावरील मानवी अस्तित्वाच्या दीड लाख वर्षांचे प्रागितिहासिक काळ, इतिहासपूर्व काळ आणि इतिहासकाळ असे तीन प्रमुख टप्पे मानले आहेत. यापैकी पुरातत्वशास्त्र प्रागितिहासिक काळाचा अभ्यास करते , असे विवेचन करताना लेखक प्रागितिहासिक की प्रागैतिहासिक, इतिहास शब्दाचा नेमका अर्थ काय, कातळशिल्पांचा सिंधू संस्कृतीशी संबंध आहे की नाही, पुरातत्वशास्त्र म्हणजे नेमके काय या सगळ्या बाबी थोडक्यात, सोप्या भाषेत लेखकाने उलगडून सांगितल्या आहेत.
लेखक स्पष्ट सांगतात की , ‘कातळशिल्पांचा संबंध सिंधुसंस्कृती व अर्वाचीन काळाशी जोडणे अनैतिहासिक म्हणावे लागेल. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेली कातळशिल्पे ही नवाश्मयुग ते मध्याश्मयुगातील ‘भटका शिकारी’ (हंटर गॅदरर) अवस्थेत असलेल्या आदिमानवाने खोदली असण्याच्या शक्यतेपर्यंत पुरातत्व संशोधक आले आहेत. याचा कालावधी इ. स. पू. पाच हजार ते २५ हजार असावा, अशी शक्यता पुरातत्वशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. असे असताना त्यांचा संबंध चक्क सिंधु संस्कृती, कोंकणातील कथित नागसंस्कृती ( ?) यांच्याशी जोडणे अनैतिहासिक आणि हास्यास्पद आहे, असेच म्हणावे लागेल.”
या कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी आताच काही पावले उचलली गेली पाहिजेत, असे सुचविताना लेखक नेमक्या सूचना करतात. राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने कोकणातील कातळशिल्पांचे व्यापक सर्वेक्षण करावे, छायाचित्रे, चित्रीकरण, ड्रोन चित्रीकरण, जीपीएस मार्किंग करुन अद्ययावत दस्तावेजीकरण करावे, बहुतेक कातळशिल्पे खासगी जागेत आहेत. या जमिनी शासनाने योग्य किमतींत संपादित कराव्यात., कातळशिल्पांची शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करावी, कातळशिल्पांभोवती चिऱ्याची दगडी कुंपणभिंत उभारावी, कातळशिल्पांच्या किमान ५०० मीटर परिसरात चिरेखाणी, सुरुंग यांना बंदी करावी, • कातळशिल्पे राज्य संरक्षित स्मारके जाहीर करावीत व त्यांना कायद्याचे संरक्षण द्यावे, कातळशिल्पांच्या ठिकाणी माहितीफलक लावावेत, कातळशिल्पांच्या जवळून जाणारे रस्ते, राज्य मार्ग व महामार्गावर दिशादर्शक फलक लावावेत, यापैकी काही कामांसाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत सामाजिक संस्था व अशासकीय सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळा, विद्यालये, महाविद्या येथे ‘कातळशिल्प जनजागृती’ या उद्देशाने संशोधक, अभ्यास पुरातत्वशास्त्रज्ञ यांची व्याख्याने आयोजित करावीत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणांना पर्यटनस्थळे जा करुन तशी प्रसिद्धी करावीत.
कोकणचा विकास हे शब्द आता जुने झाले आहेत. आहे ते जंगल पाडून रिसॉर्ट अथवा मनोरंजनाची ठिकाणे उभारली म्हणजे कोकणचा विकास होत नाही. कातळशिल्पे ही कोकणाची अमूल्य संपत्ती आहे. ती जपणे हे राज्याचे आणि देशाचे कर्तव्य आहे. एका चांगल्या विषयावर पुस्तक लिहून त्यावर प्रकाशझोत टाकल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.
Comments
Post a Comment