कर्करोग अथवा अन्य कोणताही गंभीर आजार झाला तर आधीच शारीरिक व्याधीने त्रस्त झालेला रुग्ण मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. अशा वेळेस डॉक्टर, कुटुंब, मित्रमंडळी यांचा पाठिंबा फार आवश्यक असतो. तो मिळाला तर रुग्ण अर्धा बरा होतो. अशा आजारात होणारा खर्च हा अवाढव्य असतो आणि जीवाची शाश्वती नसतानाही बँक खाते रिकामे करणारा असतो. त्यामुळे येणारे ताणतणाव आजारात भरच घालत असतात. वैद्यकीय विमा घेतला असला तरी तो पुरतो असे नाही. त्यामुळे आज समाजात बहुतांश लोकांना आजार झाल्यावर आर्थिक समस्या भेडसावत असल्याने पुरेसे व आवश्यक उपचार घेता येत नाहीत. परिणामी आजार कायम राहतो किंवा कदाचित त्यांना जीवही गमवावा लागतो. ती व्यक्ती घरातील कमावणारी एकमेव व्यक्ती असली तर कुटुंबाचे हाल होतात ते वेगळेच.
मध्यंतरी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये डॉ. सुलोचना गवांदे यांनी कर्करोग, त्याबाबतचे समज -गैरसमज, उपचार, कर्करोगातून बाहेर आलेल्या रुग्णांचे अनुभव सांगणारी लेखमालिका लिहिली होती. ती बऱ्याच वाचकांनी वाचल्याने समाजात जागृतीचे चांगले काम झाले. त्या लेखांचे नंतर ‘पॉप्युलर प्रकाशन’ने पुस्तक काढले. आता त्याचे इंग्रजी भाषांतर अमेरिकेतील प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ते पुस्तक उपलब्ध आहे. अन्य वर्तमानपत्रे आणि मासिके यातही कर्करोगाबद्दल जागृती करणारे लेखन येत असते. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे शिरीष उर्फ अजू देशपांडे यांनी लिहिलेले कर्करोगावरचे पुस्तक. HOPE – My Cancer War … Won or Lost ? हे अवघे ९४ पानांचे आहे, पण दोन वेळा कर्करोग होऊनही त्यातून सुखरूपपणे कसा बाहेर पडलो, त्या प्रक्रियेत कायकाय घडामोडी झाल्या, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉईज आदींची मदत कशी लाभली आणि पत्नी, मुलगा, बहीण, नातेवाईक डॉक्टर हे कसे खंबीरपणे मागे उभे राहिले त्याची कथा आहे.
लेखकाची शैली खुसखुशीत असल्याने पुस्तक एका दिवसात वाचून संपते, पण आयुष्यभराची शिकवण देऊन जाते. पुस्तक कर्करोगाशी केलेल्या सामन्याबद्दल आहे. खुद्द कर्करोगाची तांत्रिक माहिती देणारे नाही. त्यामुळे उगाच बोजड व भयप्रद वाटणारे वैद्यकीय शब्द अथवा त्याचे शॉर्टफॉर्म दिलेले नाहीत. अगदी आवश्यक तिथेच हा उल्लेख आढळतो. अजू देशपांडे यांचे क्रीडाप्रेम सर्वाना माहीत आहे. (माझी व त्यांची ओळख या क्रीडप्रेमातूनच झाली) भारतीय खेळांना प्राधान्य देणारे त्यांचे (व विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा. राजेश देव) स्पोर्ट्सनशा हे पोर्टल लोकप्रिय होते. क्रिकेट हे अजू देशपांडे यांचे विशेष प्रेम. त्यामुळे पुस्तकात अनेक ठिकाणी क्रिकेटचा उल्लेख सापडतो. अन्य खेळांचाही उल्लेख होतो. ही नेमकी उदाहरणे दिल्याने पुस्तक अधिक वाचनीय होते.
काही उदाहरणे द्यायला हवीत. ”माझी जीवनशैली अशी होती की चेंडू वारंवार पॅडवर आपटत होता, तरी मी LBW होईन असे वाटत नव्हते, पण शेवटी झालोच” , ”केमोथेरपीच्या दोन टप्प्यांमधले २१ दिवस संपत आले की बॉक्सिंग पुन्हा सुरु होणार असे वाटते. हे म्हणजे भरतील शिकाऊ बॉक्सर व जागतिक बॉक्सिंग विहित यामधील लढाई सारखे असते. त्याचे फटाके खात राहाता, उठण्याचा प्रयत्न केल्यावर परत फटका बसतो, परत आपण पडतो … कधी ही लढाई संपेल असे वाटते”. बऱ्याच वेळेस प्रतीकात्मक उल्लेख आढळतात. उदा. ”डॉक्टर टेस्ट करायला सांगताहेत. जणू काही टायरमध्ये puncture आहे का ते बघू, असले तर दुरुस्त करू, नसले तर सोडून देऊ… एवढे साधे आहे का हे?”
पुस्तकात अनेक डॉक्टर, त्यांची काम करण्याची शैली, अहोरात्र मेहनत घेऊन काम करणाऱ्या परिचारिका, हॉस्पिटलचे चांगले / चुकीचे नियम, इतर रुग्णांची अस्वस्थ करणारी स्थिती , या सगळ्यात पहाडासारखी पाठीशी उभी राहिलेली पत्नी, यांचा उल्लेख कायम आढळतो. वेळेत लक्षात आलेला कर्करोग योग्य उपचारानंतर बरा होऊ शकतो. पण तो नंतर पुन्हा कधीच उद्भवणार नाही, असे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून रुग्णाला अधिक काळजी घ्यायला हवी. दुसऱ्यांदा कर्करोग होणे हा देशपांडे कुटुंबियांसाठी धक्कादायक होते, पण आधीच्याच हिमतीने सगळे समोरे गेले. हे मानसिक धैर्यच कर्करोगातून दुसऱ्या वेळेसही बाहेर येण्यास फायदेशीर ठरले. हा संदेश पुस्तकातून वारंवार वाचकांना मिळतो. आशा सोडू नका, हार मानू नका, जितके लढत येईल तेवढे लढा, देवावर विश्वास ठेवा आणि पुढे जा हाच संदेश देण्याचे लेखकाचे उद्दिष्ट असावे. सगळ्याच रुग्णांना जवळचे हॉस्पिटल, उत्तम डॉक्टर व वैद्यकीय सेवा, आर्थिक पाठबळ मिळत नसते. त्यामुळे आज भारतात अनेकांना वैद्यकीय उपचारांपासून दूर राहावे लागते, ही लेखकाची खंत बरेच काही बोलून जाते. हे कर्करोगासारख्या गंभीर रोगांबद्दलच होते असे नाही, तर ग्रामीण भागांमध्ये अगदी प्रसूतीसाठी हॉस्पिटल गाठायचे तर मोठे दिव्य करावे लागते, अशा बातम्या आपण नेहमी वाचत असतो. या पार्श्वभूमीवर लेखकाची खंत अधिकच जाणवते.
पुस्तक आकाराने छोटे असले तरी वाचनीय झाले आहे. त्यातील आजाराची वर्णने ऐकून आपल्या अंगावर काटा येतो, प्रत्यक्षात रुग्णाला किती भोगावे लागले असेल याची कल्पनाच करवत नाही. कोविड काळात अथवा साध्या तापातही आपल्या तोंडाची चव गेली तर आपण कमालीचे अस्वस्थ होतो. पण लेखकाने दिलेल्या उदाहरणांनंतर त्याची खरी दाहकता लक्षात येते. हे पुस्तक आत्ता इंग्रजी भाषेत आहे, ते मराठीत आले तर आणखी अनेक लोकांपर्यंत जाईल व लेखकाला अपेक्षित असणारा आशावाद (HOPE) अधिक पसरेल. त्यांच्या जिद्दीला सलाम !
(पुस्तकाचे प्रकाशक – सहित प्रकाशन, गोवा. किंमत २५० रुपये – पुस्तक विकत घ्यायचे असेल तर UPI Handle – 9869852213@paytm. पत्ता पाठवण्यासाठी ९८६९८५२२१३ यावर मेसेज करावा.
Comments
Post a Comment