सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधोरेखित

 मुंबईतल्या ताज्या पावसाने दाणादाण उडविल्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधिक अधोरेखित झाले आहे. रेल्वे, मेट्रो, ‘बेस्ट’ बस ही सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि त्याबरोबर टॅक्सी, रिक्षा ही त्यांना अत्यंत पूरक पण खासगी मालकीची साधने यावर मुंबई ‘धावते’. मुंबईत जरा जास्त पाऊस पडला के त्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. नाल्यांची सफाई नीट होत नाही, शहरातला कचरा कमी होत नाही, ड्रेनेज यंत्रणा जुनी झाल्याने प्रश्न निर्माण होतात. यावर नुसती चर्चा होते. पुढच्या वर्षी परत तेच रडगाणे गायले जाते. त्यातच मुंबईला आडवी पसरायला जागा नसल्याने ती ‘उभी’ वाढत आहे. नवनवे तोवर उभे राहात आहेत. मुंबईत पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधांवरचा ताण कमालीचा वाढत आहे, आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत मुंबईकरांचे जीवन अधिक त्रासाचे होणार आहे यात शंका नाही.

मुंबईत मेट्रो अलीकडच्या काळात आली, तोपर्यंत रेल्वे आणि रिक्षा, टॅक्सी यावरच सर्वसामान्य माणूस विसंबून होता. ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत त्यांची गर्दी मुंबईला अधिकाधिक घुसमटवून टाकत आहे. जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चोख असते तिथे खासगी गाड्या कमी असतात. मुंबईत नोकरीला जाताना रेल्वेमधून गेल्यावर परत ‘बेस्ट’ बसने प्रवास करावा लागतो. ही बेस्ट आता ‘बेस्ट’ राहिली नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण पडला हे खरे आहे. गेल्या काही वर्षांत ‘बेस्ट’ने अनेक मार्गांवरच्या बसेस बंद केल्या अथवा त्यांचा मार्ग अर्ध्यावर आणला. बसची संख्या कमी झाली वेगवेगळ्या कारणांमुळे बस प्रवाशांनी ‘बेस्ट’कडे पाठ फिरवली. २००९मध्ये सुमारे ४४ लाख लोक ‘बेस्ट’ बसने प्रवास करत होते. आज ती संख्या ३३ लाखांवर आली आहे. २०२०मध्ये ती संख्या २५ लाखांवर आली होती. कोविडमुले हा फटका बसला असावा. तीन वर्षांत आठ लाख प्रवासी वाढले ही त्यातल्या त्यात समाधानाची बातमी आहे.

मुंबईकरांची खरेच सोय करायची असेल तर किमान सहा हजार बसेसची आवश्यकता आहे, प्रत्यक्षात आज ‘बेस्ट’कडे फक्त ३१०० बसेस आहेत. दशकभरापूर्वी ‘बेस्ट’कडे ४३८५ बसेस होत्या, आता ती संख्या १६००वर आली आहे. खासगी कंत्राटदारांकडून आणखी १५०० बसेस चालविल्या जातात. हा आकडा अपुरा आहे, असे ज्येष्ठ पत्रकार विद्याधर दाते यांनी पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिले आहे. अलीकडेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये गेल्या आठवड्यात बेस्ट बसेससंदर्भात बातमी होती. त्यात हा उल्लेख होता. दाते गेली अनेक वर्षे ‘बेस्ट’ बस, त्यांचे प्रश्न, प्रवाशांचे प्रश्न याबाबत लढा देत आहेत. ते स्वतः टाइम्समध्ये होते तेव्हा या विषयावरच्या असंख्य बातम्या त्यांनी दिल्या आहेत. ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ या समूहाचे ते सदस्य आहेत. ‘बेस्ट’ने प्रवाशांना अधिक सोयी द्याव्यात, गाड्यांची संख्या वाढवावी, फेऱ्या वाढवाव्यात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मदत करावी यासाठी दाते व त्यांचा समूह प्रयत्न करीत असतात. आजही ज्या बेस्ट बस रस्त्यावर धावतात त्या उत्तम सेवा देतात. मग बसची संख्या वाढवून अधिक प्रवासी आले तर आर्थिक फायदा बेस्टचाच होईल आणि लोकांची सोय होईल हा विचार सर्वांपर्यंत जायला हवा.

‘बेस्ट’ने काही काळापूर्वी २०० एसी डबलडेकर बसेस आणण्याची घोषणा केली खरी पण आतापर्यंत त्यातील बराच बस सेवेत आल्या आहेत. जुन्या डबलडेकर बसेस भंगारात जातील, इतर सध्या बसेससुद्धा कालांतराने कमी होत जातील. मग आताची स्थिती बरी असे म्हणायची पाळी येईल. ‘बेस्ट’ला सरकारी अनुदान मिळते. मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांचा कारभार पाहिला जातो. ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. मुंबई सर्व अर्थाने सुरळीत चालावी हे पाहणे या महानगरपालिकेचे काम आहे. अशावेळेस मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी किती वाढत आहेत हे सांगताना पालिकेचा पैसे बेस्टला अधिक का मिळत नाही, ते मात्र सांगितले जात नाही. हा प्रश्न राजकारणाचा नाही. बेस्टची अधोगती कोणाच्याही राज्यात /काळात झाली असली तरी ती एका दिवसात झालेली नाही. सर्वच राजकारणी हे जाणतात. अनेक देशांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सरकारी अनुदानावर चालते, त्यामुळे मुंबईत ती का चालू नये हे कळू शकत नाही. राज्यात कोणेएके काळी सर्वोत्तम असणाऱ्या एसटी सेवेचा आज बोजवारा का उडाला हे सर्वाना माहीत आहे. ही सेवा नीट चालू राहण्यासाठी एसटी कर्मचारी, चालक, वाहक अतोनात प्रयत्न करतात. परंतु, त्यांना महिन्याला (आधीच कमी असणारा) पगारही वेळेवर मिळत नसला तर ते तरी काय करणार. तेच ‘बेस्ट’ सेवेचे झाले तर मुंबईसाठी तो सर्वात मोठा धक्का असेल.

सात ऑगस्टला ‘बेस्ट’ दिवस असतो त्या दिवशी कोतवाल उद्यान ते वडाळा बस डेपो असा एक मोर्चा ‘बेस्ट’प्रेमी कार्यकर्ते काढणार आहेत. ‘बेस्ट’ बसची संख्या वाढवा, म्हणजे आपोआप फेऱ्या जात होतील आणि मग प्रवासी व ‘बेस्ट’ या दोघांचाही फायदा होईल, हे सांगण्यासाठी हा मोर्चा असेल. जुन्या डबलडेकर बसच्या समोर स्वतःचे फोटो काढून ती आठवण जपणे हा एक भाग झाला पण अशा चळवळीत सामील होऊन ‘बेस्ट’वृद्धीसाठी प्रयत्न करणे हा दुसरा भाग झाला. दोन्हीमध्ये ‘बेस्ट’बद्दल असलेली आस्था , प्रेम दिसले. ते महापालिका प्रशासन अथवा राज्य सरकार याना कधी दिसेल हा खरा प्रश्न आहे.

मुंबईच नव्हे तर राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवेचा बोजवारा वाजला आहे. सेवा तोट्यात चालते आहे असे सांगून अधिक बस, अधिक सुविधा द्यायच्या नाहीत, मग प्रवासी घटले की तोटा वाढला असे सांगून पुन्हा रडायचे हा प्रकार चालतोच.

मुंबईत ‘बेस्ट’ असो व अन्य शहरातली बस सेवा असो, ती टाळून लोक खासगी वाहने का वापरतात असा प्रश्न विचारून चालणार नाही. जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसते तिथेच खासगी गाड्या वाढतात. मुंबईत २०२२-२३ मध्ये मुंबई सेंट्रल RTO मध्ये ६४८७६ नव्या वाहनांची नोंद झाली. २०२१-२२ मध्ये हाच आकडा ५१५५६ होता. लोकांकडे जास्त पैसे आला म्हणून ते गाड्या घेतात असे म्हणून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इच्छित स्थळी जायला उत्तम बस सेवा नाही म्हणूनही लोक दरवेळी रिक्षा टॅक्सी करण्यापेक्षा स्वतःची गाडी घेणे पसंत करतात. (मुंबईत पार्किंगसाठी जागा मिळत नाहीत म्हणून स्वतःची गाडी घरी ठेवून टॅक्सी रिक्षाने प्रवास करावा लागतो हे भाग वेगळा !)

देशात अनेक शहरांमध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यात आले आहे. राज्यांतर्गत चालणारी रेल्वे किंवा एका शहरापुरती चालणारी रेल्वे यांत गेल्या काही वर्षांत कमालीची सुधारणा झाली आहे. ताशा प्रकारची सुविधा बस सेवेमध्ये झाली नाही, हे सर्वांचे दुर्दैव आहे. मुंबईतल्या ताज्या पावसाने बेस्ट बसही रस्त्यावर धावू शकल्या नाहीत हे खरे असले तरी लोकांना शेवटी रेल्वे व बस यांचाच आधार असतो हे लक्षात घ्यायला हवे.

गेल्या दोनतीन दशकांमध्ये मुंबई जशी वाढली आहे, ते बघता या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज अधिक भासत आहे हे लक्षात घ्यायला हवे. प्रवासाची गरज काही अंशी मेट्रो रेल्वे पूर्ण करील हे खरे असले तरी बस सेवा परिपूर्ण होत नाही तोवर काही फरक पडणार नाही. पुढचे वर्ष निवडणुकीचे आहे. आश्वासनाशिवाय दुसरे काहीही मिळणार नाही, हे लक्षात ठेवा !

Comments