राजकीय नाती दुरावत चालली …
अजितदादा पवार आज ना उद्या धाडसी पाऊल उचलणार हे गेल्या काही महिन्यांच्या त्यांच्या हालचालींवरून दिसत होते. ते त्यांनी दोन जुलै २०२३ रोजी उचलले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांसह त्यांचा शपथविधी झाला तेव्हा डबल इंजिन सरकारला आणखी एक इंजिन मिळाले. आता यात कोणत्या इंजिनची ‘पॉवर’ जास्त, कोणाची कमी हा प्रश्न या घडीला बिनबुडाचा आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, देवेंद्र फडणवीस यांचा भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हे तिघे एकत्रितपणे महाराष्ट्राचा विकास खूपच वेगाने करणार आहेत, हे बघून राज्यातील मतदार पावसाने सुखावतो तसा सुखावला आहे असे काही जणांना वाटायला लागले आहे, असे दिसते. शरद पवार यांनी आता वयाच्या ८३ व्या वर्षी पुन्हा मैदानात उतरून नव्याने पक्षबांधणी करण्याचा निर्धार केला आहे. त्याचवेळी अजितदादांच्या ‘मी राष्ट्रवादी पक्षातच आहे’, या दाव्यावर कोणताही न्यायालयीन लढा न देण्याचा निर्णयही घेतला आहे. या सगळ्यात खरी अडचण आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्यावर विसंबून मूळ शिवसेना सोडून नव्या राजकीय समझोत्यात सामील झालेल्या आमदारांची. उद्या त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर आणखी वेगळे प्रश्न निर्माण होती हा भाग वेगळा. ही सगळी खिचडी लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवायची, एकदा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून अपेक्षित जागा मिळाल्या की मग राज्याकडे बघू, असा विचार भाजपच्या महाराष्ट्रातील ‘जाणत्या राजा’ने केला असू शकतो.
जशी शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अडचण होईल (नेत्यांची कधीच होत नसते) तशीच अडचण भारतीय जनता पक्षात होईल. असंख्य निष्ठावान कार्यकर्ते केवळ पदासाठी काम करत नसले तरी अमुक एक टप्प्यावर आपल्या कारकिर्दीचे चीज व्हावे अशी अपेक्षा बाळगून असतात. त्यांचे काही चूक नाही. राष्ट्रवादीच्या लोकांची भाजपमध्ये आवक झाली नसली तरी सरकारमध्ये झाली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम भाजप कार्यकर्त्यांवर होणारच. ही नाराजी सगळ्याच पक्षांत वाढू लागली की बंड होते हे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी दाखवून दिलेच आहे. यापासून इतरांनी वेळीच धडा घेतलेला बरा !
भारतीय राजकारणात पक्षातील वा सरकारमधील फूट हा प्रकार नवीन नाही. अशा फुटीनंतरच पक्षांतर विरोधी कायदा आणला गेला. त्यातूनही पळवाट काढली जाते हेही वेळोवेळी दिसून आले आहे. या सगळ्यात अडचण होते ती सामान्य कार्यकर्त्याची. काही वर्ष ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी लढा दिला, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे आणि आपल्या नेत्याला निवडून आणायचे, तेही तो नेता किती काळ त्याच पक्षात वा त्याच आघाडीत राहील हे माहीत नसताना ! उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आघाडी केली म्हणून आम्ही बाहेर पडलो असे सांगणारे शिंदे गटातले आमदार आता राष्ट्रवादी पक्षाबरोबरच सत्ताधारी म्हणून एकत्र बसणार आहेत, हीच तर राजकारणाची करामत आहे. कालचा राजकीय शत्रू आजचा मित्र किंवा आजचा मित्र दुसऱ्या दिवशी सकाळी शत्रू होणे हे भारतीय राजकारणात नवीन नाही.
वेळेवर संधी न मिळाल्याने अस्वस्थ होऊन वेगळे पाऊल उचलले जाणे, प्रसंगी जवळचे नातेही विसरले जाणे हेही नवीन नाही. गेल्या दोनतीन दशकांचा विचार केला तर राज व उद्धव ठाकरे, पंकजा व धनंजय मुंडे आणि आता अजितदादा व सुप्रिया सुळे या जवळच्या नात्यातील जोड्या प्रामुख्याने लक्षात येतात. या सगळ्यांनी परस्परांमधील ‘कौटुंबिक’ नाते तोडले नसले तरी एकाच घरातील अथवा घराण्यातील राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे वेगळ्या राजकीय वाटा मात्र स्वीकारल्या आहेत. हे सगळे का वेगळे झाले याचा इतिहास आपल्यासमोर आहेच. राज आणि उद्धव एकत्र येणार, निदान कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे, अशी बातमी आज एका टीव्ही चॅनेलवर पाहिली आणि हा इतिहास परत समोर आला. राज ठाकरे गेले वर्ष दोन वर्ष सतत वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत आहेत. ते भाजपबरोबर जाणार का की वेगळी वाट कायम ठेवणार वगैरे चर्चा अनेक वेळा झाल्या. अलीकडची वक्तव्ये पाहिली तर ते राजकीयदृष्ट्या कमालीचे अस्वस्थ असल्याचे दिसते आहे. त्यांच्या सभेला होणारी गर्दी आणि मिळणारी मते याचे प्रमाण अजून जमत नसले तरी अधिक आक्रमकपणे राजकारण करीत आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत उद्धव खरेच राज यांच्याशी जुळवून घेतील का, कि दोन्ही भाऊ वेगळेच राहतील हा प्रश्न औत्सुक्याचा आहे.
पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यातला राजकीय वाद गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अधिक उफाळून आला. पंकजा याना २०१४ मध्येच थेट मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडायला लागली. धनंजय मुंडे यांनी भाजपमध्ये न राहता राष्ट्रवादीची वाट धरली . पंकजा यांची राजकीय धुसफूस चालूच आहे. अधूनमधून काही राजकीय वक्तव्ये करून त्या चर्चेत राहात असतात, पण त्यांच्या हाती काही लागत नाही. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकत्र आले तेव्हा त्यांना परत मंत्रिपदाची ओढ लागली, पण ते मिळाले नाही. धनंजय मुंडे यांनी मात्र राष्ट्रवादीतच राहूनही भाजपशी नव्याने सोयरीक करून मंत्रिपद मिळवले आहे. पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का की आणखी कोणत्या पक्षात जाणार, या चर्चा अधूनमधून रंगतात, पण पुढे काहीच होत नाही.
अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील राजकीय संघर्ष लपून राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा अजितदादांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या असू शकतात. अर्थात काकांनी तीन दिवसातच माघार घेतली आणि काही दिवसांनी मुलीला कार्याध्यक्ष करून टाकले. तेव्हाच अनेक वेळा मनात असलेले बंड अजितदादांनी प्रत्यक्षात करायचे हे ठरवले असणार. तसे वेळोवेळी भारतीय जनता पक्ष गळ टाकून बसला होताच. लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा हेच लक्ष्य असल्याने मग यावेळी भाजपनेही अजितदादांचे घड्याळ आपल्या हातावर बांधले. अजितदादा तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी पक्षातच असूनही ते व सुप्रियाताई अधिकृतपणे वेगळे झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक बहीण – भाऊ राजकीयदृष्ट्या एकमेकांना दुरावले. अजितदादा आणि शरद पवार हे काका – पुतण्याचे नातेही दुरावले.
निवडणूक जवळ आल्यावर अथवा आपल्या मुलाला अथवा मुलीला राजकीय संधी मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्या ‘वेगळ्या’ राजकीय प्रवासाला अनुमती मिळणे हे नवीन नाही. पण नंतर काही कालावधीत ते एकत्रही येतील अशी शक्यता असते. मी उल्लेख केलेल्या तीन जोड्या अजून तरी राजकीयदृष्ट्या एकमेकांपासून दूर राहिल्या आहेत. नजीकच्या भविष्यकाळात म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होईपर्यंत आणखी किती नाती राजकीय दृष्ट्या तुटतील वा जुळतील हे पाहणे मनोरंजक ठरेल.
महाराष्ट्रात राजकारण कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही करवत नाही. आजच टीव्हीवर काँग्रेसचे आमदारही फुटण्याच्या तयारीत अशी बातमी पाहिली. (कितपत खरी ते माहीत नाही. अशा अनेक बातम्या सोडल्या जातात, नंतर गायब होतात.) परंतु, त्याही पक्षाच्या काही आमदारांना महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली त्यांना रोखणारे आपण कोण?
असे म्हणतात की प्रेम आणि युद्धात सगळे काही माफ असते. आता प्रेम, युद्ध आणि राजकारण यात सगळे माफ असते असे म्हणावे लागेल !
Comments
Post a Comment