वाढते प्रदूषण .. आता तरी जाग येईल?

 प्रदूषणाने आरोग्यावर परिणाम होतो हे आपल्याला माहीत आहे, पण तो नेमका किती होतो याबाबतची मते प्रत्येकाची वेगवेगळी असतील. शिकागो विद्यापीठाने केलेल्या Energy Policy Institute (EPIC) ताज्या पाहणीत या प्रदूषणाची तीव्रता पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, चीन, इंडोनेशिया आणि नायजेरिया या देशांमधील लोकांचे आयुष्य प्रदूषणामुळे किमान आठ वर्षांनी कमी होत आहे, असा हा अहवाल सांगतो. हे प्रदूषण प्रामुख्याने कशामुळे होते? वाहनांमधून निघणारा धूर आणि इंधनाचे ज्वलन यांमधून ते सर्वाधिक होते. वर उल्लेख केलेल्या देशांमध्येच नव्हे तर जगभरात प्रत्येकाचे आयुष्य साधारणपणे सव्वादोन वर्षांनी कमी होते आहे. म्हणजेच एरवी ते जितके जगू शकले असते त्यापेक्षा सव्वादोन वर्षे आधी ते मृत्युमुखी पडत आहेत. इंग्रजीत ज्याला particulate matter म्हणतात (म्हणजेच PM2.5) त्या घटकांमुळे हे प्रदूषण होते. त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे होते. – PM2.5 pollution is caused by any liquid or solid particle floating in the air that is 2.5 microns or smaller in diameter, allowing it to bypass the body’s natural defences and penetrate the lungs. हा परिणाम भयंकर आहे.

धूम्रपानाने  जेवढे लोक मरतात तेवढे आता प्रदूषणाने मरत आहेत. दारू प्यायल्याने आणि अशुद्ध पाणी प्यायल्याने जेवढे मृत्यू होतात त्याच्या तिप्पट ही संख्या आहे. आशिया आणि आफ्रिका या दोन खंडांना याचा सर्वाधिक फटका बसतो. २०१३ पासून नंतरच्या काळात प्रदूषणात जी वाढ झाली त्यापैकी ५९ टक्के भारतात प्रदूषण वाढले, असे हा अहवाल सांगतो. जगातील सर्वात प्रदूषित महानगर हा ‘मान’ (?) नवी दिल्लीला मिळाला आहे. इंडोनेशियातील जाकार्ता हेही सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत गणले जाते. अनेक शहरांमध्ये हृदयविकार आणि श्वसनविकार यांचे एक प्रमुख कारण हे प्रदूषण असते, असे सांगितले जाते.

चीनमध्ये अजूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडाच्या सहापट जास्त प्रदूषण आहे, तरीही अहवालात चीनचे थोडे कौतुक आढळते. कारण २०१३नंतर चीनने प्रदूषणविरोधी मोहीम राबवली आणि त्यामुळे त्यांची अशुद्ध हवा ४२.३  टक्क्यांनी कमी झाली. चिनी नागरिकांचे आयुष्य सव्वादोन वर्षांनी वाढले. परंतु, हे अशुद्ध हवेचे प्रमाण सगळ्या देशांनी खूप कमी करण्याची गरज आहे, हे या साऱ्या अहवालावरून लक्षात येते. आणखी एक बाब येथे स्पष्ट होते. ती म्हणजे एड्स, मलेरिया आणि टीबी या रोगांना तोंड देण्यासाठी जगभरात चार अब्ज डॉलरपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला जातो. प्रदूषण निवारणासाठी  याच्या काही टक्केही निधी उपलब्ध करून दिला जात नाही, असे अहवाल म्हणतो. म्हणजेच सर्व देश प्रदूषणाबाबत अजूनही फार गंभीर नाहीत असे समजायचे का?

मागे म्हणजे २०१९मध्ये Lancet ने केलेल्या पाहणीत असे आढळले होते की, असे वेळेआधी (म्हणजे पूर्ण निरोगी आयुष्य मिळाल्यावर जेवढे आयुष्य मळेल तेवढे) मरण पावलेल्या लोकांमुळे अर्थव्यवस्थेचे जे नुकसान होते ते जवळपास ३६.७ अब्ज डॉलर एवढे आहे. पुढे २०२१ मध्ये एका पाहणीत आढळून आले की भारतात प्रदूषणामुळे  लोक आजारी पडल्यावर अर्थातच नोकरीवर जाऊ शकत नाहीत, त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होतो, ग्राहकांचे नुकसान होते आणि त्याचा पर्यटनावरही विपरीत परिणाम होतो. यामुळे दरवर्षी ९५ अब्ज डॉलरचा फटका बसतो. हे सगळे आर्थिक नुकसानीचे आकडे पाहिले की आपला तोटा किती होत आहे ते लक्षात येते. तो फक्त आर्थिक नाही. प्रदूषण रोखण्यासाठी जो खर्च करावा लागेल तो यापेक्षा निश्चित कमी असेल, परंतु आर्थिक व अन्य उपाययोजना करणार कोण आणि कशा हा प्रश्न आहे.

आज २०२३च्या उत्तरार्धातही नवी दिल्लीच्या प्रदूषणाच्या बातम्या सातत्याने येत असतात. प्रदूषणामुळे दिल्लीकर कसे आजारी पडतात, विमाने, रेल्वे यांच्यावर कसा परिणाम होतो, हे सांगितले जाते. भारताच्या प्रमुख शहरांमध्ये किती तापमान आहे याच्या बातम्या / माहिती देण्याचे काम टीव्ही वाहिन्या करत असत. आता त्यांना तापमानाप्रमाणेच हवेचा दर्जा (Air Quality Index) कोणत्या शहरांत किती आहे हेही सांगावे लागते आणि नागरिकांना त्याकडे लक्ष द्यावे लागते ही वस्तुस्थिती आहे. या प्रदूषणानंतरही भारतात अनेक लहानमोठ्या शहरांत नवनवीन गाड्या रस्त्यावर येत आहेत. उपलब्ध सुविधा आणि रस्ते, प्रदूषण यांचा विचार करता त्यांचा आकडा किती भयाण परिणाम करतो याची कल्पनाही येणार नाही. भारतात आता इलेक्ट्रिक वाहने आली आहेत. त्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. परंतु, प्रदूषण कमी होण्यासाठी वा नाहीसे होण्यासाठी अजून प्रचंड मोठा पल्ला गाठायचा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन इथेनॉलवर चालणारी गाडी रस्त्यावर आणली आहे. पेट्रोल – डिझेलमुळे होणारे प्रदूषण यामुळे टळू शकेल किंवा ते लक्षणीयरीत्या कमी तरी होईल. भारतात फक्त मोटारगाड्यांमुळेच प्रदूषण होते असे नाही. प्रदूषण करणाऱ्या प्रत्येक घटकांवर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा २०४७ सालापर्यंत विकसित देश होण्याचे स्वप्न याच प्रदूषणात विरून जाईल.

विविध विकासकामांसाठी होणारी वृक्षतोड, त्या प्रमाणात नव्या वृक्षलागवडीकडे न दिलेले लक्ष, या साऱ्याचा हवामानावर झालेला परिणाम, विविध कारणामुळे जागतिक हवामानात होणारे भयंकर बदल हे सारे प्रश्न भारतापुढेच नव्हे तर जगापुढे ‘आ’ वासून उभे आहेत. कमी अधिक पावसाच्या प्रमाणामुळे सध्या महाराष्ट्रात काय झाले आहे, ते आपण बघतच आहोत. त्याचा दोष प्रत्येक वेळेस ‘अल निनो’वर टाकून मोकळे होता येणार नाही. शेती, शेतकरी आणि त्यावर आधारित असलेली अर्थव्यवस्था हे सारे सुधारायचे असेल तर अनेक प्रश्नांचा सामना करावा लागेल. प्रदूषण हा त्यातला एक महत्वाचा घटक आहे हे निश्चित.

Comments