विश्वाची नवलकथा !

चंद्रयान -३ चंद्रावर उतरल्यावर आपण काही दिवसांतच सूर्याचा आभास करण्यासाठी आदित्य एल वन या नावाने मोहीम हाती घेतली. या दोन्ही घटनांबद्दल भारतात प्रचंड प्रमाणात जल्लोष झाला, आनंद व्यक्त झाला. इस्रोच्या कामगिरीबद्दल कमालीचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला. जगभरात इस्रोचे कौतुक झाले, ही जगाची मोहर तेवढीच महत्वाची होती. केवळ या विषयापुरते नव्हे तर एकूणच विश्व कसे आहे, परग्रह कसे आहेत, आकाशगंगा म्हणजे काय, हे विश्व कसे निर्माण झाले, त्यात कसकसे बदल झाले, अजूनही आपल्याला हे विश्व नीटसे कळले नाही – ते कधी कळणार, या साऱ्या पसाऱ्यात पृथ्वी एका सूक्ष्म कणाएवढी आहे, मग या पृथ्वीचे पुढे काय होणार, म्हणजेच पर्यायाने मानवजातीचे (आणि अन्य ग्रहांवर जीव असलेच तर त्यांचे काय होईल) यांसारखे असंख्य प्रश्न आपल्याला पडलेले असतात. त्याची संपूर्ण उत्तरे अजून कोणालाही मिळालेली नाहीत. त्यामुळे आपली उत्सुकता अधिक वाढायला मदत झाली आहे. मानव विज्ञानात प्रगती करत आहे, आता सारे कळेल असे वाटत असतानाच नवे विश्व समोर येते आणि मग हा सारा पसारा आहे तरी किती असे विचार पुन्हा आपल्या मनात येतात. ….

विश्वाच्या निर्मितीवर, त्यातील शक्यतांवर आपल्याकडे वा परदेशात पुस्तके नाहीत असे नाही. या संदर्भात सुकल्प श्रीकांत कारंजेकर यांनी लिहिलेले व पुण्याच्या ‘रोहन प्रकाशन’ने काढलेले ‘आपलं विश्व आणि त्याची नवलकथा हे ‘विश्वाच्या उत्पत्तीच्या रंजक इतिहासापासून भविष्यात विश्व कसे असेल इथपर्यंत’ सांगणारे पुस्तक अतिशय महत्वाचे ठरते. पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकाचा परिचय ‘ शिक्षण : अभियांत्रिकी (B.E.). माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १७ वर्षांचा अनुभव. विश्वशास्त्र, उत्क्रांती, भूगर्भशास्त्र, जागतिक इतिहास, मेंदूशास्त्र, ‘वर्तनवादी अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयांचा अनौपचारिक अभ्यास. यापैकी काही विषयांवरील लेख विविध मासिकांमध्ये प्रकाशित” असा देण्यात आला आहे. पुस्तक वाचल्यावर त्यांच्या अभ्यासाची / चिकित्सक वृत्तीची/ संशोधनाची आणि कठीण विषयही अत्यंत सोप्या मराठी शब्दांत मांडण्याच्या शक्तीची चांगलीच कल्पना येते.’मी स्वतः शास्त्रज्ञ नाही, त्यामुळे भौतिकशास्त्राच्या आकलनाला मर्यादा आहेत. पण विश्वाच्या गोष्टीवर मनापासून प्रेम करणारा मी एक वाचक आहे ” असे लेखक मनोगतात म्हणत असले तरी पुस्तक वाचल्यावर हे प्रेम किती मनापासून आहे हे कळते. सोप्या मराठी भाषेत लिहिले असले तरी आजच्या पिढीला कळावेत म्हणून शेवटी मराठी शब्द व त्याचा इंग्रजी शब्द सांगणारी सूचीही आहे. पुस्तकात असंख्य छायाचित्रे, ग्राफ, अनेक शास्त्रज्ञांचे दुर्मिळ फोटो, त्यांची सखोल माहिती, त्यांचे या क्षेत्रातील काम, ते करताना आलेल्या अडचणी, त्या- त्या वेळेचे समज -गैरसमज आणि या साऱ्याची सूत्रबद्ध मांडणी. म्हणूनच आपल्याला या पुस्तकात पुढील साऱ्या गोष्टी मिळतात.

१. विश्व कसं निर्माण झालं, याबद्दलच्या रंजक पुराणकथा. २. गेल्या अडीच हजार वर्षांतील विज्ञानाची वाटचाल. महत्त्वाचे परदेशी तसंच भारतीय वैज्ञानिक (उदा. आर्यभट्ट, मेघनाद साहा, चंद्रशेखर इत्यादी), त्यांच्या कार्याचा परिचय. ३. महिला शास्त्रज्ञांचं कार्य, त्याचं महत्त्व, त्यांचा लढा (व्हिरा रुबिन, हेनरिटा लेव्हिएट)

४. विज्ञानातले नवे शोध, त्यामागची कारणं, कथा (उदा. गॅलिलिओ, केप्लर, आर्यभट्ट, इ.) (मुलांना अभ्यासासाठी, निबंध लेखनासाठी उपयुक्त). ५. सापेक्षतावाद (Theory of Relativity) आणि पुंजवाद (Quantum Theory) यांचा सोप्या भाषेत, रोचक उदाहरणं आणि आकृत्यांच्या आधारे परिचय. ६. स्थिर स्थिती (Steady State Universe Theory) आणि महास्फोट (Big Bang Theory) या सिद्धान्तांचा उदाहरणांसह परिचय

७. महास्फोटाचा सिद्धांत आणि फुगवट्याचा सिद्धांत (Inflationary Universe Theory) यांचा विविध उदाहरणांच्या आधारे सविस्तर परिचय. ८. आपल्या विश्वात १०पेक्षा अधिक मिती (Dimensions) असल्याची विलक्षण मांडणी करणाऱ्या स्ट्रिंग सिद्धान्ताचा (String Theory) परिचय, ९.काल-प्रवास अर्थात Time Travel शक्य आहे का, याची रंजक मांडणी,

१० . अवकाशातल्या Cosmic Microwave Background Radiationची गोष्ट. ११. विश्वाची घनता आणि आकार यांचा शोध शास्त्रज्ञ कसा लावतात, याची आकृत्यांसह मांडणी. १२. कृष्ण वस्तुमान (Dark Matter) आणि कृष्ण ऊर्जा (Dark Energy) म्हणजे काय? त्याबद्दलची रंजक माहिती. १३. दैवी मूलकण अर्थात God Particle म्हटलं गेलेलं हिग्स बोसॉन म्हणजे काय? त्याचा परिचय।

१४. बिग बँग सिद्धांतानुसार विश्वाच्या सुरुवातीच्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं, त्याचे प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध आहेत, त्याबद्दलची माहिती. १५. विश्व एकच नसून अनेक विश्वं असू शकतात का, या वैज्ञानिक शक्यतांचा रंजक, समजेल असा ऊहापोह. १६. आपल्या विश्वाच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असलेले वस्तुमान, ऊर्जा कुठून आले? काळाची दिशा कशी ठरते? या विषयावर माहिती. १७. आपल्या विश्वाचं भविष्य कसे असेल? विश्वाच्या भविष्यात काय काय घटना घडतील? आपल्या विश्वाचा अंत कसा घडण्याची शक्यता आहे का, त्याची माहिती. १८. आजवर घडलेल्या वैज्ञानिक शोधांची, घडामोडींची अवद्ययावत माहिती .

प्रत्येक प्रकरणात लेखक माहिती देताना काही ठळक मुद्दे अधोरेखित करतो. उदा. ‘महाविस्फोटाआधी’ हे प्रकरण बघा. लेखक म्हणतात – ”शंभर वर्षांआधी माणसाला आकाशगंगा हेच पूर्ण विश्व आहे असं वाटायचं. नंतरच्या दशकांत आकाशगंगेसारखी अब्जावधी तारकाविश्वं आहेत असं लक्षात आलं. ह्यातून आपल्या विश्वाची प्रचंड व्याप्ती लक्षात आली. गेल्या काही दशकांमध्ये आपल्या भौतिकशास्त्राच्या ज्ञानात प्रचंड भर पडली आणि त्यातून अनंत विश्वांची कल्पना पुढे आली. आपल्या विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यात माणसाचं स्थान नगण्य आहे ह्यात शंका नाही, पण अवकाशकाळाच्या सतत विस्तारणाऱ्या पटलावर आपल्या विश्वाचंही स्थान नगण्य असण्याची शक्यता आहे.”

”भौतिकशास्त्राचे नियम, मूलकणांच्या गुणधर्मांत सर्वत्र एकरूपता आहे. ह्याच एकरूपतेच्या आधारे आपण विश्वाची सद्यस्थिती, भूतकाळ आणि भविष्याचा अंदाज घेऊ शकतो. पण हे झालं आपल्या विश्वाबद्दलचं. दुसऱ्या विश्वातही भौतिकशास्त्राचे मूलभूत नियम आणि मूलकणांचे गुणधर्म आपल्या विश्वासारखेच असतील का? ”

”इतर विश्वांचा जन्मदेखील आपल्या विश्वासारखा फुगवट्याच्या क्रियेतून घडला असला तरी त्यांच्या उत्पत्तीच्या वेळची नेमकी परिस्थिती आपल्या विश्वापेक्षा खूप वेगळी असू शकते. ह्यामुळे दुसऱ्या विश्वातील मूलकणांचे गुणधर्म वेगळेही असू शकतात.”

अशा प्रकारच्या ठळक नोंदी / टिप्पणी प्रत्येक रकरणात आहेत. विश्वाचे अंतरंग उलगडून दाखवताना मनात काय तरंग उमटतात हे सांगायची ही पद्धत सर्वाना भावेल. ‘आपलं विश्व’सारखे पथदर्शक ठरेल असे पुस्तक काढणे हे सोपे नाही. ‘असा घडला भारत’ किंवा त्यानंतर विविध विषयावरील संच, वेगवेगळ्या विषयात रस असणाऱ्या लेखकांची आणि वाचकांची जपणूक हे केवळ ‘व्यावसायिक गरज’ हे लक्ष्य ठेवून होत नाही. त्यासाठी काळानुसार बदलण्याची आणि पुढे जाण्याची वृत्ती लागते . ‘आपलं विश्व’ हे पुस्तक त्याचाच एक टप्पा आहे. प्रतिभाशाली लेखक प्रणव सखदेव यांनी स्वतःचा लेखनव्याप सांभाळताना केलेले विविध विषयांवरच्या पुस्तकांचे संपादन आतापर्यंत नावाजले गेले आहेच. याची झलक याही पुस्तकात ठळकपणे दिसते. या पुस्तकातील ‘मनोगत’, ”पुस्तकात काय आणि कसे वाचाल?” आणि शेवटचे ‘निरोप’ ही तीन प्रकाराने इथे मुद्दाम देत आहे. त्या सर्वांवरून पुस्तकाचा आवाका लक्षात येईल.

मनोगत

विश्व म्हणजे तुम्ही – मी आणि आपल्या आजूबाजूला पसरलेला अनादी, अथांग भासणारा अजस्र पसारा. अणूंच्या गर्भातील सूक्ष्मकणांपासून ते अब्जावधी तारे असलेल्या तारकाविश्वांपर्यंत! आणि कदाचित त्याच्या पलीकडे असणाऱ्या असंख्य विश्वांपर्यंतचा ! हे पुस्तक माणसाच्या विश्व समजून घेण्याच्या प्रवासाला समर्पित आहे. विश्वाच्या गोष्टीत सगळं काही येतं. तारे-तारकाविश्वांच्या उगमापासून ते जीवसृष्टीच्या गोष्टीपर्यंत. हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतींमध्ये रचल्या गेलेल्या अद्भुत मिथककथांपासून ते अत्याधुनिक विश्वशास्त्राच्या सिद्धांतांपर्यंत. हे पुस्तक विश्वाच्या उगमापासूनच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतं आणि विश्वाच्या अंताबद्दल आजचे प्रचलित सिद्धांत काय सांगतात तेदेखील मांडतं. ह्यात विश्वशास्त्राच्या संशोधनाचा इतिहास येतो, महत्त्वाच्या शास्त्रज्ञांचा परिचय येतो, महत्त्वाच्या सिद्धांतांचा आणि संज्ञांचा परिचय येतो. शिवाय फुटकळ चिंतनाचाही भाग येतो – विश्वामधील आपल्या स्थानाबद्दल, विश्वाच्या गोष्टीतील देवाच्या स्थानाबद्दल तसेच वास्तवाबद्दल, आपल्या ज्ञानाच्या मर्यादांबद्दल ! मला विश्वाबद्दल पुस्तक लिहावंसं का वाटलं ह्याचा विचार करताना मला लहानपणीचा एक प्रसंग ठळकपणे आठवतो. हा प्रसंग नीट कळावा ह्यासाठी माझी थोडी वैयक्तिक पार्श्वभूमी सांगावी लागेल.

माझे लहानपण वर्ध्यात गेले. वर्ध्यात गांधी आणि विनोबांच्या प्रेरणेतून चालणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. माझे वडील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र ह्या संस्थेत कार्यरत होते आणि आई अध्यापिका होती. माझ्या आई-वडिलांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यातील काही लोक डॉक्टर होते, काही सामाजिक कार्यकतें होते, काही लेखक होते तर काही इतर क्षेत्रांमध्ये कार्यरत होते. हा घट्ट असा मित्रपरिवार होता आणि सर्व लोक महिन्यातून एकदा तरी एकत्र यायचे. मग विविध विषयांवर चर्चा व्हायच्या, एकमेकांचे विचार ऐकायला मिळायचे. आम्हा मुलांना एकमेकांशी खेळायला मिळायचं. अनेकदा कोणालातरी सर्वांसमोर एखादा विषय मांडण्याची संधी दिली जायची. अनौपचारिक वातावरणात नवनव्या विषयांना ऐकायची संधी मिळायची. अशा एका कार्यक्रमात माझे वडील महास्फोटाच्या सिद्धांताबद्दल आणि विश्वशास्त्रावर बोलले. माझ्या वडिलांचे वैचारिक वाचन चौफेर होते. पण विश्वशास्त्र हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी छोटेखानी भाषणात महास्फोटातून आपलं विश्व कसं जन्माला आलं ह्याची गोष्ट सांगितली. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा मी चौथीत किंवा पाचवीत असेन. ती गोष्ट ऐकून मी अवाक् झाल्याचं आठवतं. एवढी मोठी पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि आकाशातले अगणित तारे असलेलं विश्व एका बिंदूमधून जन्माला आलं असावं? हे कसं शक्य आहे? बाबांचं बोलणं झाल्यानंतर प्रश्नोत्तरांचा भाग झाला. बाबांच्या काही मित्रांनी त्यांना जो भाग नीट कळला नाही त्याबद्दल प्रश्न विचारले. त्याबरोबर मी बाबांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. एकामागे एक प्रश्न. कार्यक्रम संपून आम्ही घरी परतलो, पण माझे प्रश्न संपले नाही. त्या वयात ना मला सापेक्षतावादाचा सिद्धांत माहीत होता, ना पुंजवादाचा. पण बाबांनी मला शक्य तितक्या सोप्या भाषेत जमे तितक्या प्रश्नांची उत्तरं दिली. अनेक प्रश्नांची उत्तरं अजून विज्ञानाला मिळाली नाहीत असंही सांगितलं. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस चालू होते. आम्ही रात्री गच्चीवर झोपायचो. त्या रात्री लखलखणाऱ्या ताऱ्यांना
पाहत मी बाबांना ताऱ्यांच्या व विश्वाच्या जन्माची गोष्ट विचारली. आणि ती गोष्ट ऐकता ऐकता मी झोपी गेलो. आज माझे वडील हयात नाहीत. पण त्यांनी सांगितलेल्या विश्वाच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. इथे पुस्तकाच्या सुरुवातीला माझ्या मर्यादांचा नम्रपणे स्वीकार करायला हवा. विश्वशास्त्राच्या विषयावर स्टीफन हॉकिंग, स्टीवन वाईनबर्ग, ब्रायन ग्रीन, जयंत नारळीकर ह्या व ह्यांच्यासारख्या इतर मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी उत्तम पुस्तकं लिहिली आहेत. मी स्वतः शास्त्रज्ञ नाही. त्यामुळे माझ्या भौतिकशास्त्राच्या आकलनाला मर्यादा आहेतपण विश्वाच्या गोष्टीवर मनापासून प्रेम असणारा मी एक वाचक आहे. एका अनि इथे मी माझ्या वडिलांचं काम पुढे नेतो आहे. मी लहानपणापासून ऐकलेल्या आणि वाचलेल्या विश्वाबद्दलच्या गोष्टी सांगणार आहे. वाचकाला त्या विश्वशास्त्राच्या अद्भुत विषयाचा सोप्या शब्दांत परिचय करून देतील, अशी आशा आहे. ‘रोहन प्रकाशना’तर्फे हे पुस्तक प्रकाशित होत असल्याचा मला आनंद आहे.

पुस्तकात काय आणि कसं वाचाल ?

हे पुस्तक लिहिताना मला कधीकधी ‘अॅलिस इन वंडरलँड’ पुस्तकाची आठवण यायची. अॅलिसने सशाचा पाठलाग करत कुतूहलाने आणि धाडसाने अज्ञात बिळात उडी मारली. ह्या पुस्तकाची सुरुवातही एका प्रश्नाचा पाठलाग करताना झाली. तो प्रश्न म्हणजे – Why there is something rather than nothing विश्वात काहीच नसण्याऐवजी काहीतरी का आहे? हा प्रश्न सतराव्या शतकात लायबनिझने विचारला असला तरी ‘हा सगळा विश्वाचा अजस्र पसारा कुठून आला?’ अशा स्वरूपाचे प्रश्न दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी ग्रीक आणि भारतीय तत्त्वज्ञांनाही पडत होते. काही लोकांनी ह्या प्रश्नासाठी ‘देवाची इच्छा’ अशा सोप्या उत्तराचा आधार घेतला. पण ही पळवाट प्रश्नालाच नाकारणारी होती. कारण विश्व देवाने निर्माण केलं असं म्हटलं तर लगेच ‘देव कुठून आणि का आले?’ असा प्रश्न पुढे येतो. हा प्रश्न किती गहन आहे ह्याची जाणीव काही भारतीय तत्त्वज्ञांना झाली होती. त्यातूनच ऋग्वेदातील नासदीय सूक्तासारखी नितांतसुंदर रचना जन्माला आली. ह्या प्रश्नाची सुरुवात तत्त्वज्ञानातून झाली असली तरी आज हा प्रश्न विज्ञानाच्या परिघात येतो. जेव्हा शास्त्रज्ञ विश्वाच्या सुरुवातीच्या क्षणांमध्ये काय घडलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा नकळत ते ह्या प्रश्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकतात. आ माणसाने विश्व समजून घेण्याच्या दिशेने मोठी मजल मारली आहे. सापेक्षतावाद आणि पुंजवाद विश्व समजून घेण्याचा मार्ग दाखवतात. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील देदीप्यमान प्रगतीमुळे हबल, जेम्स वेब यांसारख्य अंतराळ दुर्बिणी, लिगो, सर्न यांसारख्या प्रयोगशाळांची निर्मिती झाली. आज आपण अडीच हजार वर्षं जुन्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या किती जवळ पोचलो आहोत ह्याचा आढावा घ्यावा ह्या हेतूने मी लिखाणाल सुरुवात केली. पण लिखाणाला सुरुवात केल्यानंतर समोर अनेक पर्यायी विषयांच्या वाटांचे जाळे पसरले असल्याची जाणीव झाली. सशाच्या बिळात शिरलेल्या अॅलिसप्रमाणे मी विश्वशास्त्राच्या ‘वंडरलँड’ मध्ये रमलो. ह्यामुळे पुस्तकामध्ये विश्वशास्त्र आणि व्यापक विज्ञानाच्या इतिहासाशी निगडित अशा अनेक वाट आडवाटा येतात. पण शेवटी त्या विश्वाच्या उत्पत्तीच्या मूळ प्रश्नाचा पाठलाग करतात. इथे थोडक्यात पुस्तकाच्या मांडणीचा आणि पुस्तकात काय आहे ह्याचा आढावा घेतला आहे. पुस्तकाच्या मांडणीत मुख्य असे दोन प्रवाह आहेत. एक प्रवाह विश्वाच्या भूतकाळाच्या दिशेला जातो अ विश्वाच्या उत्पत्तीच्या क्षणाला स्पर्श करायचा प्रयत्न करतो. पण विश्वाच्या भूतकाळात प्रवास करताना आपल्याला अनेक सिद्धांत, संकल्पना, गृहीतकांचा आधार घ्यावा लागतो. दुसरा प्रवाह मानवी इतिहासात प्राचीन काळापासून सुरुवात करत आत्ताच्या काळाच्या दिशेने येतो आणि माणसाचं विश्वाबद्दलचं ज्ञान व समृद्ध होत गेलं, नवे सिद्धांत, संकल्पना कशा मांडल्या गेल्या, हे सिद्धांत मांडणारे महत्त्वाचे शास्त्रज्ञ व होते त्याचा परिचय करून देतो. ह्या दोन्ही प्रवाहांच्या संगमातून माणसाला विश्वचित्र कसं उलगडत गेल ह्याची गोष्ट पुढे येते. ह्या गोष्टीचा गाभा म्हणजे आपल्या विश्वाचे ज्ञात वास्तव काय आहे ह्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं आणि हे वास्तव समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विज्ञान तत्त्वज्ञानाचा परिच करून घेणं. पुस्तकातून आपल्या विश्वाच्या वास्तवाची आणि विश्वशास्त्राची समग्र गोष्ट मांडण्याचा नम्र प्रयत्न केला आहे.

पुस्तकाची सुरुवात होते विश्वाबद्दल प्राचीन काळातील लोकांनी मांडलेल्या अद्भुत उत्पत्तिकथांच्या परिचयातून (असंख्य तेजस्वी कथा). सगळ्या संस्कृतींमध्ये आणि धर्मामध्ये विश्वाची उत्पत्ती कशी झाली, माणूस कुठून आला ह्याबद्दल सुरस उत्पत्तिकथा आढळतात. ह्या कथा म्हणजे माणसाने विश्व समजून घेण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल होतं. पुढील दोन लेखांमध्ये दोन हजार वर्षं जुन्या काळापासून सुरुवात करत ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्या विज्ञानाच्या इतिहासाचा आढावा घेतला आहे (विश्व समजून घेण्याचा प्रवास – भाग १ आणि २). एखादा शोध लागण्यासाठी अनेक गोष्टी जुळून लागतात. कधी कधी शास्त्रज्ञ नवा सिद्धांत किंवा संकल्पना मांडतात. पण त्याचे पुरावे शोध लागणारी उपकरणं किंवा तंत्रज्ञान विकसित झालं नसतं. तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर नवी निरीक्षणं पुढे येतात. पण कधी ती निरीक्षणं प्रचलित सिद्धांतांच्या चौकटीत बसत नाहीत. त्यामुळे एकतर प्रचलित सिद्धांतामध्ये बदल घडवावे लागतात किंवा नवा सिद्धांत मांडावा लागतो. ह्या सगळ्या घडामोडींतून विश्वचित्र हळूहळू कसं समृद्ध होत जातं त्याचं वर्णन ह्या भागात येतं.

विसावं शतक हे विश्वशास्त्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. कारण ह्या शतकात सापेक्षतावाद आणि पुंजवादाचे सिद्धांत विकसित झाले आणि आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया भक्कम झाला. विश्वाची गोष्ट नीट समजून घ्यायची तर सापेक्षतावाद आणि पुंजवादाचा परिचय करून घेणं आवश्यक आहे. ‘प्रकाशाच्या वेगाची गोष्ट’ आणि ‘गुरुत्वाकर्षणाची गोष्ट’ ह्या लेखांमध्ये सापेक्षतावादाचा परिचय येतो तर ‘सूक्ष्म कणांची गोष्ट’ पुंजवादाच्या सिद्धांताचा परिचय करून देते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विश्वाचं वास्तव नेमकं काय आहे ह्यावर वैज्ञानिक जगतात व्यापक विचारमंथन झालं. विश्व अनादी आणि स्थिर आहे की ते भूतकाळात विशिष्ट क्षणी निर्माण झालं ह्यावर शास्त्रज्ञांमध्ये गट पडले. अशा विश्वाच्या वास्तवाबद्दलच्या भिन्न सिद्धांतांचा परिचय ‘ज्ञाताचे विश्व विस्तारले’ आणि ‘विश्वाची विविध प्रतिमाने’ ह्या लेखांमध्ये येतो.

विसाव्या शतकात एकीकडे भौतिकशास्त्राची सैद्धांतिक चौकट भक्कम होत होती तर दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे नवीनवी निरीक्षणं पुढे येत होती. ह्यातले एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे अवकाशामध्ये सूक्ष्मतरंगांच्या रूपातील प्रारण लपलेलं आहे असं लक्षात आलं. ह्या प्रारणाच्या शोधामुळे आद्य विश्वाच्या स्थितीबद्दलच्या माहितीचे भांडारच शास्त्रज्ञांच्या हाती लागलं. सूक्ष्मतरंगांचा शोध हा महास्फोटाच्या सिद्धांताला पाठिंबा देणारा ठरला आणि त्यामुळे वैज्ञानिक जगताचं पारडं महास्फोटाच्या सिद्धांताच्या बाजूला झुकलं. एकीकडे अशी निरीक्षणं विश्वाबद्दलच्या वास्तवाचे चित्र स्पष्ट करत होती तर दुसरीकडे नव्या निरीक्षणांमधून नवे प्रश्नही पुढे येत होते. उदाहरणार्थ, तारकाविश्वांचं निरीक्षण करताना विश्वामध्ये आपल्या नजरेला पडते त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक वस्तुमान लपलेल्या अवस्थेत असतं असं लक्षात आलं. ह्यामुळे कृष्ण पदार्थाच्या अस्तित्वाची चाहूल लागली. विश्वाचा आकार समजून घेण्यासाठी केलेल्या निरीक्षणांतून विश्वामध्ये लपलेल्या अवस्थेत ऊर्जा आहे असं लक्षात आलं. सूक्ष्मतरंगांमध्ये विश्वाची कुठली रहस्यं दडली आहेत आणि कृष्ण पदार्थ आणि कृष्ण ऊर्जेचा प्रश्न काय आहे ह्याचा परिचय ‘अज्ञाताचे कण’, ‘प्रथम प्रकाश’ आणि ‘गोठलेले ध्वनितरंग’ ह्या लेखांमध्ये येतो. विश्वाचं वास्तव समजून घेण्यामागील अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की विश्व नेमकं कुठल्या मूलतत्त्वांनी बनलं आहे? प्राचीन काळातील तत्त्वज्ञांना वाटायचं की विश्व हे पंचमहाभूतांचं बनलं आहे. वस्तू ह्या सूक्ष्म अणूंच्या बनल्या असाव्या अशी कल्पना काही ग्रीक आणि भारतीय तत्त्वज्ञांनी केली होती. विसाव्या शतकात अणूच्या गर्भा लपलेल्या मूलभूत कणांचा शोध लागला. अणूंच्या गर्भातील वेगवगळी क्षेत्रं आणि ऊर्जेच्या परस्परसंबंधां मूलभूत कणांचे आणि अणूंचे गुणधर्म कसे निश्चित होतात हे लक्षात आलं. विश्वातील मूलभूत कणांच्या गुणधर्माची गोष्ट ‘निर्मितीची मूलतत्त्वे’ लेखात येते. गॉड पार्टीकल म्हणून संबोधल्या गेलेल्या हिग्ज बोसॉन कणांची गोष्ट ह्या लेखात येते.

विश्वाचे वास्तव समजून घेताना सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी घडली हे शोधण्याचा प्रयत्न करणं. गेल्या काही दशकांपासून महास्फोटाचा सिद्धांत किंवा त्याचे सुधारित रूप असलेला फुगवट्याचा सिद्धांत वैज्ञानिक जगतात प्रचलित आहे. फुगवट्याचा सिद्धांत महास्फोट का आणि कसा झाला ह्याचे स्पष्टीकरण देतो. पण हा विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत नाही. विश्वाची उत्पत्ती घडल्यान सुरुवातीच्या क्षणांत काय घटनाक्रम घडला आणि त्यामुळे आपल्या विश्वाचे गुणधर्म कसे निश्चित झाले ह्याचे स्पष्टीकरण फुगवट्याच्या सिद्धांतातून मिळते (लेख : ‘गाथा स्थित्यंतराची भाग १ आणि २’, ‘महास्फोटाआधी’). परंतु विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी घडली असावी ह्या प्रश्नाचा वेध घेताना विश्वाती ऊर्जेचा, वस्तुमानाचा उगम कसा झाला हे पाहावं लागेल, काळाचा गुणधर्म कुठून आला ते पाहावं लागे ह्या प्रश्नांचा ‘शून्याची गोष्ट’, ‘वस्तुमान, काळ आणि ऊर्जेचे बीज’ आणि ‘काळाची दिशा’ ह्य लेखांमध्ये केला आहे. काळाचा गुणधर्म समजून घेताना आपल्या विश्वाचं भविष्य कसं असेल, विश्वाच प्रवास पुढे अनंत काळापर्यंत चालेल की विश्वालाही अंत आहे हे प्रश्न पुढे येतात. विश्वाच्या आणि जीवसृष्टीच्या भविष्यात डोकावण्याचा प्रयत्न ‘रिते आकाश’ लेखातून केला आहे.

प्रचलित सिद्धांतांच्या आधारे आपण विश्वाच्या उगमापासून ते अंतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतो. प विज्ञानाचा प्रवास सतत चालू आहे. सैद्धांतिक क्षेत्रात सुधारणा घडत आहेत. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे नव निरीक्षणं पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत आज जे सिद्धांत प्रचलित आहेत ते उद्या टिकतील किंवा आपली विश्वाबद्दलची जी समज आहे ती भविष्यातही ग्राह्य ठरेल हे कसं सांगता येईल ? वास्तवाचा अ लावणारे एकाच वेळी भिन्न सिद्धांत असतात तेव्हा शास्त्रज्ञ मार्ग कसा निवडतात, विश्वाबद्दल कुठला सिद्धांत अंतिम सिद्धांत ठरू शकेल का, हे प्रश्न विज्ञान तत्त्वज्ञानाचा विचार करायला भाग पाडतात. विषयाचा ऊहापोह ‘वास्तवाचा शोध घेताना’ लेखात घडतो.

हजारो वर्षांपूर्वी चमचमत्या ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे विस्मयाने पाहताना माणसाच्या मनात हे सगळं कुठून आलं असा प्रश्न आला. आज हबल आणि जेम्स वेब दुर्बिणींनी प्रकाशित केलेल्या हजा तारकाविश्वांची छायाचित्रं बघताना मनात तोच प्रश्न आहे. विश्वाच्या गोष्टीबद्दल प्राचीन ऋषीमुनींनी विचार केला, न्यूटन, आइन्स्टाइन सारख्या मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी विचार केला. तुमचे, माझे आणि आपल्यासारख्या असंख्य लोकांचे कृतीक्षेत्र वेगवेगळे असले तरी मनात कुठेतरी विश्वाबद्दलच्या आणि वास्तवाबद्दलच्या कुतूहलाचा अंश आहे. त्यातून हे पुस्तक घडलं. विचार करण्यासाठी विश्वापेक्षा अधिक मोठा विषय कुठला असेल? हजार वर्षांपूर्वी रेड इंडियन लोकांनी गुहेतील दगडी भिंतीवर आकाशातील वेगळ्या दिसणाऱ्या ताऱ्याचं चित्र काढलं होतं. आज माणसाने अंतराळात सोडलेल्या मोठमोठ्या दुर्बिणी अवकाशाचा वेध घेत आहेत. एकेकाळी वास्तव समजवण्यासाठी कविता आणि लोककथा रचल्या गेल्या. आज क्वांटम ग्रॅव्हिटीवर काम चालू आहे. विश्वाबद्दलच्या विचारांच्या प्रवासाची गोष्ट विलक्षण आहे. विश्वाच्या ह्या सफरीवर आपलं स्वागत आहे!.

निरोप

The Cosmos is all that is or was or ever will be. Our feeblest contemplations of the Cosmos stir us – there is a tingling in the spine, a catch in the voice, a faint sensation, as if a distant memory, of falling from a height. We know we are approaching the greatest of mysteries. – Carl Sagan, Cosmos

२५ डिसेंबर २०२१ साली जेम्स वेब दुर्बीण अवकाशात सोडण्यात आली. ही आत्तापर्यंतची सर्वात प्रभावी अशी अघोरक्त (Infrared) अंतराळ दुर्बीण आहे आणि ह्या दुर्बिणीच्या वापरातून पहिल्या ताऱ्यांचं तारकाविश्वांचं निरीक्षण करता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ह्या दुर्बिणीने काढलेल्या दूरवरच्या तारकाविश्वांची छायाचित्रं गाजली. त्यातील एक छायाचित्र म्हणजे डीप फिल्ड नावाने ओळखलं जातं. जर एक वाळूचा कण बोटांच्या चिमटीत पकडून हातभार लांब अंतरावर ठेवला तर तो जितकी जागा व्यापेल तितक्या आकाराच्या अवकाशाच्या तुकड्यात लक्ष केंद्रित करून हे छायाचित्र काढलं आहे. ज्या काळाचं विश्वाचं चित्र ह्या छायाचित्रातून पुढे येतं त्या काळात विश्वाचं वय १ अब्ज वर्षांहून कमी होतं. ह्या छायाचित्रामध्ये हजारो तारकाविश्वं दिसतात, प्रत्येकी शेकडो अब्जावधी तारे असलेली. हे विश्वाच्या सूक्ष्म भागाचं दर्शन. ह्यावरून आपले विश्व किती प्रचंड आणि समृद्ध आहे ह्याचा अंदाज येतो.

ह्या अनंत, अफाट भासणाऱ्या विश्वाच्या एका सूक्ष्म कणावर आपण आपलं जग वसवलं आहे. अब्जाव वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या आणि पुढे अनंत काळापर्यंत चालणाऱ्या विश्वाच्या प्रवासात मानवप्रजात का लाख वर्षांआधी उत्क्रांत झाली. ती पुढे किती काळ टिकेल हे आपण प्रदूषण, जागतिक तापमानवाढ देशादेशांतील, वेगवेगळ्या समाजांमधील संघर्ष ह्यांना कसे आटोक्यात ठेवतो ह्यावर अवलंबून असेल. पण माणूस कितीही शहाण्यासारखा वागला तरी एक ना एक दिवस आपला प्रवास संपेल. एक दिवस सूर्याचं इंधन संपेल आणि त्याचा लाल राक्षसी तारा बनून तो पृथ्वीला गिळंकृत करेल. एक दिवस देवयानी तारकाविश‍ आकाशगंगेत सामावून जाईल. एक दिवस विश्वातील शेवटच्या ताऱ्याचं इंधन संपेल आणि विश्वात कायमच अंधार पसरेल. त्यानंतर काय घडेल? कोण जाणे!

अनंत काळाच्या प्रवाहातील क्षणभंगुर जाणिवेचे क्षण आपल्या वाटेला येतात. त्यात आपण सुखदुःख अनुभवतो, आयुष्याचा अर्थ शोधतो, आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतो. हा एक क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्या क्षणात मी हे वाक्य लिहितो आहे, तुमच्याबरोबर संवाद साधतो आहे. तुम्ही जेव्हा हे वाक्य वाचाल तेव्हा कदाचित मी अस्तित्वात असेल किंवा नसेलही. ह्या क्षणी माझ्यात, तुमच्यात जो काही विश्वाचा अंश आहे तो आजूबाजूच्या अनंत पसाऱ्याकडे थक्क होऊन पाहतो आहे, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधतो आहे. ह्या सूक्ष्म क्षणाच्या अनुभूतीत विश्व सामावलं आहे. डिप फिल्डच्या छायाचित्राप्रमाणे !

आपले विश्व एकमेव आहे की असे अजून खूप विश्व आहेत? माहीत नाही. देव अस्तित्वात आहे की नाही? माहीत नाही. आपल्या अस्तित्वाला काही अर्थ आहे का? कोण जाणे! पण एखाद्या सुंदर फुलाचा वास घेतांना, रात्रीचे शांत आकाश पाहतांना, लहान मुलांना निरागस हसतांना पाहतांना आपल्याला काहीतरी सापडतं. ते प्रत्येकाने जपावं. विश्व अनंत असतील किंवा नसतील. विश्वाच्या अब्जावधी वर्षांच्या प्रवासाच्या तुलनेत मानवी आयुष्य क्षणभंगुर आणि नगण्य भासेल. पण विचार करता येणारं, जाणिवेचे काही मोजके क्षण जे आपल्या प्रत्येकाच्या वाटेत येतात, ते जपावे. ओंजळभर विश्व प्रत्येकाच्या वाट्याला येतं, ते जपावं. इथे आपली विश्वाबद्दलची गोष्ट संपते. कृष्णाच्या यशोदा मातेला विश्व दिसलं होतं असं म्हणतात. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी विश्वाबद्दलच्या गोष्टींचं बीज लपलं आहे. कधी ते पौराणिक उत्पत्तिकथांच्या रूपात दिसतं तर कधी भौतिकशास्त्रातील सिद्धांतांच्या रूपात. कधी ते एखाद्या तरल कवितेच्या रूपात सापडतं, तर कधी एखाद्या मुग्ध करणाऱ्या चित्राच्या रूपात. कोण जाणे अनादी, अनंत विश्वांप्रमाणे हे विश्वाबद्दलच्या गोष्टींचे बीजही अनादी आणि अनंत असेल?

Comments