कौतुकास्पद यश
भारतीय खेळाडूंच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होते आणि हे यश क्रिकेटशिवाय इतर खेळांमधील आहे ही बाब खूप सुखावून जाणारी आहे. नुकत्याच संपलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ ब्राँझ पदकांसह विक्रमी १०७ पदकांची कमाई केली. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या यशात क्रिकेट संघाचाही वाटा असला तरी तो एकूण स्पर्धेच्या तुलनेत इवलासा होता हे महत्वाचे आहे. नेमबाजी, घोडेस्वारी, टेनिस, स्क्वाश, अॅथलेटिक्स, तिरंदाजी, हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन, रोविंग, सेलिंग , वुशू, गोल्फ, बॉक्सिंग, ब्रीज, टेबल टेनिस, कुस्ती, रोलर स्केटिंग, सपक टेकरा … यापैकी प्रत्येक खेळात भारताने पदक मिळवले. २००२ नंतर भारताची कामगिरी चढत्या क्रमाने होत आहे. अपवाद २०१४चा. २००२मध्ये ३६ पदके होती, २००६ मध्ये ५३, २०१० मध्ये ६५, २०१४ मध्ये ५७, २०१८मध्ये ७० आणि आता शंभरीपार १०७ ! फक्त क्रिकेटपटूंचे कौतुक करण्याची सवय असणाऱ्या भारताला हा अलीकडच्या काळातला सर्वात मोठा सुखद धक्का म्हणायला हवा. प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन. !
भारताने अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली. सुवर्णपदकांच्या बाबतीत भारतासाठी हा सर्वोत्तम स्पर्धेचा दिवस होता, १ ऑक्टोबर रोजी भारताने १५ पदके जिंकली होती. तरी शेवटच्या दिवशी अधिक सुवर्णपदके मिळाल्याने हा दिवस भारतासाठी व प्रत्येक भारतीयांसाठी संस्मरणीय ठरला.
कबड्डी हा खरा भारतीय खेळ. शंभरावी पदक या खेळाने मिळवून द्यावे हा विलक्षण योगायोगच आहे.
अविनाश साबळे असो, अथवा साताऱ्यात राहणारे ओजस आणि अदिती असोत, त्यांचे यश डोळ्यात भरणारे आहे. ओजस व आदिती याना तर या दोघींना वॉर्डबॉय ते पोलीस कॉन्स्टेबल असा आयुष्याचा प्रवास असणाऱ्या प्रवीण सावंत यांनी प्रशिक्षण दिले असून त्यांनी साताऱ्यात निवासी तिरंदाजी अकादमी उभारली आहे. ज्योती सुरेखाची ही तिची तिसरी आशियाई क्रीडा स्पर्धा होती तर ओजस देवतळेचे पदार्पण होते, त्यांनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके जिंकली आणि विक्रमी ६५५ खेळाडूंच्या पथकात ते सर्वात यशस्वी भारतीय खेळाडू बनले. २०१० च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या १०१ पदकांपेक्षा ही १०७ पदके भारताने जागतिक बहुविषयक स्पर्धेत जिंकलेली सर्वाधिक पदके आहेत. भारतीय खेळाडूंच्या यशासाठी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा ही पहिली पायरी ठरली असे म्हणायला हवे.
शनिवारी संपलेल्या स्पर्धेत चीन ३८३ (२०१ -१११- ७१), जपान १८८ (५२-६७-६९) आणि दक्षिण कोरिया १९० (४२ -५९ ८९) हे तीन देश पहिल्या तीन क्रमांकावर राहिले असले आणि तिसरा केयामंक व भारत यांत बरेच अंतर असले तरी भारताची कामगिरी दुय्यम मानता येणार नाही. मागच्या म्हणजे २०१८च्या आशियाई स्पर्धेत पहिल्या तीन देशांनी अनुक्रमे २८९, २०५ व १७७ पदके मिळवली होती. म्हणजे चीन १०४ ने वाढत असताना, जपान १७ ने खाली आला आणि दक्षिण कोरिया १३ ने वाढला. म्हणजेच चीनएवढी देदिप्यमान कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. जपान आणि दाक्षित कोरियाच्या तुलनेत भारताची कामगिरी एका अर्थाने मी सरस मानतो. कारण भारताच्या पदक संख्येत एकदम ३७ने वाढ झाली. बाकी आकड्यांची तुलना होऊ शकत नाही हा भाग वेगळा. २०२६च्या स्पर्धेमध्ये आता भारताकडून खूप जास्त अपेक्षा ठेवल्या जातील. १०७वरून किमान १५० पदकांची संख्या व्हावी अशी अपेक्षा असेल. ते काम सोपे नाही, पण अशक्यही नाही.
चीनमधील क्रीडासंस्कृती व आपल्याकडील क्रीडासंस्कृती, पैसा, मूलभूत सोयी वगैरेमध्ये कमालीचा फरकआहे. तरीही भारत चांगली कामगिरी करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आता सर्वांचे लक्ष २०२४च्या पॅरिस ऑलिंपिककडे आहे. त्यातल्या भारतीय यशाकडे पाहताना आशियाई स्पर्धेची आकडेवारी लक्षात घेता काम नये. अथवा कोणत्याही प्रकारची तुलना होता कामा नये. कारण दोन्ही स्पर्धांची उंची, ताकद वेगवेगळी आहे. सध्या भारतात क्रिकेटचा एकदिवसीय विश्वचषक चालू आहे. पहिल्या सामन्याकडे प्रक्षकांनी कधी पाठ फिरवली त्याच्या बातम्या छापून आल्या आहेत. एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमधील संपलेला रस आणि सामन्यात भारत नसल्याने आणखी उदासीनता अशी दोन करणे त्यासाठी देता येतील. त्याचवेळी आशियाई स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीकडे असलेले भारतीयांचे लक्ष ही बाब लक्षात घ्यायला हवी. आशियाई स्पर्धा चालू असताना एक दिवसीय विश्वचषक सुरु झाला नव्हता असे म्हणून भारतीयांच्या प्रेमाचा अवमान होता कामा नये !
Comments
Post a Comment