पर्यावरणाच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी काम
काल एक ऑक्टोबर रोजी अनेक राजकीय नेते हातात लहान मोठा झाडू घेऊन रस्ता अथवा त्या लगतचा भाग साफ करताना आपण पाहिले. हे कृत्य स्वच्छतेचा संदेश देणारी प्रतीकात्मक कृती होती हे मान्य करायला हवे. त्यांनी रोज हे काम करणे अपेक्षितही नाही. परंतु, स्वच्छता ही एका दिवसाची गोष्ट नाही. एक दिवस साजरा झाला की दुसऱ्या दिवसापासून परत सगळे सुरळीत होते हे आपण अनेकदा पाहिले. राजकीय / सामाजिक क्षेत्रातील मोठ्या लोकांच्या जयंती / पुण्यतिथी या दिवशी त्यांची आठवण जागवली जाते, पण त्यांची शिकवण बाकीचे ३६४ दिवस किती लोक लक्षात ठेवतात हा प्रश्नच आहे. स्वच्छता असो, जयंती / पुण्यतिथी असो वा अन्य सामाजिक उपक्रम असोत, त्यात सातत्य नसले की मूळ अपेक्षित काम होऊ शकत नाही.
या पार्श्वभूमीवर एक ऑक्टोबरलाच हिंदुस्थान टाइम्स या इंग्रजी दैनिकात नीरज पंडित यांनी दिलेली बातमी लक्षवेधी वाटली. ती होती वृक्ष लागवडीची. वृक्षारोपणाचेही ‘इव्हेंट’ आपल्याकडे होतात. रोप लावतानाचे फोटो छापून येतात. नंतर त्या रोपांचे काय होते, किती जागवली जातात आणि किती अदृश्य होतात ते कळतही नाही. परंतु मी ज्या बातमीबद्दल बोलतो ती बातमी वेगळी आहे.
आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी प्रवीण भागवत यांनी शिक्षकांच्या सन्मानार्थ म्हणून वृक्षारोपणाची कल्पना मांडली होती. देशी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून २०० एकर पडीक जमीन पूर्ववत करण्याचे काम भागवत आणि त्यांची मित्रमंडळी करीत आहेत, अशी ती बातमी होती. पुण्याजवळील वाटेले गावात नुकताच हा अनोखा उपक्रम पाहायला मिळाला आयआयटी मुंबईतर्फे आयोजित या कार्यक्रमात प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि विद्यमान विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण केले आणि संस्थेतील आपल्या आवडत्या प्राध्यापकांचे नाव दिले. या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाची मूळ संकल्पना म्हणजे संस्थेच्या स्थापनेपासूनच आयआयटी मुंबईत काम केलेल्या प्रत्येक प्राध्यापकाच्या नावे बागेत एक झाड लावणे, असे या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे १९८० च्या वर्गाचे माजी विद्यार्थी शिरीष देवधर यांनी सांगितले.
वाटेले गावातील १४ वृक्ष प्रकल्पस्थळाला भेट दिल्यानंतर या प्रकल्पाची प्रेरणा मिळाली. प्रवीण भागवत यांनी शिक्षकांच्या सन्मानार्थ वृक्षारोपण करण्याची कल्पना मांडल्यावर देशी झाडे लावून २०० एकर पडीक जमीन पूर्ववत करण्याचे काम भागवत व त्यांची मित्रमंडळी करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचा आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण परिसंस्थेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. आयआयटी कानपूरच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने भागवत यांच्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
‘१४ वृक्ष’ (The 14 Trees Project) हा भागवत आणि त्यांच्या मित्रांचा एक उत्तम उपक्रम आहे, या प्रकल्पामुळे स्थानिकांना उपजीविकेसाठी व समाजाला हरित क्षेत्र मिळण्यास मदत होत आहे आणि आयआयटीयन्ससाठी हा भावनिक अनुभव आहे,’ असे प्राध्यापक दीपक फाटक यांचे म्हणणे आहे. त्यांनी आयआयटी-मुंबईमध्ये सेवा बजावलेल्या आणि सध्या सेवा बजावत असलेल्या सर्व प्राध्यापकांच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले. ‘IIT Mumbai Alumni Grove Project’ हा पर्यावरणीय व्यवस्थापनाचे महत्त्व आणि शिक्षणाचा शाश्वत वारसा अधोरेखित करणारा उपक्रम आहे.
आयआयटी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी प्रामुख्याने ग्रामीण भारतातील हुशार आणि वंचित विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या ‘दक्षिणा फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने १४ झाडांच्या जागेलगतची आपली जमीन आयआयटी-मुंबई फॅकल्टी ग्रोव्हला मोठ्या मानाने देऊ केली. दीपक फाटक, रवी गुडी, कामेश्वरी चेब्रोलू आणि आयआयटी गांधीनगरच्या सेंटर ऑफ क्रिएटिव्ह लर्निंगचे प्रमुख मनीष जैन यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
देवधर यांच्या म्हणण्यानुसार The 14 Trees Project फाऊंडेशनकडे सध्या अस्तित्वात असलेल्या प्राध्यापकांची सुमारे १५० नावे उपलब्ध आहेत. इतर विद्यमान व निवृत्त प्राध्यापकांची नावे गोळा केली जात आहेत. अंतिम आकडा एक हजाराच्या घरात असेल. देवधर यांनी आयआयटी मुंबईच्या काळात (१९७५-१९८०) महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही प्राध्यापकांची नावे सांगितली. त्यात प्रा.एस.डी.आगाशे, प्रा.के.आर.शंकर, प्रा.के.सी.मुखर्जी, प्रा.व्ही.व्ही.अथणी, प्रा.वाय.एस.आपटे आणि प्रा.व्ही.पी.सुंदरसिंग यांचा समावेश आहे.
आयआयटी कानपूरमधून १९९० मध्ये पदवी घेतलेले प्रवीण भागवत (५४) हे आयबीएममध्ये संशोधक म्हणून कार्यरत होते. ते काम सोडून ते काही वेगळे करण्यासाठी भारतात परतले आणि आयआयटी-केमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले, परंतु नंतर आयआयटी-मुंबईचे माजी विद्यार्थी किरण देशपांडे यांच्यासमवेत त्यांनी टेक कंपनी स्थापन केली. १५ वर्षांनंतर त्यांनी पर्यावरणासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि देशपांडे आणि आयआयटी-मुंबईचे आणखी एक माजी विद्यार्थी अजय फाटक यांच्यासमवेत The 14 Trees फाऊंडेशनची स्थापना केली.
पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी वृक्षारोपण, शिक्षकांना जोडून भावना जोडणे आणि स्थानिकांना उपजीविका उपलब्ध करून देणे अशा तीन पातळ्यांवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भागवत यांनी सांगितले. सध्या १०० आदिवासी रोजंदारीवर काम करत असून त्यांना रोपवाटिकाच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भागवत यांच्या म्हणण्यानुसार ते आणि त्यांची मित्रमंडळी ओसाड टेकड्यांच्या पर्यावरणाच्या ऱ्हासावर उपाय म्हणून तेथे देशी हरित क्षेत्र निर्माण करीत आहेत. कृत्रिम संसाधनांचा वापर करण्याऐवजी पावसाचे पाणी साठविण्यासाठी तलाव आणि भूजल पुनर्भरणासाठी खड्डे खोदत आहोत. भागवत यांच्या फाऊंडेशनचे नाव या वैज्ञानिक गोष्टीवर आधारित आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार , १४ झाडांमुळे माणसाच्या आयुष्यभर श्वासोच्छवास घेता येतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या हयातीत किमान १४ झाडे लावावीत, असे त्यांचे आग्रही सांगणे आहे.
अशी कामे ही तात्पुरती अथवा फोटो काढण्यापुरती केलेली नसतात. केवळ झाडांची लागवड करून घरी न परतता ती झाडे जगवण्याबरोबरच आसपासचे पर्यावरण सुधारण्याकडे व तेथील लोकांचे आयुष्यमान सुधारण्याकडे लक्ष सातत्याने देत राहणे हे काम मोठे आहे. म्हणून मला ही बातमी वेगळी वाटली.
(असेच उपक्रम आपण राबवत असाल तर मला जरूर कळवा)
Comments
Post a Comment