ग्रंथ संयुक्त अरब अमिरातीच्या दारी....
साधारण पंधरा वर्षांपूर्वी आजच्याइतका समाजमाध्यमांचा प्रभाव नव्हता. वाचनसंस्कृती चांगल्यापैकी अस्तित्वात होती. आज अस्तंगत झाली असे मला सुचवायचे नाही, पण विविध वाचनालयांमधली वाचकांची घटती संख्या आणि घटलेली पुस्तकविक्री पाहता असे अनुमान काढता येते. समाजमाध्यमे, कोविड, ऑनलाईन वाचन यामुळे पुस्तक हातात धरून वाचणारे वाचक कमी झाले. हे वाचन वाढावे म्हणून पुस्तके वाचकांना घरी देण्याचेही उपक्रम सुरु झाले. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री. विनायक रानडे यांनी एकच ध्यास घेतला आणि तो म्हणजे वाचकांना त्यांच्या घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचा! त्यातूनच २००९ ला अशा वाचन प्रेमींसाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ या योजनेचा उगम झाला.
भारतात ह्या योजनेत १०० पुस्तकांची एक पेटी असते, जी साधारण ३५ वाचकांच्या समूहासाठी असते. भारताबाहेर या योजनेत सोयीनुसार बदल झाले. मूळ ध्येय पुस्तकवाचन अधिकाधिक व्हावे, अधिकाधिक वाचक या योजनेशी जोडले जावेत हे असल्याने ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ योजना अनेक घरांपर्यंत पोचली. मराठी भाषक जगभरात जवळपास प्रत्येक देशात आहेत. त्यापैकी ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना पुस्तके मिळत असतीलच असे नाही. त्यांना या योजनेचा फायदा होईल. संयुक्त अरब अमिरातीमध्येही ही योजना २०१४मध्ये पोचली. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, देणगीदार, समन्वयक आणि वाचक हे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ चे चार आधारस्तंभ! कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता निस्वार्थी वृत्तीने वाचकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणारे ‘समन्वयक’ हा या साखळीतला महत्वाचा दुवा आहे. स्वतःच्या घरी पुस्तके ठेवून ती वाचकांना उपलब्ध करून देणे आणि वेळप्रसंगी घरी जाऊन पुस्तके देवून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हे नाव शब्दशः सार्थ करतात. आज संयुक्त अरब अमिरातीत (UAE) सात पैकी पाच अमिराती मिळून साधारण ३० पेक्षा जास्त समन्वयक काम करत असून त्यात लहान मोठे सर्वांसाठी साहित्य उपलब्ध आहे. यातीलच एक समन्वयक श्रीमती श्वेता पोरवाल यांनी या योजनेची माहिती सांगणारा लेख इथे दिला आहे. त्यांचे मन:पूर्वक आभार.
ग्रंथ संयुक्त अरब अमिरातीच्या दारी ..
युनायटेड अरब अमिराती (युएई) हा देश वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतो.जसे २०१६ वर्ष हे इयर ऑफ रीडिंग घोषित केले होते, तसेच दरवर्षी मार्च महिना हा ‘मंथ ऑफ रीडिंग’ म्हणून साजरा केला जातो. दुबई पब्लिक लायब्ररी तसेच इतर अनेक वाचनालय देखील वाचकांसाठी इथे उपलब्ध आहेत. परंतु हे सगळं अरब आणि इंग्रजी भाषेतून वाचनासाठी. भारताबाहेर राहून भारतीय भाषांमध्ये असणाऱ्या पुस्तकांचे वाचनालय तस मिळणं अशक्यच परंतु ही अशक्य कोटीतील गोष्ट साध्य केली ती कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाने!
एखाद्या भीषण अपघातातून आलेल्या सक्तीच्या विश्रांतीमध्ये सुचलेली एक कल्पना कशाप्रकारे सत्यात येऊन अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करू शकते हे लक्षात येतं, श्री विनायक रानडे यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रेरणेने सुरू केलेल्या ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम पाहताना. २००९ साली नाशिकमध्ये ३५ वाचकांसाठी शंभर पुस्तकांची एक पेटी या स्वरूपात सुरू झालेला हा उपक्रम भारताबाहेर सर्वप्रथम येऊन पोहोचला तो दुबईत!! २०१४ साली डॉक्टर श्री. संदीप कडवे आणि त्यांच्या पत्नी सौ स्वाती कडवे यांच्या प्रयत्नांनी ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम युएईत सुरू झाला. सुरुवातीला दुबई, शारजा, रस-अल- खेमा येथे ८ पेट्यांनी सुरु झालेली ही योजना देणगीदारांच्या व समन्वयकांच्या सहकार्यामुळे तसेच वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे लवकरच अबू धाबी, फुजेरा, अजमान ३५ पेट्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. या ३५ पेट्यांसोबत बालवाचकांसाठी असणाऱ्या ११ बालपेट्या आणि तरुणांसाठी ६ तरुणाई पेट्या आता यूएईमध्ये सर्व वयोगटातील वाचकांसाठी उपलब्ध आहे.
आपल्या देशात आजूबाजूला समान भाषा असणारे शेजारी, समाज असणं अजून तरी सहज शक्य आहे. परंतु भारताबाहेर ही गोष्ट तशी अवघडच त्यामुळे पुस्तकांच्या पेट्या आल्या तरीही लगेच वाचक मात्र येत नाहीत, तर ते इथे प्रयत्नांनी मिळवावे लागतात. सुरुवातीच्या काळातला बऱ्याच जणांचा अनुभव असा की सुपर मार्केटमध्ये, मॉलमध्ये, मुलांना विविध क्लासच्या ठिकाणी घेऊन जाताना कोणी मराठी बोलताना दिसले की लगेच त्यांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांना ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाची माहिती द्यायची. त्यांना वाचनालय सुरू करण्यासाठी विनंती करून आपल्या घरी आमंत्रित करायचे हे येथील बऱ्याच समन्वयकांनी केले.
हळूहळू कानोपकांनी लोकांना कळायला लागले की निःशुल्क मराठी पुस्तक वाचनालय सहजगत्या उपलब्ध आहे. त्याचबरोबर ग्रंथ तुमच्या दारी समितीने शक्य होईल, त्या ठिकाणी जाऊन या उपक्रमाची माहिती देण्यासाठी प्रसाराचे काम केले. जसे अबुधाबीला इंटरनॅशनल बुक फेअर झाले त्यात ग्रंथ तुमच्या दारीने सहभाग घेतला होता, यावर्षी महाराष्ट्र मंडळ दुबईच्या चैत्रगौरीच्या हळदी कुंकू समारंभात ग्रंथ तुमच्या दारीने पुस्तक द्या पुस्तक घ्या हा उपक्रम राबवला होता. अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने आता ग्रंथ तुमच्या दारी ही संकल्पना युएईमध्ये बऱ्याच मराठी वाचकांपर्यंत पोहोचली आहे.
परदेशात आल्यानंतर मराठी पुस्तक पाहायलाही मिळण्याची खात्री नसताना मोफत वाचायला मिळतात, हा वाचकांना सर्वप्रथम खूप मोठा सुखद धक्का असतो. स्वतःला पुस्तक वाचण्याची आवड म्हणून जसे वाचक येतात, तसेच काहीजण इथे सुट्टीवर आलेल्या आई-वडिलांचा वेळ चांगला जावा म्हणूनही हे पुस्तकालय लावण्यासाठी येतात. माझ्या अशाच एक वाचक आईंच्या डोळ्यात मी जो आनंद पाहिला तो विसरू शकत नाही. ‘ अग, माझ्या हाती हा खजिना लागल्यासारखे झालंय मला आणि तेही इथे दुबईत!!’ हे त्यांचे हर्षोद्गार होते. परदेशात राहिला आल्यानंतर पालकांना एक भीती हीसुद्धा असते की आपल्या मुलांना येथील शाळांमध्ये मातृभाषेतील शिक्षण मिळणार नाही, त्यामुळे त्यांना कदाचित आपली भाषा वाचता, बोलता येणार नाही. परंतु छान छान पऱ्यांच्या गोष्टी, साने गुरुजींच्या गोष्टी, माधुरी पुरंदरे, राजीव तांबे यांची लहान मुलांसाठीची पुस्तकं बालपेटी मध्ये पाहिल्यानंतर मात्र पालकांना मुलांना आपल्या मातृभाषेची जोडून ठेवण्याचे एक साधन गवसते. बालपेटीतील पुस्तकांमुळेच इथल्या मुलांनाही प्रेमळ भूत, फास्टर फेणे, बोक्या सातबंडे माहिती आहेत.
माझ्या एक वाचक आजीचा अनुभव तर खूपच हळवं करणारा होता. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, ‘माझ्या जीवनाचा जोडीदार मला सोडून गेला, त्यानंतर मी इथे मुलाकडे राहायला आले आणि मला सावरायला मदत केली ती या पुस्तकांनी! ज्यावेळेस माझ्यापेक्षाही जास्त दुःखाला सामोरे गेलेल्या मोठमोठ्या व्यक्तींची चरित्रं मी वाचले, त्यावेळेस मला माझ्या उदासपणाच्या कोशातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळाली. मी सकारात्मक झाले.’ ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचे यश आणि आवश्यकता हे दोन्हीही एकच वेळी मला या आजींच्या बदललेल्या रूपात दिसते.
मराठी पुस्तक वाचनाचा प्रसार व्हावा यासाठी ग्रंथ तुमच्या दारी युएई समिती खूप प्रयत्नशील असते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठीच ब्लॉगची निर्मिती केली गेली ब्लॉगवर पुस्तकांचे परीक्षण प्रकाशित केले जातात यावर्षीच स्वातंत्र्याचा आमंत्रित अमृत महोत्सव या उपक्रमाद्वारे ब्लॉगवर २६ जानेवारी ते १५ ऑगस्ट च्या दरम्यान ७५ परीक्षणे प्रकाशित करण्याचा संकल्प केला गेला आणि तो आश्चर्यकारक रीतीने ८० परीक्षणं प्रकाशित करून पूर्ण केला गेला यावर्षी ब्लॉगवर स्वरचित नावाचा अजून एक कप्पा तयार केला गेला, समन्वयक आणि वाचक स्वतःच्या कथा कविता ललित प्रवास वर्णन इत्यादी विविध विषयांविषयी लिहून त्यावर प्रकाशित करू शकतात. तसेच मागच्या वर्षीपासून जवळ जवळ दर महिन्याला ओळख लेखकांची या सदरात अनेक मान्यवर लेखक आणि लेखिकेची मुलाखत ऑनलाइन मंचावर घेत आहोत. दरवर्षी १५ ऑक्टोबर, वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी प्रवीण दवणे, अरुणाताई ढेरे, राजीव तांबे यांच्यासारखे मान्यवर अतिथी आम्हाला लाभले.
अरुणाताईंनी कार्यक्रमाच्या निमित्ताने संवाद साधत असताना म्हटले होते की भाषा म्हणजे संस्कार ! भाषा विसरली गेली की त्यातले महत्त्वाचे असे संस्कारही नष्ट होत जातात. इथे परदेशात मराठी भाषा केवळ टिकवण्यासाठीच नव्हे तर पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठीही या मराठी पुस्तकांच्या माध्यमातून ग्रंथ तुमच्या दारी उपक्रम खारीचा वाटा उचलत आहे. मुलांना मायदेशी आपल्या सगेसोयऱ्यांशी जोडून ठेवण्यासाठीही मराठी भाषा त्यांच्यापर्यंत नेणं, त्यांच्यात रुळवणं गरजेचं आहे.
सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यांचाही वापर करत आहोत. व्हिडिओ स्वरूपातील पुस्तक परीक्षण, लेखकांच्या मुलाखती यूट्यूब वर प्रकाशित केल्या जातात. ग्रंथ तुमच्या दारी युएई समितीच्या कार्यक्रम आणि उपक्रम खालील संकेतस्थळावर जाणून घेता येतील.
ब्लॉग – https://gtduae.wordpress.com/
फेसबुक पेज – https://www.facebook.com/GTDUAE?mibextid=ZbWKwL
यूट्यूब चॅनल – https://youtube.com/@granthtumchyadariuae
समजमध्यमांवरील या तीनही लिंकद्वारे या उपक्रमाची माहिती मिळू शकेल.



Comments
Post a Comment