गोष्टी पाऊसपाण्याच्या (पूर्वार्ध)
यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून, पुढील उन्हाळा गंभीर असेल, याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता १७८ तालुक्यांमधील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मदत व पुनर्वसनविषयक उपसमितीने गुरुवारी (नऊ नोव्हेंबर २०२३) घेतला. त्यामुळे राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे अनेक विभागांत दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. या भागांत दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करून मदत देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने गेल्याच आठवडय़ात १६ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती. नंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमधील १२०० पेक्षा अधिक महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. (बातमी – लोकसत्ता १० नोव्हेंबर २०२३)
राज्यातली ही ताजी स्थिती आहे. पाऊस, पाणी हा विषय महाराष्ट्रातच नव्हे तर देशातले जीवन बरेवाईट करू शकतो. वेगवेगळ्या कारणामुळे देशाच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण होते. कमी पाऊस किंवा कमालीचा जास्त पाऊस दोन्ही हानीकारक आहे. अर्थात ही परिस्थिती एका दिवसात निर्माण झालेली नाही. माणसाने निसर्गाशी जे खेळ केले आहेत ते पाहता माणसाने हा प्रश्न ओढवून घेतला आहे, असे आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रात मुंबई – पुण्यासारखी महानगरे असोत अथवा ग्रामीण भाग असो, पाण्याचा प्रश्न भीषण होत चालला आहे. देशातील एका भागात पाणी नाही म्हणून दुसरीकडून रेल्वेने पाणी आणण्याचा प्रकारही नवीन नाही. दि. २० एप्रिल २०१६ रोजी मिरजेहून निघालेली ‘जलदूत’ रेल्वे लातूरला पोहोचली. ती पाण्याची वाहतूक करत होती. पन्नास डब्यांची ही रेल्वे २५ लाख लीटर पाणी घेऊन लातूरमध्ये दाखल झाली. २०१५ सालचा मान्सून एकंदर देशासाठीच विशेष समाधानकारक नव्हता. महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांपुढे तर मोठं प्रश्नचिन्ह घेऊन हे वर्ष आले होते. नंतरच्या वर्षात हा प्रश्न आणखी गंभीर होत गेला आणि या पुढच्या काळात त्याची तीव्रता अधिक वाढणार आहे. असे असले तरी सर्वसामान्य लोकांमध्ये पाण्याच्या विषयावर जनजागृती होणे गरजेचे आहे.
पाऊसपाणी या विषयावर प्रसारमाध्यमात भरपूर लिहून येते , टीव्हीवरही बरेच काही पाहता येते, त्यामुळे माहितीचा अभाव हा प्रकार नाही. तरीही या विषयावर जेवढे काम व्हायला हवे तेवढे होत नाही. या पार्श्वभूमीवर कोकणातून प्रसिद्ध झालेला ‘गोष्टी पाण्याच्या’ हा दिवाळी अंक वाचनात आला. झरे, तळी, भूजल, नद्या, तंत्रज्ञान, योजना, पाऊस आणि आपले पाणी -आपले विज्ञान अशा आठ विभागांमध्ये हा अंक काढण्यात आला आहे. संपूर्ण फोकस कोकणावर असला तरी बऱ्याच लेखांमध्ये राज्यातील पाण्याबाबतचे उल्लेख आढळतात. दिवाळी अंक काढताना साधारणपणे व्यावसायिक दृष्टिकोन असतो. त्यात काही चूक नाही. परंतु पाण्यासारख्या अत्यंत महत्वाच्या विषयावर पूर्ण अंक काढणे हे धाडसाचे काम आहे. (दिवाळीत एका विषयावर अंक काढण्याचा प्रकार नवीन नाही, अरुण शेवते ‘ऋतुरंग’चा अंक एक विषय / थीम घेऊन काढतात. इतरही काही अंक असे निघतात.) स्पृहा आठल्ये आणि हर्षद तुळपुळे यांनी हे धाडस केले आहे.
या दोघांच्याच शब्दांत सांगायचे तर – ” रत्नागिरी हे महाराष्ट्रातलं सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर. मागच्या अनेक पिढ्यांची जशी इथे परंपरा आहे तसाच इथला आजचा तरुण वर्गही सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रात काहीतरी नवीन नवीन करत दिसतो. जिथे आपण जन्मलो आणि वाढलो तीच आपली कर्मभूमी असणं यात एक वेगळा आनंद असतो रत्नागिरीसारखी कर्मभूमी लाभणं यात तर तो अधिकच असतो. आमचं दोघांचंही शिक्षण, व्यवसाय हे पूर्ण भिन्न स्वरूपाचं असलं तरी रत्नागिरीच्या साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रात काहीतरी ‘निर्मितीचे उपदव्याप करण्याचा लोभ आम्हालाही चुकलेला नाही. प्रत्येक तारखेवर १ याप्रमाणे ३६५ वनस्पतींची फोटोसहित माहिती असलेली ‘वनस्पती विशेष दिनदर्शिका’, कोकणातल्या गावांचा इतिहास-भूगोल-संस्कृती मांडणारा ‘सुंदर गावे कोकणची’ हा गेल्या वर्षीचा (२०२२) दिवाळी अंक या दोन गोष्टींना उत्तम प्रतिसाद मिळाला. यावरून एक खात्री पटली की आशयात नाविन्य आणि दर्जा असलेली कुठलीही गोष्ट, मग ती कितीही सामान्य असो, लोक मनापासून आवडते.”
अंक आधी म्हटल्याप्रमाणे कोकणावर फोकस करणारा असला तरी पाण्याविषयीच्या अनेक मूलभूत संकल्पना यात स्पष्ट केल्या आहेत. त्या फक्त राज्यासाठी नव्हे तर देशासाठी लागू होतात. पहिल्या झऱ्याच्या विषयाचा उहापोह करताना संपादक म्हणतात – ”झरा म्हटलं की डोळ्यासमोर येतो दगडांच्या फटींतून येणारा पाझर, व्याख्याच करायची झाली तर अशी करू शकतो की जमिनीत मुरलेलं पाणी जिथून बाहेर पडतं ते ठिकाण म्हणजे झरा, ज्याला इंग्रजीत ‘spring’ असं म्हटलं जातं. आपल्याला दिसणाऱ्या विशाल नद्यांचा उगम हा कुठेतरी एखाद्या बारीकशा झऱ्यातून असतो यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही! पाण्याची एक गंमत अशी की जमिनीत मुरलेलं पाणी जमिनीखाली नेमकं कुठून कुठे कसं वाहतं हे आपल्याला वरून दिसत नाही; पण कुठूनतरी बाहेर पडलेलं मात्र दिसतं. यावरूनच आपण ‘इथे झरा आहे’ असं म्हणतो. विहीर खणायला लागलं की खणता खणता अचानक पाणी यायला सुरुवात होते. हा झाला जमिनीखालचा झरा. पण डोंगरउतारांवर अनेक ठिकाणी जमिनीत मुरलेल्या पाण्याला दगडांच्या फटींमधून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो आणि तिथे झरे तयार होतात. हे अनेक ठिकाणी बारमाही असतात. माणसांनी अशी ठिकाणं हेरून तिथे आपल्या वस्त्या वसवल्या. कोकण, सह्याद्री, हिमालय, ईशान्य भारत अशा डोंगरउतार असलेल्या भागांत अनेक झरे माणसांनी शोधले व पिण्याच्या पाण्याचे स्रोत म्हणून त्यांचा वापर सुरु केला. झऱ्यांची ठिकाणं सुरक्षित राहावीत म्हणून अनेक ठिकाणी त्यांना देवस्थानाचं रूप दिलेलं आढळून येतं. पाटाने, आणि आधुनिक काळात पाइपलाइनचा वापर करून माणसांनी आपल्या घरापर्यंत हे पाणी आणण्याच्या व्यवस्था उभ्या केल्या. झरे ही निसर्गाने माणसाला दिलेली एक मोठी देणगी आहे. झऱ्यांच्या ठिकाणांची नियमित साफसफाई ठेवणं, त्या ठिकाणी साठवणक्षमता वाढवणं आणि झऱ्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अवाजवी मानवी हस्तक्षेप टाळून या मौल्यवान संपदेचं संरक्षण-संवर्धन करणं गरजेचं आहे.”
हे संरक्षण – संवर्धन तळी, नद्या आणि इतर बाबतीत कसे व्हायला हवे हे विविध विभागांतून वाचायला मिळते.’गोष्टी भूजलाच्या’ या विभागात भूजलाचे विलक्षण विश्व (डॉ. श्रीकांत कार्लेकर), भूजल आरेखन – का आणि कसे ( दिव्यांशु पवार), विहीर कशी अभ्यासावी ( योगेश कुलकर्णी) आणि स्थलानुरूप जलसंधारण (डॉ. उमेश मुंडल्ये) हे चार लेख भूजलाचा प्रश्न नेमकेपणाने मांडतात. पाण्याच्या विषयावर नेमका अभ्यास करण्यासाठी आज अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
कोकणातील महाविद्यालयीन मुले या प्रश्नाचा अभ्यास करत आहेत ही गोष्ट आश्वासक आहे. अंकाचे संपादक याविषयी टिप्पणी करताना म्हणतात – ” विज्ञान म्हणजे काय? विज्ञान या शब्दाचा एक ढोबळ अर्थ होतो ‘अणुरेणूंशी संबंधित शास्त्र’, परंतु विज्ञान या शब्दाचा एक दुसरा आणि अधिक व्यापक अर्थ होतो ‘वास्तवाची विश्लेषणात्मक मांडणी’. आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित छोटे छोटे प्रश्न, मग ते पिण्याच्या पाण्याचे असोत, इंधनाचे असोत, वाहतुकीचे असोत, आरोग्याचे असोत, स्वच्छतेचे असोत, पर्यावरणाचे असोत, त्यांचा पद्धतशीरपणे अभ्यास करून त्यांची मांडणी करणं हेही एक विज्ञान आहे. विज्ञानाची ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुज्जावी यासाठी आयआयटी मुंबईतर्फे गेल्या वर्षीपासून (२०२२) कोकणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबवला जातोय, ज्याचं नाव ‘आपले प्रश्न आपले विज्ञान’। २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात कोकणातल्या १४ महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरु होऊन त्यातून विद्यार्थ्यांना गावातल्या छोट्या प्रश्नांवर केस स्टडी पद्धतीने अभ्यास कसे करायचे याचे मार्गदर्शन आणि अनुभव मिळाला. ‘पिण्याचं पाणी’ हा कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक गावातला प्रश्न असतो. या प्रश्नाचा अभ्यास केस स्टडी पद्धतीने व्हावा यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राजापूर तालुक्यातली १० गावं निवडून उन्नत माहाराष्ट्र अभियान प्रकल्प सदस्यांमार्फत या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या सद्यास्थितीचे अहवाल तयार करण्यात आले. यामध्ये गावातल्या प्रत्येक वाडीत फिरून विहिरी आणि अन्य जलस्रोतांचं सर्वेक्षण करण, विहिरींमधली पाणी पातळी मोजणं, त्यांचं जीपीएस लोकेशन घेणं, लोकांशी संवाद साधून पाण्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती गोळा करणं, गावाचा नकाशा तयार करून त्यात गावातले जलस्रोत दाखवणं, ग्राम पंचायतीतून आवश्यक माहिती मिळवणं, आढळलेल्या समस्यांचं विश्लेषण करून सविस्तर अहवाल तयार करणं, अशी कार्यपद्धती ठरवण्यात आली. या अहवालांतून मांडलेल्या समस्या आणि शिफारशी ग्राम पंचायतींना आपला वार्षिक विकास आराखडा तयार करण्यासाठी उपयोगी पडतील हा यामागचा हेतू होता, राजापूर तालुक्यात प्रयोगिक तत्त्वावर हे काम केल्यावर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सहयोगाने जिल्ह्यातल्या २० टैंकरग्रस्त गावांच्या पाणीपुरवठा सद्यस्थितीचं सर्वेक्षण करण्याचा आणखी एक उपक्रम एप्रिल व मे २०२३ या काळात झाला. यात कोकणातल्या महाविद्यालयांतले विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले. ‘आपल्या गावाचं पाणी’ हा विषय घेऊन त्यावर केस स्टडी पद्धातीने सविस्तर अभ्यास कसा करायचा, मिळालेल्या माहितीची पद्धतशीर मांडणी कशी करायची याबाबतचे सहभागी विद्यार्थी व उन्नत महाराष्ट्र अभियान कक्षाचे सदस्य यांचे अनुभव आपल्याला या विभागात वाचायला मिळतील. शाळा-महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरातले असे पाणी वा अन्य बाबतींतले विषय घेऊन केस स्टडी केल्यास त्यातून नक्कीच कौशल्य विकास होईल.”
ही तरुण पिढी काय करत आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ‘चला बनवूया पाण्याचे नकाशे’ (अक्षय चव्हाण), आपला सडा आपले पाणी (तनया पंगेरकर) आणि गावोगावचे पाणी समजून घेताना (अन्वी साळवी) हे लेख वाचायला हवेत. आपल्याकडे जलसंधारण हा विषय त्यातील कथित घोटाळ्यांमुळे जास्त चर्चिला जातो, त्याऐवजी एकंदरच पाणी व त्याचे व्यवस्थापन हा विषय सर्व स्तरांवर गंभीरपणे चर्चिला जाणे आवश्यक आहे.
(पूर्वार्ध)
Comments
Post a Comment