गोष्टी पाऊसपाण्याच्या (उत्तरार्ध)

हाराष्ट्रात पाऊस आणि पाणी, बदलते हवामान, प्रदूषण, निसर्गावर मात करण्याचा माणसाचा हव्यास या सगळ्या कारणांमुळे या संदर्भातील असमतोल वाढत आहे. याचे परिणाम नजीकच्या भविष्यकाळातही जाणवतील. हर्षद तुळपुळे आणि स्पृहा आठल्ये यांनी काढलेल्या ‘गोष्टी पाण्याच्या’ या दिवाळी अंकाला म्हणूनच जास्त महत्व आहे. (पूर्वार्ध https://ashokpanvalkar.com/water-spring-rivers-rain-management-and-drought-in-maharashtra/ इथे वाचायला मिळेल) अंक कोकणावर फोकस करणारा असला तरी तीच तत्वे, निकष सगळ्या राज्याला लागू होतात. त्यामुळे केवळ कोकणचा अंक असे संकुचित दृष्टीने याकडे पाहून चालणार नाही. उदा. ‘गोष्टी नद्यांच्या’ या विभागात डॉ. अजित गोखले यांनी लेख लिहिला आहे. आज केवळ कोकणच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्र आणि भारतात अनेक ठिकाणी नद्यांमध्ये साठलेला गाळ ही गंभीर समस्या होऊन राहिली आहे. यावर उपाययोजना म्हणून गाळ उपसा करण्याची जोरदार मोहीम अनेक ठिकाणी हाती घेतली आहे. गाळ उपसा करून नद्या प्रवाही बनवणे ही आजची मोठी गरज असली तरी त्यात कायकाय काळज्या घेतल्या पाहिजेत त्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न अशा यादृष्टीने या लेखाकडे पाहता येईल.
 
गाळ उपसा आणि नदी पुन्हा प्रवाही बनवणे हा प्रश्न अजूनही फार गंभीरपणे घेतला जात नाही, असे मला वाटते. मुंबईत मिठी नदी आणि इतर नालेसफाई यावरून दरवर्षी वाद होतो आणि तो वाद नंतर पावसात वाहून जातो, नंतर पुन्हा पावसाची चाहूल लागेपर्यंत सारे काही शांत होते. हे प्रश्न केवळ मुंबईत आहेत असे नव्हे तर राज्यातल्या / देशातल्या जवळपास प्रत्येक नदीच्या संदर्भात आहेत. त्या प्रश्नावर स्थानिक पातळीवर उपाययोकांना करण्यात येत आहेत, त्या या कामातला  खारीचा वाटा म्हणून महत्वाचा असल्या तरी अशी कामे खूप मोठ्या प्रमाणात व्हायला हवीत. त्यांचे महत्व स्थानिक व राज्य सरकारला कळायला हवे. याबाबत जिथे कामे चालू आहेत त्यापैकी चार प्रतिक्रिया वानगीदाखल देतो.
 
 ”काजळी नदीकाठी वसलेल्या कोंडगाव-साखरपा गावाला दरवर्षी नदीच्या पुराचा सामना करावा लागे. २०२० च्या सुमारास आम्ही ग्रामस्थांनी एकत्र येऊन नदी गाळमुक्त करायचं ठरवलं. सुमारे ३० लाख रुपयांचा निधी जमवला. नाम फाउंडेशननने मोफत पोकलेन पुरवले. २०२१ साली फेब्रुवारी ते मे असे सुमारे साडेतीन महिने श्रमदानाचं काम केलं. नदीच्या एक किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातला गाळ काढला व तो काठावर योग्य रीतीने पुनर्स्थापित केला. यामुळे नदीचं पात्र मोकळं झालं आणि जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडून सुद्धा कोंडगाव-साखरपा बाजारपेठ पाण्याखाली गेली नाही. (मुग्धा सरदेशपांडे)
 
 सह्याद्रीच्या पायथ्याशी कणकवलीपासून सुमारे १७ किमीवर असणाऱ्या नाटळ या गावच्या नदीच्या गाळ उपशाचं काम आम्ही २०१८ साली केलं. १९५५ च्या सुमारास मोठं भूस्खलन होऊन दगड खाली आले होते व त्यानंतर नदी गाळाने भरायला सुरुवात झाली. २०१८ च्या सुमारास सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे साडेबारा किलोमीटर लांबीचा नदीचा पट्टा आम्ही मनुष्यबळ व यंत्र दोन्ही वापरून गाळमुक्त केला. यात नाम फाउंडेशनची चांगली मदत झाली. काढलेले दगडगोटे आम्ही किनाऱ्यावर चेपून बसवले. तेव्हापासून गेल्या पाच पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस पाडूनसुद्धा पूरपरिस्थिती फार उद्भवलेली नाही. नदीवर मातीचे बंधारे बांधून भूजल संधारणाचे प्रयत्न सुरु आहेत. पाणी मुरण्यासाठी आणि योग्य निचरा होण्यासाठी आजूबाजूची शेती सुरु राहणं महत्त्वाचं वाटतं. (विश्वनाथ सावंत, अध्यक्ष, ग्रामविकास मंडळ, नाटळ)
 
२०२३ नांजा तालुक्यात केळवली या गावात सुमारे तीन किलोमीटरच्या नदी पात्रातल्या गाळ उपशाचं काम आम्ही २०१९ साली केलं. अलीकडे पाणीटंचाईची समस्या खूप जाणवत होती. गाळ साफ करताना आम्ही सुमारे १२ ते १५ फुटांच्या दोन कोंडी मोकळ्या किल्या. तिथे आम्हाला एक झराही मिळाला. यामुळे पाणीसाठा बाढून टंचाई आता कमी जाणवत आहेकाढलेला गाळ नदीपात्राबाहेर काही मोकळ्या जागी योग्य रीतीने टाकला. नदीच्या उगमस्थानी जलसाठा वाढवण्यासाठी आमचे यत्न सुरु आहेत. (अरविंद चव्हाण)
 
‘उमलती पृथ्वी’ या संस्थेतर्फे आम्ही संगमेश्वर तालुक्यातल्या कडवई गावात सुमारे साडेतीन किलोमीटरच्या पट्ट्यात २०१९ च्या सुमारास आम्ही गाळ उपशाचं काम केलं. या गावात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. अनेक संस्थाच्या व व्यक्तींच्या मदतीने आम्ही नदीपात्राचा अभ्यास करून साडेतीन किलोमीटरच्या पात्रात ४२ दिवस गाळ काढण्याचं काम केलं. त्यामुळे अलीकडे आजूबाजूच्या सुमारे १५ विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ दिसून येते. पाणी टिकावं यासाठी आम्ही नदीपात्रात चार रिमूव्हेबल बंधारे बांधले आहेत (इरफान चिकटे, कडवई )
डॉ. अजित गोखले यांच्याबरोबरच नदीजोड प्रकल्प- एक आढावा (प्रदीप पुरंदरे), पूर्वचिकित्सा (दिनेश कुमार मिश्रा), अथातो दुर्ग जलजिज्ञासा (प्र. के. घाणेकर), विदर्भातील तलावांचे वैभव ( मनीष राजनकर), गोष्टी योजनांच्या या विभागातील मेघना बेहरे, पद्मिनी दिवेकर, अदिती देवधर, नेत्रा पुरोहित आणि राजेंद्र केरकर यांचे अनुक्रमे रत्नागिरी, पेपरव्हिल , पुणे, इंदूर, गोवा या ठिकाणातील पाण्यासंदर्भात लेख , भिजू या आणि मोजुया (अभिजित घोरपडे), सत्तावीस वजा नऊ राहिले शून्य (दा . कृ सोमण), पर्जन्य जलसंचयन हेच भविष्य (अनिरुद्ध फाळणीकर) हे सारेच लेख पाण्याच्या प्रश्नाचा विविध अंगांनी आढावा घेतात आणि भीषण भविष्याची चाहूलही दाखवतात. जागे व्हायचे की असेच झोपेचे सोंग घेऊन राहायचे हे प्रशासन / राज्यकर्त्यांनी ठरवायचे आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाला / उद्योग विश्वालाही यात आपला सक्रिय सहभाग कसा असेल, नदी अथवा कोणत्याही जलस्रोतांमध्ये कचरा, रासायनिक पदार्थ न जाऊ देता आणि गाळ साठू न देता पाणी कसे वाहते आणि स्वच्छ राहील याकडे लक्ष द्यावे लागेल.
 
या दृष्टिकोनातून भूजल आणि त्याचे व्यवस्थापन हा खूप महत्वाचा आहे. संपादकद्वयानी या विभागाच्या संदर्भात केलेली टिप्पणी महत्वाची आहे. ती अशी – पावसाचं पाणी जमिनीवर पडतं. त्यातलं काही पाणी नद्यांच्या वाटे समुद्रात वाहून जातं आणि काही जमिनीत मुरतं. जमिनीत मुरल्यानंतर त्या पाण्याचा पुढे होणारा प्रवास हा एक गूढ विषय आहे. हा प्रवास आपल्याला डोळ्याने बघता येत नाही. अंदाजानेच कळतो. जगभरातले अनेक शास्त्रदन्य, भूगर्भतज्ज्ञ, भूजलतज्ज्ञ यावर अनेक दशकं संशोधन करीत आहेत. भूजलाचं विश्व हे महासागराइतकंच अफाट आहे. माणसाचा पूर्वीपासून भूजलाशी अगदी निकटचा संबंध आहे तो अर्थातच ‘विहीर’ नामक व्यवस्थेमुळे. (आणि अलीकडे बोअरवेलमुळे.) विहीर खणायला लागलं की खणत खणत खाली गेल्यावर अचानक कुठेतरी खळखळ वाहणारा झरा मिळतो. विहिरीला पाणी लागतं. पण हे पाणी नेमकं इथेच का लागलं? एवढयाच खोलीवर का लागलं? तिथून जवळच दुसरी विहीर खणली तर तिला तेवढ्याच खोलीवर पाणी का नाही लागत? काही विहिरीचं पाणी मचूळ का होतं? काही ठिकाणी झऱ्यांमधून गरम पाणी का येतं? हे सगळे सामान्य माणसाच्याही दैनंदिन जीवनात पडणारे प्रश्न आहेत. पण त्यामागे फार मोठं भूजलशास्त्र आहे, जे शास्त्रज्ञांनाही अद्याप पूर्णपणे उलगडलेलं नाही. पण याचा अभ्यास हा निश्चितपणे मनोरंजक आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपण सगळेच भूजलावर अवलंबून आहोत. आज विकासाच्या रेट्यात जमिनीखालचं पाणी आपण वाट्टेल तसं उपासतोय. दोनशे फूट, अडीचशे फूट, तीनशे फूट अशा खोल खोल बोअरवेल मारून आपण भूगर्भातले जलसाठे रिकामे करायच्या मागे लागलो आहोत. गेला उन्हाळा अतिशय तीव्र होता. कोकणातल्या पाणीबहुल प्रदेशातही पुष्कळ ठिकाणी उन्हाळा अखेरीस विहिरी आटल्या होत्या. हा प्रश्न यापुढे अधिकाधिक गंभीर होत जाणार आहे. हे ओळखून भूजलसाठ्यांचा अभ्यास, भूजलाच ‘शाश्वत उपसा’ आणि सुयोग्य पद्धतीने भूजल पुनर्भरण यावर भरपूर मानवी बुद्धिमत्ता आणि श्रम खर्ची घालावे लागणार आहेत. यादृष्टीने विचारांना चालना देणारे काही लेख आपल्याल वाचायला मिळतील ‘गोष्टी भूजलाच्या’ या विभागात…”
 
तसेच ‘गोष्टी नद्यांच्या’ या विभागाची ओळख करून देताना संपादकांनी म्हटले आहे – भारतात सुमारे ४०० पेक्षा जास्त नद्या आहेत. गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू, यमुना, नर्मदा, तापी, कृष्णा, कावेरी, महानदी या भारतातल्या प्रमुख मोठ्या नद्या. महाराष्ट्रात सुमारे १०० मुख्य नद्या आहेत, तर पश्चिम घाटातून उगम पावून पश्चिमेकडे कोकणातून आडव्या वाहणाऱ्या सुमारे ३६ नद्या आहेत. भारतीय संस्कृतीत नद्यांना मातेसमान मानलेलं आहे. ऋषीमुनींनी नद्यांची सूक्तं लिहिली. प्राचीन काळी माणसाने वस्तीसाठी नद्यांचाच परिसर निवडला. आधुनिक काळात धरणं, जलविद्युत प्रकल्प, सांडपाणी यांमधून माणसांचा नद्यांमध्ये हस्तक्षेप वाढला. उमलणं हा जसा फुलाचा धर्म, रोज नित्यनेमाने उगवणं हा जसा सूर्याचा धर्म, बरसणं हा जसा पावसाचा धर्म तसाच ‘वाहणं’ हा नदीचा धर्म, पण आज नद्यांवर जे काही अत्याचार चाललेत त्याने नद्यांचा प्रवाहीपणाच गेलाय, मरणासन्न अवस्थेत असलेल्या नद्या पुनरुज्जीवित करायच्या असतील आणि ज्या जिवंत आहेत त्यांना मरणासन्न अवस्थेत ढकलायचं नसेल तर आपल्याला ‘नदी’ समजून घ्यायला हवी. नदीच्या बाबातीत त्रांगडं असं की एका ठिकाणी केलेला हस्तक्षेप हा दुसऱ्या कुठल्यातरी लांबवरच्या ठिकाणी जाऊन परिणाम करतो. पुणे शहरात मुळा-मुठा नदीत टाकलेला कचरा हा तिथून सव्वाशे किलोमीटर लांबवर भीमा नदीवरच्या उजनी धरणात जाऊन अडकतो. सह्याद्रीत जंगलतोड झाल्यामुळे कोकणात नद्या गाळाने भरून जातात. महाराष्ट्रात कृष्णा नदीवर धरणं झाल्यामुळे प्रवाहाचा वेग मंदावून तिकड़े आंध्र प्रदेशात कृष्णेच्या मुखाशी समुद्राचं पाणी आत येत. हे प्रश्न यापुढे अधिकाधिक जटिल होत जाणार आहेत. उगमापासून मुखापर्यंत संपूर्ण नदी आणि तिचं खोर यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून विकासाचं नियोजन करण्याला पर्याय नाही. या विभागात नदीचा उगमापासून संगमापर्यंतचा प्रवास आणि तिच्याशी संबंधित सध्याचे ज्वलंत प्रश्न यांचा थोडक्यात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. अजित गोखले यांचा ‘या गाळाचं करायचं काय?’ हा लेख विशेष महत्त्वाचा ठरतो, कारण नद्यांना पुन्हा स्वच्छ, सुंदर, प्रवाहित करण्यासाठी ‘विवेकी गाळ उपसा’ हा फार महत्वाचा आहे. मातेसमान मानलेल्या आपल्या नद्यांची मातेसारखी काळजी घेण्यासाठी भरपूर मानवी बुद्धिमत्त्ता आणि श्रम ओतावे लागणार आहेत. यादृष्टीने विचारांना चालना देणारी ही लेखमाला… गोष्टी नद्यांच्या !”
 
या अंकात अनेक विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. तो ‘थोडक्यात’ असला तरी विषयाची जाणीव करून देण्यासाठी पुरेसा आहे. एक वेगळा अंक काढल्याबद्दल  हर्षद तुळपुळे आणि स्पृहा आठल्ये यांचे अभिनंदन !
(अंकासाठी संपर्क – ८९९९१४७०८२ आणि ९४०५९५५६०८)

Comments