निर्वासितांच्या प्रश्नाचे भयाण वास्तव

 

बातमी -१
आर्मेनियातील दोन तृतीयांश निर्वासित मुले आता शाळेत शिकत आहेत. उरलेल्या एक तृतीयांश मुलांचाही सहभाग त्यात असेल या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तशी सूचनाच ‘युनिसेएफ’ने केली आहे. आर्मेनियात निर्वासित म्हणून आलेल्या या मुलांना सलग शिक्षण मिळालेले नाही. अनेक वेळ त्यात खंड पडला आहे. त्यांना नीट शिक्षण मिळावे आणि निदान ते शिक्षणाच्या बाहेर फेकले जाऊ नयेत यासाठी सध्याची यंत्रणा काम करत आहे. ‘शाळा ही केवळ शिक्षणाची ठिकाणे नाहीत. निर्वासित मुलांसाठी ती सर्वात महत्वाची जागा आहे. त्यांच्या कठीण परिस्थितीतून बाहेर येऊन नव्याने आयुष्य उभारण्यासाठीचे महत्वाचे ठिकाण आहे. या शाळा त्यांना शिक्षण देतात, अन्न देतात, त्यांच्या मानसिक स्थितीवर मार्गदर्शन करतात, अन्य समाजाशी मिळूनमिसळून राहतील हे पाहतात आणि याशिवाय लागेल ती मदत करतात, असे ” युनिसेफ आर्मेनियाच्या प्रतिनिधी क्रिस्टीन वीगँड आवर्जून सांगतात. .

बातमी -२
जर्मनीत निर्वासितांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ज्यांचा निर्वासित म्हणून येण्यासाठीचा अर्ज फेटाळला गेला आहे, त्यांना परत त्यांच्या मूळ देशात पाठवण्याचा निर्णय जर्मन सरकारने घेतला आहे. चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी अशा अवैध स्थलांतरितांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. ‘ज्यांना जर्मनीत राहण्याचा अधिकार नाही, त्यांना आपण मोठ्या प्रमाणावर हद्दपार केले पाहिजे,’ असे त्यांनी नुकतेच ‘स्पीगल’ या जर्मन नियतकालिकाला सांगितले. या संदर्भात जर्मन सरकारने बुधवारी एका कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली. अवैध लोकाना जास्तीत जास्त दहा दिवस जर्मनीत राहता येईल असा नियम होता. हद्दपारीची तयारी करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिक वेळ मिळावा, यासाठी हद्दपारीपूर्व कोठडीचा कमाल कालावधी १० दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या कायद्याच्या मसुद्याला जर्मन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाची (बुंडेस्टाग) मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

बातमी -३
युक्रेनमधून येणाऱ्या लोकांचा ओघ नॉर्वेमध्ये कमालीचा वाढला आहे. त्यांना राहण्यासाठी घरे आणि हाताला काम मिळावे म्हणून नॉर्वे सरकार नवनवीन उपाययोजना करत आहे. नॉर्वेच्या न्याय आणि सार्वजनिक सुरक्षामंत्री एमिली एंगर मेहल यांनी सांगितले की, उन्हाळ्यानंतर नॉर्वेमध्ये (युक्रेनियन नागरिकांचे) आगमन खूप वाढले आहे आणि गेल्या आठ आठवड्यांत इतर नॉर्डिक देशांच्या एकत्रित तुलनेत अधिक लोक येथे आले आहेत. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून ६५,००० पेक्षा अधिक विस्थापित युक्रेनियन लोकांनी नॉर्वेमध्ये आश्रय घेतला आहे, त्यापैकी २९,००० लोक २०२३ मध्ये आले आहेत. यामुळे नॉर्वेमधील सध्याच्या यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. नॉर्वेजियन इमिग्रेशन विभागाने हा लोंढा हाताळण्यासाठी आता अतिरिक्त दोन ते तीन हजार रिसेप्शन केंद्र उघडण्याची योजना आखली आहे.

बातमी -४
गाझामधील हजारो पॅलेस्टिनींना ब्रिटन कसा आश्रय देऊ शकेल, याचा आराखडा अनेक धर्मादाय संस्था आणि इतर संस्थानी तयार केला आहे. इस्रायल व गाझा यांच्यातील संघर्ष अजून चालूच असल्याने हा प्रश्न आणखी चिघळेल अशी भीती रिफ्यूजी कौन्सिल, सेफ पॅसेज इंटरनॅशनल, डॉक्टर्स ऑफ द वर्ल्ड, हेलन बंबर फाऊंडेशन आणि सिटी ऑफ सेंच्युरी या संघटनांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत युक्रेनियन नागरिक एकत्रित राहतील आणि वैद्यकीय मदतीची गरज असणाऱ्या लोकांसाठी वेगळी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये जे आधीच निर्वासित म्हणून राहतात त्यांच्याकडेही अधिक लक्ष देण्यात येणार आहे.

बातमी -५
जगभरातील निर्वासित लोकांची संख्या साडेअकरा कोटींवर पोचली आहे. त्या त्या देशांमधील संघर्ष आटोक्यात ठेवण्यात आंतरराष्ट्रीय समुदायाला अपयश आल्याचे हे द्योतक आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. हा आकडा या वर्षीच्या सप्टेंबर पर्यंतचा आहे. “जागतिक स्तरावर युद्ध, छळ, हिंसाचार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे विस्थापित झालेल्या लोकांची ही संख्या आहे. १९७५ मध्ये निर्वासिताची आकडेवारी नोंदवण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यंत नोंदवलेली ही सर्वाधिक संख्या आहे. यूएनएचसीआरने नमूद केले की २०२३ च्या पूर्वार्धात, विस्थापनाची मुख्य कारणे युक्रेन, सुदान, म्यानमार आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमधील संघर्ष हीहोती; अफगाणिस्तानात मानवतावादी संघर्ष; आणि सोमालियातील नैसर्गिक आपत्ती आणि अस्थिरता हीसुद्धा कारणे होती.

गेल्या चार दिवसातील या बातम्या आहेत. आणि अशा बातम्या रोजच्या रोज येत आहेत. ‘निर्वासित’ या शब्दाचा अर्थ ते निर्वासितपण भोगणाऱ्यालाच कळू शकेल. देशांतर्गत होणारे स्थलांतर आणि एक दिवसांत देश सोडून दुसऱ्या देशात परक्यासारखे राहणारे लोक यात जमीनअस्मानाचा फरक आहे. या साऱ्या लोकांमध्ये इस्रायल संघर्षाने भर टाकली आहे. निर्वासितांच्या प्रश्नाकडे भारतात सहसा लक्ष जात नाही. संघर्ष होणाऱ्या देशांमध्ये कोणी भारतीय लोक अडकले तरच त्याची बातमी होते. म्हणूनच निर्वासित प्रश्नाबाबत अधिक जाण होणे आवश्यक आहे. या संदर्भात पुण्याच्या समकालीन प्रकाशनाच्या ‘अनुभव’ मासिकात काम करणाऱ्या प्रीति छत्रे यांनी लिहिलेले ‘देश सुटतो तेव्हा – विश्वाला व्यापून असलेल्या रेफ्यूजी प्रश्नाचा वेध’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवे. ‘देशांना .. सीमारेषांना .. आणि त्यांच्या असण्या – नसण्याच कारण असणाऱ्या माणसांना ’ हे पुस्तक अर्पण केले आहे. देश कोणताही असो, निर्वासितांचे प्रश्न जवळपास सारखे असतात. आपण कारणीभूत नसतानाही अचानक अंगावरच्या कपड्यांसह किंवा फारतर किडुकमिडूक सामानासह देशाबाहेर जायचे आणि पूर्णतः अंधारात उडी मारायची, उजेड कधी दिसेल ते माहीत नाही, पण तो दिसेल याची दुर्दम्य इच्छा मात्र उरी बाळगायची हे सोपे नाही. कितीही हाल सहन केले तरी रोज पोटाला अन्न लागते ते कुठून आणायचे? दुसऱ्या देशात गेल्यावर बऱ्याचदा प्रश्न येतो तो भाषेचा. तो कसा सोडवायचा? मुलाबाळांचे शिक्षण बंद पडते. ते पुढे कसे चालू ठेवायचे? आपण कसेतरी आयुष्य काढू, पण मुलांनी कायम ‘निर्वासित’ म्हणूनच जगायचे का? दुसऱ्या देशातील सरकारे आणि त्यांच्या यंत्रणा स्वागत करतीलाही कदाचित, पण तेथील स्थानिकांनी आपल्याला स्वीकारले नाही तर काय करायचे? बाहेरून आलेल्या लोकानी आपला रोजगार पळवला, आमच्या सुविधांवर ताण आणला असे स्थानिक लोक म्हणतील त्याचे काय?

जगभरातील संघर्ष कमी होतील अशी चिन्हे अजिबात दिसत नाहीत. म्हणजे निर्वासित लोकांच्या संख्येत सतत वाढ होणार आहे हे निश्चित. इतर देश किती प्रमाणात त्यांना सामावून घेऊ शकतील यालाही मर्यादा आहे. मग सुवर्णमध्य कसा गाठायचा हे ठरवणेच कठीण होईल. या प्रश्नाचा आवाका फार मोठा आणि प्रत्येक संवेदनशील माणसाला कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. भांडतात देशाचे राज्यकर्ते आणि भोगतात सामान्य माणसे. हे चित्र जगभर दिसते. जगात अन्न, पाणी, निवारा या सगळ्या सुविधांवर मर्यादा आहेत. निर्वासित लोकाना आश्रय देणाऱ्या प्रत्येक देशांच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक मर्यादा वेगवेगळ्या आहेत. अशा परिस्थितीत हा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत जाणार आहे.

लेखिका प्रीति छत्रे यांनी (काही आधी प्रसिद्ध झालेले व काही नव्याने लिहिलेले लेख यांचे) पुस्तक लिहिताना प्रामुख्याने सीरियातील निर्वासित प्रश्नांचा ऊहापोह केला असला तरी वेळोवेळी इतर देशांमधील उदाहरणे दिली आहेत. त्यांनी सुरुवातीलाच म्हटले आहे, की ‘सीरिया आणि इतर अरब राष्ट्रांतले निर्वासित युरोपच्या उंबरठ्यावर होचले. त्यावरून युरोपीय देशांमध्ये एक सामाजिक वादळच निर्माण झालं. याचक आणि दाता यापलीकडे त्याची व्याप्ती होती. वर्णभेद, वंशभेद यांनी हा प्रश्न आणखी मोठा करून ठेवला होता. अरब निर्वासित आणि युरोपी समाज सगळेच त्या गर्तेत सापडले होते. त्यांच्यासमोर अनेक अनोळखी प्रश्न उभे राहिले होते. त्यांवरची उत्तरं शोधताना दोन्ही बाजूंची माणसं धडपडत होती, जखमी होत होती. या सगळ्या घडामोडींमागच्या ‘ह्युमन स्टोरीज’ सांगणं, हा लेखांचा मुख्य उद्देश आहे. देशी-परदेशी वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्या, कित्येक वैयक्तिक ब्लॉग, ऑनलाइन व्याख्यानं, पॉडकास्ट्स, माहितीपट, अहवाल, संशोधन लेख अशा वेगवेगळ्या माध्यमांमार्फत इंग्रजीत हा विषय हाताळला गेला आहे. मराठीत मात्र त्यावर फारसं लेखन किंवा विश्लेषण झालेलं नाही. या पुस्तकाने ती कसर थोडीशी भरून निघेल अशी आशा आहे. सीरियातली यादवी २०११ साली सुरू झाली. त्यामुळे पुस्तकात त्यानंतरच्या १० वर्षांतल्या घडामोडींवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. पण सीरिया हे केवळ निमित्त. कारण निर्वासितांचा प्रश्न त्यापलीकडच्या काळाला आणि जगातल्या अनेक देशांनाही व्यापून राहिलेला आहे. पुस्तकाचं काम सुरू असताना याची नव्याने प्रचिती आली… ’

दुसरा देश गाठतानाचा प्रवास अजिबात सोपा नसतो. प्रामुख्याने जलमार्गाने प्रवास करावा लागतो, अक्राळविक्राळ समुद्रात तुलनेने छोट्या बोटीमध्ये कोंबून भरलेली माणसे इच्छित किनाऱ्यावर जिवंतपणे पोचतीलच असे नाही. पोचलेच तर तो देश/ बेट आपल्याला स्वीकारेल का ही भीती, स्वीकारलेच तर पुढचे आयुष्य कसे जेल ही भीती .. ही भीती शृंखला संपतच नाही. पुस्तकातले एक उदाहरण देतो. म्हणजे कल्पना येईल.

‘ऑक्टोबर २०१३, एका संध्याकाळी उशिरा उत्तर आफ्रिकेतल्या लिबियाच्या किनाऱ्यावरून एक बोट निघाली. बोटीत सीरियातले जवळपास ५०० निर्वासित होते. बोट भूमध्यसमुद्रातून निघाली. पुढे सर्वांत जवळचा देश म्हणजे इटली. ती रात्र आणि पुढचा संपूर्ण दिवस ती बोट पाणी कापत चालली होती. त्या मार्गावर इटलीच्या मुख्य भूमीच्या बरंच आधी लाम्पेदूसा हे इटलीच्या अखत्यारीतलं बेट येतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमार या बेटाच्या थोडं अलीकडे असताना बोट उलटली. लाम्पेदूसा बेटाच्या पूर्वेकडे माल्टा हा लहानसा देश आहे. इटली आणि माल्टाच्या जहाजांनी काही निर्वासितांना वाचवलं; पण त्या दिवशी जवळपास २७० जणाना आपले प्राण गमवावे लागले. त्यांत ५०-६० लहान मुलंही होती. भूमध्यसमुद्राच्या भर मध्यातलं हे ठिपक्याएवढं लाम्पेदूसा बेट तोपर्यंत पर्यटनासाठी प्रसिद्ध होतं. तिथल्या एका बीचला हौशी पर्यटकांनी जगातला सर्वोत्कृष्ट बीच म्हणून बिरूदही बहाल केलेलं होतं. २०११ नंतर ट्युनिशिया, लिबिया, एरिट्रिया, नायजेरिया, सोमालिया, सीरिया, येमेन या देशांचे निर्वासित बेटावर येऊन धडकायला लागले. त्यांच्या दृष्टीने ते बेट म्हणजे युरोपचा दरवाजा होता. पण हा अगतिक मानवी ओघ झेलण्याची त्या बेटाची ताकदच नव्हती. एका आकडेवारीनुसार नवीन सहस्त्रकाच्या सुरुवातीपासून पाच लाखांहून अधिक लोकांनी उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून लाम्पेदूस गाठण्याचा आटापिटा केला आणि त्यांपैकी १५ ते २० हजार लोकांनी जीव गमावला. ‘गेट वे टू युरोप’ म्हणवलं जाणारं हे बेट कधी ‘ग्रेव्हयार्ड ऑफ युरोप’ बनलं हे कुणाला कळलंच नाही.’

हा प्रवास कोणीही स्वेच्छेने करत नाही. जगण्यासाठीची धडपड म्हणून करतात. त्यांचा नाईलाज असतो. या संदर्भात आणखी एक उदाहरण देण्यासारखे आहे. लेखिकेने दुसऱ्या प्रकरणात म्हटले आहे, की ‘व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडाच्या सर्वांत उत्तरेकडचा एकेकाळ देश. जगातले सर्वाधिक तेलसाठे त्या देशात होते. मात्र, राजकीय दडपशाही, भ्रष्टाचार, अन्नाची भयंकर टंचाई, वैद्यकीय सेवांचा दुष्काळ आणि एकंदर हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे देशातली ९०% जनता गरिबीच्या खाईत ढकलली गेली. २०१५ नंतर जवळपास तीस-चाळीस लाख व्हेनेझुएली नागरिकांनी देश सोडला आणि जगाचं त्यांच्या समस्येकडे लक्ष गेलं. व्हेनेझुएली निर्वासितांचा प्रश्न कसकसा आकार घेतो हे अभ्यासणाऱ्याच प्रमुख लक्ष व्हेनेझुएला आणि त्याच्या शेजारच्या कोलंबिया, ब्राझिल इत्यादि मोठ्या देशांकडे लागलेलं आहे. मात्र, व्हेनेझुएलापासून अवघ्य १५ किमी अंतरावरचं त्रिनिदाद बेटदेखील या प्रश्नाचा जाच झेलत आहे लोकसंख्येच्या तुलनेत पाहायचं तर त्रिनिदादमधल्या व्हेनेझुएली निर्वासितांची टक्केवारी सर्वांत जास्त आहे. मॅन्युएल रोमेरो हा तिथला व्हेनेझुएली निर्वासित म्हणतो, “समुद्रात भरकटलेल्या लाकडाच्या ओंडक्यासारखं वाटतं. आपण जिकडे नेईल तिकडे फरफटत जायचं; पण आमच्या देशातही राहणं शक्य नव्हतं. तिथे अशी परिस्थिती होती, की तुम्हाला भूक लागली तर चूल पेटवण्यासाठी घरातली एखादी लाकडी वस्तू जळण म्हणून वापरावी लागली असती, कारण गॅसचा पुरवठा आटलेला होता… माझा मुलगा आजारी होता, पण त्याच्यासाठी औषधंच मिळत नव्हती. आमच्या डॉक्टरनी त्याला जनावरांच्या डॉक्टरकडे पाठवलं आणि कुत्र्यासाठीचं औषध घ्यायला सांगितलं.” आपल्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी रोमेरो त्रिनिदादमध्ये आला. तिथे तो मिळेल ती लहान-मोठी कामं करतो.’

हे सारे वाचून अंगावर काटा येतो. प्रत्यक्ष अनुभवणाऱ्यांचे काय होत असेल? हे निर्वासित जेथे जातात तेथील सगळे काही बदलून टाकतात. मुद्दाम नाही, अभावितपणे. पुस्तकात झाटरी या गावाबद्दलचा उल्लेख आहे. तो असा ‘ उत्तर जॉर्डनमधलं एक अगदी लहानसं खेडं- झाटरी. तो सगळा वाळवंटी देश आहे. रूक्ष, ओसाड. क्वचित अधेमध्ये तुरळक वस्ती. झाटरी हा जॉर्डनच्या लष्कराचा मोठा तळ होता. ‘होता’ असं म्हणायचं कारण २०१२च्या मध्यावर तिथे काही वेगळ्याच हालचाली दिसायला लागल्या. त्या कारणीभूत ठरल्या जॉर्डनच्या सीमेपलीकडच्या घडामोडी. झाटरीपासून जॉर्डनची उत्तर सीमा साधारण ६०-७० किलोमीटर आहे, आणि पलीकडे आहे सीरिया. सीरियात शिरलं, की पहिलं मोठं गाव लागतं दारा. २०११मध्ये त्या गावातच सीरियातल्या क्रांतीची पहिली ठिणगी पडली. त्या देशातली यादवी भडकली तीदेखील सर्वांत आधी तिथेच. त्यात पोळलेली माणसं २०१२च्या मध्यावर सीमा ओलांडून जॉर्डनमध्ये यायला सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्रं आणि जॉर्डन सरकारने त्यांच्या सोयीसाठी झाटरीच्या लष्करी तळावर तात्पुरते कापडी तंबू उभारून दिले. त्यांना गरजेपुरतं खाणं-पिणं पुरवलं. ती माणसं १०-१५ दिवस तिथे राहिली असती, फार फार तर एखाद-दुसरा महिना. तोवर त्यांना मदत करायलाच हवी होती. पण ते व्हायचं नव्हतं. सीमेपलीकडून येणाऱ्या माणसांचा ओघ वाढत राहिला, वाढत राहिला. काही दिवस बघता बघता काही महिने बनले. १०-२० तंबूंच्या जागी १००-२०० तंबू आले, त्यांचे हजार-दोन हजार तंबू झाले. झाटरी या नावासोबतची लष्करी तळाची ओळख कधी पुसट होत गेली ते कुणाला कळलंच नाही. त्याच्या -जागी उभा राहिला ‘झाटरी रेफ्युजी कॅम्प’. त्याच्या विस्ताराचा वेग छाती दडपवणारा होता. निर्वासितांची छावणी हा प्रकार जगाला तसा नवीन नाही; मात्र झाटरीसारखी गोष्ट याआधी कुणीच पाहिली नव्हती. कारण पुढच्या दोन वर्षांत तब्बल एक लाख सीरियन निर्वासित झाटरी कॅम्पमध्ये आले. त्यांना राहण्यासाठी तंबूंच्या जागी जरा बरे चौकोनी आकाराचे ‘कॅराव्हान्स’ आले. त्यांच्या ओळींचे रस्ते, गल्ल्या, चौक तयार व्हायला लागले. ठिकठिकाणी थोडेफार विजेचे खांब आले. ठराविक अंतरावर पाण्याच्या टाक्या उभ्या राहायला लागल्या. बघता बघता हे जॉर्डनमधलं चौथ्या क्रमांकाचं सर्वांत मोठं शहर बनलं ! एक ‘पॉप-अप सिटी’, कुणाच्याही गावी नसताना उगवलेलं एक शहर. वाळवंटातलं एक भलतंच, नकोसं ओअॅसिस.’

अगदी असेच नाही, पण आश्रय देणाऱ्या जवळपास सगळ्या देशांमध्ये असे ‘रेफ्युजी कॅम्प’ उभे राहिले. त्या भागाची सगळी गणिते क्षणात बदलून गेली. या रेफ्युजी कॅम्पमधील लोकांसाठी जगभरातील विविध क्षेत्रातील लोक उभे राहिले. लेखक, पत्रकार, समाजसेवी संस्था इतकेच काय तर विदूषक आणि चित्रकार / आर्टिस्टसुद्धा मदतीला धावले. लेखिकेने १९९०च्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट सांगितली आहे. ‘ स्पेनमधला एक प्रसिद्ध विदूषक टोर्टेल पोल्त्रोना बार्सिलोना शहरातल्या एका शाळेत गेला होता. पोल्त्रोनाच्या गमतीजमती त्या शाळेतल्या मुलांना माहिती होत्याच. तो त्यांचा अगदी आवडता विदूषक होता. त्या दिवशी त्या मुलांनी पोल्त्रोनाकडे एक अनपेक्षित मागणी केली. पोल्त्रोनाने थेट क्रोएशियातल्या एका शाळेत जाऊन तिथल्या मुलांसाठी कार्यक्रम करावा अशी त्यांची इच्छा होती. तेव्हा युगोस्लाव्हियामध्ये मोठं यादवी युद्ध माजलं होतं. बार्सिलोनाच्या मुलांची क्रोएशियाच्या काही निर्वासित मुलांशी पत्रमैत्री होती. ती निर्वासित मुलं हसणं विसरली होती, मजा कशाला म्हणतात हे विसरली होती. त्यांनी बार्सिलोनातल्या मुलांना पत्रांतून त्याबद्दल सांगितलं. त्यावर या मुलांना पोल्त्रोना न आठवता तरच नवल होतं. पोल्त्रोना या मुलांची ही विनंती अव्हेरणं शक्यच नव्हतं. तो आपल्या काही सहकारी विदूषकाना घेऊन १९९३ साली क्रोएशियाच्या इस्त्रिया प्रांतातल्या त्या शाळेत पोहोचला. बार्सिलोनाच्या मुलांनीच त्यांच्या प्रवासासाठी निधी उभा केला. त्यांतली १२-१३ वर्षांची काही मुलंही पोल्त्रोनाबरोबर क्रोएशियाला गेली. या पहिल्या दौऱ्यात पोल्त्रोनाने जवळपास चार हजार मुलांसमोर कार्यक्रम केले.”

इतकेच नाही, तर परतल्यावर स्पेनमधल्या इतर विदूषकाना त्याबद्दल सांगितले. मग इतरही त्यात सामील झाले. १९९३ -९४ वर्षांत विदूषकानी काही देशांचे १२ दौरे केले आणि मुलांच्या चेहेऱ्यावर हास्य आणले. हे काम सर्वात कठीण होते. आपल्याला उद्या जिवंत राहता येईल की नाही, हे माहीत नसणाऱ्या व त्याच अनामिक भीतीने ग्रासलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे काम किती कठीण असेल याची कल्पना आपण करू शकतो.

अशा निर्वासित लोकांचे भविष्य काय? लेखिका म्हणतात, ‘जगभरातल्या निर्वासितांपैकी ५० टक्के निर्वासित १८ वर्षांखालचे आहेत. ८० टक्के निर्वासित त्या परिस्थितीतून नजीकच्या भविष्यकाळात बाहेर पडतील याची शक्यता जवळपास शून्य आहे. परिणाम ? निर्वासित मुले त्यांच्या शिक्षण घेण्याच्या वयात सलग १०-१२ वर्षं परागंदा अवस्थेतच राहण्याची शक्यता असते. त्यांचं अख्खं बालपणच विस्थापित अवस्थेत जातं. त्यापैकी पाच वर्षांच्या आतली मुलं शाळेचं तोंड पाहण्यापूर्वीच विस्थापित झालेली; तर त्यांच्याहून मोठी शाळेशी तोंडओळख झालेली, मात्र पुन्हा शाळेत जातील की नाही याची अजिबात शाश्वती नसलेली. आपलं घर, गाव, देश सोडून पळावं लागतं तेव्हा दुसऱ्या ठिकाणी मूलभूत सोयी मिळवणं, नव्याने ओळख मिळवणं यात खूप ताकद खर्ची पडते. पोटापाण्यासाठी लहान मुलांसकट सर्वांना काम शोधावं लागतं. ते झाल्यानंतरही पुढे प्रत्येक पावलावर अडचणी असतात. मुळात कित्येक ठिकाणी निर्वासित मुलांसाठी शाळाच नसते. एखादी असलीच, तर तिथे आधीच मुलांची संख्या प्रचंड झालेली असते, शिक्षक नसतात अभ्यासाची-खेळांची पुरेशी साधनं नसतात, मूलभूत सुविधांची वानवा असते. अनेक ठिकाणी पालकांकडे योग्य ती ओळखपत्रं, मुलांच्या शिक्षणाची प्रमाणपत्रं नसल्याने शाळाप्रवेशात अडचणी येतात…. त्यांच्याजवळ अशी कागदपत्रं नसतात, कारण त्यांनी जीव वाचवण्यासाठी तडकाफडकी घरं सोडलेली असतात. पण हे कुणीच लक्षात घेत नाही.’

शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. निर्वासित झाल्यावर लहान मुले प्राथमिक शाळेत मोठ्या संख्येने जातात. माध्यमिक शाळेत त्यांची संख्या ७५ टक्क्यांनी आटते आणि उच्च शिक्षणाची तर बातच सोडा ! पुस्तकात या निर्वासित लोकांचे सगळे प्रश्न मांडलेले दिसतात. लेखन करताना प्रामुख्याने सीरिया (आणि अरब स्प्रिंगचे परिणाम) समोर असला तरी जगभरात याचे पडसाद उमटत असल्याचे त्या त्या ठिकाणी नमूद केले आहेच. हा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. ज्या जर्मनीत एंजेला मरकेल यांनी निर्वासिताना मदतीचा हात दील तिथेच आता अवैध लोकाना बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. यावरूनच सारे लक्षात यावे. म्हणूनच हा प्रश्न मराठीत पुस्तक रूपाने सर्वांसमोर मंडल्याबद्दल लेखिकेचे आभार मानायला हवेत.

पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निर्वासितांची छायाचित्रे. विलक्षण अस्वस्थ करून जाणारी. युद्ध पत्रकारांचे अनुभव. म्युरल तयार करणाऱ्या लोकांचे अनुभव. हेही सारे अस्वस्थतेत भर टाकते. जगात या निर्वासितांना मदतीचा हात मिळतो आहे आणि ते पुन्हा आयुष्य ‘जगायला’ सुरुवात करत आहेत हे मान्य, तरीदेखील हा मूळ प्रश्न काही संपण्याची चिन्हे अजिबात दिसत नाहीत ही वाईट गोष्ट आहेच !

Comments