RNEP ही NEP इतकीच महत्वाची !
Responsible Netism 1st National Cyber Psychology Conference 2017
Theme: Living Life 2.0: Coming together to Interface our Online and Offline Lives. Date: January 20-21, 2017 | Mumbai
2nd Conference 2018 – Theme: Building Cyber Hygiene Culture. Date:January 18-19, 2018 | Mumbai
3rd Conference 2019 – Theme:Child Online Protection
Date:January 8, 2019 – Run-up event at Kolhapur, January 18, 2019 – Run-up event at Aurangabad, January 23, 2019 – Main event at Mumbai
4th Conference 2020 – Theme: Child Online Protection. Date: January 23-24, 2020 | Pune
5th Conference 2021 – Theme: Coping With Technology, New Education Policy And New Normal
Date: January 23, 2021 |
6th Conference 2022 – Theme: India Fights Cyber Violence against Women and Children
Date: January 22, 2022 |
6th Conference 2023 – Theme: Cyber Wellness: Ensuring Mental Well-being in Cyberspace
Date: Saturday, January 21, 2023 |
8th Conference 2024 – Theme: “Evolution of Cyber Wellness in Education”
Date: Saturday, January 20, 2024 |
पुण्यामध्ये 20 जानेवारीला ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेची आठवी परिषद पार पडली या संस्थेचे गेले एक तप चाललेले काम पाहिले तर या परिषदा हे त्यांच्या कामाचे हिमनगाचे टोक आहे असे म्हणावे लागेल परंतु असे म्हटल्याने या परिषदांचे महत्त्व कमी होत नाही. गेल्या आठ वर्षातले विविध विषय वर दिले आहेत यावरून त्यांच्या परिषदांमध्ये कोणत्याकोणत्या विषयांचा उहापोह झाला, विविध तज्ञ मंडळींनी एकत्र येऊन ज्यावर मार्गदर्शन केले ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. २० जानेवारीला पुण्यात याचा अनुभव घेता आला. शिक्षण क्षेत्रात सायबरवेलनेसचा प्रभाव किंवा त्याचा उपयोगी वापर असा या परिषदेचा मुख्य विषय होता.
मुख्यमंत्र्यांबरोबर दावोसला गेलेले ब्रिजेश सिंग तिथून मुंबईत आले आणि लगेच थेट या परिषदेसाठी पुण्यात आले यावरून परिषदेचे महत्व लक्षात यावे. ब्रिजेश सिंग यांचे या संस्थेला मिळत असलेले सहकार्य फक्त या वर्षांपुरते मर्यादित नव्हते तर त्यांच्या सायबर सुरक्षेच्या प्रेमापोटी संस्थेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून ते निगडीत आहेत. या परिषदेत त्यांच्याबरोबर मुकुल जोशी, कृष्णन रघुनाथन, दिलीप तिकले , ऍड़वोकेट वैशाली भागवत, मंगेश वाघ, डॉ भूषण शुक्ल, प्रसाद शिरगावकर, डॉ श्रुती पाटील, समीर आठल्ये, निनाद छाया, फ्रांसिस जोसेफ आदि तज्ञ लोकानी यात मार्गदर्शन केले. मुकुल जोशी यांचे सादरीकरण यात वेगळे ठरले. आकडेवारी, चार्ट, ग्राफिक्सचा वापर करून त्यांनी या साऱ्या विषयातली वस्तुस्थिती समोर मांडली
झपाट्याने बदलत असणारे तंत्रज्ञान टाळता येणार नाही, त्यामुळे त्याचा योग्य वापर कसा करता येईल, रोजच्या शिक्षणात त्याचा वापर कसा करता येईल हे बघायला हवे असे सर्वांच्या बोलण्याल्याचे समान सूत्र होते. नवीन पिढी तंत्रज्ञानाच्या नव्या युगात जन्मलेली आहे. त्यांचे पालक मात्र जुन्या युगातले आहेत किंवा काही पालकांचे अर्धे आयुष्य आधुनिक तंत्रज्ञानाविना गेले आहे आणि अलीगडचा काही काळ या तंत्रज्ञानाशी ओळख करून घेण्यात केले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या कोविडने हे तंत्रज्ञान शिकण्यास प्रत्येकाला भाग पाडले आणि जणू काही प्रत्येकजण टेकसॅव्ही झाला. परंतु हे टेकसॅव्ही होणे म्हणजे व्हॉट्सअॅपवरून मेसेज फॉरवर्ड करणे किंवा व्हॉट्सअॅप कॉल करणे हे नव्हे. तंत्रज्ञानही रोजच्या रोज ‘सुधारत’ आहे आणि तीन दशकांपूर्वी जन्मलेल्या पिढीलाही त्याच्याशी जमवून घेण्या थोडा वेळ लागत आहे. हे तंत्रज्ञान दुधारी आहे त्याचा वापर योग्य कारणासाठी झाल्यास प्रचंड मोठा फायदा आहे, परंतु त्या तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यास रोजच्या दिवसाचे ९-१० तास मोबाईल वा लॅपटॉपमध्ये डोके घालून बसल्यास त्याचे होणारे दुष्परिणामही प्रचंड आहेत या धोक्याची जाणीव करून देणे, त्यावरच्या उपाययोजना सुचवणे आणि त्या अमलात आणताना येणार् या अडचणींवर मात करून रोजच्या शिक्षणात या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करणे याबाबत या परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले.
रिस्पॉन्सिबल नेटिझमने शाळा, महाविद्यालय आणि एकंदरीत सर्व समाजासाठी मोठे काम केलेले आहे वर उल्लेखलेल्या आठ परिषदांमध्ये या कामाचे प्रतिबिंब पडते आणि लोकांना प्रत्यक्ष तज्ज्ञ लोकांशी बोलण्याची, त्यांचे म्हणणे थेट ऐकण्याची संधी मिळते. परिषदेत सहभागी झालेले काहीजण विद्यार्थी होते, काही पालक तर काही शिक्षक. तंत्रज्ञानाशी सामना करताना या तीनही घटकांत पुढे येणारे प्रश्न हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. मुलाला मोबाईल दिला की तो त्याच्या आहारी जाणार् नाही ना याची पालकाला चिंता असते, तो मोबाईलवर काय बघतो आहे हे जाणून कसे घेता येईल हा एका पालकाने विचारलेला प्रश्न खूपच प्रातिनिधिक होता किंवा फोन मुलाला ठराविक वेळ बघता येईल, नंतर तो फोन बंद पडेल अशी व्यवस्था एका पालकाने केल्यावरही फोन बंद असणे अपेक्षित असलेल्या वेळेत मुलगा फोन वापरत होता हे पाहून आश्चर्यचकित झालेला पालक हेही एक प्रातिनिधिक चित्र होते. सायबर तज्ञ असलेल्या पालकालाही हा प्रश्न पडत असेल तंत्रज्ञानात फारशी गती नसलेल्या पालकांनी काय करायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.
शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधी म्हणून श्रीमती जागृती धर्माधिकारी आणि श्रीमती अंजली सरदेसाई या सहभागी झाल्या होत्या. मुलांकडून होणारा फोनचा अतिवापर किंवा कदाचित गैरवापर याबाबत शाळा काय करू शकतात, पालकांनी काय केले पाहिजे या दोघींनी काही उदाहरणे देऊन सांगितले. परंतु या प्रश्नावर शाळांकडे आर्थिक तरतूद फार कमी असते. किंबहुना असे वेगळे बजेट या प्रश् नावर दिले जात नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात. असे श्रीमती सरदेसाई यांचे म्हणणे होते. तोच धागा पकडून अॅडव्होकेट वैशाली भागवत यांनी शिक्षण संस्थांकडे अशा गोष्टींसाठी पुरेशी आर्थिक तरतूद हवी, कायदेशीर सल्ला घेण्याची वेळ आली तर पैसे लागतातच हे सांगितले. त्याबरोबरच त्यांनी एका गोष्टीवर स्पष्टीकरण दिले की मुलांशी संबंधित कोणतेही गंभीर प्रकरण पुढे आले तर त्याची तक्रार शाळेने अथवा महाविद्यालयाने संबंधित विभागाकडे करावी लागेल, पोलिसांकडे जावेच लागेल, न गेल्यास तो गुन्हा होऊ शकतो. अशी प्रकरणे परस्पर दाबून टाकणे पूर्णतः अयोग्य आहे. यातून मूळ प्रश्न सोडवला जात नाही. उत्तर शोधून योग्य ते मार्गदर्शन करणे खूप गरजेचे असते आणि त्यासाठी सर्व घटकांची मदत घेतली जाणे गरजेचे आहे हे आवर्जून सांगितले.
परिषद जवळपास सर्व वक्त्यांनी ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) या विषयाचा उल्लेख केला. या हेमुळे काय काय होऊ शकते याची कल्पना दिली. याचा सकारात्मक वापर झाल्यास शिक्षणासाठी मदत होईल हे सांगितले. आपण या एआय संबंधात अजून चाचपडत असलो तरी यूएई म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये एआयद्वारे तयार केलेला शिक्षक विद्यार्थाला शिकवू शकेल का याचे प्रयोग चालू आहेत, ते यशस्वी झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या गरजेप्रमाणे, त्याच्या मानसिक कुवतीप्रमाणे आणि शैक्षणिक क्षमतेप्रमाणे हा शिक्षक शिकवू शकेल. शिक्षणातील ती मोठी क्रांती असेल.
सा या परिषदेचा मुख्य फोकस शिक्षणावर असल्यामुळे सहाजिकच नव्या शैक्षणिक धोरणाबाबत या परिषदेत चर्चा झाली. हे धोरण लागू करताना तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी कशी लावावी, काही अॅप्सचा वापर करून शिक्षण कसे सहज देता येते याबद्दल सांगण्यात आले. आधीच्या परिषदांच्या विषयावर परत नजर टाकली तर २०२१ मध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा विषय घेतला होता. पान गेल्या तीन वर्षांत या धोरणाबाबत साधकबाधक चर्चा झाली, तंत्रज्ञान झपाट्याने बदलत गेले, शिक्षणाच्या गरजा बदलत गेल्या, त्यामुळे २०२४ मध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून हा विषय परत घेणे हे क्रमप्राप्त होते. या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल अजूनही उलट सुलट चर्चा चालू आहे. हे धोरण टप्प्याटप्प्याने अमलात येत आहे. अशा वेळेस ही चर्चा आवश्यक होती.
जेव्हा कोविड हा शब्दही कोणी केला नव्हता तेव्हा म्हणजे २०१७ सालच्या परिषदेचा विषय बघा. ऑनलाइन आणि ऑफलाइन आयुष्य याची सांगड कशी घालावी असा हा विषय होता. तो आता जास्तच प्रखरपणे जाणवत आहे. २०१९ मध्ये मुलांचे ऑनलाइन संरक्षण कसे करावे हा विषय होता. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये महिला आणि मुले यांच्यावर होणारा सायबर हिंसाचार हा विषय होता. हे सगळे विषय आजही अत्यंत महत्वाचे आहेत. गेला तीन वर्षामध्ये तंत्रज्ञानाचा वापर / गैरवापर, शैक्षणिक धोरणामध्ये टयाचा झालेला समावेश यामुळे विविध बाबींमध्ये बरेच बद्दल झाले आहेत. २०१७ मध्ये सुरू झालेला परिषदांचे विषय पाहिले तर काळाच्या पुढे जाऊन ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ने आपल्याला जागृत करण्याचे काम केले आहे. सोनाली पाटणकर, उन्मेश जोशी आणि त्याची संपूर्ण टीम गेले एक तप ज्या निष्ठेने काम करत आहे, त्याची योग्य दखल सरकारकडून घेतली गेली नाही ही खंत आहे. गेल्या आठ वर्षात परिषदांच्या निमित्ताने या संस्थेने (आणि या विषयावर काम करणाऱ्या अनेक संस्थानी) जे विचारमंथन केले आहे त्यापासून धडा घेऊन सरकारने शैक्षणिक अभ्यासक्रमांत या विषयाचा पुरेसा समावेश करणे गरजेचे आहे. परंतु सरकारचे आणि प्रशासनाचे काम खूप वेगळ्या पद्धतीने चालते. लाल फितीत अडकलेले सरकार बाहेर पडून या क्षेत्रात काम करेल ही अपेक्षा आपण ठेवायची का? कारण आपण कितीही काम केले तरी राज्यभरात हा विषय जाण्यासाठी सरकारची मदत घ्यावी लागते. इकडे ‘स्वबळा’वर लढून चालत नाही आतापर्यंत सरकारच्या वेगवेगळ्या मंत्र्यांनी आश्वासाने भरपूर दिली परंतु आपणच दिलेली आश्वासने आपल्याला पाळायची असतात हे मात्र फार कमी लोकांना कळते. प्रत्येक गोष्टीत राजकारण होऊ नये एवढीच इच्छा असते.
‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ चे काम जाणून घ्यायचे असेल तर https://responsiblenetism.org/ या वेबसाईटला जरूर भेट द्या. सायबर गुन्हा झाल्यावर नंतर धावण्यापेक्षा आधीच सायबर जागृत व्हा. ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ ने गेल्या बार वर्षांत जे काम केले आहे त्यामुळे एक प्रकारे सायबर सुरक्षेबाबत एक अर्थाने अभ्यासक्रम तयार झाला असे मी म्हणेन. त्याला मीRNEP म्हणेन. Responsible Netism Education Policy असे म्हणता येईल. या संस्थेचे काम मुंबई – ठाणेसह संपूर्ण महाराष्ट्रात चालते. काही काळापूर्वी गोव्यात एक केंद्र सुरू झाले आहे. मध्य प्रदेशात काम चालू आहे. आता लवकरच पुण्यात स्वतंत्र केंद्र सुरू होत आहे. तंत्रज्ञान जसजसे अधिक ‘प्रगत’होत जाईल तसतसे सायबर गुन्हेगार अधिकच ‘प्रगत’ होतील. AI आताच करामत दाखवायला सुरुवात करत आहे. त्यामुळे ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ सारख्या संस्थांचे काम अधिकाधिक वाढणार आहे.



Comments
Post a Comment