कसोटी क्रिकेटच्या भल्यासाठी ...
भारताने इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी जिंकून मालिका खिशात टाकली. आता पाचवी आणि शेवटची कसोटी सात मार्च रोजी सुरु होईल. चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह या आपल्या सर्वात उत्तम वेगवान खेळाडूला विश्रांती देण्यात आली होती. तरी रविचंद्रन आश्विन , रवींद्र जडेजा आणि नवोदित आकाश दीप यांनी बुमराहची उणीव भासू दिली नाही. रांचीमध्ये नवा समर्थ यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलच्या रूपाने आपल्याला मिळाला. जुरेलने यष्टिरक्षण आणि फलंदाजी या दोन्ही बाबींमध्ये जी चमक दाखवली ती निश्चितच सुखावह होती.
गेल्या काही कसोटी सामन्यांचा इतिहास पाहिला तर कसोटी पाचव्या दिवसापर्यंत जातेच असे नाही. याचा दोष सर्वस्वी खेळपट्टीला देऊन चालणार नाही. काही अंशी खेळपट्टी, काही अंशी उत्तम गोलंदाजी आणि काही अंशी ढेपाळलेली फलंदाजी यास जबाबदार आहे असे दिसते. पाच दिवसांची कसोटी हेच खरे क्रिकेट असे नेहमी म्हटले जाते. ते खरेच आहे. परंतु अलीकडची परिस्थिती पाहिली तर झटपट क्रिकेट व त्यात मिळणाऱ्या पैशांवर डोळा ठेवून कसोटी क्रिकेट न खेळात टी 20 च्या आयपीएल मध्ये खेळण्याकडे जास्त लक्ष दिले जाते. हे दिसून आले आहे. कसोटी क्रिकेट खेळणारेकाही मोठे खेळाडू रणजी वा अन्य देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणे टाळतात, हेही दिसून आले आहे. खरे म्हणजे रणजी , दुलीप वगैरे स्पर्धा या क्रिकेटपटूंची कारकीर्द घडवणाऱ्या स्पर्धा आहेत. पण ज्या शिडीच्या आधारे कसोटी क्रिकेटचे शिखर गाठले ती शिडी विसरणारे काही खेळाडू या देशात आहेत असे नाईलाजाने म्हणावे लागते.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, कसोटी सामना खेळल्यास प्रत्येक भारतीय खेळाडूस 15 लाख रुपये मिळतात, एक दिवसीय सामन्यांसाठी पाच लाख आणि टी 20 सामन्यासाठी तीन लाख रुपये मिळतात. ही रक्कम कमी नाही. तरी कसोटी सामन्याकडे दुर्लक्ष करून टी 20 आयपीएलला कोणी प्राधान्य देत असल्यास काय करायचे ? कालच वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जो खेळाडू वर्षभर कसोटी क्रिकेट खेळेल त्याला त्याच्या फी मध्ये वाढ करून मिळेल, शिवाय वेगळी वार्षिक फी असते ती मिळेलच, असा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विचार आहे. कसोटी क्रिकेट जगेल का हा प्रश्न गेले काही वर्ष चर्चिला जात आहे, त्यावर वाढीव पैसे हेच उत्तर असल्याचे भारतीय मंडळाला वाटत आहे. खेळाडूंनाही आपला कस कसोटीतच लागतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही ते पैशांच्या मागे लागतात, हे दिसते आहे.
स्थानिक क्रिकेट्स्पर्धांमध्ये न खेळण्याबरोबरच इतर काही कारणांमुळे काही क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दणका दिला आहे. तर कसोटीत उत्तम कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला बक्षीस दिले आहे. सप्टेंबर २०२४पर्यंत जे वार्षिक कंत्राट खेळाडूंबरोबर केले जाते त्यात मंडळाने हा उलटफेर केला आहे. मोहम्मद सिराज, के एल राहुल, शुभमन गिल याना ग्रेड ‘बी’ मधून ‘ए’ मध्ये बढती मिळाली आहे. रिषभ पंत आणि अक्षर पटेल ‘ए’ मधून ‘बी’ मध्ये आले आहेत तर कुलदीप यादव हा ‘सी’ मधून ‘बी’ मध्ये आला आहे. यशस्वी जयस्वायल , रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिष्णोई, जितेश शर्मा, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्ण, आवेश खान आणि रजत पाटीदार याना नव्याने कंत्राट कक्षेत आणण्यात आले आहे. सोबत आज ‘हिंदुस्थान टाइम्स’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेला ग्राफ देत आहे. त्यावरून हे वर्गीकरण आणि त्यांचे पैसे यांची कल्पना येईल. कासोट, एक दिवसीय सामने आणि टी २० खेळल्याबद्दल मिळणारे पैसे वेगळे असतात.
गेल्या काही वर्षांत भारतीय पुरुष / महिला खेळाडूंनी क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांमध्ये चांगले यश संपादन केले आहे. काही वर्षांपूर्वी पिछाडीवर पडलेल्या हॉकीलाही चांगले दिवस येत आहेत. हे खेळ विकसित होत असताना क्रिकेटमध्ये मात्र ज्याला अस्सल क्रिकेट म्हणतात त्या कसोटी सामन्यांकडे मात्र काही खेळाडू दुर्लक्ष करत आहेत हे लक्षण चांगले नाही. कसोटी संघात प्रवेश मिळवणे कठीण असते, देशांतर्गत स्पर्धा खेळून चांगले पैसे मिळत नाहीत, मग आयपीएलमध्ये खेळून जास्त पैसे मिळवले तर बिघडले कुठे, असा युक्तिवाद यावर करण्यात येतो. इथे प्रश्न पैशांपेक्षा कसोटी क्रिकेट टाळून आयपीएल खेळण्याचा आहे. आयपीएल जरूर खेळा, परंतु अस्सल कसोटीला दुर्लक्षू नका, हा मुद्दा महत्वाचा आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा यानेही या आठवड्यात चौथी कसोटी संपल्यावर या संदर्भात खडे बोल सुनावले आहेत. ते काही जणांना ऐकू येणार नाहीत हे माहीत असूनही !
आयपीएल किंवा दोन देशांमधील टी 20 सामने यांत वाढ होते आहे आणि कसोटी सामन्यांची संख्या घटत आहे. कसोटी सामन्याला कमी गर्दी होते, म्हणजेच मंडळाला कमी पैसे मिळतो, असा दावा होतो. टी 20 सामन्याला भरपूर गर्दी होते, पैसाही मिळतो. अलीकडच्या कसोटी सामन्यांनी मात्र लोकांना परत कसोटीकडे वाळण्यास भाग पडले आहे. रंगतदार सामने, शेवटपर्यंत वाढत जाणारी उत्कंठा यामुळे काही कसोट्या चर्चेत राहिल्या. क्रिकेटमध्ये आता फक्त तीनचार महत्वाच्या देशांकडे लक्ष जाते असे नाही. अगदी अफगाणिस्तानसारखा नवशिका देश चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे दर्जेदार क्रिकेट फक्त आपणच खेळतो हा भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या संघांचा भ्रम कधीच दूर झालेला आहे. क्रिकेटमधील बदलत्या परिस्थितीकडे कनिष्ठ / वरिष्ठ खेळाडूंनी लक्ष देणे आवश्यक आहे.
तुमचे काय मत आहे ?

Comments
Post a Comment