बुरा ना मानो, होली है …
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर आता देशातील राजकारणाला खरा वेग आला आहे. राजकीय विचारधारा, निष्ठा वगैरे बाबी भूतकाळात जमा झाल्याने तिकीटवाटप होईपर्यंत कोणते नेते कुठे पळ काढतील हे सांगता येणे कठीण झाले आहे. एक पक्ष सोडला की दुसऱ्या पक्षात कोणतेही तिकीट वा पद किमान एक वर्षभर मिळणार नाही अशी अट घातली तर बहुदा एकही पक्षांतर होणार नाही. परंतु कोणताही पक्ष हे पाळणार नाही. कारण ते कोणत्याही पक्षाला सोयीचे नाही हे उघड आहे. ‘मी अमुक एका पक्षाच्या विचारधारेने प्रभावित होऊन त्या पक्षात जात आहे, कोणत्याही पदाच्या आमिषाने नाही,” असे सांगणारे नेते पक्षांतरानंतर काही तासांतच लोकसभेचे तिकीट अथवा राज्यसभा पदरात पाडून घेतात हेही आता नवीन राहिलेले नाही. याला महाराष्ट्रही अपवाद राहिलेला नाही. हे गेल्या साधारण दोन दशकांच्या राजकारणातून आपल्याला दिसले आहेच. गेल्या चार वर्षांत तर ही प्रक्रिया फारच वेगाने झाली आहे. आणि लोकसभा निवडणूक पार पाडल्यावर आणि विधानसभा निवडणुकीआधी आणखी किती वेगाने होईल याची फक्त कल्पनाच केलेली बरी !
भारतीय जनता पक्ष नेतृत्व करत असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस नेतृत्व करू पाहात असलेली महाविकास आघाडी यांच्यातील रस्सीखेच अजून संपलेली नाही. होतकरू नेत्यांना भारतीय जनता पक्ष, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस इतके पर्याय असल्याने अवघी पळापळ चालू आहे. त्यात आणखी छोटे पक्षही मागे राहिलेले नाहीत. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्यामुळे त्यांचा पक्ष अजून तरी एकसंध आहे. अन्यथा राजकीय अपरिहार्यतेमुळे ‘मोठा भाऊ’ असतानाही ‘लहान भावाची भूमिका भूषवावी लागल्याने नाराज असलेले भाजपवासी अधिकच अस्वस्थ झाले असते. अर्थात गेल्या आठवडाभरात कदोन ठिकाणी ही अस्वस्थता दिसून आली, परंतु फडणवीस यांनी तिथे संबंधितांची समजून काढली आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही, अशी आताची तरी परिस्थिती आहे.
सत्तेत जितके जास्त भागीदार तेवढे जास्त वाद आणि अस्वस्थता जास्त हे चित्र देशाच्या राजकारणात नवीन नाही. महाराष्ट्रात काही दशकांपूर्वीच, कोणत्याही एका पक्षाचे स्थिर सरकार येण्याचे दिवस गेले हे लक्षात आल्याने, आघाडीची सरकारे यायला सुरुवात झाली. आणि त्यात वारंवार बिघाडीही होताना दिसून आली. तरी शक्य तोवर एकमेकांशी जुळवून घ्यायचे असे धोरण असल्याने सगळे अपमान गिळून विविध लहानमोठे पक्ष आपापले हित सांभाळून काम करत राहिले. परंतु, प्रत्येकाच्या आकांक्षेचे धुमारे काही कमी होत नव्हते. प्रत्येकवेळा ‘त्यागाची संधी’ मलाच का, हा प्रश्न मनात भेडसावणे स्वाभाविक होते. ती अस्वस्थता आता सर्वच पक्षांत दिसू लागली आहे, यात नवल नाही. वयाची साठी उलटली तरी राजकारणात हाती काहीच लागत नाही, २०२४ मध्ये संधी मिळाली नाही तर नंतर मिळण्याची तर शक्यताही नाही, ही भीती हा एक भाग आहेच !
या साऱ्यात जास्त अडचण होते ती सामान्य कार्यकर्त्यांची. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा , ‘दुश्मनी जमकर करो, लेकीन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हो.. ” हा सल्ला नेते मंडळी बरोबर लक्षात ठेवतात आणि योग्य वेळी तो सल्ला पाळतातही. . पण सामान्य कार्यकर्त्यांना ते पचविणे खरेच कठीण जाते. अशा परिस्थितीत सामान्य मतदार या निवडणुकीकडे कसा पाहतो ही पाहणे कुतूहलाचे ठरेल. कोणतेही राज्य वा सरकार असो, मतदानाच्या दिवशी रोखठोक भूमिका घेणे हे या मतदाराच्या हाती असते. याआधी अनेकवेळा तसे घडलेही आहे. या दृष्टीने मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतलेली कडक भूमिका स्वागतार्ह आहे.
निवडणुकीच्या काळात रोज होणाऱ्या आरोप – प्रत्यारोपांनी लोक कंटाळतात आणि राजकारणापासून दूर जातात हे या नेत्यांच्या कसे लक्षात येत नाही? अनेकवेळा प्रसार माध्यमांनाही ते कळत नाही आणि प्रेक्षक / वाचक आपल्यापासून लांब जात आहेत याकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. सामान्य माणसांच्या गरजा आणि आकांक्षा वेगळ्या आहेत. आता प्रत्येक पक्षांचे जाहीरनामे उर्फ आश्वासननामे प्रसिद्ध होतील हे नव्याने प्रसिद्ध करण्यापेक्षा मागील निवडणुकीवेळी दिलेली किती आश्वासने पाळली आणि किती पाळली नाहीत याचा ‘खुलासानामा’ प्रसिद्ध करा आणि एखादे पान नवीन आश्वासनांचे जोडा, हेच बहुदा मतदाराचे (भोळे) सांगणे असेल. पण त्याकडे लक्ष कोण देतो?
शिक्षण, आरोग्य, नोकऱ्या या संदर्भात किती आश्वासने दिली गेली आणि किती पाळली गेली याचा हिशेब कधी मिळणार असे भोळे प्रश्न बिचाऱ्या मतदाराला पडत असतात.नवीन ‘लोक(?)प्रतिनिधी’ निवडून आल्यावर पुन्हा पाच वर्षे सारे शांत. परंतु, निवडणूक होईपर्यंत ‘बुरा ना मानो, होली है’, हेच वातावरण राहणार असेच दिसते आहे. निवडणुकीत गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा न होता एकमेकांची उणीदुणी काढण्यावरच भर दिला जातो हे वारंवार दिसून आले आहे. प्रत्यक्षात ‘जनहितार्थ’ काम करणारे लोकप्रतिनिधी नाहीतच असा माझा अजिबात दावा नाही, परंतु जनतेपुढचे प्रश्न वेगळे आहेत आणि आपण ते सोडविण्यासाठी आहोत, हे सर्वानीच लक्षात घेतलेले बरे!
Comments
Post a Comment