जाहल्या काही चुका अन् ...

 


महाराष्ट्रात सध्या निवडणुकीच्या बातम्या आणि अनेक नेत्यांच्या तोंडातून निघणारे 'सुविचार' ऐकणे / पाहणे टाळायचे असेल तर 'यू ट्यूब' हा एक उत्तम पर्याय आहे. असंख्य उत्तम चॅनल्स / पॉडकास्ट इथे पाहायला / ऐकायला मिळतात. त्यातलेच एक म्हणजे 'स्मृतिगंध'. याचा गंध सर्वदूर पसरला आहेच. त्यांनी  'काचे पलिकडचे किस्से' या नावाने  नवीन कार्यक्रम सुरू केला आहे. राजेंद्र पाटणकर आणि किशोर सोमण ही दोन नावे घेतली की रेडिओ आठवतो आणि त्या माध्यमाशी निगडित असणाऱ्या असंख्य आठवणीही जाग्या होतात. रेडिओवर कार्यक्रम करताना काहीवेळा काय गमतीजमती होतात या विषयावर हे दोघे बोलले. जेव्हा लाईव्ह कार्यक्रम असतो तेव्हा निवेदकाच्या हातून चुका होण्याची शक्यता असते आणि त्यातून अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. या संदर्भातल्या काही आठवणी, आकाशवाणीतले वातावरण, दिग्गज कलाकार स्टुडिओमध्ये आल्यावर त्यांचे आलेले अनुभव अशा गप्पा पहिल्या भागात ऐकायला मिळाल्या. अर्थात फक्त या चुका म्हणजे रेडियो नव्हे, त्यामुळे पुढील काही भागांत विविध कार्यक्रम / कलाकार यांच्या हृद्य आठवणी ऐकायला अधिक आवडेल. 
 
मराठी भाषा नीट वापरली नाही तर भलताच अर्थ निघतो हेही पाटणकर - सोमण यांनी दिलेल्या काही उदाहरणांवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. एकदा बातम्या देत असताना 'एका कांद्याच्या ट्रकला  अपघात झाला' असे निवेदक म्हणाला, (तो ट्रक एकच कांदा घेऊन जात होता का ?) ते वाक्य 'कांद्याच्या एका ट्रकला अपघात झाला' असे हवे होते. पुण्याहून निघालेली रेल्वेगाडी कर्जतपर्यंतच चालविण्यात येईल अशी घोषणा करताना एका हिंदी भाषिक निवेदकाने 'Train will be terminated at Karjat ' चे भाषांतर यह गाडी कर्जत में नष्ट कर दी जायेगी' असे केले होते. 'व्यायाम हा उत्तम आरोग्याचा मूलमंत्र आहे' असे संपूर्ण कार्यक्रमात बरोबर म्हणणाऱ्या निवेदिकेने शेवटी चुकून व्यायाम उत्तम आरोग्याचे मलमूत्र आहे'  असे म्हटल्यावर गोंधळ झाला. एका मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन स्वातंत्र्यदिनाचा संदेश रेकॉर्ड करायचा होता. तेव्हा ते महोदय 'एकर कमी पंधरा हजार' असे म्हणत होते. ते एक रकमी पंधरा हजार' असे हवे होते. त्यांना चूक सांगितल्यावर पुन्हा रेकॉर्डिंग झाले. असे अनेक किस्से पाटणकर - सोमण यांच्याकडून ऐकायला मिळाले. 
 
ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांची व संबंधित विषयाची माहिती मुलाखत घेणाऱ्याला असणे आवश्यक असते. ती नसली तर काय होते याचाही किस्सा ऐकायला मिळाला. एका व्यक्तीने दारुगोळा कारखान्याच्या प्रमुखाला 'तुम्ही इथे दारूच्या गोळ्या बनवता का' असा प्रश्न विचारला होता. तर दुसऱ्या एका व्यक्तीने प्लास्टिक सर्जनची मुलाखत घेताना 'आम्ही बाहेरून प्लास्टिक आणून दिले तर चालते का' असे विचारून धमाल उडवून दिली होती. 
 
अशा गमतीजमती प्रत्येक माध्यमात होत असतात. दुसऱ्या माध्यमातल्या चुकांवर हसणे वा टीका करणे सोपे असते. आम्ही वर्तमानपत्रवाले काय कमी चुका करतो ? रेडिओ , टीव्ही, वर्तमानपत्रे आणि ऑनलाईन बातम्यांचे जग यांचा विचार केला तर रेडिओतल्या चुका अर्धा टक्केही नसतात. ९९.५ टक्के वाटा रेडिओव्यतिरिक्त इतर माध्यमांचा असतो. वर्तमानपत्रातील चुका 'उसंडू' म्हणजेच 'उपसंपादकाच्या डुलक्या' या नावाने प्रसिद्ध आहेतच. शब्दांचा चुकीचा वापर, चुकीची वाक्यरचना आणि त्यामुळे झालेले गोंधळ अनेक वेळेस दिसतात. वर्तमानपत्रांमध्ये या गमतीजमती रोज घडत असतात. वर्तमानपत्रांतील जाहिरातीतही काही वेळा हास्यास्पद चुका असतात. या चुकांचा आणि संपादक वा संपादकीय खात्यातील कोणाचाही काडीमात्र संबंध नसतो. परंतु, वाचकाच्या दृष्टीने वर्तमानपत्रात जे जे छापून येते त्यास संपादक जबाबदार असतो, त्यामुळे अशा जाहिरातीबद्दलचा रोष संपादकीय विभागालाच सहन करावा लागतो !
 
अर्थात चुकांमध्ये टीव्ही माध्यमे आघाडीवर आहेत. 'ब्रेकिंग न्यूज'च्या घाईत ज्या captions दिल्या जातात त्या अनेकवेळा हास्यास्पद असतात. कालच 'विमानांना फोन करणारा अटकेत' असे शीर्षक पाहिले. बातमी लवकर देण्याची घाई असल्याने हे गोंधळ होतात. ऑनलाईन जगात बऱ्याच वेळेला शीर्षक एक आणि बातमी वेगळीच असाही प्रकार असतो. किंवा काही वेळेला मराठीत भाषांतर केलेली बातमी कळतच नाही. कदाचित गूगल Translation चा परिणाम असावा. 
 
माझी जवळपास चार दशके वर्तमानपत्राच्या क्षेत्रात गेली. त्यामुळे सर्व माध्यमांच्या पत्रकारांकडून काही वेळा कशा चुका होऊ शकतात हे समजू शकते. कोणीही मुद्दाम चूक करत नसतो. माझ्या काळातही या चुका होत होत्या, आताही होतात. आता बातम्या खूप जास्त प्रमाणात असतात, टीव्ही आणि ऑनलाईन क्षेत्रातील माध्यमांमधली स्पर्धा कमालीची वाढली आणि प्रत्येक बातमी 'ब्रेकिंग न्यूज' ठरायला लागली असल्याने चुकांची संख्या आणखी वाढली ! 
 
'स्मृतिगंध'च्या कार्यक्रमामुळे या सगळ्याला उजळा मिळाला एवढेच !

Comments