घटत्या जन्मसंख्येचा असाही फटका !

 कोणताही लहानमोठा उद्योगधंदा असो, ग्राहकांना नेमके काय हवे आहे, ग्राहकांची गरज काय आहे, हे पाहणे नेहमीच गरजेचे असते. न खपणारी उत्पादने कोणीच काढत नाही. उलट उत्पादनांमध्ये सतत सुधारणा करून ग्राहकाला ती अधिकाधिक उपयोगी कशी होतील आणि पर्यायाने उत्पादनांचा खप कसा वाढेल, पर्यायाने आपला नफा कसा वाढेल  हेच पाहिले जाते. त्यात काहीच चूक नाही. (अलीकडे जाहिरात तंत्राचा वापर करून ग्राहकांना गरज नसलेली उत्पादनेही माथी मारली जातात हा भाग वेगळा). प्रत्येक कंपनी ठराविक अंतराने हे करत असते. अगदीच काही नाही, तरी काही वेळा उत्पादनाचे वेष्टन बदलून, उत्पादनांच्या नावापुढे प्लस किंवा सुपर वगैरे शब्द वापरून उत्पादन अधिक ‘सशक्त’ झालेले भासवले जाते. हे सशक्ततेचे प्रमाण कमीजास्त असते. परंतु, एखादी कंपनी जेव्हा आपले लोकप्रिय उत्पादन कमी करून वेगळ्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करते तेव्हा त्याची दखल वेगळ्या अर्थाने घ्यावी लागते. समाजात घडत असलेल्या बदलाची दखल कंपन्यांही घ्यावी लागते ती अशी !

काल या संदर्भातील एक बातमी वाचली. ती होती जपानमधून. लहान मुलांसाठी नॅपी (लंगोट) बनवणाऱ्या जपानी कंपनीने या उत्पादनाची मागणी झपाट्याने कमी होत असल्याने आता प्रौढांसाठी अधिक प्रमाणात डायपर तयार करण्याची घोषणा केली आहे.ओजी होल्डिंग्ज या कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्याची उपकंपनी ओजी नेपियाच्या लक्षात आले की जवळपास २००१ पासून नॅपीच्या विक्रीत वेगाने घसरण होत आहे. त्या काळी कंपनीने ७० कोटी  नॅपीच्या उत्पादनांचा उच्चांक गाठला होता. बीबीसी आणि द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या कंपनीचे वार्षिक उत्पादन ४० कोटी बेबी डायपरचे आहे. गेल्या दशकात जपानमध्ये प्रौढ डायपरच्या विक्रीने नॅपीला मागे टाकले असून देशातील सर्वात मोठी बेबी डायपर उत्पादक कंपनी युनिचार्मने २०११ पासूनच हा  ट्रेंड ओळखला होता. जपानमधील प्रौढ डायपरची बाजारपेठ वाढत असून त्याची किंमत दोन अब्ज डॉलर्स असल्याचे बीबीसीने म्हटले आहे.
ओजी होल्डिंग्स कंपनीचे म्हणणे आहे की, कंपनी वृद्ध लोकांसाठी सॅनिटरी उत्पादनांचे उत्पादन वाढवेल, कंपनीला अपेक्षा आहे की ही उत्पादने नर्सिंग होम आणि इतर सुविधांमध्ये वापरली जातील. घटत्या जन्मदरासह अनेक कारणांमुळे बेबी डायपरची मागणी कमी होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जपानमध्ये २०२३  मध्ये जन्माचे प्रमाण कमी झाले असून देशात नवीन बाळांच्या तुलनेत दुप्पट मृत्यूंची नोंद झाली आहे. हे आकडे जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने निर्माण करतात. नवीन तरुण मनुष्यबळ ज्या वेगाने तयार व्हायला हवे ते होत नाही. दुसरीकडे आता ८०  वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या १०  पैकी किमान एका व्यक्तीला आरोग्य सेवा पुरविण्यावर जास्त खर्च करावा लागतो. २०२३  मध्ये जन्मदरात सलग आठव्या वर्षी ५.१ टक्क्यांची घसरण होऊन जन्मांचा कडा ७,५८६,३१ वर आला आहे. मृतांचा आकडा १५,९०५०३  इतका होता, जन्माच्या आकड्यापेक्षा दुप्पट. म्हणजेच एकूण लोकसंख्येत आठ लाखापेक्षा अधिक घट  झाली. तरुण जोडपी मुलांना जन्म देण्यापेक्षा आर्थिक परिस्थितीशी स्वतःच सामना करू पाहतात, असेही एका बातमीत म्हटले होते. त्यामुळे ही समस्या वाढत आहे. आता बालसंगोपनावर अधिक लक्ष देणे, त्यावरील खर्च वाढवणे, तरुण कामगारांना अधिक वेतनवाढ देणे व इतर उपाययोजना करून समतोल राखण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. परंतु दरवर्षी जन्मदर कमी होतो आहे, वृद्ध माणसांची संख्या वाढत आहे, अशा परिस्थिती आणखी दशकभर कायम राहिली तर जपानपुढे गंभीर समस्या उभी राहू शकते.
संभाव्य सामाजिक आणि आर्थिक परिणाम आणि सार्वजनिक अर्थव्यवस्थेवरील ताण लक्षात घेता, पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी या प्रवृत्तीला “आपल्या देशासमोरील सर्वात गंभीर संकट” म्हटले आहे आणि गेल्या वर्षी अपत्यप्राप्ती झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, असे संबंधित बातमीत म्हटले आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रिसर्चच्या अंदाजानुसार, जपानची लोकसंख्या २०७० पर्यंत सुमारे ३० टक्क्यांनी घटून ८७ दशलक्ष होईल, दर १० पैकी ४ लोक ६५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असतील. ‘द इकॉनॉमिस्ट’च्या अहवालानुसार जीडीपीनुसार १५ सर्वात मोठ्या देशांमध्ये प्रजनन दर प्रतिस्थापन (रिप्लेसमेंट. लोकसंख्या कायम ठेवण्यासाठी आवश्यक दर) दरापेक्षा कमी आहे .२००० मध्ये जागतिक प्रजनन दर २.७ होता, जो २.१ च्या “रिप्लेसमेंट रेट” पेक्षा थोडा जास्त होता. २०२३  मध्ये प्रजनन दर कमी होऊन तो २.३ झाला आहे. तो “रिप्लेसमेंट रेट”च्या खाली आला तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. (अर्थात भारत आणि चीन सारख्या देशांना लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायला हवे. इथे “रिप्लेसमेंट रेट”चा फार विचार सध्या केला नाही तरी चालेल)  चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिका येथेही जन्मदर घटत आहे. परंतु जपानमधील परिस्थिती जास्त भयावह आहे.
या अनुषंगाने जपानी कंपन्यांच्या वरील निर्णयाकडे पाहिले पाहिजे. ओजी होल्डिंग्सचा साठा संपेपर्यंत देशांतर्गत बेबी डायपरची विक्री सुरूच राहणार आहे, आणि  व्यवसाय वाढावा म्हणून बेबी डायपरची  मागणी वाढण्याची शक्यता असलेल्या इतर देशांमध्ये उत्पादन अधिक प्रमाणात पोचवणार आहे.

Comments