डोळस प्रवासवर्णन आणि इतरही …

 

प्र
वासवर्णन हा काही नवीन लेखनप्रकार नाही. अनेकांनी तो हाताळला आहे, त्यांना ‘जसे दिसले, जसे अनुभवले’ तसे एखादे पर्यटनस्थळ शब्दबद्ध केले आहे. अनेकदा पर्यटनाची ठिकाणे ‘नेहमीची’ म्हणजे काश्मीर, कुलू-मनाली, केरळ वगैरे असली तर नवीन काय पाहणार अथवा नवीन काय लिहिणार असा प्रश्न असतोच. परंतु प्रत्येक पर्यटकाला असे ‘नेहमीचे’ ठिकाण वेगळे दिसू शकते. सर्वसाधारणपणे ज्या भागाला सर्वच भेटी देतात तो भाग टाळून नवीन काही भाग धुंडाळणारे लोकही असतात. ते ‘यशस्वी’ पर्यटन कंपन्यांच्या मागे न लागत, स्वतः जोडीदारासमवेत अथवा कुटुंबियांसमवेत जमेल तसा प्रवास करतात. मोजकीच ठिकाणे पण तपशीलाने बघतात, अनुभवतात आणि आयुष्यात ते क्षण जपून ठेवतात. कधी लिहूनही ठेवतात. प्रत्येकाचेच प्रसिद्ध होते असे नाही. याचा अर्थ त्यांना काही वेगळे सांगण्यासारखे नाही असे अजिबात नाही.

नाशिक आणि ठाणे अशी वास्तव्याची ठिकाणे असणाऱ्या सौ. आशा अरुण जोशी या खऱ्या (इतर विषयांबरोबरच) मराठी विषयाच्या शिक्षिका. परंतु मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्यावर आधी विविध कारणांमुळे न झालेली भटकंती लेखणीतून कागदावर उतरली. त्या लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन गेल्या आठवड्यात ठाण्यात झाले.  हे पुस्तक वाचनीय आहे ते सहजसुलभ लेखनामुळे, लिखाणातल्या प्रामाणिकतेमुळे. हे पर्यटन साधारण वीस वर्षांपूर्वी केले असल्याने त्यावेळचा अनुभव अधिक वाचनीय वाटतो. अलीकडच्या चारपाच वर्षांत व्हिडिओ ब्लॉगिंगमुळे अनेक पर्यटनस्थळे सामान्य माणसाच्या घराघरांत व प्रत्येक मोबाईलवर पोचली हे खरे असले तरी दोन दशकांपूर्वीचे पर्यटन, त्यांचा बारीकसारीक तपशील हा विशेष वाचनीय आहे. या पुस्तकात आशाताईंनी केलेले ललितलेखन समाविष्ट केले आहे. प्रवासवर्णन आणि ललितलेखन हा दोन्ही खूप वेगवेगळा प्रकार असला तरी दोन्ही प्रकारचे लेखन उत्तम प्रकारे जमले आहे हे पटकन जाणवते. त्यांच्या ललितलेखनाचे वेगळे पुस्तक व्हायला हवे असे आवर्जून वाटते.
मी इथे लेखिकेचे मनोगत आणि नंतर ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी लिहिलेली प्रस्तावना देत आहे. त्यावरून पुस्तकाबद्दल कल्पना येईल.

लेखिकेचे मनोगत
शाळेच्या नोकरीतून निवृत्त होण्यापूर्वी आणि नंतरही आम्ही दोघांनी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे ठरविले आणि जमेल तसे, जमेल तेव्हा ही स्थळे पाहून आलो. कोणतेही प्रेक्षणीय स्थळ पाहिल्यावर त्यासंबंधी मी माझ्या डायरीत लिहून ठेवत असे, पण त्या केवळ नोंदी होत्या. त्या नोंदींना प्रवास वर्णनाचे स्वरुप आले ते आमचे काका (माझे चुलतसासरे) श्री. गजाननराव जोशी यांच्यामुळे. त्यांना आमच्या प्रवासाबद्दल, पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल वर्णन करुन सांगितले की ते मला म्हणायचे, “तू हे सर्व सविस्तर लिहून काढ, प्रवास कसा केला, त्या ठिकाणी काय काय पाहिले, ते पाहून तुला काय वाटले, हे सर्व लिही. म्हणजे मला घर बसल्या त्या सहलीचा अनुभव घेता येईल.” सन २००१ ते २०१८ या कालावधीत आम्ही भारतातील जवळजवळ सर्व राज्यांमधील निवडक प्रेक्षणीय ठिकाणे पाहिली, काकांच्या प्रोत्साहनामुळे मी प्रत्येक सहलीचे वर्णन तपशीलवार लिहून काढले. ते वाचल्यावर त्यांना अतिशय आनंद होत असे. त्या लिखाणाचे ते मनापासून कौतुक करीत. अशी १५-१६ प्रवास वर्णने फाइलमध्ये संग्रहित करून ठेवलेली होती.

ती पुस्तकरुपाने छापावीत, असे कधीच वाटले नाही. मात्र आमचा मुलगा उन्मेष याने या प्रवास वर्णनांचे पुस्तक छापावे असा आग्रह धरला. तेव्हा मी त्याला म्हणत असे, “एवढी लांबलचक प्रवास वर्णने कोण वाचणार? आणि ती सुद्धा आपल्या देशातल्या नेहमीच्याच प्रेक्षणीय स्थळांची ! आजकाल लोक परदेशातील अगदी ‘हटके’, नेहमीपेक्षा वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण अशी ठिकाणे निवडतात आणि त्यांची वर्णनेही इतक्या तपशीलवार करीत नाहीत. या नेहमीच्या पर्यटन स्थळांबद्दल यापूर्वी अनेकांनी लिहिले आहे.” त्यावर तो म्हणाला, “हे खरं आहे, पण असं असलं तरी प्रत्येकाचा त्या ठिकाणी जाण्याचा हेतू, त्या ठिकाणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. लेखनाची पध्दत, भाषाशैली वेगळी असते. तुझ्या या प्रवासवर्णनातून वेगळी माहिती, वेगळी वर्णने व वेगळे अनुभव वाचायला मिळतील.” त्याचे हे म्हणणे मला पटले. प्रत्येक प्रेक्षणीय स्थळ हे कॅलिडिओस्कोपसारखे असते. कॅलिडिओस्कोप जसजसा फिरवावा तसतशा त्यातून प्रत्येक वेळी नव्या नव्या सौंदर्याकृती दिसतात. असा विचार माझ्या मनात आला. आणि ‘जे पाहिलं ते’ हे पुस्तक तयार झाले. या सर्व सहलींमधून आम्हाला अवर्णनीय असा आनंद मिळाला.

त्या आनंदात आपल्या जिवलगांना, मित्रमैत्रिणींना सहभागी करून घ्यावे, हा ही एक हेतू या लेखनामागे आहे. आमच्या या सहलींचे वैशिष्ट्य म्हणजे फार थोड्या सहली आम्ही प्रवासी कंपन्यांबरोबर केल्या. बऱ्याचशा सहली स्वतः नियोजन व पूर्वतयारी करून दोघांनीच केल्या. विमान प्रवास शक्य असतानासुद्धा सर्व प्रवास रेल्वेने केला. प्रवासात सहप्रवाशांशी गप्पा मारत त्यांच्यात मिसळून गेलो. मध्यम दर्जाच्या हॉटेलांमध्ये राहिलो आणि शक्य तो तेथील स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला. जेथे जास्त दिवस मुक्काम होता त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने पायी फिरून ते शहर समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेथील रिक्षावाले, दुकानदार, सामान्य माणसे यांच्याशी संवाद साधला. मंदिरांना दिलेल्या भेटी केवळ धार्मिक भावनेतून नव्हत्या. त्यांचा इतिहास, त्याचे स्थापत्य, तेथील शिल्पांचे सौंदर्य समजून घेण्याचाही हेतू होता.
अगदी सुरूवातीच्या सहलींमध्ये स्मार्ट फोन नव्हता. गुगल, यू-ट्युब माहीत नव्हते. अगदी साधे कॅमेरे जवळ होते. त्या प्रेक्षणीय ठिकाणांसंबंधी फारसे वाचनही नव्हते. हे सर्व लिखाण केले त्याला १५ ते २० वर्षे होऊन गेली. आता ही सर्व प्रेक्षणीय ठिकाणे, तेथील रस्ते, वास्तव्याच्या व प्रवासाच्या सोयी यात खूपच बदल झाला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही स्थळे अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न होत आहे. आपले पंतप्रधान मा. मोदीजी म्हणतात त्याप्रमाणे ‘देखो अपना देश!’ असे मलाही म्हणावेसे वाटते. आपल्या या देशात इतके पाहण्यासारखे आहे की ते पाहण्यासाठी एक जन्म कमी पडेल. प्रत्येकाने आपल्या देशातील किमान १०-१५ राज्यातील प्रेक्षणीय स्थळांना प्रथम भेट द्यावी आणि मग परदेशातील पर्यटनस्थळे पाहण्यास जावे, असे मला वाटते. माझ्या या पुस्तकाचा दुसरा विभाग आहे, ‘जे वाटलं ते……’ माझ्या अगदी जवळच्या व्यक्तींविषयी, म्हणजे माझे सासू सासरे, माझा नातू यांच्याविषयी तसेच माझ्या जिव्हाळ्याची, घराच्या गच्चीवरील बाग आणि आमचे घरातले ग्रंथालय यांच्याविषयी मला जे वाटलं ते मी ललितलेखांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसंगोपात्त सुचलेला एक छोटा लेखही आहे. हे लेख आणि प्रवासवर्णने वाचताना वाचकांना एक वेगळा आनंद मिळेल, अशी अपेक्षा !

– आशा अरुण जोशी

जे वाचले ते.. (प्रस्तावना)
शावहिनी आणि अरुणदादा जोशी हे दाम्पत्य व्रतस्थ शिक्षक आहेत. छंदाचे रूपांतर ध्यासात, ध्यासाचे रूपांतर निष्ठेत आणि आत्मीय निष्ठेचे व्रत होते, तेव्हा व्रतस्थ बहुल मनस्वी गोसावीची निर्मिती होते..! विद्यार्थ्यांना शिकवत असताना जो स्वतः शिकत जातो, तो खरा शिक्षक होय. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही; तर तो अज्ञानाचा तिमिर दूर करतो. “ज्ञाताच्या कुंपणावरुनी धीरत्व धरोनी उड्डाण करोनी चिद्घनचपला ती जाते नाचत तेथे चकचकते अंधुक आकृती तिस दिसती त्या गाताती निगूढगीती त्या गीतीचे ध्वनी निघती झपूर्झा गडे झपूर्झा..!” कविवर्य केशवसुत यांनी सांगितलेल्या या अज्ञानाच्या मोहडोहातून चिद्घनचपला प्रतिभेचे सु-दर्शन दाखवणे, हे जातिवंत शिक्षकाचे आद्य लक्षण आहे..! हे परम तत्त्व या अद्वैती युगुलाने हेरले आहे आणि शिक्षणाचे अथक व्रत त्यांनी संयुक्तपणे अंगीकारले आहे.

सेवेतून निवृत्त झाल्यावरही जो कार्यमग्न प्रवृत्त असतो, तो खरा शिक्षक..! उपजीविका सरली. आता जीविका सुरू झाली. निसर्गाएवढी मोठी पाठशाळा सृष्टीवर दुसरी कुठलीही नाही. या निसर्गाच्या एकेक सर्गाची प्राणप्रतिष्ठा करणे, हे या गुणग्राही जोडप्याने मनोमन दृढ केले आहे आणि त्यांची भटकंती सुरू झाली. या भटकंतीचा सांगोपांग इतिहास, म्हणजे “जे पाहिले ते..” हा शारदेच्या दरबारी रुजू झालेला प्रवास-ग्रंथ आहे..!! माणूस हा पृथ्वीवरचा काही वेळेपुरता रहिवासी आहे. पृथ्वीवरच्या विशिष्ट भूगोलावर त्याचा जन्म होतो आणि त्या भूगोलावरचा इतिहास त्याच्या नसातून रक्तगटात वाहत असतो. यालाच संस्कृतीचा अर्क म्हणतात. माणसाच्या स्थिरवास्तव्यात त्याच्या मनात असतो तो भूगोल आणि बुद्धीत वावरतो तो इतिहास..! यालाच मातीचा गुण म्हणतात.

माणसाचे दुर्दैव असे की त्याला सर्व पृथ्वी पादाक्रांत करण्याचे बळ नसते; पण तो नकाशांतून, चित्रांतून ही पृथ्वी समजून घेतो. क्वचित इथे तिथे जवळपास हिंडतो किंवा दुसऱ्या देशात उड्डाण करून जातो. रहिवास सोडून बाहेर जाणे, याला प्रवास म्हणतात. माणसाचा समूह एकत्र प्रवास करतो त्याला यात्रा म्हणतात. आखूनरेखून योजनाबद्ध जे प्रवास करतात त्याला पर्यटन म्हणतात आणि मनोमन प्रवासाला भटकंती असे म्हणतात..!! आप, तेज, वायू, आकाश व पृथ्वी ही पंचमहाभूते माणसांच्या शरीरात वस्तीला आहेत, याची त्याला कल्पना नसते. जलतत्त्व रक्ताच्या रूपाने, तेज डोळ्यांच्या (दृष्टी) रूपाने, वायू श्वासात, पृथ्वी शरीरधर्मात आणि वास्तव्य अवकाशात धारित असते. माणसाला आकृती मिळते; पण कृती करणे, हे प्रवासाचे आद्य लक्षण आहे..! पृथ्वीवर बहुसंचारी प्रवास करणारे एकच तत्त्व आहे ते म्हणजे वायू..! म्हणून “एखादा वाऱ्यासारखा आला आणि वाऱ्यासारखा निघून गेला..!” असे जेव्हा प्रौढ लोक वाक्य उच्चारतात, त्याच्यामागे हेच परमतत्व आहे. हे ज्याला उमगते तो माणूस प्रवासाला बाहेर पडतो.

या वायूतत्त्वाची रसमय पूजा या दांपत्याने या ग्रंथात संपन्न केली आहे..! आशा वहिनींनी हे मर्म जाणून आपल्या आत्मीय जोडीदारासह प्रवास करून “भारतीय संस्कृतीचा शोध घेतला आहे. त्यांनी सर्व प्रवास रेल्वेने केला. प्रवासात सहप्रवाशांची गप्पा मारत त्यांच्यात मिसळून गेले. मध्यम दर्जाच्या हॉटेलमध्ये राहिले आणि स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला. जेथे जास्त दिवस मुक्काम होता तेथे पायी फिरून, ते शहर समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेथील रिक्षावाले, दुकानदार, सामान्य माणसे यांच्याशी संवाद साधला. मंदिरांचा इतिहास त्यांचे स्थापत्य, तेथील शिल्पांचे सौंदर्य समजून घेतले..”असे त्यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले आहे. केवळ टूम म्हणून प्रवास न करता, त्यांनी भारतीय संस्कृतीची “सत्यम्, शिवम्, सुंदरम्” ही मूल्यप्रणाली स्वतः श्रद्धेय समजून घेण्याचा आणि अंगीकारण्याचा प्रयत्न केला, ही अतिशय सृजनशील प्रक्रिया आहे..! समर्थ रामदास म्हणतात– “केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा, ज्ञान येत असे फार..” प्रवास करताना सज्जन ज्ञानवंत लोकांशी मैत्री करणे, परिसरात हिंडणे, भूमीला समजून घेणे, यातून मनुष्याला फार ज्ञान मिळते, या उक्तीला अनुसरून जोशी दांपत्य परिसरात हिंडले.

संचार केल्याने उच्चार आकळतात आणि मनुजाचा माणुसकी असलेला माणूस होतो, याची प्रचिती त्यांच्या सुनीत अभिव्यक्तीत रसिकांना उमगते. सहवास असेल; तर रहिवास सुखकर होतो आणि सहवासासह पर्यटन केले की त्या त्या ठिकाणचा रहिवास सफल समृद्ध होतो, याची मनोमन जाणीव जोशी दांपत्याला आहे. दृश्य व दृष्टी यांच्या संयोगातून दर्शन होते. “जे दिठीही न पविजे / ते दिठीविण देखीजे //” हे माउलींचे शब्द ते पर्यटनात अक्षरशः जगले, याची प्रचिती त्यांच्या सुबोध लिखाणातून आपणास मिळते. नियोजनबद्धता, स्वावलंबन आणि सहभागातून अनुभवलेला सामंजस्यपणा हे सगुण दर्शन रसिकांना या ग्रंथातून दृगोच्चर होताना दिसते..! “जे पाहिले ते..” या अतिशय साध्या, निरामय शीर्षकाचा हा ग्रंथ म्हणजे “प्रवास-भक्तीयोग” आहे.



आशा वहिनींनी केलेला मुक्त संवाद हा इतका आत्मीय आहे, की प्रत्येक मनुष्याला घरबसल्या हे दार्शनिक अनुभवता येते. निरूपणाची मुक्त, साधी, ओघवती, सहज, सुंदर शैली हा या ग्रंथाचा प्राण आहे. एखादी गोष्ट निरागसपणे कथन करणारे मातृत्व त्यांच्या हृदयी वसले आहे. का..? व कसे..? या दोन प्रश्नातून संपूर्ण तत्त्वज्ञान निर्माण झालेले आहे. ही सृष्टी का आहे..? आणि कशी आहे..? मी का आहे..?आणि कसा आहे..? हा प्रवास का आहे..? आणि कसा आहे..? याचे उद्बोधक तात्विक रसग्रहण म्हणजे हा “जे पाहिले ते..” हा ग्रंथ आहे. हे प्रवास वर्णन नाही; तर तो वर्णनांचाही अप्रतिम प्रवास आहे..! “प्रत्यक्ष हेच प्रमाण” या तत्त्वज्ञानी चार्वाकच्या उद्गाराचे थेट प्रत्यंतर हा ग्रंथ वाचताना मी अनुभवला आहे. “जे जे आपणाशी ठावे / ते जनांशी सांगावे //” या समर्थांच्या उक्तीचा प्रत्यय “याची देही याची डोळा..” येत राहतो आणि रसिकांचा मनप्रवास संपन्न होतो..! मी विद्वान नसल्यामुळे खरे बोलतो. ‘जे वाचले ते..’ मी कृतज्ञपणे नि माझ्या सुमार बुद्धीनिष्ठतेने कथन केले आहे. पण जे प्रवासापासून अजूनही वंचित आहेत, जे प्रवासापासून अजूनही ‘वाचले’ आहेत, त्यांच्यासाठी या ग्रंथाचे वाचन ही पर्वणी आहे. हे ‘हरपले श्रेय’ रसिकांना लाभावे आणि ही ‘मर्मबंधातली ठेव’ हृदयस्थ जपावी, असे सर्व रसिकांना कृपाळू आवाहन करून, मी या प्रवासी मुक्कामाला थांबतो आणि जोशी दांपत्याला सर्व साहित्यकुलातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो..!!

– प्रा अशोक बागवे


Comments