घडताना, घडवताना...

 साधारण १६ वर्षांपूर्वी रूढार्थाने निवृत्त झालेले, नंतरही या ना त्या प्रकारे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेले श्री. अरुण जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. आशा जोशी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन गेल्या आठवड्यात ठाण्यात झाले. यापैकी जोशी सरांच्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिली आहे. ती इथे मुद्दाम देत आहे. सरांच्या कारकीर्दीचा आढावा घ्यायचा असेल तर पुस्तक विकत घेऊन वाचणे आवश्यक आहे. सरांचे पुस्तक ‘घडताना, घडवताना …’ या नावाने आहे. त्यांची स्वतःची जडणघडण कशी झाली आणि नंतर जवळपास साडेपाच दशके त्यांनी अनेक शिक्षक, विद्यार्थी याना कसे घडवले याची ही संघर्षमय कथा आहे.


शि
क्षणसम्राट आणि त्यांची अर्थशक्ती , शिक्षणाचा खालावलेला दर्जा, शिक्षकांवरील शिक्षणेतर कामे, इंग्रजीला प्रमाणाबाहेर आलेले महत्व व त्यामुळे मराठी शाळांचा होत असलेला ऱ्हास, संस्थाचालकांची बदलती आर्थिक गणिते व त्यामुळे शिक्षण सामान्य माणसाच्या हाताबाहेर जाण्याची भीती, ज्ञानाधिष्ठितऐवजी मार्काधिष्ठीत होणारा अभ्यास, एसएससी बोर्डाची CBSE , ICSE  व इतर बोर्डांशी सामना करताना होणारी दमछाक, परीक्षांचे निकाल लावताना शाळेपासून महाविद्यालयीन पातळीवर होणार उशीर, परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या ओढीपोटी विद्यार्थ्यांनी भारताबाहेर घेतलेली धाव, सतत बदलते व काही वेळा अनाकलनीय वाटणारे शैक्षणिक धोरण आणि त्यातील राजकीय हस्तक्षेप ही सध्याची परिस्थिती पाहिली तर. श्री. अरुण जोशी (जोशी सर) यांनी लिहिलेली ही शैक्षणिक आत्मकथा हे एक स्वप्नरंजन वाटण्याची दाट शक्यता आहे. नव्हे, ते वाटेलच !

सुमारे साडेपाच दशकांपूर्वी त्यांची शिक्षकी कारकीर्द सुरु झाली आणि लौकिक अर्थाने २००८  मध्ये ती संपली. तरी शैक्षणिक सल्लागाराच्या व इतर कामांच्या निमित्ताने प्रत्यक्षात शैक्षणिक क्षेत्रातले काम सुरूच राहिले. शिक्षण क्षेत्रातील निरपेक्ष, निरलस कार्यकर्ता, मार्गदर्शक म्हणून आणि हा प्रवास ठाणे, नाशिक, मुंबईपुरता मर्यादित न राहता निवृत्तीनंतर विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून थेट अरुणाचल प्रदेशापर्यंत पोचला आहे. आणि तो अजूनही चालू आहे. आधी शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम करताना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणाऱ्या जोशी सरानी दिवसागणिक संघर्षाचा सामना केला. कधी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीबरोबर, कधी संस्थाचालकांबरोबर, कधी सहकारी शिक्षकांबरोबर, कधी सरकारबरोबर तर कधी शिक्षक – मुख्याध्यापक संघटनांबरोबर. कधी विद्यार्थ्यांच्या तर कधी शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी झगडताना संबंधितांबरोबर ! या साऱ्या विधायक कामांसाठी लागणारी ‘बंडखोरी’ जोशी सरांच्या अंगात भरपूर होती. ही बंडखोरी स्वतःच्या हितासाठी नव्हती तर शाळा, संस्थाचालक, विद्यार्थी यांच्यासाठी होती. अन्यायाच्या विरोधात होती. कुठे काही खटकत असेल तर त्याविरुद्ध होती. सटाणा येथे अगदी सुरुवातीच्या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना इतिहास विषय स्पेशल विषय म्हणून घेण्याची सोय नव्हती. त्यामुळे पिंपळगावच्या महाविद्यालयातून प्राध्यापकांना बोलवा आणि त्यांना इतिहास शिकविण्याची परवानगी द्या असे सांगतानाचे धाडस हे या ‘बंडखोरी’त बसणारे नसले तरी न्यायासाठी गप्प न बसता सर्वमान्य तोडगा काढण्याच्या लढ्याची सुरुवात होती असे म्हणावे लागेल.

“माझ्या कुटुंबात शाळेतील सेवेची परंपरा होती. माझे दोन्हीकडचे आजोबा, सर्व काका व काकू, मामा, आत्या सर्वच जण या (शिक्षण) क्षेत्रात सेवा करुन निवृत्त झाले. माझ्या आईने तर मी तीन महिन्यांचा असताना ब्राह्मणगाव येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. व तेथील देवळात बांधलेल्या झोळीत मला ठेवून तेथेच ज्ञानदानाला सुरुवात केली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून मी लहान असल्यापासून ठरवून टाकले होते की, आपण शिक्षक व्हायचे, नव्हे, मुख्याध्यापक व्हायचे. शाळेत माझ्या खालच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना मी गणित चांगल्याप्रकारे शिकवत असे. त्यांच्या अभ्यासातील अडचणी सोडवत असे. हा सिलसिला पुढे कॉलेज शिक्षणात ही चालू राहिला. अध्यापनाचे हे कौशल्य माझ्यात उपजतच असावे, असे आज वाटते. वास्तविक त्या काळी म्हणजे १९६० ते ७० या काळात एस.एस.सी. उत्तीर्ण झाले की, पोस्ट ऑफीस, अकाऊंट जनरल, एल्.आय.सी., अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्या सहज मिळायच्या. माझ्या बरोबरीचे कितीतरी विद्यार्थी वेगवेगळ्या खात्यात नोकरीला लागून गेले. पण घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आईची तीव्र इच्छा होती की, मी पदवीधर व्हावे. मलाही माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक व्हायचे होते. त्यामुळे मी एस. एस. सी नंतर पदवीधर होऊनच नोकरी करायची असा निर्धार केला होता. एस.एस.सी. उत्तीर्ण होऊन ही कॉलेजच्या अॅडमिशनसाठी घरच्यांजवळ पैसे नव्हते म्हणून एक वर्ष घरीच थांबलो. त्या काळात अर्थार्जनाचे अनेक, लहान मोठे उद्योग केले”. असे जोशी सर म्हणतात. म्हणजे शिक्षणाबाबतचा संघर्ष अगदी सुरुवातीपासून कसा सुरु झाला. इच्छित काम करण्यासाठीची जिद्द किती विलक्षण होती याचे हे प्रतीक आहे आणि पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून ही जिद्द, तळमळ, शिक्षणाविषयीची आस्था हे सारे वारंवार अनुभवायला मिळते.

जोशी सरांनी एका अर्थाने ही शैक्षणिक आत्मकथा लिहिली असली तरी लेखनाला शैक्षणिक अहवालाचे स्वरूप येऊ दिलेले नाही, आपण साडेपाच दशकात जे काही मिळवले, त्यात शाळेतील शिपायापासून ते थेट राज्याच्या शिक्षण संचालकांपर्यंत कशी मदत झाली हे अनेक ठिकाणी नमूद केले आहे. पुढे शिक्षक संघटना व मुख्याध्यापक संघटना यात काम करताना येणाऱ्या अडचणी, यश – अपयश आणि आजची वास्तव स्थिती यावर त्यांनी टाकलेला झोत या क्षेत्रातील वास्तव खूप झणझणीतपणे आपल्यापुढे आणतो. एका प्रकरणात सर जेव्हा – “सध्याच्या, पैसे देऊन आपले काम करून घेण्याच्या कार्यसंस्कृतीमुळे शिक्षक संघटना व मुख्याध्यापक संघटना नावापुरत्या व आमदार निवडणुकीपुरत्या उरलेल्या आहेत. संघटनेकडे आपले प्रश्न नेऊन ते सोडविण्यासाठी संघटनेची मदत घेण्याची गरज आता कोणाला फारशी राहिलेली नाही. तरी देखील सरकारच्या अयोग्य, अन्यायकारक, धोरणाविरूद्ध आवाज उठवण्यासाठी संघटनेचे ‘एकीचे बळ’ आवश्यक आहेच. तसेच सरकारच्या शैक्षणिक धोरणातील चांगल्या व उपयुक्त बाबींची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यासाठी संघटनांच्या विधायक प्रयत्नांची गरज आहे, असे मला वाटते.” – असे म्हणतात तेव्हा तो टीकेसाठी टीका असा भाग नसून या साऱ्या प्रक्रियेतून तावूनसुलाखून निघालेल्या हाडाच्या शिक्षकाची उद्विग्नता आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. त्यांनी ज्या ज्या शाळांमध्ये काम केले त्या त्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय काय उपक्रम हाती घेतले ते मुळापासून वाचण्यासारखे आहे. सुरुवातीला शिक्षकांची संख्या एका बोटावर मोजता येईल इतकी असतानाही, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देता उलट त्यांचे अधिकाधिक भले कसे होईल याचाच विचार करून ते कसे अमलात आणले हे त्रयस्थ व्यक्ती म्हणून वाचताना सोपे वाटले तरी प्रत्यक्षात किती कठीण होते हे जाणकारांच्या लगेच लक्षात येईल. एका शाळेत शिकवताना ते एका सहकारी शिक्षकासह रोज एका विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत असत व त्याची परिस्थिती जाणून घेत असत, पालकांना विश्वासात घेत असत, संबंधित विद्यार्थ्यात जी सुधारणा आवश्यक असेल ती करत असत, हे वाचून तर (आजच्या काळामुळे) आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.

“आदर्श विद्यामंदिरात नोकरीला लागल्या लागल्याच मला वेळापत्रक तयार करण्याच्या कामात सहभाग मिळाला म्हणून त्याचे प्रत्यक्ष ज्ञान मला कामातून मिळाले. वेळापत्रक तयार करण्याच्या शिक्षकांच्या त्या गटात मी अगदीच अननुभवी होतो. बाकी सर्व अगदी एक्सपर्ट होते. विशेषतः कु. सुनंदा कुलकर्णी यांना तर त्यात विशेष गती आहे असे दिसले”, असे सर सांगतात आणि कालांतराने सहजीवनाचे वेळापत्रक तयार करण्याच्या कामातही कु. सुनंदा कुलकर्णी याना सहभागी करून घेतात याचा उल्लेख पुढे येतोच. कु. सुनंदा कुलकर्णी या सौ. सुनंदा अरुण जोशी होणे हा केवळ कौटुंबिक उल्लेख म्हणून झालेला नाही. शिक्षिका / मुख्याध्यापिका आणि आयुष्यातील सहकारी म्हणून सुनंदाताईंचे योगदान खूप मोठे आहे. त्याचा उल्लेख पुस्तकात अनेक वेळा येतो. पत्नी म्हणून सर्वतोपरी मदत हे तर आलेच परंतु शैक्षणिक कामातही जोशी सरांचा हात कधी सोडला नाही, याची अनेक उदाहरणे जोशी सर लेखनाच्या ओघात देतात. पुस्तकात अखेरीस, “आईवडिलांनी अतिशय बिकट आर्थिक परिस्थिती असूनही मला पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यास सर्वतोपरी मदत केली. सुदैवाने सहधर्मचारिणी लाभली, तीही माझ्या स्वप्नांना साथ देणारी आणि माझ्या कामात सर्व प्रकारची मदत करणारी! आक्रमक स्वभावामुळे, कोणापुढेही न झुकण्याच्या वृत्तीमुळे आणि हितशत्रूच्या कारवायांमुळे या जीवनप्रवासात संकटे आली, आव्हाने समोर उभी ठाकली, कधी तर सर्वच उध्वस्त होण्याची वेळ आली. पण जन्मजात धाडसी वृत्ती, दैवाची अनुकुलता, सहकाऱ्यांची व मित्रांची मदत आणि कुटुंबाची पुरेपूर साथ या सर्वांच्या बळावर मी त्या संकटांना निडरपणे तोंड दिले. संकटांनंतर माझे कर्तृत्व पुन्हा उजळून निघाले. ही सुध्दा परमेश्वराची कृपाच !” असे सांगायला सर विसरत नाहीत.

ही सारी वाटचाल सोपी नव्हती. ”लोकलचा प्रवास, ठाणे – कर्जत मार्गावरची स्टेशने, उल्हासनगरचा परिसर सर्व काही माझ्यासाठी नवेच होते. आतापर्यंत नाशिक, सटाणा, वडाळी या परिसरात फिरलेला, राहिलेला मी आता मुंबई-ठाणे परिसरात स्वतःचे भविष्य उजळविण्यासाठी आलो होतो व नव्या उमेदीने धाडसाने सगळीकडे फिरत होतो. कुतुहलाने एकेक पाहत होतो. विचारत चौकशी करत पुढे जात होतो.”, असे सर म्हणतात तेव्हा फक्त रेल्वे प्रवास वा बस प्रवास एवढ्यापुरता त्याचा अर्थ नसतो. आर्थिक परिस्थिती, स्वतःचे शिक्षण, शिक्षकी कारकीर्द, संघटनात्मक काम, कौटुंबिक वाटचाल या सगळ्यातील स्थित्यंतर वेळोवेळी दिसत राहते. उल्हासनगर, कुळगाव, बदलापूर या ठिकाणचा उल्लेख त्या त्या ठिकाणच्या शाळा वा वास्तव्यामुळे येत राहतो. तेथील त्यावेळेची भौगोलिक  स्थिती, आताची स्थिती, शिक्षण क्षेत्रातील स्थित्यंतर हे सगळे बदल अचूक टिपले आहेत. निवृत्तीनंतर सुमारे दहा वर्षांनी पुस्तक लिहायला घेतले व पाच वर्षांनी लिहून पूर्ण केले असले तरी तीव्र स्मरणशक्ती व तपशीलात चूक राहू नये म्हणून घेतलेले परिश्रम ठळकपणे दिसतात. सरांना त्यांचा गरजेवेळी मदत करणाऱ्यांची आठवण ते आदरपूर्वक काढतातच पण पुढे असेही म्हणतात, की ”माझ्या पुढच्या भवितव्यासाठी एम्. ए. होणे मला आवश्यक होते. त्या एम्.ए. चा मार्ग सुकर करुन देणाऱ्या सावंतसरांची आजही आठवण येते. पुढे एम्.ए. च्या अभ्यासातही त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. हे सारे आज आठवले तर असे वाटते की त्यावेळी गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अनेक अडचणी होत्या. तरी जिद्दीने शिकणाऱ्या, धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनापासून मदत करणारे, आधार देणारे अनेक प्रेमळ हातही होते. हा विचार, ही जाणीव मनांत इतकी खोलवर रुजली की पुढे मुख्याध्यापक झाल्यावर अनेक धडपडणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मी आर्थिक बाबतीत सर्व प्रकारची मदत केली. प्रोत्साहन दिले. आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या पालकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना आपल्या पाल्याची फी भरतांना सवलती दिल्या. अनेकांची फी माफ केली. नोकरी करून शिकणाऱ्या मुलांना प्रोत्साहन दिले आणि त्यामुळेच हजारो विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात मला आदराचे प्रेमाचे स्थान मिळाले.” ही जाणीव आजही त्यांच्या मनात आहे.

जोशी सर ज्या शाळेत शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून राहिले, तेथे अक्षरशः सर्व प्रकारची कामे केली. शाळेतल्या मुलांना घडविण्यापासून (मी फक्त शिकविण्यापासून असे म्हणणार नाही ) ते नवीन तुकड्या व शाळा याना सरकार दरबारी खेटे घालून मान्यता मिळवून देण्यापर्यंतची सगळी कामे झाली. त्यांचे शिक्षणप्रेम माहीत असल्याने त्यांच्या हेतूंबद्दल कधी शंका घेतली गेली नाही आणि त्यांची कामे यशस्वी होत गेली हे लक्षात येते. याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांनी जमविलेला, सांभाळलेला मित्रपरिवार. मी एकटा काही करत नाही, करू शकत नाही, पण सर्वांचे सहकार्य असल्यास बरेच काही करता येते, हे धोरण त्यांनी आयुष्यभर पाळले. त्याचे फळ त्यांना गोड मिळाले. ही वृत्ती पुढे शिक्षक / मुख्याध्यापक संघटनांमध्येही भरपूर कामाला आली यात नवल नाही. लहानपणची खडतर आर्थिक स्थिती, पदवीधर होण्याचा आईचा आग्रह, वेळोवेळी विविध सहृदय व्यक्तीकडून मिळालेली आर्थिक मदत व सतत विद्यार्थ्यांचा विचार, ‘विद्यादान’ या शब्दाचा शब्दशः अर्थ जगलेले जोशी सर, आज कृतार्थतेच्या भावनेने हे पुस्तक आपल्यासमोर आणतात, तेव्हा ते केवळ ‘नोंद’ या सदरात मोडत नाही. राज्यातील सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीवर नकळत लक्ष वेधतात. आणि शिक्षण कसे असले पाहिजे, शिक्षकांनी/ शिक्षणसंस्थांनी कसे वागले पाहिजे याची झलक आपल्यासमोर मांडतात. याचा अर्थ आजचे सगळेच शिक्षक वा शिक्षणसंस्था “शिक्षणाचे व्यापारी” झाले आहेत असे मला सुचवायचेही नाही. साडेपाच दशकांपूर्वीची स्थिती आज नसणार, काळानुसार त्यात आणि माणसांत बदल होणार हे स्वाभाविक आहे. तरीही आजच्या परिस्थितीबद्दल तीव्र कटुता व्यक्त न करत राहता जे सकारात्मक काम झाले त्यावर भर देण्याचे काम या पुस्तकाद्वारे श्री. अरुण जोशी सरांनी केले हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठीच त्यांचे मन:पूर्वक आभार !

 

(एप्रिल २०२४)

Comments