समाधी संजीवन ...
(डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या समाधीचा शोध कसा घेतला आणि ती समाधी प्रत्यक्ष पाहिल्यावर काय भावना मनात आल्या हे नेमके मांडणारा विद्या हर्डीकर सप्रे यांचा हा लेख. )
बराच वेळ नकाशातून वाट काढत काढत मी आणि अशोक (माझा नवरा) एका दफन भूमीच्या दारात पोहोचलो. मला पहाताच समोरची बाई चटपटीतपणे पुढे आली आणि हसतमुखाने विचारती झाली, “ Are you here for Dr Joshi ?” मी चकितच झाले. “ How do you know ?” मी विचारले..
तिन सांगितलं की ,” तू भारतीय दिसते आहेस. इथे खूप भारतीय येतात डॉ. जोशींच्या समाधीला भेट द्यायला.! खरं तर या दफन भूमीत सर्वात जास्त भेट दिली जाणारी .. सर्वात लोकप्रिय समाधी आहे ही ! “
आणि आमच्या वॉकिंग टूर मध्ये आम्ही या समाधीचाही सामावेश केलाआहे.”
हे ऐकून मला अभिमानानं भरून आलं !
त्या स्वागतिकेन मला दफनभूमीचा नकाशा दिला. ‘कार्पेन्टर/ Eighmie लॉट’ कुठे आहे त्याची खूण नकाशावर केली आणि तिथे जायचा मार्गही दाखवला. आमचे मिशन ‘ए २१६’ सुरु कझाले ! ( Eighmie हे कार्पेन्टर मावशीच्या माहेरचे नाव. )
मी त्यांच्या नोंदणीपत्रकात मोठ्या अभिमानाने आमची नाव नोंदवली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
कार्पेन्टर लॉट तसा मोठा आहे. आता इतक्या सगळ्या थडग्यातून आनंदीबाईंची समाधी कशी शोधायची असा विचार करत आम्ही चालत होतो. तेवढ्यात मला’ ती’ दिसली. मी समाधीचा फोटो पाहिला होता. त्यामुळे चटकन दिसली. “ भेटलीस ग बाय ..” असं म्हणत मी भराभर उंचवटा चढून लहानशा टेकाडावर गेले, ..काहीशा अधीरपणे!
समाधीच्या दगडाच्या एका बाजूला अक्षर अस्पष्ट होती. पण दुसऱ्या बाजूला सुस्पष्ट अक्षरात
“The First Brahmin Woman to Leave India to obtain an education” (द फर्स्ट ब्राह्मण वुमन टू लीव्ह इंडिया टू ऑबटेन ऍन एज्युकेशन ) असे आनंदीबाईंबद्दल कोरून ठेवले आहे.
माझ्या डोळ्यांसमोरून दीडशे वर्षांपूर्वीचा आनंदीबाईंच्या जीवनाचा सगळा पट उलगडला होता…. कादंबऱ्या आणि चरित्रातून वाचलेला.. पण मनावर त्याचा सुस्पष्ट अक्षरातला खोल ठसा उमटवून गेलेला.
समोरून उतरत्या सूर्याची किरणे समाधीवर पडली होती. बाजूला काही हिरवळ, काही पाचोळा होता. आम्ही ते सर्व बाजूला करून आमच्या बरोबर आणलेली फुले समाधीसमोर ठेवली. काही फुले समाधीवर छान रचून ठेवली. कातर मनाने , भरल्या डोळ्यांनी मी तिला वाकून नमस्कार केला… आणि मग तिच्या जवळ थोडा वेळ निशब्द पणे बसून राहिले. मध्ये उलटलेल्या काळाचा वारा मनात सळसळत होता.
किती वर्षे या भेटीची आस लागून राहिली होती !
मन काही वर्षे मागे गेले. .. १९९१ पर्यंत..
मी फिलाडेल्फयाला एका स्नेह्यांकडे गेले होते, तो दिवस आठवला. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी मलाही मुद्दाम बोलावले होते. जवळच्याच एका लहान गावात रहाणारे अशोक आणि मनीषा गोरे आणि त्यांच्याबरोवर आलेल्या त्यांच्या नातेवाईक ‘अंजली कीर्तने !’ हे नाव मी ऐकलं होत. मला वाटत चेरी ब्लॉसम की अशा काही नावाचं त्यांचं पुस्तक वाचलं होत. अंजलीताई मुद्दाम आल्या होत्या त्या आनंदीबाई जोशींवर संशोधन करायला. फिलाडेल्फियातल्या कॉलेज मध्ये आनंदीबाईंची डॉक्टर ची डिग्री झाली होती. तिथे अंजलीताईना घेऊन जाऊन श्री. गोरे यांनी तिथल्या पुरातत्व विभागात कागदपत्रे शोधायला सुरवात केली होती. आजवर कधीच माहिती नव्हता तो माहितीचा खजिना तिथे मिळाला होता. त्यात एक पुस्तक हाती आलं. कॅरल डॉल ने लिहिलेलं आनंदीबाईंचं चरित्र ! त्यात एका वाक्याचा उल्लेख होता : आनंदीबाईंची अमेरिकेत कार्पेन्टर मावशींकडे पाठवलेली रक्षा कुठे जतन केली जाणार आहे त्याचा.
तेवढ्या धाग्यावरून ती समाधी शोधून काढण्याचा खटाटोप चालू होता. गोपाळराव जोशी यांनी आनंदीबाईंचा रक्षाकलश बोटीने अमेरिकेत पाठवल्याचे उल्लेख आहेत. पण त्याच पुढे काय झालं ते कोणाला माहिती नव्हतं.
मी अमेरिकेत आल्यावर त्यांची समाधी शोधून काढण्याचा विचारही मी कधी केला नव्हता ! पण आपल्याला देवतेसारख्या वाटणाऱ्या आनंदीबाईंच्यासाठी चाललेल्या या प्रकल्पाबद्दल आता मात्र मलाही उत्सुकता वाटायला लागली.
गोरे पतिपत्नी आणि अंजलीताई यांची ओळख नुकतीच झाली होती, पण पहिल्याच भेटीत त्यांच्याशी कुठेतरी सूर जुळले .त्यामुळे न्यूयॉर्क राज्या मध्ये एका लहानशा गावात कुठेतरी असणारा तो कार्पेन्टर लॉट शोधण्यात त्यांना कशी मदत करता येईल याचा विचार मी करु लागले. गुगल , विकिपीडिया आणि इंटरनेट यांच्या आधीचे ते दिवस. म्हणजे “आपल्या ओळखीचं कोण कोण आहे न्यूयॉर्क राज्यात” अशी आठवणींची साखळी बांधून माझी विचारांची साखळी सुरु झाली. योगायोग असा की कार्पेन्टर लॉटबद्दल चा उल्लेख आहे त्या गावाच्या आसपास माझे एक मित्र विराज आणि लीना सरदेसाई रहात होते, हे मला एकदम आठवलं.
मी लगेच विराज ला फोन केला. गावातल्या दफन भूमी विंचरून हा कार्पेन्टर लॉट शोधण्याची आणि तिथेच रक्षाकलश असण्याचे पुरावे शोधण्याची जबाबदारी विराजने घेतली. पुष्कळ परिश्रम करून त्याने हे इतिहास संशोधन केलं. त्यामुळे अंजलीताईना तिथे पोहोचता आलं. मला त्यावेळी जण शक्य नव्हतं. पण अंजलीताईनी समाधीचा फोटो आठवणीने मात्र पाठवला.( मी तो अजूनही जपून ठेवला आहे. )….
शंभर वर्षे उलटून गेल्यावरही आनंदीबाईंची समाधी तिथे होती .. वादळ वारे , हिमवर्षाव सहन करत होती. खोदलेली अक्षरे पुसट झाली होती. (‘त्यात खडू भरून त्या अक्षरांना उठाव देत कोरलेली वाक्ये वाचावी लागली.’, असे अंजलीताई सांगत होत्या. )
दफनभूमीवरील यादीत आनंदीबाईंचं नाव होत. पण बाकी माहिती कुणालाच नव्हती. ती अंजलीताईनी दिली आणि कागद प्रत्रातले रिकामे रकाने भरले गेले. इतिहासाच्या अक्षरांना पुन्हा उठाव मिळाला.
आनंदीबाई आल्या अमेरिकेत तेव्हा इथे कोणी नव्हतं. पण आनंदीबाईनी इथे जात, धर्म, भाषा यांचे तट ओलांडत कॅरल डॉलशी मैत्रीचे बंध जुळवले. कार्पेन्टर मावशीनं तर तिला कुटुंबातच सामावून घेतलं आणि माहेरच्या दफनभूमीत तिच्यासाठी खास जागा निर्माण केली. तिची समाधीशिळा उभारली.
त्याकाळच्या मराठी बाईची चाकोरी माजघर, स्वयंपाकघर ते मागील आंगण एवढीच होती. ती ओलांडून आनंदीबाई वेगळ्या वाटेने चालल्या.
ती वाट शिक्षणाची होती. अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणे .. म्हणजे केवळ चाकोरीबाहेरची वाट चोखाळणे नव्हते, तर व पायवाट सुद्धा नव्हती तिथे राजमार्ग उभारणे होते.. पहिली भारतीय डॉकटर स्त्री होण्याचा सन्मान घेताना आनंदीबाईंच्या या अलौकिक कार्याचं सार्थक झालं खरं; पण त्या राजमार्गावरून पुढे जाण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने कलाटणी दिली आणि त्यांच्या रक्षा या न्यूयार्क मधल्या आडगावात एका दफनभूमीत एकाकी होऊन पडून राहिल्या होत्या. नंतर इतके मराठी लोक आले, त्यांनाही याचा पत्ता नव्हता. ..
बाविसाव्या वर्षी पराक्रम करून गेलेल्या झाशीच्या राणीच्या समाधीस्थळी
‘रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी …..”
अशी भा रा तांबे यांनी घातलेली साद …
तशी बाविसाव्या वर्षी पराक्रम करून गेलेल्या आनंदीबाईच्या समाधीस्थळी
अंजली कीर्तने , विराज , लीना सरदेसाई, अशोक, मनीषा गोरे यांनी घातलेली ही साद …
मराठी, भारतीय लोकांपर्यंत हळू हळू पोहोचली. आणि आता इथे लोक दर्शनाला येऊ लागले.
हे सगळं आठवत मी समाधीपाशी स्तब्ध झाले होते…..
माझी ही तीर्थ यात्रा पूर्ण झाली ती विराज आणि लीना यांच्या घरी जाऊनच.. लीना आणि विराज आता त्या गावात रहात नाहीत. ते आता दूरच्या एका गावात असतात. मधल्या काळात आमच्या भेटी झाल्या होत्या, काही प्रकल्पसुद्धा आम्ही एकत्रित पणे केले होते.
पण तरीही समाधीदर्शनानंतर लगेच त्यांना भेटल्याशिवाय तीर्थयात्रा पूर्ण होणार नव्हती. म्हणून आम्ही पुढे निघालो. त्या दोघांनाही आमच्या या विशेष भेटीचा खूप आनंद झाला. .पुष्कळ जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
तेव्हाच्या आठवणी विराजने सांगितल्या. संशोधनाचं आव्हान, समाधी सापडल्याचा आनंद, कितीतरी गोष्टी.! आम्ही ऐकताना भारावून गेलो होतो.. .
समाधीच्या शिळेवरची अक्षर पुसट झाली, ती महत्प्रयासाने परवानग्या काढून विराजने पुन्हा खोल करून घेतली. त्यामुळे एका बाजूला आता सुस्पष्ट खोदकाम दिसते. हा ऐतिहासिक दुवा मला कळला.
आनंदीबाईंवर अंजलीने पुस्तक लिहिले. लहान माहितीपट केला. लेख लिहिले. (अलीकडेच आनंदीबाई गोपाळरावांवर एक चित्रपटही निघाला)
या समाधी संशोधनानंतर अनेक लोकांनी समाधीला भेट द्यावी अशी तिची इच्छा होती आणि आहे. तिच्या संशोधनाचे आणि धडपडीचे सार्थक झाले. आज खरोखरच जास्तीत जास्त लोक येऊन या समाधीला भेट देतात.
अमेरिकेत आलेल्या प्रत्येक भारतीय डॉकटर ने विशेषतः: महिला डॉक्टरने समाधीला भेट द्यावी असे मला मनोमन वाटते. त्यासाठी मी आणखी काही लेख लिहून समाधीचा पत्ता प्रसिद्ध केला. आमच्या दुसऱ्या पिढीच्या मुलींनी ही समाधी पहावी आणि काही प्रेरणा त्यांना मिळावी! कारण आनंदीबाईनी चाकोरीचे आणि परंपरांचे अवघड घाट ओलांडून, आमचे मार्ग सोपे केले. आम्ही आज इथे आहोत, ते त्यांच्यामुळे आणि आमच्या मुली आज मोठ्या मोठ्या भराऱ्या घेत आहेत , त्या त्यांच्याचमुळे ! आम्ही आनंदीबाई जोशींच्या लेकी आहोत !
तेव्हा आनंदीबाईनी विराज,
लीना, अशोक, मनीषा , अंजली आणि मी यांचे बंध अनुबंध जुळवले, आज अंजली
कीर्तने नाहीत. तसे अशोक गोरे सुद्धा नाहीत. पण त्यांनी मोलाचे काम केले
त्याची चिरंतन स्मृती या समाधीच्या पायाशी विसावलेली आहे. आमचे
मैत्र आनंदीबाईंच्या संजीवन नामाने नामांकित झालेले आहे.!
समाधीस्थळ : Poughkeepsie Rural Cemetery, 342 Sounth Ave, N.Y. 12602 दूरध्वनी: (845) 454-6020 https://poughkeepsieruralcemetery.com/ या दफनभूमीच्या वॉकिंग टूरमध्ये आनंदीबाईंच्या समाधी चा समावेश आहे.
(हा लेख आधी ‘समतोल’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या व विद्या हर्डीकर सप्रे यांच्या परवानगीने हा लेख इथे घेत आहे. दोघांचेही आभार)

Comments
Post a Comment