एका लायब्ररीचा मृत्यू ...
तो साधारण १९८७-८८ चा काळ असावा. आमच्या सोसायटीत दर १५ दिवसांनी एक गृहस्थ ग्रंथपेटी घेऊन यायचे. पंधरा दिवसांपूर्वी दिलेले पुस्तक बदलून वाचकांनी नवीन पुस्तक घ्यावे, ते वाचावे यासाठी. त्यासाठी ते वाचकांकडून अल्प अशी मासिक फी घेत असत. त्यांचे नाव श्री मधू भट होते. ही ग्रंथपेटी केवळ 'व्यवसाय' म्हणून ते चालवत नव्हते. ते स्वतः उत्तम पुस्तके वाचत असत आणि ग्रंथपेटीत उत्तमोत्तम पुस्तकेच असावीत याकडे त्यांचा कटाक्ष असे. वाचकांनाही त्यांची आवडनिवड ओळखून विविध पुस्तके सुचवत असत. त्या सुमारास मी इंदिरा गांधी यांच्यावरील एक लेख अनुवादित केला होता. रविवार पुरवणीत पूर्ण आठ कॉलम म्हणजे पूर्ण पानभर (हो, त्या वेळेस मटामध्ये पूर्ण पानभर लेख प्रकाशित होत होते) आणि उरलेला पान दोनवर असा तो प्रसिद्ध झाला होता. तीनच दिवसांनी श्री भट यांनी तो अनुवाद आवडल्याचे पत्र घरच्या पत्त्यावर पाठवले होते. मी ते अजून जपून ठेवले आहे. कालांतराने त्यांनी ही फिरती लायब्ररी बंद केली, पण त्यांचे साहित्यप्रेम काही कमी झाले नव्हते. लायब्ररी बंद झाल्याची चुटपुट मात्र अनेकांना लागली होती. आता साल आठवत नाही, पण नंतर क...