'तुम्ही निवृत्त का होत नाही' यापेक्षा 'तुम्ही निवृत्त का होत आहात' असे
लोकांनी विचारले तर ते अधिक चांगले, असे विख्यात क्रिकेटपटू विजय मर्चंट
नेहमी म्हणत असत. अलीकडच्या काळात याचा जास्त प्रत्यय यायला लागला आहे. फक्त
क्रिकेटपुरते बोलायचे तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि आता महेंद्रसिंग
धोनी या तिघांबद्दलही हे प्रश्न वारंवार विचारले जाऊ लागले आहेत. गेल्या
काही महिन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा
खूप कमी दर्जाची होत आहे. मधूनच एखादी उत्तम खेळी केली की जणू 'माझ्यात अजून
दम आहे' असे हे खेळाडू सांगतात. पण नंतर पुढचे अनेक डाव ते असफल होतात. खेळाडू
मोठा असला तरी त्याची निवृत्ती कधी न कधीतरी होणारच हे गृहीत धरले पाहिजे .
भारतीय क्रिकेट नियमक मंडळ किंवा तुमच्या आमच्यासारखे सामान्य क्रिकेटप्रेमी यांच्यापेक्षाही या खेळाडूंनी त्याची जाणीव जास्त ठेवली पाहिजे. पण
ते प्रत्यक्षात होताना दिसत नाही. त्याचे उदाहरण म्हणजे हे तीनही खेळाडू असे
म्हणायला हवे.
या तिघातही महेंद्रसिंग धोनी हा 'चेन्नई
सुपर किंग्ज' (सीएसके) संघाचा आधारस्तंभ. आयपीएल स्पर्धा सुरू होऊन आता जवळपास दोन दशके झाली.
परंतु या सर्व काळात सीएसकेचा प्रमुख आधारस्तंभ हा महेंद्रसिंग धोनी हाच
राहिला आहे. अनेक सामन्यांमध्ये मोक्याच्या वेळी फलंदाजीला येऊन संघाला
हमखास विजय मिळवून देणारा धोनी आता ती कामगिरी करू शकत नाही. तो ४३
वर्षांचा झाला आहे आणि त्याचे मन 'अजून क्रिकेट खेळ' असे म्हणत असले तरी शरीर
मात्र 'आता विश्रांती घे' असे म्हणत आहे. जो एखाद्या संघाचा मोठा आधारस्तंभ
आहे त्याने निवृत्ती घ्यावी असे संघ व्यवस्थापनाला सहजासहजी वाटणार नाही .
शिवाय हा फक्त एका खेळाडूच्या निवृत्तीचा प्रश्न नाही. आयपीएल हा एक मोठा
पैशाचा खेळ आहे आणि धोनीसारखे क्रिकेटपटू हा खेळ आणखीन मोठा करत आहेत. आज धोनीकडे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त ब्रँड जाहिरातीसाठी धाव
घेतात असे वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून दिसते आहे. अशावेळी सीएसकेला धोनीच्या प्रतिमेचा फायदा निश्चितच होतो. त्यामुळे धोनी संघात नसला तर या संघाला मिळणाऱ्या जाहिराती किंवा अन्य उत्पन्न याच्यावर
मोठाच विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे धोनीची निवृत्ती हा फक्त धोनीच नव्हे तर सीएसके आणि एकूणच आयपीएलमधल्या पैशाच्या खेळावरचा मला मोठा प्रश्न आहे.
धोनी सुरुवातीपासून आयपीएल खेळत आहे आणि २०२१ पर्यंत त्याची कामगिरी अत्यंत
उत्तम राहिली आहे. तो संघात असताना त्यांनी १०९ वेळा संघाला विजय मिळवून
दिलेला आहे तर ८४ वेळा पराभूत झालेल्या संघातही तो होता. या काळात त्याच्या
नावावर २३ अर्धशतके आहेत. परंतु २०२२ नंतर त्याच्या नावावर अवघे एक
अर्धशतक लागले आहे. उत्तम यष्टीरक्षक फलंदाज म्हणून नाव कमावलेल्या धोनीचे
गुडघे त्याला साथ देत नाहीत असे त्यांच्या प्रशिक्षकाने म्हणजेच स्टीफन
फ्लेमिंग यांनी नुकतेच जाहीर केले. तरीही आयपीएलसारख्या अत्यंत धकाधकीच्या
स्पर्धेमध्ये तो वयाच्या ४३ व्या वर्षीही खेळतो आहे, ही एका अर्थाने खूप
जमेची बाजू असली तरी दुसऱ्या बाजूने ह्या अडचणी धोनीला निवृत्तीकडे लवकर
नेणार का याचाही विचार संघ व्यवस्थापनाने आत्ताच केलेला बरा !
सीएसके संघाला
मिळणाऱ्या जाहिरातीचा महसूल व इतर उत्पन्न यात धोनीचा खूप मोठा वाटा आहे
हे जरी खरे असले तरी फक्त धोनीवर अवलंबून राहून संघ व्यवस्थापनाने काही चूक
केली आहे का असा प्रश्नही मनात येतो आणि तो केवळ एखादा आयपीएलचा संघ किंवा
फक्त सीएसके यांच्यापुरता तो मर्यादित राहत नाही. भारतीय कसोटी संघाचा विचार केला तर आज प्रत्येक जागेसाठी पर्यायी खेळाडू उपलब्ध आहे,
मी कसाही खेळलो तरी माझी संघात जागा कायम राहील हा फाजील आत्मविश्वास
खेळाडूंना बाळगून चालत नाही. कारण त्यांची जागा घेण्यासाठी दुसरे खेळाडू
तयार आहेत. सीएसके हा गेली दोन दशके केवळ धोनीवर अवलंबून
राहिला आहे. दुसरा धोनी तयार करण्यात सीएसकेने फारसे लक्ष दिले नाही का असे
वाटते. अन्यथा ही वेळ आली नसती. पुढच्या हंगामामध्ये धोनी खेळला नाही तर
चेन्नईच्या संघाचे आर्थिक नुकसान किती होईल याची कल्पनाच केलेली बरी.
याशिवाय सामना न जिंकता अथवा ही स्पर्धा न जिंकता आल्यास संघाच्या एकूणच
क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाईल. म्हणून कोणताही मोठा खेळाडू संघात असला
तरी पर्यायी खेळाडू तातडीने उभारणे हे फार गरजेचे असते हे आता चेन्नई सुपर
किंग्जला जाणवू लागले असेल. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, एका खेळाडूच्या आधारावर तो नेहमी जिंकू शकत नाही, हे खरे असले तरी यष्टीरक्षक, फलंदाज आणि चतुर कप्तान अशी तिहेरी कामगिरी उत्तमपणे करणारा धोनी निवृत्त होणे कोणालाच परवडणारे नाही.
विराट कोहली आणि रोहित
शर्मा यांच्या निवृत्तीविषयी चर्चा चालू असतानाच काही महिन्यांपूर्वी
भारताचा फिरकी गोलंदाज आर. आश्विन याने अचानक निवृत्ती जाहीर केली.
आपल्याला संघात स्थान मिळणे अशक्य आहे हे त्याच्या लक्षात आले आणि संघ
व्यवस्थापनाने किंवा अन्य कोणी दिलेली वागणूक त्याला रुचली नाही, म्हणून
त्याने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला. अशा आशयाच्या बातम्या त्यावेळी
प्रसिद्ध झाल्या होत्या. पण आर. अश्विनने जे धाडस दाखवले ते धाडस इतर
क्रिकेटपटू दाखवतील का? हा खरा प्रश्न आहे. यात फरक आश्विन आणि धोनी
यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये निश्चितच आहे. क्रिकेट असे तडकाफडकी सोडणे हे धोनीला जमणारे नाही. कारण त्याच्यामागे खूप मोठा पैशाचा खेळ उभा आहे. अश्विनला
त्या तुलनेत कमी जाहिराती असल्याने किंवा ब्रँड व्हॅल्यू कमी असल्याने ती
निवृत्ती घेणे कदाचित सोपे गेले असेल. कदाचित याच कारणामुळे विराट कोहली आणि
रोहित शर्मा यांना निवृत्तीचा निर्णय घेणे कठीण जात असेल. अधूनमधून एखादी
चांगली खेळी खेळली की संघात राहता येते, पण एकंदरीतच आपल्या संघाला आपली
उपयोगिता किती आहे आणि संघ मोठा की खेळाडू मोठा हा विचार प्रत्येकाला करावा
लागणार आहे.
आयपीएलमध्ये आर्थिक नुकसान सोसायचे की धोनीच्याऐवजी दुसरा
तगडा खेळाडू घेऊन त्याच्यावर पैसा लावायचा हे सीएसकेला लवकरच
ठरवावे लागेल. याबाबत फ्लेमिंग यांचे एक वाक्य सूचक आहे. आता धोनीनेच काय
तो निर्णय घ्यावा असे ते म्हणतात. पण हा निर्णय घेणे हे धोनी
आणि संघाच्या दृष्टीने खूप अवघड आहे हे त्यांना आणि संघालाही माहीतआहे .
खुद्द धोनीलाही ते माहीत आहे. पण याच्यावर मार्ग काढावाच लागेल. कारण शेवटी
संघाच्या अस्तित्वाचा आणि आर्थिक भविष्याचा हा प्रश्न आहे .
दिग्गज खेळाडू याबाबत काय निर्णय घेतात, ते स्वतःपुरते बघतात की संघाचाही
विचार करतात हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात, हे सारे जसे धोनीला लागू पडते तसेच अन्य 'दिग्गज' खेळाडूनाही लागू पडते. कपिल देवसारख्या खेळाडूलाही हा प्रश्न पूर्वी पडला असणार. अन्य अनेक खेळाडूनीही आपल्याला संघात स्थान मिळणार नाही हे कळल्यावरही आशा सोडली नव्हती. त्यांची तुलना वर उल्लेखलेल्या महान खेळाडूंशी करता येणार नाही, हे खरे असले तरी प्रत्येकाला हा निर्णय कधी ना कधी तरी घ्यावा लागतोच! आजही धोनी फलंदाजीसाठी किंवा यष्टीरक्षणासाठी मैदानात उतरला की अवघे स्टेडियम त्याच्यावरच्या प्रेमापोटी जो जल्लोष करते ते पाहण्यासारखे असते. असे प्रेम फार कमी खेळाडूना मिळते. ते विसरणे धोनीला अशक्य आहे!
Comments
Post a Comment