आवश्यक असे ‘संगीत पुनर्विकास’
काही वर्षांपासून ‘पुनर्विकास’ हा शब्द मुंबईतच नव्हे तर देशभरातील महानगरांमध्ये खूप महत्वाचा ठरला आहे. मोडकळीस आलेल्या अथवा जुन्या झालेल्या इमारतींचा पुनर्विकास मुंबईत ज्या वेगाने होत आहे ते पाहता जागांचे / घरांचे संपूर्ण चित्र बदलून जाणार आहे. आधीची छोटी घरे आकाराने मोठी होत आहेत. कुटुंबांची सोय होत आहे, पण ज्यांच्याकडे महानगरात घर नाही, त्यांना ते घेणे अधिकाधिक कठीण होणार आहे. कारण नवीन जागांच्या किमती त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. बहुतांश नवीन घरांमध्ये कुटुंबे एकत्र आली आणि त्याच वेळी बऱ्याच घरांमध्ये विभागलीही. जागांच्या किमतीमुळे कुटुंबात वाद झाले, भाऊ भाऊ एकमेकांविरुद्ध उभे राहिले. अनेक कुटुंबांची वाताहत झाली. गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची विश्वसार्हता धोक्यात येण्याचे प्रकार घडले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांनी पुनर्विकासात काही विशिष्ट लोकांना झुकते माप दिले आणि इतर लोकांना ते बघत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी आपण बरे की आपले घर बरे असे ठरवून गप्प बसावे लागले, असेही प्रकार घडले.
विकासक नावाच्या व्यक्तीचा आणि त्याच्या पाठीशी असणाऱ्या प्रचंड मोठ्याआर्थिक शक्तीचा उदय झाला. हे आधी नव्हते असे नाही. पण गेल्या दोन दशकांत त्यांचाही विकास व विस्तार झपाट्याने झाला. प्रत्येक व्यवसायात असतात तसे बरे – वाईट याही व्यवसायात आले आणि पुनर्विकास हा प्रकार अधिक संशयास्पद बनला. नीट काळजी घेतली तर मात्र सारे सुरळीत पार पडते असा अनुभव आला.
समाजात जे घडते त्याचे प्रतिबिंब समजमध्यमे, चित्रपट, साहित्य, टीव्ही मालिका यांच्यात पडत असते. पुनर्विकास हा विषय चित्रपटात / साहित्यात / मालिकेत आलाच नाही असे नाही. पण तो संपूर्णपणे कधीच मांडला गेला नाही. या संदर्भात ‘चांदेकर मिडिया’ प्रस्तुत ‘संगीत पुनर्विकास’ या दीड अंकी नाटकाचे शुभारंभाचे दोन प्रयोग विलेपार्ले या मुंबईच्या उपनगरात झाले, हे महत्वाचे वाटते. गेल्या दशकभरात विलेपार्ले उपनगराचा चेहेरामोहरा पार बदलून गेला आहे. हे उपनगर साधारणतः १९६०च्या आसपास बहरले होते. अनेक सहकारी सोसायट्यांचा याच काळात ‘जन्म’ झाला. आता या इमारती ६० पेक्षा अधिक वर्षांच्या झाल्या. काही इमारती सुस्थितीत होत्या, तर बऱ्याच इमारतींचे ‘अवयव’ त्रास देऊ लागले होते. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने अथवा असलेली अपत्ये मोठी झाल्याने मोठ्या घराची गरज होतीच. नव्याने मोठे घर घेणे बऱ्याच पार्लेकरांच्या हाताबाहेर होते व आहे. त्यामुळे इमारतींचा पुनर्विकास हाच सर्वात सोयीस्कर उपाय ठरतो. म्हणूनच ‘संगीत पुनर्विकास’ पार्ल्यात विकसित व्हावे याला वेगळा अर्थही आहे. नाटक आणि चित्रपट या माध्यमांचा प्रदीर्घ अनुभव असणारे ज्येष्ठ अभिनेते श्री प्रदीप वेलणकर या प्रयोगावेळी प्रमुख पाहुणे होते. (माझ्या इमारतीचा दोनवेळा पुनर्विकास झाला आहे, त्यामुळे हे सारे प्रश्न मी जवळून पाहिले आहेत, ही वेलणकरांची टिप्पणी बरेच काही सांगून गेली). उपस्थितांमधे डाॅ अनिल बांदिवडेकर, क्षितीज झारापकर, प्रसाद आठल्ये, विश्वास सोहोनी मिलिंद इंगळे यांच्यासह अनेक उद्योजक, लेखक, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर होते.
नाटकाचे लेखक, निर्माते ज्ञानेश चांदेकर याना गेली ३२ वर्षे ‘आम्ही पार्लेकर’ आणि ‘उद्योगविश्व’चे संपादक व उपनगरीय पुनर्विकास परिषदांचे ते आयोजक, या अनुभवामूळे ‘पुनर्विकास’ हा विषय चांगलाच माहीत आहे. हा अनुभव त्यांना नाटकाचे लेखन करताना निश्चितच उपयोगी ठरला, हे वारंवार जाणवते. पुनर्विकास एखाद्या इमारतीचा किंवा सहकारी सोसायटीचा असला तरी एकावेळेस होणाऱ्या अनेक पुनर्विकास प्रकल्पांमुळे त्या उपनगराचा चेहेरामोहरा बदलून जातो असा अनुभव आहे. हेच ठाण्यात अनुभवाला आले, नवी मुंबईत आले आणि वसई विरार पट्ट्यातही आले. त्यामुळेच चांदेकरांच्या मुक्तनाट्याचे नाव जरी ‘संगीत पुनर्विकास’ असले तरी हे नाटक मराठी माणसाचं मुंबईतील अस्तित्व, सामाजिक संस्थांचे सद्य स्वरूप, मैदानांचा प्रश्न, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अशा अनेक महत्वाच्या विषयांवर हलक्या फुलक्या शैलीत आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने भाष्य करतं. नाट्य कंटाळवाणे होऊ नये म्हणून मध्ये मध्ये पेरलेली “टांग टिंग टिंगा”, “येत नाही आम्ही जा मिटिंगला”, “ह्या विंगेतली मंडळी खाली आली” इ.गाणी विशेष पूरक ठरतात.
पुनर्विकास विषयावरून सोसायट्यांच्या अनेक मीटिंग गाजल्या आहेत. एका गटाला एक विकासक हवा असतो आणि दुसऱ्याला दुसरा. एकाने एक मुद्दा मांडला की दुसऱ्याने तो खोडून काढायचा, हे काम इमानेइतबारे केले जाते. असंख्य वादानंतर नाईलाजाने तोडगा निघतो. कधी एकदा इमारतीचा पुनर्विकास होतो आणि आपल्याला चांगल्या, भक्कम घरात राहायला जाता येते, असा विचार ”सर्वसामान्य” लोक करतात. आणि गप्प बसतात. सोसायटीतलाचा एखादा माणूस पुनर्विकासाच्या सर्व पैलूंचा काटेकोर अभ्यास करतो, पण नंतर ‘योग्यवेळी’ गप्प बसतो. या विषयावरून होणारे गॉसिपींग हा आणखी एक वेगळा विषय आहे. तो कधीच संपत नाही. हे सगळे सांगणारी सोसायटीची मिटिंग ‘संगीत पुनर्विकास”मध्ये कमालीची जिवंतपणे साकार केली गेली आहे. त्यात चर्चेला फुटणारे फाटे, गटबाजी, अंतर्गत भांडणे आरोप प्रत्यारोप. विकासक कुठला त्त्याचा वाद, दिली जाणारी प्रपोझल्स, काम पूर्ण होईल का याची साशंकता, बॅन्क गॅरेंटी, आमिषे (एक विकासक प्रत्येकाला फुकट एसी देण्याचे आश्वासन देतो, दुसरा विकासक फुकट स्मार्ट टीव्ही, तोही नेटफ्लिक्सच्या वर्गणीसह देऊ करतो. ही आमिषे अर्थात प्रातिनिधिक आहेत. ) , अशा विविध मुद्यांचा उहापोह मीटिंगमध्ये होतो. नाटक पाहणाऱ्या जवळपास प्रत्येक प्रेक्षकाला आपापल्या सोसायटीच्या पुनर्विकासाच्या आठवणी आल्यावाचून राहात नाहीत, हे या नाटकाचे मोठे यश आहे. पुनर्विकासासंदर्भात सतत बदलणा-या सरकारी नियमांमुळे आलेली अनिश्चितता आणि त्यामुळे नागरिकांचहोणारे हाल ह्या अत्यंत महत्वाच्या मुद्यावर प्रकाश टाकत नाटक संपते.. “लई नाई लई नाई मागणं देवा” ही प्रार्थना सर्व कलाकार गात असतात आणि ती प्रार्थना प्रेक्षकांचीसुद्धा होऊन जाते ही गोष्ट नाटकाचा प्रभाव अधोरेखित करते.

पुनर्विकासासारख्या विषयावर नाट्य सादर करणे हे काम सोपे नाही. कारण हा काही उगाच अंगविक्षेप करून अथवा अन्य नको ते उपाय करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रकार नाही. विषय नाजुक असल्याने रंगमंचावर ते उभे करणे हे तर अधिक कठीण आहे. श्रीनिवास नार्वेकर व अश्वजीत सावंतफुले यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी इतकी उत्तम सांभाळली आहे की हे नाटक प्रायोगिक न वाटता व्यावसायिक वाटते. त्यांनी निवडलेले सगळे कलाकार नाटकाला पूर्ण न्याय देतात. म्हणूनच नाटक अपील होते. गायन, संगीत, नृत्य, विनोद याचा सुंदर ताळमेळ साधत हे सादरीकरण सहजतेनं साकारलं जाते. नाटक विलेपार्ले उपनगराला डोळ्यासमोर ठेवून केलेले असले तरी अन्य ठिकाणी सादर करताना त्यात योग्य ते बदल करावे लागतील हे खरे असले तरी पुनर्विकासाचे मूळ प्रश्न सगळीकडे तेच असल्याने नाटकाचे अपील सार्वत्रिक आहे हे नक्की. जसजसे अधिक प्रयोग होतील तसतसा अधिक नेमकेपणा येईल. नाटकाच्या सुरुवातीच्या दहा पंधरा मिनिटांतच नाटकाने पकड घेतली तर अधिक चांगले होईल, असे मला वाटले. पण जसा पुनर्विकासाचा विषय येतो तसे लगेच नाटक आपल्याला कमालीचे गुंतवून ठेवते, हेही खरे आहे.
आज अनेक व्यावसायिक नाटकांनाही आर्थिक गणिते जुळवताना घाम फुटतो. अशा वेळी पुनर्विकास विषयावरच्या वेगळ्या प्रकारच्या नाटकासाठी आर्थिक जोखीम उचलून पुढाकार घेणे हे धाडस चांदेकरांनी केले आहे. त्यांचे आणि श्रीनिवास नार्वेकर व अश्वजीत सावंतफुले आणि त्यांच्या कलाकारांचे मनापासून अभिनंदन
Comments
Post a Comment