प्रकल्पांची खर्चवाढ टाळता येईल का ?
मुंबईतील वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचा खर्च ६७८८ कोटी रुपयांनी वाढला आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी ५०८ दिवसांची मुदतवाढ मिळाली ही सौरभ कुलश्रेष्ठ यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'मध्ये दिलेली बातमी वाचून खेद वाटला असला तरी अजिबात आश्चर्य वाटले नाही. हा खर्च आता ११,३३२ कोटींवरून १८,१२० कोटींवर गेला आहे. वांद्रे वर्सोवा सी लिंक रस्ता हा मरीन लाईन्स ते कांदिवली अशा रस्त्याचा एक भाग आहे. मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नातील एक भाग म्हणून याकडे पाहता येईल. वांद्रे वरळी सी लिंक २००९मध्ये पूर्ण झाल्यावर तेव्हाच्या काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने वरळी ते नरिमन पॉईंट आणि वांद्रे वर्सोवा असे दोन मार्ग उभारण्याचे ठरवले, परंतु दोन्ही पक्षातील मतभेदांमुळे पुढे काहीच झाले नाही. २०११ मध्ये वांद्रे वर्सोवा मार्ग मंजूर करण्यात आला. पण प्रत्यक्षात काम सुरु झाले नव्हते. २०१७मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरवले आणि एमएसआरडीसीला ७५०८ कोटींचा हा प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले. वर्षभरातच खर्चाचा आकडा वाढून ११,३३२ कोटींवर गेला. तोच आता सात वर्षांनी वाढून १...