धोनीला पर्याय आहे का?
'तुम्ही निवृत्त का होत नाही' यापेक्षा 'तुम्ही निवृत्त का होत आहात' असे लोकांनी विचारले तर ते अधिक चांगले, असे विख्यात क्रिकेटपटू विजय मर्चंट नेहमी म्हणत असत. अलीकडच्या काळात याचा जास्त प्रत्यय यायला लागला आहे. फक्त क्रिकेटपुरते बोलायचे तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि आता महेंद्रसिंग धोनी या तिघांबद्दलही हे प्रश्न वारंवार विचारले जाऊ लागले आहेत. गेल्या काही महिन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूप कमी दर्जाची होत आहे. मधूनच एखादी उत्तम खेळी केली की जणू 'माझ्यात अजून दम आहे' असे हे खेळाडू सांगतात. पण नंतर पुढचे अनेक डाव ते असफल होतात. खेळाडू मोठा असला तरी त्याची निवृत्ती कधी न कधीतरी होणारच हे गृहीत धरले पाहिजे . भारतीय क्रिकेट नियमक मंडळ किंवा तुमच्या आमच्यासारखे सामान्य क्रिकेटप्रेमी यांच्यापेक्षाही या खेळाडूंनी त्याची जाणीव जास्त ठेवली पाहिजे. पण ते प्रत्यक्षात होताना दिसत नाही. त्याचे उदाहरण म्हणजे हे तीनही खेळाडू असे म्हणायला हवे. या तिघातही महेंद्रसिंग धोनी हा 'चेन्नई सुपर किंग्ज' (सीएसके) संघाचा आधारस्तंभ. ...